अतर्क्य- द्वितीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- अर्चना कुलकर्णी
डॅा. राहुल ची नजर राहुन राहुन त्या दोन बेडकडे जात होती. पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यापासुन सगळेच बदलून गेले होते. संक्रमित लोक आणले जात होते त्यातले काही बरे होऊन घरी जात होते तर काहींच्या नशीबी पुन्हा घर बघायचं नसायचं. गेल्या दहा दिवसांपासुंन ते दोघं त्या दोन बेडवर होते. त्यांना तिथे बघायची त्याला सवय लागली होती.
दहा दिवसांपुर्वीची गोष्ट, त्या आजीआजोबांना एकत्रच या कोरोना आयसोलेशन वॅार्डमधे आणण्यात आलं होतं. एरवीही इथे येणारा रुग्ण एकटाच येतो.घरच्यांना सोबत येता येत नाही. पण यांच्या बाबतीत त्याच्या कानावर आलं होतं की इथे त्यांच्यासोबत कोणी राहात नाही. त्यांना एकच मुलगा आहे आणि तो ही अमेरीकेत असतो. आणि जरी तो इथे असला असता असता तरी सोबत येउ शकला नसताच. इथे ही ते दोघे एकमेकांना सोबत आहेत हेच विशेष. या आजीआजोबांच्या फॅमिली डॅाक्टरांनी त्यांना इथे पोचवण्याची सोय केली होती जेव्हा त्यांना या दोघांच्या कोरोना बाधीत होण्याची खात्री झाली होती. त्यांनाही राहुन राहुन आश्चर्यही वाटत होतं की हे वृद्ध जोडपं कधी आणि कसं कोणाच्या संपर्कात आलं आणि बाधीत झालं असावं?
आजीआजोबांना कोव्हीड सेंटरला आणलं तेव्हा त्यांची परीस्थीती बरीच खालावलेली होती.एकतर त्यांचं वय आणि त्यांचे इतर क्रॅानिक आजार. त्यातल्या त्यात आजींना फक्त बीपी चा त्रास होता मात्र आजोबा चांगलेच आजार समृद्ध दिसत होते हे डॅा.राहुलला त्याच्या फाईलकडे बघतांनाच लक्षात आले होते. त्यांच्या फॅमीली डॅाक्टरांनी त्यांची फाईल व्यवस्थीत तयार केलेली दिसत होती आणि आजी-आजोबंनीपण ती व्यवस्थीत सांभाळलेली लक्षात येत होती.आजोबांनी रक्तदाब, मधुमेह, संधीवात ह्रदयरोग सगळ्यांना आपलसं केलं होतं. थोडे सावरल्यावर त्याने आजोबांना कोरोनाची लागण कशी झाली असावी याबद्दल विचारले पण त्यांना काही सांगता येईना की ते सांगायचं टाळताहेत अशी शंका त्याला चाटुन गेली.ते कोठे बाहेर जात नसत. त्यांच्या अमेरीकेतल्या मुलाने त्यांना घरपोच सगळे मिळेल याची उत्तम सोय लावली होती.जेव्हा जेव्हा तो आजोबांच्या बेडजवळ जाई तेव्हा तो जाणुन घ्यायचा प्रयत्न करत असे पण उत्तरादाखल आजोबा फक्त स्माईल देत. आजींची तर प्रकृती घाबरल्यामुळेच जास्त खालावली होती. त्या एक शब्दही न बोलता जेवढा वेळ जाग्या असायच्या तेव्हा फक्त मान वाकडी करुन आजोबांकडे बघत राहायच्या. चेहरा निर्वीकार दिसत असला तरी अश्रुंनी उशी भिजत राहायची. आजोबा मग हात लांब करुन आजींच्या हातावर थोपटल्यासारखे करत. त्यासाठी ते बेडच्या एवढे काठाला येत की ड्युटीवरची सिस्टर त्यांच्यावर कधीकधी रागवायची पण तिलाही मनातुन या जोडीची गंमतंच वाटत असावी कारण तीने वॅार्डबॅायला सांगुन आजोबांचा बेड थोडा आजींच्या बेडजवळ सरकवुन घेतला होता.
