घातक हिरे- भाग 2

*********दोन पोलिसांचे पथक हॉटेल  ‘साईतारा’  मध्ये पोहोचले . धमकीच्या चिठ्ठी मागिल बाजूस  ह्याच हॉटेलची पावती होती . 
  पोलिसांनी वेटर ला निरंजन चा फोटो दाखवला . तो ह्या हॉटेल मध्ये अधून मधून नाश्त्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली . मिळालेल्या वर्णना वरून तो कुठेतरी मेकॅनिक असावा असा संशय होता . आजूबाजूच्या गॅरेज मध्ये चौकशी केल्यावर तो 
 ‘ शिवशंकर ‘ मेकॅनिक्स  मध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली .
” साहेब , निरंजन  नेहेमी सुट्ट्या घेऊन गायब होत असे . मग आमच्या कामाची खोटी व्हायची . म्हणून मी त्याला दोन महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकला होता . ” गॅरेज च्या मालकाने सांगितले . तो कदाचित कर्जत ला त्याच्या घरी लपून बसला असावा अशी शंका मालकाने बोलून दाखवली . 

******** ओझोन हॉस्पिटलमध्ये रुद्र 
फोटोग्राफर च्या पलंगा जवळ बसला होता . 
” घाबरू नकोस . तसा  तू प्रेसचा माणूस आहेस म्हणजे तुला   ह्या गोष्टींची सवयच असणार  . ” रुद्र त्याच्याकडे सरकून बोलला .  
” कोण होते ते माणसं ? ” 

” सर , मी   अपघाताच्या ठिकाणचे बरेच फोटो घेतले होते . ते सगळे फोटो आम्हाला दे अशी मागणी करत दोन जण माझ्याकडे आले होते . फोटो प्रेस ऑफिस मध्ये होते , घरी नाही . हे मि त्यांना सांगितले , पण त्यांचा विश्वास बसला नाही . मी ऐकत नाही म्हटल्यावर त्यांनी मला नमवायला माझ्यावर हल्ला केला . ” 
” त्यांनी काही मास्क घातला होता ? ”
” नाही सर . चांगले धडधाकट होते . अगदी भाडोत्री गुंड असल्या सारखे . ”
” हं ….त्या टॅक्सी ने एका कारला धडक दिली . बरोबर ? ” 
” हो सर . ” 
” त्याच्या मालकाचे पण फोटो तू काढलेस . त्या कार मध्ये तो एकटाच होता न ? ”

” नाही सर . आत अजून एक जण बसला होता . त्याचेही अस्पष्ट फोटो आहेत माझ्याकडे . ” 
रुद्र चमकला . ही माहिती नवीन होती .
रोमाच्या सांगण्यानुसार कारमध्ये एकच 
माणूस होता , जो गाडी चालवत होता . 
मग हा दुसरा कोण ? 
” ठीक आहे मित्रा , ते सगळे फोटो आमच्या ताब्यात दे .  ” 
रुद्र ने सब इन्स्पेक्टर थोरात ला आपल्या ऑफिस मध्ये बोलावले , आणि गाडी वेगात चालवत तोही तिथे पोहोचला . 

******* हातात पाच सहा फोटो घेऊन रुद्र विचारात असतांनाच रोमा तिथे आली .
” मला बोलावलंत सर ? ” 
” मिस रोमा , अपघात झाला तेव्हा  त्या समोरच्या कार मध्ये किती लोक होते ? ” 
”  मला तरी एकच दिसला , जो गाडी चालवत होता . ” 
” आणि आत बसला होता तो ? ”
” आत कुणीही दिसले नाही सर . तिथे फारसा उजेड नव्हता . ….म्हणजे मला तरी कुणीच दिसले नाही . ”
” हे बघा फोटो ! ” त्याने दाखवलेल्या एका फोटोत गाडीच्या समोरच्या सीट वर कुणीतरी बसले असावे असे दिसत होते . फोकस नव्हता , पण डोके दिसत होते . 
” पहा मिस रोमा . एका फोटोत डोकं दिसतंय , आणि ह्या दुसऱ्या फोटोत पहा ….त्याने लपवलंय स्वतःला खाली . 
रोमाला खूप आश्चर्य वाटले . ह्या गोष्टीकडे तिचे लक्ष्यच गेले नव्हते . 
रुद्र ने ते फोटो पुन्हा पुन्हा बघितले . 
खूप मोठे काहीतरी हातात लागल्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर दिसत होता .
त्याने रोमाला जायला सांगितले .

