“ज्याचा त्याचा राम”- प्रथम पारितोषिक विजेती कथा. लेखन- गौरव रत्नपारखी

एक

जे घडलं ते धक्कादायक होतं. मोहन गंगेच्या पात्राकडे नुसताच बघत उभा होता. आता कोणताही विचार, कसलाही कल्लोळ त्याला नको होता. डोकं इतकं जड पडलं होतं. तरीही अपमानाची वेदना मस्तकात घुमत होती. डोकं फुटून त्याच्या ठिकऱ्या उडतील तर बरं असं त्याला फार वाटलं. पण मरण इतकं सोपं नसतं. मोहनच्या डोळ्यात पाणी मात्र आलं नाही. सगळी आग आत कोंडून ठेवायची त्याला सवय होती.

तसा तो काही लेचपेचा नव्हता. स्वप्नांसाठी वेडं व्हावं, ती पूर्ण करावीत आणि उंची champagne सारखी ती धुंदी डोक्यात चढू द्यावी . त्यासाठी लढणारा, धडपडणारा तरुण होता.आजची धुंदी मात्र यशाची नव्हती. डोक्याला आलेला जडपणा ….केवढातरी संताप होता त्यामागे! अपमान, नालस्ती ,आरोप आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे आपल्याच बेजबाबदारपणामुळे झालेलं नुकसान त्याच्या सहन करण्यापलीकडे होतं.

गंगेचा घाट आता चांगलाच भरत चालला होता. आज रामनवमी…रामाचा रथ साऱ्या पंचवटीतून मिरवून मंदिरात जाणार! अक्षरशः मुंगी शिरायलाही जागा नसते. मोहन तीच संधी साधणार होता. इतक्या गर्दीत एखाददुसरा पाण्यात घसरून पडणारच. गदारोळात कुणाच्या लक्षातदेखील यायचं नाही. समोरचं पात्र पाहून त्याला वाटलं…द्यावं झोकून आत! एव्हाना मिरवणुकीची धामधूम सुरू झाली होती. त्या गर्दीकडे पाहून मोहनला कीव वाटली. यांचा राम असलं काय करत असेल की हे लोक बेभान होऊन त्याच्यासाठी नाचत सुटलेत! तसा तो अगदीच काही नास्तिक नव्हता…पण जग माणसाच्या मनातल्या दयेवर नाही तर त्याच्या मनगटातल्या ताकदीवर चालतं ह्यावर त्याचा ठाम विश्वास होता. विश्वास….ह्या विश्वासानेच मोहनचा घात केला होता. त्या रात्री केबिन बंद केलीय हा विश्वास नसता तर त्याने एकदा जाऊन तपासलं असतं. पण आपला गाफीलपणा अपल्यासकट किती जणांना घेऊन बुडणार हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं…नाहीतर…जर आणि तर ला आता काय अर्थ होता? त्या रात्री पासवर्ड चोरी झाला आणि सगळ्यात मोठा कोड competitor च्या हातात गेला! कम्पनीचं करोडोंचं नुकसान झालं! मार्केट मध्ये बदनामी झाली ती वेगळीच! नाहीतरी Games and application industry मध्ये competitors काही कमी नसतात. विदेशी कंपन्यांच्या नाकावर टीच्चून मोहन आणि त्याच्या टीमने पहिलं गेम ऍप्लिकेशन तयार केलं होतं. पण लॉन्च करायच्या अठ्ठेचाळीस तास आधीच कोड चोरी झाला ! मोठमोठे war games फिके पडतील आणि चीनची ह्या क्षेत्रातली सद्दी संपेल म्हणून भारतातले कित्येक developers ह्या एप्लिकेशन कडे आशेने बघत होते. पण लॉंचिंग च्या दोन दिवस आधीच विदेशी कंपनीने सेम application बाजारात आणलं. नावीन्य सम्पलं! कोड चोरला गेलाय हे सरळसरळ दिसत असूनही सिद्ध करणं शक्य नव्हतं. मोहन लबाडी करणार नाही हे मालकाला ठाऊक होतं म्हणून…नाहीतर त्याला जेलची हवा खायला पाठवणं कंपनीला कठीण नव्हतं! तरीसुद्धा बेजबाबदारपणाचा आरोप ठेऊन त्याच्यासकट त्याच्या जिवलग मित्रालाही कंपनीने नारळ दिला होता. त्याला स्वतःबद्दल फार नाही पण सुजय बद्दल मात्र मनापासून वाईट वाटत होतं. मोहन सडे फटींग असला तरी सुजयला कुटुंब पोसायचं होतं. आधीच परिस्थिती बेतास बेत…त्यात त्याची लहानगी मिनू आजारी होती. तिच्या ट्रीटमेंट साठी खर्च वेगळाच! आता तर मोहनमुळे सुजयची नोकरी गेली होती! हे मोहनसाठी असह्य होतं! अपराधीपणाची भावना भयंकर असते! आज तो स्वतःसोबत ती भावना सम्पवणार होता! गंगेच्या काळ्याशार पात्राकडे बघून त्याने डोळे मिटले….आणि दुसऱ्या क्षणी आत उडी घेतली!

