‘बंध’
नाना पुराणिक… वय वर्ष ८०… बेडरुममधील पलंगावर पडून पेपर वाचत होते. सकाळी लवकर उठून, लवकर आवरुन तयार बसायचं… हा त्यांचा शिरस्ता होता. भले नंतर कुठेही जायचं नसलं तरीही. त्याप्रमाणे ते आजही टिपटाॅप होऊन बसले होते. आंघोळ – पांघोळ आटोपून, अंगभर पावडर लाऊन, मलमलचा शुभ्र हाफ सदरा… नी शुभ्र लेंगा घालून. तेवढ्यात माईंनी त्यांना आवाज दिला. माई पुराणिक… वय वर्ष ७७… हातात टाॅवेल नी खांद्यावर साडी, ब्लाऊज वगैरे टाकून आंघोळीला चाललेल्या.
“अहो… ऐकलंत का?”
“बोला”
“दूध, पेपर आलंय… कचरेवाली येऊन गेलीये, पोळ्या करणारी येऊन गेलीये, आणि आपली गंगाही घरकाम उरकून गेलीये… आता कोणीही यायचं शिल्लक नाहीये… मी आंघोळीला बसतीये… बेल काही आता वाजायची नाहीच, पण अगदी ती समोरची पाटलीण आलीच चौकशीला तेवढ्यात… तर आपलं दार उघडा… बरं का”
“बरं… बरं… तू बैस आंघोळीला”
नवर्याकडून कन्फर्मेशन घेऊन, माई आंघोळीला गेल्या. आत गेल्यावर सवयीप्रमाणे त्यांनी, चार – पाच तांबे बाथरुमभर ओतले. त्यातलं काही पाणी, नेहमीप्रमाणे उंबरा ओलांडत बाहेरही गेलं. खरंतर नाना कायम बोलत असत माईंना, त्यांच्या ह्या सवयीवरुन. “हे पाणी बाहेर जे येतंय… त्यावरुन कधीतरी, तुच पाय घसरुन पडणारेस बघ” असं म्हणत नाना. पण माई म्हणत… “मला नाही ते कोरडं – कोरडं आवडत… आणि माझी आंघोळ होईस्तोवर, हे बाहेरचं पाणी शोषलं जातं तरटात… काही घसरत नसते मी”. दिवसाआडचा ठरलेला संवाद असे हा. पण तरीही जेव्हा नानांना… माईंनी बादलीत उरलेलं शेवटचं पाणी अंगावर घेतल्याचा आवाज येई, त्यानंतरच्या पाच – सात मानिटांत… म्हणजे माईंची साडी नेसून होऊन त्या दार उघडेपर्यंत, ते बाथरुमच्या दाराबाहेर जाऊन उभे राहीलेले असत. आणि अगदी दरवेळी सुचना देत असत माईंना… “सावकाश… सावकाश पाऊल टाक हो”. आणि माई ‘धन्य तुमची’ हा भाव, अगदी रोज तोंडावर आणत म्हणत… “होय हो… तुमचीपण बाई कमालच आहे”.
तर आजही माईंनी, ते शेवटचं पाणी अंगावर घेतल्याचा आवाज आला नानांना… आणि नाना पेपर बाजूला ठेवत, उठून बसले. चश्मा काढून बाजूला ठेवला नानांनी, आणि घड्याळाकडे बघत बसले ते. घड्याळाकडे बघतांना मग, आपसुकच नाडीचे ठोके ही तपासले जात नानांकडून. चार मिनिटं झाली होती… नानांनी बाजूला ठेवलेली वाॅकिंग स्टिक जवळ घेतली. आणि तेवढ्यात त्यांना जोराचा धप्पकरुन आवाज आला, नी पाठोपाठ आला माईंच्या वेदनेने विव्हळण्याचा आवाजही. “ही आज लवकर बाहेर येत, नेमकी घसरली की काय?” हा विचार धडकी भरवून गेला नानांच्या छातीत. आणि कसलाही संयम न बाळगता… अगदी वाॅकिंग स्टिकही न घेताच, नाना पळतच बाथरुमपाशी गेले. आणि… आणि मघा त्या बाहेर आलेल्या पाण्यावरुन नेमका पाय घसरला त्यांचा, नी ते दाण्णकन खाली पडले. प्रचंड जोरात कळवळले नाना, जमिनीवर वेडं – वाकडं आपटल्याने. म्हणजे बाथरुममध्ये आत माई खाली पडलेल्या, तर बाथरुम बाहेर नाना पडलेले… आणि मध्ये होता बंद दरवाजा.