” या थोरात !! काय माहिती आणलीत ? ”
” सर , तुम्ही खूष होणार ऐकून ! ….सागर  हा झवेरी साठी काम करत असे . त्याच्या मार्फत दोन तीन कोटींचे हिरे हंसराज शहा  आणि अशाच इतर छोट्या व्यापाऱ्याकडे पाठवले जात . ह्यात कुठलीही लिखापढी होत नसे . एक दोनदा मात्र शहा ने हिऱ्याच्या कॅरेट बद्दल शंका घेतली होती . त्यावरून झवेरी आणि शहा मध्ये खूप वाद पण झाला होता . शहाने पोलिसात जाण्याची धमकी पण दिली होती . ज्या दिवशी सागरचा खून झाला , त्या दिवशी त्याच्या कडे अडीच कोटींचे हिरे होते सर ! ” 
” पण त्याला तर कामावरून काढले होते ना ! ” 
”   पण त्याला अधून मधून मोठ्या कामगिरी साठी बोलावले जात होते सर ! 
सुरक्षिततेसाठी हे व्यापारी नेहमी असे करतात न सर  . ” 

******कर्जत च्या पोलिसांनी निरंजन ड्रायव्हर ला ताब्यात घेऊन  त्याच्या मुसक्या आवळून त्याला रुद्र पुढे आणले होते . त्याच्या घरात फक्त पंचवीस हजार रोख मिळाले होते . 
” सागर चा खून का केलास ? ” 
“.मी काही नाही केलं सर…..”
एक जबरदस्त ठोसा लागून निरंजन भेलकांडला होता . 
” हे बघ , तुला सुपारी देणारा तुझा बाप आमच्या ताब्यात आहे . बऱ्या बोलाने तोंड उचकट !! ” रुद्र ची युक्ती कामी आली , आणि निरंजन ने तोंड उघडले . सागर ला मारण्यासाठी त्याला सुपारी देण्यात आली होती . पन्नास हजार ऍडव्हान्स पण मिळाला होता . मात्र त्याला सागर किंवा हिरे ह्याबद्दल काहीच माहिती नव्हती .

******* महिला पोलीस कर्मचारी रोमाची कसून चौकशी करत होती आणि समोर रुद्र बसला होता . 
” तुम्ही का माझ्या मागे लागला आहात ? माझा ह्याच्याशी काय संबंध ? ” रोमा त्रासून ओरडून म्हणाली . 
” सागर झवेरी कडून हिरे घेऊन निघाला होता . मारेकऱ्यांना त्याच्या जवळ हिरे असण्याची खबरच नव्हती . म्हणजे मारेकऱ्यांनी घेतले नसणार .    निरंजन ड्रायव्हर  कडे हिरे नाहीत ,  ताहीर स्क्रॅप जवळ गाडी सापडली , त्यातही हिरे नव्हते . रझाक ला तर काही माहीतच नाही ,  टॅक्सित फक्त तूच होतीस . मग ते हिरे कुठे गेले ? ” 
” मला काय माहीत ? ” तिने असे म्हणताच महिला पोलीस ने फाडकन तिच्या मुस्काटात ठेवून दिली . 
” हे बघ , तू बऱ्याच गोष्टी आमच्या पासून लपवल्या आहेत . तुझे पूर्ण करिअर मातीत जाईल असे करू नकोस . तू खरे बोललीस तर तुला माफीचा साक्षीदार बनवू  शकतो . ….बोल लवकर !!!! ” 