दोन

महेश पार वैतागला होता. एकतर त्याला भारतात येऊन दोन महिने होत आले होते. एव्हाना अमेरिकेत परतून प्रॅक्टिस सुरू झालीसुद्धा असती ही खंत त्याला छळत होती. पण त्याच्या वडिलांना – मनोहररावांना हजारदा समजावूनही त्यांचं आपलं एकच – ‘आपल्या देशात चांगल्या हुशार डॉक्टरांची फार कमतरता आहे! मेडिकल प्रोफेशन हा काही धंदा नाही! तू इथेच प्रॅक्टिस कर!’ अर्थात अमेरिकेत शिकायला जायच्या आधीच मनोहररावांनी त्याला हे समजावलं होतं- ‘बाळ, आपल्या निमशहरी भागात सुसज्ज आणि तज्ञ डॉक्टर असलेलं एकतरी रुग्णालय असायला हवंच! म्हणून तुला तिकडे शिकायला पाठवतोय. आपल्या मातीचे उपकार विसरू नकोस! परत आल्यावर आपल्या माणसांसाठी झटून काम कर!’

अर्थात महेश सुद्धा तेव्हा ‘हो’ म्हणाला होता. पण पुढे जाऊन पाश्चात्य संस्कृतीचा असा काही पगडा बसला , की तो देशाला विसरला! पण अमेरिकेत परत जाण्यासाठी तेवढंच एक कारण नव्हतं! मानसी वर त्याचं मनापासून प्रेम होतं! ती म्हणायला भारतीय असली तरी अमेरिकेत जन्मलेली , तिथेच वाढलेली तिकडच्या वळणाची मुलगी होती! महेशच्या हट्टाखातर ती सात आठ दिवस भारतात आली खरी ; पण जाताना तिने त्याला स्पष्ट सांगितलं होतं – “माझ्याशी लग्न करायचं असेल तर अमेरीकेत सेटल हो! तुझ्या तिसऱ्या जगातल्या देशात मी राहणार नाही!”

पप्पाना कित्येकदा सांगूनही ते ऐकणार नव्हते! आज त्याला बळजबरीने रामाच्या दर्शनाला आणलं होतं…काय तर म्हणे रामाच्या पायाशी डोकं ठेवलं की सुधारशील!

महेश वैतागून मंदिराबाहेर घाटावर आला. रात्र असली तरी गंगेचं पात्रं झगमगत होतं. रामाचा रथ सजवला जात होता. सगळ्या वातावरणात धूप आणि दिव्यांच्या तेलाचा सुगन्ध होता. लोक भक्तिभावाने रथ ओढत होते. रामाची पायधूळ कपाळाला लावून धन्य होत होते. इतक्यात महेशला बऱ्याच दूरवर कुणीतरी उभं दिसलं. हा माणूस अशी मिरवणूक सोडून घाटाशी काय करतोय ते दिसतही नव्हतं. मिरवणूक पुढे सरकली. आता घाट मोकळा मोकळा होत होता.

अगदी पापणी लवते इतक्यात ते घडलं. त्या माणसाने नदीच्या खोल कुंडात उडी घेतली!

तीन

सुजयला आता आपल्या चिमुरड्या पोरीकडे पाहवेना! बिचारी मिनू अंथरुणावर तळमळत होती. गेले तीन महिने तिची प्रकृती खालावतच चालली होती.

