आप्पा…

८६ वर्षांचे गृहस्थ…

त्यांचं कुटुंब फार मोठं…

त्यांना चार मुली, एक मुलगा…

शिवाय त्यांच्याकडे भावाची दोन मुलं राहायला…

स्वतःच्या मुलांसकट सगळ्यांच आप्पा अगदी मनापासून करायचे..कसलीही अपेक्षा न ठेवता…

त्यांना एका बऱ्यापैकी कंपनीमधे नोकरी…

पगार तसा साधारणच…

जोडीला ते रंगकाम, शिवणकाम, सुतारकाम, गवंडीकाम करायचे…

त्यांना सगळ्यातलीच माहिती…

परोपकाराची भावना कायम मनात…

लोकांच्या मदतीला धावून जायचे…

कोणी पत्ता विचारायला आलं की त्याला घरापर्यंत सोडायचे…

मी लहान असताना माझी आई बाहेर जाऊन येईपर्यंत मला सांभाळायचे…

तेवढ्याशा पगारात, जोडकामात मिळणाऱ्या पैशात आणि पदरी पडलेल्या पुण्यामुळे सगळे आनंदात राहायचे…

नंतर नंतर हळुहळू एकेक सेटल व्हायले लागले…

भावाच्या मुलांची शिक्षणं पूर्ण झाली…

त्यांनी स्वतःची घरं घेतली…

लग्न केली…

आप्पांनी पण स्वतःच्या मुलींची लग्न करायला सुरवात केली…

पहिल्या दोघी एकाच घरात दिल्या…

सख्या बहिणी..सख्या जावा…

आता जरा आप्पा बऱ्यापैकी जबाबदारीतून मुक्त झाले होतेे…

मिळणारा पगार ही थोडा वाढला होता…

घरातली खाणारी तोंडं पण कमी झाली होती…

आवश्यकतेनुसार खर्च करून बाकीचा पगार बँकेत पडायचा…

सगळं बरं चाललं होतं…

एक दिवस आप्पा आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला…

आप्पांची कंपनीच बंद पडली…

घरात कमावणारे आप्पा एकटेच…

आता काय करायचे हा त्यांच्यासमोर पडलेला गहन प्रश्न…

बँकेतल्या ठेवीवर किती दिवस घर चालणार…

घरात अजून दोन मुली आणि एक मुलगा लग्नाचा बाकी…

कंपनीमधे बऱ्याच मिटींगा झाल्या…

प्रत्येक मिटींगच्या वेळी आशेचा नवा किरण…

पण मिटींग संपून घरी येताना मात्र पदरी निराशा आलेली असायची…

दिवसामागून दिवस चालले होते…

मिटिंगवर मिटिंग व्हायच्या…

आता कंपनीमधून काही मिळणार नाही हे कळून चुकलेलं…

आप्पांनी आता त्यांच्याकडे असलेल्या बाकीच्या कलेवर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं…

लोकांच्या घराचं रंग लावण्याचं कंत्राट घेऊ लागले…

लहान बाळांची दुपटी, गोधड्या शिवायचे…

ब्लाउज, शर्ट, पॅन्टसुद्धा त्यांना उत्तमरित्या शिवता येत होतं…

या सगळ्यावर मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशांवर त्यांचं भागत होतं…

आता मुली लग्नाच्या वयात आलेल्या…

थोडे थोडे असे पैसे गोळा करून यथावकाश त्यांनी दोन्ही मुलींची लग्न करून दिली…

मुलाचंही लग्न करून दिलं…

मुलगा आपला असतो..सून आपली नसते…

मधून मधून खटके उडायचे…

सहा महिन्यात मुलगा वेगळा झाला…

आता म्हातारा-म्हातारी दोघंच घरात…

मुली जसं जमेल तसं पैसे पाठवतात…

मुलगा दर महिन्याला काही पैसे देतो…

तेवढेच आप्पा फिरतात मिशीला कोकम लावून…तूप तूप म्हणत…

आता दोन्ही मोतिबिंदूची operation झाली…

तसं फारसं दिसत नाही…

शिवणकाम सकाळपूरतंच मर्यादित राहिलंय…

दातांच्या पंगती पण उठून गेल्यात…

काकडी मिक्सरला फिरवून खातात…

आजीही म्हातारी झाल्याने तिलाही स्वयंपाकात मदत करतात…

एकदा आजीला बरं नव्हतं…

दोघांचं पिठलं भात करायचं ठरलं…

आप्पांनी जबाबदारी घ्यायची ठरवली…

इंडियन पिठलं विथ मुळा…

घरात मुळा दिसला तो घातला पिठल्यात…

आजीने नाक मुरडलं पण इलाज नव्हता…आयतं मिळालं होतं…

एकदा खिचडी केली..तांदूळ आणि मूगडाळीपेक्षा इतर व्यंजनं जास्त…

दोघे आनंदाने राहतात…

रोज नव्या दिवसाच नव्यानं स्वागत करतात…

मधून मधून मुली येतात..त्यांच्या मुलांना घेऊन रहायला…

तेवढेच चार दिवस हे दोघे नातवंडात रमतात…

मुलगाही येतो दर महिन्याला…

सुनेचे दुरून डोंगर साजरे…

बट ओके..नो प्रॉब्लेम ऍट ऑल…आप्पा-आप्पीची स्मॉल फॅमिली….हॅपी फॅमिली………..

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

2 thoughts on “आप्पा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!