आई- द्वितीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- मंजिरी देशपांडे
आई होणं हि तशी भाग्याची गोष्ट! नाही का ? आणि एकदा बाई आई झाली कि तिची आईपणातून सुटका होत नाही …. वाट सरली तरी आईपण सरत नाही …. हि माझ्या आईपणाची गोष्ट आहे. आई झाले त्याची पण आणि आईपण सुटलं त्याची पण. नाही कळलं ? थांबा सांगते …सगळं संगतवार सांगते.
मी भागीरथी. कोकणातल्या एका जमीनदार घराण्याची मोठी सून. घरात कामाचं एवढं खटलं होतं कि सकाळपासून मरमर काम करावं …संध्याकाळ कशी व्हायची कळायचं नाही . आणि त्या काळात बायकांच्या कामाची , थकण्याची फिकीर कोणाला? बायकांचं एकच काम … घराण्याला वारस देणे. आणि इथेच नेमकी मी कमी पडले. लग्नाला दहा वर्ष होत आली तरी अजून माझी कूस उजवलेली नव्हती. माझ्या धाकट्या जावेला दोन मुली आणि एक मुलगा . दीड वर्षाचा पाळणा असल्याने ती सतत गरोदर तरी असायची नाही तर बाळंतीण तरी . आणि तिची बाळंतपण काढायला मी होतेच. हक्काची कामकरिण. त्याकाळी वांझ बाईच्या नशिबी फार कष्ट आणि अवहेलना असत. येता जाता टोमणे आणि कुचकी बोलणी.
खूप वर्ष झाली आता , नीट आठवत नाही …पण बहुतेक जाऊबाई धाकट्या लेकाच्या वेळी बाळंतीण होत्या. नवसाचा नातू . दोन मुलीच्या पाठीवर झालेला. बाळाची शेक शेगडी, न्हाऊ माखू घालणे खुद्द सासूबाई करीत. किंवा करवून घेत. पण हाताखाली राबणारी मी . भागे हे दे , भागे ते दे , भागे पाणी गरम कर , भागे अमुक आणि भागे ढमुक . मोलकरणीच्या बरोबरीने सासूबाई मला राबवत असत. दुसरा उपयोग काय ना माझा ! बाळाजवळची कामं मात्र मला नाही द्यायच्या. बाळाला नीट पाहू पण देत नसत. हातात घ्यायचे तर सोडाच.
एकदा फुललेली शेगडी ठेवण्यासाठी मी जाऊबाईंच्या खोलीत आले तेव्हा जाऊबाई गाढ झोपल्या होत्या. आणि बाळ जागा होता. मी पाळण्यात डोकावून बघितलं आणि मला राहवलं नाही हो …. हळूच उचलून घेतलं तर माझ्या कडे बघून हसला गुलाम ! मी त्याच्या जावळा चा वास घेतला. दुधाचा , वेखंडाचा , उदाचा असा सगळं मिश्र वास होता त्याच्या जावळाला. मी अशी हरखले ….बाळाला गच्च छातीशी धरला. तेवढ्यात जाऊबाई उठल्या आणि त्यांनी जोरात आरडा ओरडा सुरु केला . “माझ्या नवसाच्या पोराला छातीशी घेत होती. पोरावर करणी करेल हि …. बघा बघा हो सासूबाई ….” सासूबाई आल्या. सासरे आले. माझा नवरा, दीर, घरातली गडीमाणस सगळे खोलीबाहेर जमा झाले. सासूबाईंनी तर आकाश पाताळ एक केलं. खूप खूप गलका झाला घरात …… त्यादिवशी पहिल्यांदा माझ्या नवर्याने माझ्या अंगावर हात उगारला. मला खूप मारलं.
मारलं त्याच वाईट नाही वाटलं बरं मला …. तसा माझा नवरा बरा होता. अख्या घरात माझ्याशी थोडाफार माणुसकीने वागणारा तोच होता … माझी तक्रार नाही हो त्याच्या बद्दल. पण शेवटी घरातल्या लोकांच्या दबावाला बळी पडला. त्यालाही वाटलं कि मी बाळावर करणी केली… याच मला फार वाईट वाटलं. आता या घरात माझ्यासाठी काय ठेवलं होतं ? आपला शेर संपला इथला असं वाटलं ….. पण तसं नव्हतं हे फार नंतर कळलं मला.