फारशी चांगली नाही तरी बरी म्हणता येईल अशी सुजयच्या कुटुंबाची अवस्था होती. तो, बायको गीता आणि आठ वर्षांची लहानगी मिनू असं त्रिकोणी कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं. तीन महिन्यांपूर्वी मिनूला श्वास घ्यायला अचानक त्रास व्हायला लागला. आधी किरकोळ वाटलेलं दुखणं वाढलं. तरीही सुजय जमेल तितकं करत होता . पण आता डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं होतं – तातडीने ऑपरेशन करावं लागणार! नाहीतर फुफ्फुसे निकामी सुद्धा होऊ शकत होती!

सुजय कोलमडलाच! मिनूची काया दिवसेंदिवस फिकी पडत होती. ऑपरेशनचा निर्णय तातडीने घ्यावा लागणार होता! पण इतके पैसे आणायचे कुठून??

आणि मग तो फोन आला होता! थोडेथोडके नाही…तब्बल दहा लाख द्यायला समोरची कम्पनी तयार होती! काम एकच! सध्या चालू असलेल्या game application चा कोड चोरायचा! स्पष्ट नकार दिला सुजयने! पण त्या रात्री मिनूची तब्येत अजूनच खालावली! तिच्या तोंडून अस्फुट उमटणारी “बाबा” ची हाक सुजयला ऐकवेना! तिच्या डोळ्यांत केवढा विश्वास होता! आपला बाबा आपल्याला लवकर बरं करेल !

बस्स! ठरवलं त्याने! कोड सेव्ह केलेल्या device चा पासवर्ड टीम लीडर म्हणून फक्त मोहनकडे होता! मोहन नको म्हणत असताना मैत्रीची शपथ देत चिक्कार दारू पाजली त्याला! दारूच्या नशेत मोहन काहीतरी बरळला! सुजयचं काम झालं! मोहनच्या गलथानपणापायी कोड चोरीला गेला अशी सगळ्यांची समजूत झाली! मोहन सोबत सुजयचाही जॉब गेला पण त्यावेळी त्याला फक्त मिनू समोर दिसत होती! पैसे मिळवायलाच हवे होते!

सुजयला पैसे मिळाले खरे ; पण आज मिनूची तब्येत अचानक बिघडली! परवा करायचं ते ऑपरेशन आजच करायला हवं होतं! रामनवमी मुळे रस्ते माणसांनी भरून गेले होते. Ambulance ला फोन करून तास उलटला होता. शिवाय इतक्या तातडीच्या नोटीस वर मुंबईहून येणारे डॉक्टर पोचणं कठीणच होतं!

सुजय हताशपणे आपल्या पोरीकडे बघत होता. गॅलरीतून खाली रामाचा रथ चालला होता. सुजयने डोळ्यातलं पाणी लपवत हात जोडले! ‘देवा…वाचव लेकीला!’

त्याक्षणी त्याला काय वाटलं कुणास ठाऊक…पण त्याचं पापभिरू मन खायला उठलं! आपण वागलो ते योग्य नाही! माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलीला मिळता कामा नये!

सुजयने लॅपटॉप काढला…मालकांना- मनोहररावांना मेल लिहिला! आणि सोबतच फोन उचलून मोहनचा नंबर डायल केला!

चार

महेशने मोहनला बाहेर काढलं तेव्हा तो थोडाफार शुद्धीवर होता.

” Are you alright young man?”

“Yes..”

” उडीच घेतलीत! मरायचं होतं की काय?”

“होय!”

महेश चिडून काहीतरी बोलणार होता इतक्यात मोहनचा मोबाईल वाजला. पाण्यात पडूनही फोन चालू कसा ते मोहनला कळेना!

“हॅलो मोहन …मी सुजय..”

” अं… बोल”

त्यापुढे सुजयने सगळी कबुली दिली.

” मोहन मी सगळं सरांना सांगितलंय…तुझी चूक नाही! ”

मोहनला काय बोलावं कळेना.

पण वेळ अटीतटीची होती. सुजयला शिव्या नन्तर घालता आल्या असत्या पण आधी मिनूला वाचवणं आवश्यक होतं!

मोहन महेशकडे वळला.

” हे पहा…तुम्ही मला वाचवून एकदा उपकार केलेत. माझी अजून एकदा मदत करा फक्त! तुमच्याकडे गाडी आहे का ? It’s a medical emergency!”

“You are one lucky basterd!”

“म्हणजे?”

“मी डॉक्टर आहे!”