डॅा.राहुलला तीथे असेपर्यंत जरासुद्धा मोकळा वेळ मिळत नव्हता.त्याच्या खुर्चीवरुन आजोबांचा बेड स्पष्ट दिसायचा.जेवढा वेळ तो खुर्चीत असायचा त्याची राहुन राहुन नजर त्यांच्याकडे जाइ आणि त्यांच्या स्माईल माधे काहीतरी गुढ अर्थ आहे असे त्याला वाटत राही. चार पाच दिवस असेच गेले. त्या दिवशी जेव्हा तो आला तेव्हा धावपळ सुरुच होती. आज अजुन दोन पेशंट सकाळीच आणण्यात आले होते. रात्रीचे डॅा. मनोज उपचार करत होते. डॅा.राहुल पीपीइ कीट घालुन तयार झाला तेवढ्यात त्याच्या कानावर वॅार्डबॅाय गणेशचे बोलणे पडले. सोबतच्या रमणला तो म्हणत होता अरे, बघ हे तेच आजोबा आहेत ना रे ?जे रोज आवारात येउन उभे राहायचे आणि आलेल्या प्रत्येक पेशंटच्या जवळ जाउन त्यांना हात लावायचे.सांगत होतो त्यांना येउ नका आजारी पडाल म्हणुन, बघ झालं शेवटी तसंच.
ऐकलं राहुलने पण वेळ नव्हता उहापोह करत बसायला. डॅा.मनोज पीपीई कीटमधे अवघडुन गेला असेल बिचारा.त्याला लवकर सोडवायला पाहिजे.
डॅा.राहुल कामाला लागला दुपारपर्यंत त्याला सवडंच मिळाली नाही विचार करायला. मध्यंतरी दोनतीन वेळेस तो इतर पेशंटप्रमाणे आजीआजोबांच्या बेडवळही जाउन आला होता. तेव्हा त्याने काही गोष्टींची नोंद केली होती. आजी होत्या सत्तरीच्या थोड्या पुढे आणि आजोबांची मात्र पंचाहत्तरी पार झालि होती. वैद्दृयकियदृष्ट्या आजोबांची परिस्थीती फारंच नाजुक होती.त्यांना आधीपासुनंच बऱ्याच व्याधी ,होत्या सगळे रिपोर्ट्स गडबड दाखवंत होते. प्रत्यक्षात मात्र आजी कोसळल्यात जमा होत्या. घसरलेल्या ॲाक्सीजन लेव्हलने धोक्याची घंटा वाजवयला सुरुवात केली होतीच. त्या उपचारांना प्रतिसाद देत नव्हत्या. आजोबा मात्र कोणत्यातरी आंतरीक शक्तींच्या बळावर आजारावर काबु ठेउन असावेत असं राहुन राहुन त्याच्या मनांत येत राही.आजोबांचा अमेरीकेतला मुलगा नियमीतपणे फोन करायचा डॅाक्टरांच्या सोईने, वेळ मिळेल तेव्हा तो डॅाक्टरांशीही बोलायचा. विमानसेवा बंद असल्यामुळे तो येउ शकत नव्हता, पण वाटेल ते करा कितीही खर्च आला तरी चालेल पण माझ्या आईवडलांना वाचवा म्हणुन आर्जवं करत होता. एकदा का यातुन बरे झाले की मी त्यांचे काहीही न ऐकता त्यांना सोबतंच घेउन जाणार आहे म्हणत होता. सगळेच परिस्थीतीपुढे आगतीक झाले होते.डॅा. राहुलसुद्धातर कित्येक दिवस घरी जायचं टाळायचाच ना घरी वृद्ध आईवडील आजीआणि लहान मुलगी आहेत म्हणुन.
त्यादिवशी त्याची रात्रीही शिफ्ट होती. दोन ज्युनिअर डॅाक्टर्सना कोरोनाचं निदान झाल्यामुळे उरलेल्यांवर कामाचा ताण वाढला होता. तशी सगळीकडे सामसुम होती. पेशंटना लावलेल्या मॅानिटर्सचे लयबद्ध बिपबिपचे आवाज सोडले तर कुठे फारशी हालचाल नव्हती. थकलेल्या सिस्टर्सपण टेबलवर डोकं टेकवुन सावध विश्रांती घेत होत्या. एक राउंड घ्यावा म्हणुन राहुल एकएक पेशंट नजरेखालुन घालत आजोबांच्या बेडजवळ पोचला. आजोबा टक्क जागे होते एकटक आजींकडे बघत पडुन होते. तो जवळ गेला तशी त्याच्या चाहुलिने त्यांनी वळुन बघितले. आजींना झोप लागली असावी. खोल गेलेल्या आवाजात आजोबांनी विचारलं,”ही”, कशी आहे डॅाक्टर?