त्या रात्री मी परसातल्या मोठ्या विहिरीत उडी घेतली. आयुष्य संपवलं. उडी घेतल्यानंतर अगदी हलकं हलकं पिसासारखं वाटू लागलं मला. जड देह सुटला ना …. पण मी मात्र सुटले नाही त्या घरातून . मी तिथेच राहिले. त्या विहिरीच्या आसपास असायची. मोलकरीणींना जाणवू लागलं होतं माझं अस्तित्व. अंधार पडल्या नंतर कुणी विहिरीजवळ फिरकायचं नाही. दिवस उजेडी सुद्धा काचकूच करत विहिरीवर यायला.
शेवटी सासर्यांनी दुसरी विहीर खोदली वाड्याच्या पुढच्या भागात आणि माझ्या विहिरीवरची वर्दळ कमी झाली. अशी अनेक वर्षे लोटली …. आमच्या अनेक पिढ्या मी बघितल्या . चांगल्या , वाईट अनेक गोष्टींची साक्षीदार झाले. माझ्या सासूबाईंना शेवटी वात झालेला … त्यात त्या सतत माझ्या नावानी हाका मारत होत्या …. पश्चाताप होत असणार …. पण आता काय उपयोग? जाऊदे झालं …..
तर मी सांगतेय ती हकीकत माझ्या नंतरच्या पाचव्या पिढीतील. सुरेखा नाव तिचं … सूनच माझी एका प्रकारे …. गरोदर होती. घरात ती नवरा आणि सासरे … तिघंच. खूप दमायची बिचारी. मागच्या परसात माझ्या विहिरीच्या कट्ट्यावर बसून गुलबक्षीच्या फुलांच्या वेण्या करत असे. सुरेख गुणगुणत असे. माझं मन रमत असे ती आली कि. जणू काही मीच गरोदर आहे असे वाटायचे मला …
पण देवाला मंजूर नव्हतं तिचं सुख …. बाळंतपणात गेली बिचारी. मुलगी झाली. अगदी द्रिष्ट लागावी अशी सुरेख होती पोर!
बायको गेली म्हणून संजयच मन लागेना कुठे. म्हणून त्याने पुण्याला नोकरी घेतली आणि गेला. आता घरात छोटी रमा आणि तिचे आजोबा. दोघेच उरले. रमा मोलकरीणींच्या भरोसे असायची. पण त्या नीट बघतात होय तिला …. बसल्या गप्पा हाकीत कि झालं … असाच एकदा रमा माझ्या विहिरीत वाकून बघत होती. चारेक वर्षाची होती. पडलीच असती जवळ जवळ. मी खेचली मागून! खरं तर आम्हाला असं करता येत नाही . पण त्या वेळी कुठून बळ आलं हातात ठाऊक नाही मला. मी कोणाला दिसायची नाही, फक्त जाणवायची कधी कधी … पण या रमेला दिसले बरं मी!
म्हणते कशी धिटुकली , ” तू कोण? माझी आई का ? ”
अस्स भरून आलं म्हणून सांगते मला …. पहिल्यांदा कोणी आई म्हटलं होतं मला.
मी म्हणाले, “हो ग हो ! आईच मी तुझी … पण सांगू नको हो कोणाला. आपलं तुपलं गुपित! ”
मग मी खरंच आई झाली या रमेची. तिच्याशी खेळणं, तिला रमवणं आणि मुख्य म्हणजे तिला सांभाळणं … आईपण लाभलं मला …. मेल्यानंतर अनेक वर्षांनी.
पण हेही सुख टिकलं नाही फार. दोनेक वर्षात रमेचे आजोबा आजारी झाले आणि गेले. रमेच्या वडिलांना काही तिला सांभाळणं जमणार नव्हतं म्हणे . म्हणून मग रमेला तिच्या आजीकडे पाठवायचं ठरलं. चिपळुणास. रमेच्या आजीला मी फार पाहिलेलं नव्हतं पण बाई मोठी करारी आणि कर्तबगार आहे असं ऐकलं होत.