मोहनच्या मनातलं गिल्ट गेलं होतं. त्याला अचानक मोकळं झाल्यासारखं वाटलं! पण तरी त्याची मेहनत आणि कम्पनी चं नाव मात्र गेलंच! ज्या war game च्या concept साठी त्याने गेले सहा महिने रात्रंदिवस काम केलं होतं ती concept सुद्धा गेली! शिवाय नोकरी परत मिळेल की नाही ही एक विवंचना होतीच! महेश ची गाडी गर्दी शिताफीने कापत चालली होती. गुलाल उधळला जात होता . कोदण्डधारी राम रथात उभे होते…त्यांची ती तेजस्वी मूर्ती पाहुन मोहनला वाटलं…राम खरंच होता की नाही कुणास ठाऊक …पण आपण screen वर लढतो तश्या कित्येक लढाया रामाने लढल्या असतील…त्या आजकालच्या पोरांना ठाऊक तरी असतील का?

आणि तेव्हा त्याच्या डोक्यात वीज चमकली! एकटा असता तर तो ‘युरेका युरेका’ करत नाचलाच असता! जी concept शोधत तो जंग जंग पछाडत होता ती तर लहानपणापासून त्याच्या समोरच होती! रामयणापेक्षा मोठी ‘war concept’ काय असणार होती? Pubg आणि shadow fight च्या तोंडात मारेल असा गेम तो आता डेव्हलप करणार होता!!

सुजयकडे पोचताच महेशने मिनूला तपासले. अवस्था नाजूक होती. ऑक्सिजन कमी पडल्याने तिची नखे आता निळसर दिसायला लागली होती.

यानंतरची सूत्रे महेशने भराभर हलवली! मिनूला गाडीत टाकून स्वतःच्या ओळखीने ऍडमिट केलं. लगेचच ऑपरेशन करायला घेतलं.

मनोहरराव हॉस्पिटलात पोचेपर्यंत ऑपरेशन झालं होतं. मिनू बेशुद्ध असली तरी धोका टळला होता!

महेशला मिनूत त्याचा राम सापडला होता…आपली खरी गरज इथेच आहे हे जाणवल्याने त्याने अमेरिका वगैरे विसरायचं ठरवलं !

ह्या आनंदाच्या भरात मनोहररावांनी मोहन आणि सुजयला माफ केलं. मोहनची कल्पना आवडून ‘Project Ramayana’ साठी त्यांनी ग्रीन सिग्नल दिला! मोहनला त्याचा राम त्याच्या कामात गवसला होता!

एव्हाना रामाचा रथ मंदिरापर्यंत आला होता! पोरं मिरवणुकीत बेभान होवून नाचत होती ! डीजे गात होता…

कब कब ये आये..

तब तब ये आये..

जब जब ये दुनिया इन को पुकारी!

रामजी की निकली सवारी!

रामजी की लीला है न्यारी!!

Image by Free-Photos from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

15 thoughts on ““ज्याचा त्याचा राम”- प्रथम पारितोषिक विजेती कथा. लेखन- गौरव रत्नपारखी

  • June 4, 2021 at 7:07 am
    Permalink

    अप्रतीम! ही कथा निश्चितच प्रथम क्रमांकाची जाणवते! अभिनंदन, गौरव!!

    Reply
  • June 4, 2021 at 11:03 am
    Permalink

    अभिनंदन. सुरेख कथा.

    Reply
  • June 4, 2021 at 11:47 am
    Permalink

    खूप सुंदर कथा आणि concept

    Reply
    • June 4, 2021 at 8:28 pm
      Permalink

      सुंदर कथा!

      Reply
  • June 4, 2021 at 12:48 pm
    Permalink

    खूप छान कथा आहे.👍 उतार चढाव, ट्विस्ट अगदी मस्त. अभिनंदन गौरव रत्नपारखी.

    Reply
  • June 4, 2021 at 7:21 pm
    Permalink

    कथा आवडली. छान जमून आली आहे!

    Reply
  • June 4, 2021 at 7:53 pm
    Permalink

    खूप सुंदर .. concept पण किती छान आहे…

    Reply
  • June 8, 2021 at 3:12 pm
    Permalink

    खुप सुंदर

    Reply
  • June 9, 2021 at 7:11 am
    Permalink

    kathe madhali sagali valane sundar ! APratim !

    Reply
    • June 10, 2021 at 6:10 pm
      Permalink

      खूप सुंदर.

      Reply
  • June 17, 2021 at 5:53 pm
    Permalink

    कथा आवडली

    Reply
  • July 2, 2021 at 7:16 am
    Permalink

    Amazing story – No doubt – No.1 Winning Story !!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!