आता दोघांची वयं इतकी होती, नी इतक्या शारिरीक व्याधीही होत्या दोघांना की… आपलं आपण उठूच शकत नव्हते दोघेही. प्रयत्न दोघांनीही केला, स्वतःसाठी नाही तर निदान जोडीदारासाठी उठण्याचा… पण व्यर्थ गेले होते दोघांचेही सारे प्रयत्न. तसंच जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दोघे बोलू लागले एकमेकांशी.
“अहो तुम्हाला काय गरज होती म्हणते मी पळत यायची… आणि शंभरवेळा समजावून झालं तुम्हाला की, नका येऊन उभे राहत जाऊ बाथरुमच्या दाराशी… पण तुम्ही ऐकाल तर शप्पथ” “वा गं वा… मला बाथरुमच्या दाराशी बघून खुश व्हायचीस, ते काय कळायचं नाही होय मला… अजूनही नवर्यालेखी आपल्याला किंमत आहे ह्या विचाराने मोहोरायचीस, ते कर की कबूल… आणि मी ही तुला हजारवेळा सांगितलेलं की, ते पाण्याचे तांबे असे उगा ओतत जाऊ नकोस… पण तू तरी ऐकलंस का कधी माझं?… आणि बघितलंस ना काय झालं ते”
“मी कुठे बघितलंय… फक्त ऐकलं तुमचं धडपडणं”
“आणि मी ही तुझं ते आपटणं ऐकूनच तर आलोना मरायला… धावतच”
“उठता येत नसेल नै आता?… बरंच लागलं का हो?… कपाळाला खोक वगैरे नाही ना पडलेली?… जरा तपासा पाहू रक्त वगैरे नाहीये ना आलेलं… आणि कसे पडलायत पाठीवर की छातीवर?”
“पाठीवर पडलेलो… आता कुशीवर आहे… खूप प्रयत्न केला गं… नाही येतंय उठता… तुला येतंय का?… आणि तू कशी पडलीयेस?… पालथी की उताणी?”
“मी ही पाठीवरच पडलेय… पुर्ण पाठ ओली झालीये… मला तर मेलं कुशीवरही वळता येत नाहीये हो”
“ए ऐक ना… तुझे पाय दरवाजापर्यंत पोहोचतील का?… हे बघ मी माझे दोन्ही पाय दरवाजाला टेकवलेत बाहेरुन… तू ही टेकव ना आतून… आत्तापर्यंत माझ्या हाताला हात लाऊन ममं म्हणत आलीस, आता पायाला पाय लाऊ… भले हा दरवाजा असेल मध्ये… आणि स्पर्श जरी झाला नाही एकमेकांचा, तरी निदान तो जाणवेल एकमेकांना”
“मी… मी सरकते हा जराशी खाली… अं… आई गं… हं… आई… आई… हा… बघा हो मी टेकवले बरं, माझे दोन्ही पाय दाराला”
“मला कळलं बरं का… ही अशी आपल्या अंगातली शक्ती, पायांवाटे ट्रान्सफर करता यायला हवी होती नै?… मी…”
“मी लगेच केली असती माझी तुमच्यात ट्रान्सफर”
“आहे का आता… माझं वाक्यही पुर्ण करु दिलं नाहिस ना मला”
“जाऊद्या हो… तुम्ही काय किंवा मी काय… वेगळे का आहोत आपण दोघं?… हे म्हणजे ‘माझे प्राण तुझे प्राण.. उरलेना वेगळाले’ असंच आहे की हो”