रमा जाणार ….. मग मी काय करू इकडे विहिरीला चिकटून. मूल तिथे आई … मी पण ठरवलं, रमेच्या बरोबर जायचं. आयुष्याभर ज्यासाठी आसुसले होते ते मिळालं होत मला. आता नाही जाऊ द्यायची मी माझ्या मुलीला ….
मी पण रमेबरोबर तिच्या आजोळच्या वाड्यात आले खरी, पण वाड्यात पाऊल टाकताक्षणी मला काहीतरी जाणवलं. आणि रमाच्या आजीला पण माझं तिथे असणं जाणवलं. एका क्षणात दोघीनाही दोघींची जाणीव झाली. पहिले काही दिवस रमेच्या आजीने मी रमेला काही करत तर नाही ना ते पाहिलं. बाई वेगळीच होती . एखादी घाबरली असती . पण हि नाही घाबरली. शांत होती. मी रमेला काहीही अपाय करत नाही, उलट सतत काळजीच घेते हे लक्षात आलं तिच्या …. रमेशी पण बोलली माझ्या बद्दल. रमा बिचारी स्पष्ट म्हणाली “माझी आई आहे” म्हणून.
मी शक्यतो अंगणात चाफ्याच्या झाडाखाली असे. एकदा मला हाक मारली त्यांनी … कशी ? ते ठावकी नाही मला … पण स्पस्ट जाणवली. मी त्यांच्या खोलीत गेले. म्हटलं होऊन जाऊ दे सोक्षमोक्ष.
खोलीत जाताच त्यांनी दार लावले आणि माझ्याशी बोलू लागल्या
त्या बोलत नव्हत्या आणि मीही…. पण संवाद मात्र स्पष्ट होत होता ..
“कोण आहेस तू ?”
“भागीरथी ”
“इथे का आलीस ?”
“रमे बरोबर. मी आई आहे तिची. म्हणजे जन्म नाही दिला मी पण मीच सांभाळलं आहे तिला आता पर्यंत.”
“हो , ते ठाऊक आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे तुझी . माझी मुलगी पण ऋणी आहे तुझी .”
इतका मान मला आजपर्यंत कोणी दिलेला नव्हता. भरून आलं हो मला .
“भागीरथी, माझे वडील पंचाक्षरी होते. त्यांचा वारसा माझ्यात आलाय. म्हणूनच मी बघू शकले तुला. माझ्या मुलीत नव्हता हा वारसा … पण रमेत आहे. म्हणूनच तीही तुला पाहू शकली.
तू इतके दिवस रमेची आई झालीस पण आता वेळ झालीय तुझी मुक्त होण्याची . कळतंय ना तुला …. ”
“पण रमा …. ”
“तिला मी आहे आता . आणि आता तू तिला जास्त दिवस दिसलीस तर त्रास होईल तिला . तू वाईट नाहीस. म्हणूनच मी मदत करिन तुला सुटायला …. खूप वर्ष अडकलीस भागीरथी …. मोकळी हो आता …. ह्या जगातून आणि आईपणातून.”
पहिल्यांदा पटलं नाही पण हळूहळू पटलं आजीचं.
आता माझे इथले थोडेच दिवस उरलेत …. प्रकाश दिसू लागलाय.
तेवढ्यात माझी गोष्ट तुम्हाला सांगावी म्हणून बोलले हो …. माझी गोष्ट …. आई झाले त्याची पण आणि आईपण सुटलं त्याची पण!
निघते आता …. वेळ झाला ….
Image by Free-Photos from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
सुरेख कथा आहे मंजिरी!👌👌
थँक्स
जबरदस्त..एकदम वेगळ्याच प्रकारे सांगितलेली गोष्ट
एकदम वेगळी concept… सुंदर…
Nice story
कथा आवडली 👌
आवडली.
जबरदस्त कथा आहे .. bravo 👍🏼👍🏼
आवडली , छान लिहीली आहे.
khup chhan katha … AAI pan sutat nahi hech khara
सर्व वाचकांना धन्यवाद