तो काही बोलला नाही त्याने फक्त आजोबांचा हात आपल्या ग्लोव्ह्स घातलेल्या हातात घेतला नी थोपटल्यासारखे केले. बोलण्यासारखं काही नव्हतंच त्याच्याकडे आणि सत्य एवढं स्पष्ट होतं की खोटं बोलण्याची केविलवाणी धडपड ही त्याच्याच्याने करवली गेली नाही. कोणत्याही उपचारांना त्यांची वृद्ध शरीरं साथ देत नव्हती. त्याला शांत उभं राहीलेलं बघुन आजोबाच म्हणाले “बेटा, तु काही बोलला नाहीस तरी मला कळतंय, फक्त एवढंच वाटतं की माझ्या मागे हिने राहु नये.”बराच वेळ त्याला काय बोलावे सुचत नव्हते पण तिथुन पाय ही निघत नव्हता. त्या दोधांबद्दल काही वेगळ्याच प्रकारच्या भावना त्याच्या मनात तयार होत होत्या.
थोड्या वेळाने त्यानी विचारले आजोबा,मला एका गोष्टीचं नवल वाटतंय की घरात राहुन तुम्हा दोधांना लागण झाली तरी कशी? उत्तरादाखल आजोबा फक्त क्षीणसे हसले. तेच त्यांचं गुढ स्माईल त्याला पुन्हा जाणवले. तुम्हा दोघांपैकी कोणाला पहिल्यांदा लक्षणं जाणवली? त्याने विचारले. “मलाच”, आजोबा म्हणाले, पण लगेच गडबडीने म्हणाले, म्हणजे तसा दोघांनाही एकदाच झाला रे. आणि त्यांनी डोळे मिटून घेतले. तेवढे बोलण्याचे श्रमही त्यांच्यासाठी जास्त होते. राहुलने मग विषय वाढवला नाही. तो आपल्या खुर्चीत जाउन बसला. अजुन पुर्ण रात्र जायची होती. घड्याळाचा काटा हळुहळु पुढे सरकत होता. मध्यरात्री एका व्हेंटीलेटर वरच्या पेशंटला बाहेर काढावे लागले. लगेचच तो बेड सॅनिटाइझ करुन ठेवायला सांगुन तो वळतो तोच दुसरा एक पेशंट अत्यवस्थ झालाय असे सिस्टर सांगत आली. त्या आजीच होत्या.त्यांना श्वास घेणं जवळपास अशक्यच होत होतं. धावाधाव सुरु झाली. जे जे करणे शक्य आहे ते सर्व प्रयत्न सुरु होते. तेवढ्यातही आजींनी आपला हात आजोबांच्या दिशेने लांबवला. आजोबाही हात लांबवुन तो हातात घेण्याचे प्रयत्न करत होते पण पोचत नव्हता. डॅा. राहुलच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्याने हळुच आजोबांचा बेड थोडा आजींच्या बेडकडे ओढला. आजोबाही प्रयत्नपुर्वक एका कुशीवर वळले. त्यांनी आजींचा हात आपल्या दोन्ही हातात पकडला नी आश्वासक पणे थोपटल्यासारखे केले. काहीच क्षण….. आणि आजींनी प्रवास थांबवला… एवढा अनुभवी डॅाक्टर असुनही त्याच्या अंगावर सरसरुन काटा आला. त्याने वळुन आजोबांकडे बघीतले क्षणभर नजरानजर झाली त्याला पुन्हा तेच गुढ हास्य त्यांच्या चेहऱ्यावर जाणवलं. तो सुन्न झाला होता. काही निर्णयापर्यंत तो पोचेपर्यंत आजोबांची मान एका बाजुला कलली. तो दचकलाच. त्याने शक्य तेवढ्या घाईने हालचाली केल्या पण आजोबा केव्हाच आजींमागे निघुन गेले होते हे जग सोडुन. अजुनही त्यांचा हात मात्र तिथेच होता…… आजींच्या हातात……