” हो !!! 
………हिरे मीच घेतले होते , मला आधी विश्वासच बसला नाही की ते खरे आहेत . जेव्हा तुम्ही ऑफिस मध्ये आलात , आणि खुनाबद्दल बोललात , तेव्हा माझ्या लक्षात आले  की ते खरे हिरे आहेत , ज्यासाठी हा खून झालाय . मला खूप मोह झाला होता …..पण ते हिरे माझ्या घरून चोरी झाले …..त्याच दिवशी , जेव्हा कोणीतरी माझ्या घरात घुसले होते . ” 
” तुला हिरे कुठे मिळाले ? ” 
” टॅक्सित माझे दहा रुपयांचे नाणे खाली पडले तेव्हा माझ्या पायाशी एक छोटीशी पुरचुंडी पडली होती . मी अगदी सहज ती उचलून नाण्यासाहित माझ्या पर्स मध्ये टाकली …..पण काय फायदा झाला ? आज तर हिरे माझ्याकडे नाहीतच ना !! ”
” मग तूच हा खून केला नसशील कशावरून ? ” 
” सर , मी टॅक्सित बसण्यापूर्वी ऑफिसमध्येच होते ना . तुम्ही तर पूर्ण चौकशी केलेलीच आहे ! ”
” आमच्याशी खोटे बोललीस म्हणून तुला शिक्षा होऊ शकते . हिरे चोरून 
नेलेस ह्या बद्दल तुला शिक्षा होणार . ” 
” सॉरी सर , पण मी तुमची पूर्ण मदत करेन . एकदा चूक झाली , 
माफ करा . ” हे बोलतांना तिचा चेहेरा रुद्र बारकाईने वाचत होता . 

