ऑनलाईन
सकाळी पावणेबारा.
माझे बारा वाजलेले.
मी लॅपटाॅपवर.
बंगलोरकडचा क्लायेंट.
कड्डम कुड कूड.
झूमच्या छोट्याशा खिडकीतनं,
क्लायंट बोंबल बोंबल बोंबलत होता.
खरं तर माझी काहीच चूक नव्हती.
अन् त्याचीही.
नवीकोरी मशीन.
तिथं व्यवस्थित पोचलेली.
मी सांगेन तशीच त्यानं ईनस्टाॅल केलेली.
तरीही…
मशीन चालूच होत नव्हती.
का रूसलीये कुणास ठाऊक ?
आॅनलाईन कशी चालू करणार ?
अनलाॅक झाल्यावर लगेच येतो म्हणलं.
कसाबसा त्याला बाबापुता केला.
अन् वेळ मारून नेली.
परमेश्वराचे आभार मानले.
नशीब आॅनलाईन होता तो.
प्रत्यक्ष त्याच्यासमोर ऊभं रहायची वेळ आली असती तर,
कच्चा खाल्ला असता त्यानं…
एवढ्यात चिऊ आली.
शाळा संपवून.
घरातल्या घरात.
आॅनलाईन शाळा.
तरीही युनिफाॅर्ममधे बसावं लागतं.
जरा दमलेली.
अन् चिडलेली.
हट्टानं चिऊला मराठी शाळेत घातलेलं.
चार दिवस झालेत शाळा सुरू होऊन.
“का गं काय झालं ?”
“बाबू साॅरी “
चिऊचा चेहरा पडलेला..
“आज दुसर्या तासाला मला खूप झोप आलेली.”
‘मग ?’
‘ मग काय सरळ कॅमेरा आॅफ केला.
टेबलावर डोकं ठेवलं.
अर्धा तास छान झोपले.
जाग आली अन् कॅमेरा आॅन केला.
तास संपत आलेला.
जीव खावून ओरडले.
तेव्हा कुठं जोशीबाईंचं लक्ष गेलं आमच्याकडे.
“बाई, मला शिक्षा करा.
मी तुमच्या तासाला झोपलेले.”
बाई हसायलाच लागल्या.
‘तुला काय शिक्षा देवू ?
या मेल्या कौरोनानं आम्हालाच शिक्षा दिलीय.
एवढ्याशा चौकोनात माझी सोनेरी पोरं कशी मावणार ?
शिकवता येतं गं.
पण,
डोक्यावर हलक्या हातानं कसं कुरवाळू ?
कसं दटावू ?
अनं हलक्या हातानं पाठीत धपाटा कसा घालू ?
शाळेच्या बाई म्हणजे दुसरी आई असते चिऊ.
आईपणच हरवलंय आमचं.
चित्रातले गुलाबजामून गोड लागतील का कधी ?
जाऊ दे.
ऊद्यापासून नको करूस असं.
बाबांना सांग तुझ्या.
माझ्यावाटची शिक्षा ते देतील.
पाठीत धपाटा द्या म्हणाव मला.
हळू द्यायला सांग.’
मी हक्काबक्का.
“बाबू, देतोयस ना धपाटा ?”
मला पटकन् काही सुचेना.
नेहमीसारखा चिऊचा एक पापा घेऊन टाकला.
आॅनलाईन नाही काय.
खराखुरा.
एकदम गोड लागला.
मी पुन्हा लॅपटाॅपमधे डोकं घातलं.
बाॅस माझी शाळा घेत होता…
…..कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Moritz Lübken from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021