सुन्न मनानी तो आपल्या जागेवर येउन बसला. स्टाफ पुढच्या तयारीला लागला होता. त्यांच्या मुलाला हॅास्पीटलकडून कळवले गेले.एकदा आजोबांचा फोन लागत नव्हता तेव्हा त्याने आपल्या फोनवरुन त्यांचे बोलणे करुन दिले होते त्यामुळे त्याच्याजवळ नंबर होताच तेव्हा त्याने स्वत: फोन करुन त्याला माहिती दिली. हुंदक्याशीवाय काही बोलणं झालेच नाही.त्याच्या एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टीस मधे फार कमी वेळा फेशंटशी अशा भावनिक गुंतवणुकीचे प्रसंग त्याने अनुभवले होते. तसा तो स्वत: ला अलिप्त ठेवत असे. आज मात्र तो हेलावुन गेला होता. आज त्याने ड्युटी संपल्यावर बऱ्याच दिवसांनतर घरी जायचे ठरवले. तो रोज घरी जायचं टाळत होता. तिथेच स्टाफ क्वार्टर मधे मुक्काम करत होता कारण त्याच्या घरी त्याच्या आई वडलांशीवाय त्याची पंच्यांशीच्या पुढची लाडकी आजी आणि त्याच्या काळजाचा तुकडा असलेली त्याची पाच वर्षांची लेक होती.
घरी गेल्याबरोबर त्याने आधी बाथरूम गाठलं. गरम पाण्याने स्नान केले. आईने त्याच्या आवडीचे पिठलंभात केले होते. तो नेहमीसारखा जेवत नव्हता पण आईने त्याला हटकले नाही. त्याची बायकोही तीन दिवसांपासुन घरी आली नव्हती. बिचारी थकली असेल ती पण ,त्याच्या मनांत तीची काळजी दाटून आली. मुलीजवळ जायचं पण त्याने टाळले. ती झोपली होती ते बरंच झालं नाहीतर तिला दुर ठेवणे कठीण होतं. प्रचंड थकव्यामुळे तो लगेच झोपी गेला.
सकाळी उठून कॅाफी घेताघेता त्याला वडिलांनी लावलेल्या टीव्हीवरच्या बातम्या कानावर पडत होत्या. ब्रेकींग न्युज मधे कालच्या आजीआजोबांची बातमी सांगितली जात होती. कसे काही मिनीटांच्या अंतराने हातात हात घेउन त्यांनी एकत्रच या जगाचा निरोप घेतला वगैरे वगैरे. सगळे हळहळ व्यक्त करत होते. त्याला अचानक आठवलं की वॅार्डबॅाय गणेश रमणला आजीआजोबांबद्दल काहीतरी बोलला होता. तो ताड्कन उठलाच आईला सांगुन गाडी काढुन निघालादेखील. हॅास्पीटलसमोर गाडी पार्क करतानाच त्याला रमण दिसला. त्यानी त्याला गणेशला घेउन आत यायला सांगितले आणि केबीनमधे जाऊन बसला. थोड्याच वेळात रमण गणेशला घेउन रुममधे आला. त्यांनी आजोबांबद्दल जे सांगितले ते ऐकुन तो अजुनंच बुचकळ्यात पडला. त्यांनी सांगितले की इथे ॲडमीट होण्याच्या काही दिवस आधी आजोबा या कोव्हीड सेंटरच्या परिसरांत येउन जात होते. आम्ही पेशंटला ॲंब्युलंसमधुन काढतांना तर ते एवढे जवळ यायचे की आम्ही त्यांना सांगत होतो की आजोबा , आजारी पडाल घरात रहा इकडे येउ नका,तर ते वेगळेच हसून निघुन जायचे.
जे ऐकले ते अतर्क्य होतं. राहुलने त्या दोघांना जायला सांगितलं. डोळे मिटून राहुल मान मागे टाकून खुर्चीत टेकुन बसला. त्याच्या मिटल्या डोळ्यांपुढे आता सगळ्या प्रसंगांचे तुकडे एकत्र जोडले जाऊन एक स्पष्ट चित्र ऊभे राहिले. आजोबांनी हॅास्पिटलला येउन आजारपण ओढवून घेतलं होतं, आपल्यावर आणि आपल्या बायकोवर. पण का? कशासाठी?आणि केवढी जबरदस्त ईच्छाशक्ती की आपल्यामागे आपल्या बायकोने एकटं पडु नये. त्याच्या मिटल्या डोळ्यातुन त्याच्याही नकळत दोन अश्रु ओघळले.