******* रुद्र  ‘राजेश ऑप्टिकल’ मध्ये राजेश अग्रवाल यांच्याशी बोलून बाहेर पडला . प्रेस फोटोग्राफर ने काढलेल्या फोटोवरून पोलीस राजेश पर्यंत पोहोचले होते . अपघातातील कार तोच चालवत होता . त्यालाच निरंजन ने पाच हजार रुपये दिले होते . 
        राजेशच्या सांगण्यानुसार टॅक्सी ड्रायव्हर ने वाद न घालता पैसे देऊन टाकले याचे त्याला  आश्चर्य वाटले होते . त्याने आणखीन बरीच महत्वाची माहिती दिली होती .
              हिरा व्यापारी झवेरी आणि शहा यांच्याकडून मिळालेली माहिती , रोमा आणि जय ने सांगितलेली माहिती आणि आता राजेश ने सांगितलेली माहिती यावरून रुद्र एका निष्कर्षापर्यंत आला होता . 
           त्याने रोमाला फोन लावला . 
” तुझा त्रास आता संपला रोमा . खरा गुन्हेगार सापडला . तू ये इथे .  ” 
         ऑफिस संपवून रोमा अतिशय अधिरपणे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली . आत जाताच ती आश्चर्याने ओरडली ….
” जय ? तू ? …..तू इथे काय करतोय ? “.  शेजारी बसलेल्या राजेश ला देखील तिने ओळखले . ” तुम्हीच ती कार चालवत होता न ? ….सर खून ह्यांनी केला ? ….लवकर बोला सर , मला गरगरतय ” 
  ” घेऊन या रे त्याला ” रुद्र म्हणाला , तसे सबइंस्पेक्टर थोरात एकाला पकडून घेऊन आले . 
” तपन ? ….तू ? ….” ती किंचाळली . जय मान खाली घालून बसला होता . 
” रोमा , ह्या तपननेच निरंजन कडून खून करवला सागर चा . …ह्याच्या मुळेच तुला इतका मनस्ताप सहन करावा लागला . ..बोल रे हरामखोरा !..तूच सांग आता तुझे कारस्थान ! ” रुद्र तपनला म्हणाला.
       ” मी इथे दादर ला जय सोबत राहातो . मगनलाल झवेरी माझे लांबचे मामा लागतात . ते सागर आणि त्यासारख्या आणखी काही जणांमार्फत 
फार मोठ्या किमतीचे हिरे इतर व्यापाऱ्यांकडे पाठवत . त्या हिऱ्याची किंमत अफाट असे . मी ह्या सागर ला फितवला . त्याच्याकडचे दोन किंवा तीन प्रचंड महाग हिरे काढून त्या जागी मी कमी  कॅरेट चे हिरे ठेवू लागलो .
त्या हिऱ्याची मला जबरदस्त किंमत मिळे . सागरचे ही खिसे भरू लागले.
झवेरी वरील विश्वासामुळे सुरुवातीला शहा ने बोलून दाखवले नाही पण
तिसऱ्या खेपेला मात्र शहा ने तक्रार केली आणि झवेरीने सागरला दमात घेतला . तो त्यांचा जुना विश्वासू माणूस असल्याने आपल्या पैकी कुणीतरी दुसरेच ह्यात सामील आहे अशी शंका साहेबांना आली . ” 
      ” तरीच ह्याच्याजवळ नेहमी जास्तीचा पैसा खुळखुळत असायचा .मी ह्याला टोकले देखील होते . माझाच रूममेट असे काही करत असेल अशी शंका च आली नाही .” जय म्हणाला . ” सर , रोमा माझ्याजवळ सगळं मोकळेणाने सांगायची . बऱ्याचदा हा तपण देखील असायचा सोबत . म्हणून त्याला कळाले की हिरे रोमाकडे असतील. तिचे घर पण ह्याला माहीत होते ना सर . ” जय ल धक्का बसला होता . 
” तपन , तुला सागर ला का मारावे वाटले ?” रुद्र . 