काळ कोणासाठी थांबत नाही. तसा तो आताही गेलाच. कोरोनाची साथ जाऊनही बरेच दिवस झाले. हळुहळु सगळं पुर्ववत होऊ लागले होतं. आज सुट्टी असल्यामुळे थोडा उशिराने उठला होता तो. कॅाफीचा मग घेउन बागेत येउन बसला होता. तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली , नंबर अनोळखी होता तरी असेल एखादा अडचणीतला पेशंट म्हणुन त्याने फोन घेतला. पलिकडच्या व्यक्तीने विचारले आपण डॅाक्टर राहुल जोशी ना? तुम्ही मला कदाचित ओळखणार नाही, पण आपण मागच्या वर्षी फोनवर बोललो आहोत. आपण माझ्या आईवडीलांवर कोरोना काळात उपचार केले होते. तरीही त्याच्या काही लक्षात येत नव्हतं. तेव्हा पलिकडची व्यक्ती म्हणाली बराच काळ उलटलाय. माझे आईवडील दत्तात्रय दाते आणि मालती दाते यांच्यावर तुम्हीच उपचार केले होते दुर्दैवाने ते वाचु शकले नाही पण तुम्ही त्यांच्यासाठी खुप काही केलंय. माझ्याशी बोलतांना त्ते तुमचं खुप कौतुक करायचे.
अच्छा,म्हणजे तुम्ही अनिरुद्ध दाते का? सद्ध्या कोठे आहात ?
अनिरुद्ध म्हणाला, मी दोन दिवसांपूर्वीच भारतात आलोय. तेव्हापासुन इथलं घर तसंच पडलं होतं. त्याचीही व्यवस्था लावणे भाग होतं. अशाप्रकारे इथे यावं लागेल त्यांच्यामागे असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते,बोलताबोलता त्याचा गळा दाटून आला. काही क्षणांच्या शांततेनंतर तोच पुढे म्हणाला,सकाळी सकाळी तुम्हाला फोन करुन त्रास देतोय पण आज तुम्हाला सुट्टी असेल तर तुमचा थोडा वेळ हवा होता. भेटायचे होते तुम्हाला, तुमच्या सवडीने कोणतीही वेळ सांगा , मी येईन. राहुललाही कुतुहल होतंच आजीआजोबांबद्दल तो म्हणाला, मग आत्ताच या ना आपण मिळुन नाष्टा करु माझ्याकडे. अनिरुद्धने अर्ध्या तासात पोचतो असे सांगितले आणि फोन ठेवला. राहुलही कॅाफी संपवुन लगेच आवरायला उठला.
नऊ वाजता अनिरुद्ध पोचला. उंच रुबाबदार पाहताक्षणी व्यक्तीमत्वाची छाप पडेल असा. राहुलने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला हसुन म्हणाला कोव्हीडची साथ जाउन एवढे दिवस झाले तरी कोणाशी हात मिळवतांना अजुनही क्षणभर विचार करतोच. या ना. बसा.
थोडावेळ हवापाण्याचे बोलणे झाल्यावरराहुल ने विचारले , अजुन किती दिवस मुक्काम आहे ईथे तुमचा?
तसं तर तीन आठवड्याचा वेळ काढुन आलो होतो मी इथे.इकडचे सगळे कामं मार्गी लावायला . बाबा सगळं बघत होते आधी. पण आल्यापासून त्या घरात मला आता थांबवंस वाटत नाहीय जीथे आता आई-बाबा नाहीत. खरं तर मी त्यांना तिकडेच येउन रहा म्हणुन सांगत होतो.
राहुल म्हणाला, मला माझ्या हॅास्पीटल स्टाफकडुन ज्या गोष्टी समजल्या त्यावरुन लक्षात येतं की हे आजारपण त्यांनी प्लॅन करुन ओढवुन घेतलं होतं. पण त्यांना असं का करावसं वाटलं असावं या विचारांनी मी अजुनही अस्वस्थ होतो. त्यामुळे तुम्ही आल्याचं कळलं तेव्हा मलाही बरच वाटलं.