  ” सर , मालकाला समजल्यावर आपली धडगत नाही  असे वाटल्यानंतर मात्र सागर घाबरला . साहेब आपल्याला जेल मध्ये पाठवतील ह्या भीतीने त्याने मला फोन करून आता गद्दारी करणार नाही हे सांगितले . मी त्याला आग्रह केला तशी त्याने मला धमकी द्यायला सुरुवात केली. मामांकडे सगळं खरं सांगेन म्हणाला . मग मी निरंजन आणि त्याचे दोन माणसे ह्यांना हाताशी धरले . आणि त्याचा काटा काढला . निरंजन अत्यंत लालची माणूस आहे . रात्री एका अंधाऱ्या गल्लीत त्याने सागराचा खून केला . एका पळवलेल्या टॅक्सी त सागरची बॉडी डिक्कीत टाकायला गेला , पण डिक्कीत खूप सामान होते . कुणी पाहिलं ह्या भीतीने त्याने बॉडी व्हॅनमध्ये सीट खाली ठेवण्यासाठी त्याला चादरीत गुंडाळला . त्यावेळी सागरने बुटात लपवलेली हिऱ्याची पुरचुंडी खाली व्हॅनमध्ये पडली . हिऱ्याबद्दल अजिबात माहिती नसल्याने निरंजन ला शंकाच आली नाही . ” 
” खून झाला तेव्हा सागर कडे हिरे होते हे तुला कसे कळाले ? ” जय ने चाचरत विचारले . 
” सागर वर मारेकरी पाठवून मी झवेरी मामांकडे जाऊन बसलो . त्याचवेळी एका व्यापाऱ्याचा फोन आला . मामांच्या बोलण्यातून मला कळाले की सागर करवी आज हिरे पाठवत आहेत . ” हे सांगतांना  तपन पुरता गळून गेला होता .    ” मी तसाच उठलो . रस्त्यात लिफ्ट मागितली .तेव्हा हा राजेश अग्रवाल दुकान बंद करून चालला होता . मी ह्याच्याच गाडीत बसून निरंजन च्या मागे गेलो . राजेशला हे सगळं कुठे माहीत होतं . त्याने गाडी पुढे घेतली , आणि अचानक अक्सिडेंत झाला .”” 
      रुद्र ने पाण्याचा ग्लास पुढे केला . तपनने आधाशासारखा तो संपवला . तो पुढे सांगू लागला ….
”  निरंजन ती व्हॅन ताहीर स्क्रॅप कडे नेणार हे मला माहीत होते . मी माझ्या दोन  माणसांना फोन करून ताहीर स्क्रॅप पाशी जाऊन थांबायला सांगितले . म्हणजे ते हिरे ताब्यात घेतील ….पण झाले उलटेच . त्या हरामखोराला रस्त्यात रोमा भेटली . जास्त भाडे मिळेल ह्या लालसेने त्याने तिला गाडीत घेतले , आणि ते हिरे  रोमा घेऊन गेली . ”
” पण मधेच तो अपघात झाला !!!” रुद्र हसत म्हणाला .
  जय खूप गोंधळून गेला होता ..” सर , तुम्ही  तपनला कसे शोधून काढले? ”
” अरे , रस्त्यात तपनला निरंजनची टॅक्सी दिसली . राजेश  टॅक्सिला ओव्हरटेक करून पुढे गेला ,आणि योगायोगाने अपघात झाला . ”
तपन म्हणाला , ” हो , मी सहज वळून मागे पाहिले ,तर टॅक्सित रोमा!
जयची मैत्रीण!! ……मी सटपटलो ! ही इथे कशी ? …..पण …लगेच समोरून एक जण आला , आणि मोबाईलमध्ये फोटो घेऊ लागला . मी पटकन खाली वाकलो , पण माझे फोटो त्याच्या कडे असतील आणि मी अडकेल म्हणून..”
” म्हणून तू हरामखोरा , त्याच्यावर हल्ला केलास !!” रुद्र चिडून ओरडला .

”  साहेब , जय मुळे मला रोमाचे घर माहिती होते . ती आमच्या धमक्यांना भीक घालत नाहीये हे पाहून मी तिच्या घरी माणूस पाठवून हिरे पळवले ……ते हिरे आहेत सर , मी देतो तुम्हाला . ” 

” घेतलेत आम्ही ताब्यात !!! तुझ्या घरातून !! ” रुद्र म्हणाला . ” शिवाय फोटोत राजेश आणि कार चा नंबर हे दोन्हीं होते . त्यामुळे आम्हला खूप सोपे झाले . घेऊन जारे ह्याला आत !! आठ दिवस झोप उडवलीय ह्याने !! ”

” सर , माफ करा , मला हिऱ्यांचा मोह आवरला नाही . मला तुम्ही शिक्षा करणार ? ” रोमाला घाम फुटला होता .
” मिस रोमा , त्याच दिवशी तुम्ही फोन करून पोलिसांना हिऱ्याविषयी कळवले असते तर फोटोग्राफर वरचा जीवघेणा हल्ला वाचला असता . 
नाशिबाने वाचला तो . सगळे नागरिक आपली जबाबदारी ओळखून वागू लागले तर कितीतरी जीव वाचवता येतील .  थोरात , यांच्या सह्या घेऊन जाऊ द्या  सगळ्यांना ! मिस रोमा , तुम्हा दंड पडणार कोर्ट सागेल तसा .” 
रुद्र ने गाडीच्या किल्ल्या उचलल्या आणि अतिशय रुबाबदार पणे स्टेशन बाहेर पडला .
(समाप्त)
  ©अपर्णा देशपांडे

Image by carmule from Pixabay 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

5 thoughts on “घातक हिरे- भाग 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!