“हो ना, म्हणुनच तर भेटायला आलो मी तुम्हाला”.
आज मला काही सांगायचं आहे. “मला इथे आल्यावर बाबांच्या खोलीत त्यांच्या टेबलवर त्यांनी लिहुन ठेवलेली चिठ्ठी मिळाली. त्यांच्या डायरीखाली ,मला दिसेल अशी ठेवलेली. चिठ्ठी कसली मोठ्ठं पत्रच आहे ते. थोडक्यात सांगतो तुम्हाला डॅाक्टर”.
माझे आईबाबा ईथे पुण्यात राहत होते.तसे आधीपासुनंच ते आमच्या इथल्या बंगल्यातंच राहत होते त्यामुळे त्यांना इथे करमायचे. अधुनमधुन अमेरीकेत आले तरी चार पाच महिन्यातच त्यांना पुण्याचे वेध लागायचे. सुरुवातीला मलाही काही वाटंत नव्हतं जोपर्यंत त्यांच्या प्रकृतीच्या काही समस्या नव्हत्या. मात्र गेल्या चारेक वर्षांपासुन आईला अल्झायमर झाल्याचं निदान झालं आणि झपाट्याने तो बळावत गेला.बाबांना तसे आधीपासुन बरेच त्रास होतेच.त्यात ते तिकडे यायला तयार नव्हते. आम्ही दोघेही दिवसभर ॲाफीसमधे असतो. माझा मोठा बंगला आहे तिथे ,पण दिवसभर त्यांना एकटं वाटायचं. आम्हाला मुलं नाहीत त्यामुळे त्यांचं मन रमत नव्हतं. मागच्या वर्षी अमृताने ,माझ्या बायकोनी एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि त्यांच्याजवळ येउन राहिली होती उपचाराकरता पण डॅाक्टरांनी स्पष्टच सांगितले होते की त्या आजारातुन आईचे पुर्ण बरे होण्याचे चिन्ह नाहीत म्हणुन. अशा परिस्थितीत त्यांना तिकडे नेणंही कठीणंच होतं. अशातंच मागच्यावर्षी एक दिवस बाबांना दुपारी झोप लागली आणि आई बाहेर गेली आणि घर पत्ता सगळं विसरली. खुप शोधाशोध केली, पोलिसांत तक्रार दिली तेव्हा दुसऱ्या दिवशी सापडली. मग मात्र बाबा ही हादरलेच. मी त्यांना नेण्याचं पक्कच केलं एप्रीलमधले तिकीटं पण बुक केले होते. एक केअरटेकर ठरवली होती तिकडे. पण लॅाकडाउननी घोटाळा केला.बाबांनी मात्र हा निराळाच मार्ग शोधला. अजुन एक गोष्ट मला त्यांची खोली आवरतांना जाणवली ती म्हणजे त्यांनी मर्सी किलींगबद्दलचे बरेच आर्टीकल्स कोर्टाचे निकाल अन् कायकाय गोळा केलं होते ड्रॅावरमधे. ते असाकाही विचार करत असतील याचा थांगपत्ता लागु देत नव्हते बोलतांना. पत्राच्या शेवटी त्यांनी लिहीलंय “ जेवढे दिवस आहोत स्वावलंबी रहावं वाटतं, तिच्या आधी मी गेलो तर काय ही चिंता सतावते त्याच बरोबर ती आधी गेली तर मी तरी जगुन काय करु असेही वाटते. स्वेच्छामरणही कायदेशीर नाही मग काय करावे…… म्हणुन हा मार्ग निवडंत आहे. तुला त्रास होणार आहे बेटा पण धीराने घे अमृताला सांभाळ आणि जमलं तर मला क्षमा कर तुझ्या आईला पुढे घालुन नेतोय…. ”
Image by Free-Photos from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
निःशब्द
speechless. खूप छान.
हृदयस्पर्शी
धन्यवाद !
Wah, khupach sundar lihilye katha.
धन्यवाद!
क्या बात!!! हृदय स्पर्शी कथा
Baapre, khuup ch sundar lihilay. Speechless