“पण बघ… मघा तू मला सांगून गेलीस की सगळे येऊन गेलेत, आता काही कोणी बेल वाजवणार नाही… तेव्हा कसं रिलॅक्स वाटलेलं… पण आता कळतंय सकाळच्या दहा नंतर अख्खा दिवस, अख्खी रात्र कोणीही दारावर न येणं हे किती भितीदायक आहे… आपण असंच पडून राहयचं, उद्या सकाळी कोणी येईपर्यंत?… आणि जो कोणी येईल… काय खात्री द्यावी की, कोणी दार का उघडत नाहीये ह्या गोष्टीचा पाठपुरावा करेल तो… दोन – तीन बेल वाजवून, दोन – चार मिनिटं थांबून निघून गेला तर?… तसाही इथे वेळ आहे कोणाकडे हल्ली”
“आपला लेक सांगत असतो तुम्हाला… मोबाईल कायम सदर्याच्या खिशात ठेवत जा म्हणून… बघा पाहिलंत ना, त्याचं न ऐकण्याचे परिणाम”
“तू त्याचं नाव नको काढू गं… अरे मी म्हणतो करावीच का नाटकं फोन करण्याची… राहतोस ना पाच खोल्यांच्या फ्लॅटमध्ये, बायको नी एकुलत्या मुलाबरोबर… मग एकदाही नाही वाटलं न्यावसं, आई – बापाला स्वतःच्या घरी कायमचं… करावी एखाद्या खोलीत त्यांची सोय… त्याच्या घरात ओतलेल्या माझ्या पी. एफ. मधून, निदान इतकं रिटर्न्स मिळणं अपेक्षितच होतं… अप्पलपोटी स्साले दोघंही… बस्स नातवासाठी जिव कालवतो, म्हणून आपले संबध टिकवायचे”
“जाऊ द्या हो… आपण काय कमी सुखात आहोत का?… तीन खोल्यांचं घर आहे, आपण आपल्या जिवावर घेतलेलं… आपली दोघांचीही पेन्शन्स येतायत… आपापले छंद जोपासतोय आपण… मजेत राहतोय… आणि काय हवंय मग सांगा पाहू”
“अगं असं कधी पडल्यावर, कोणीतरी उचलायला हवंय… निदान आपण पडल्याचं, कोणालातरी कळायला हवंय… वेळ निघून जाण्यापुर्वी… ऐकलं का?… अगं ए… ए… अगं ए ऐकतीयेस का?… अगं ए… ए…”
.
.
.
.
“अगं ए… ए… अगं ऐकतीयेस का?… बोलत का नाहीयेस… अगं…”
“नाना… नाना… रिलॅक्स नाना… नाना मी शशांक… शशांक पाटील… तुम्ही हाॅस्पिटलमध्ये आहात नाना… बेशुद्ध पडलेलात घरी… माझ्या मिसेसने, शांभवीने मला आॅफिसमध्ये फोन करवून बोलवून घेतलं”
“अरे… शशांक… शशांक बाळा… ही… आमची ही बाथरुममध्ये पडलीये रे… ती आतच अडकलीये… तिलाही उठता येत नाहीये… अरे तीची शुद्ध हरपली असावी बहूदा… जरा बघा ना…”
“नाना… अहो नाना… माईंनाही अॅडमिट केलंय, इथेच बाजूच्या रुममध्ये… शांभवी आहे माईंसोबत… तुम्ही तुम्ही आराम करा नाना”
“अरे… खूप खूप आभार रे बाळांनो तुमचे… पण कसं काय समजलं तुम्हाला?”
“अहो नाना… शांभवी नेहमीप्रमाणे माईंची चौकशी करायला आली, तर कोणी दार उघडेना तुमच्याकडे… म्हणून मग तिने आमच्याकडच्या किल्लीने दार उघडलं… आणि आत येऊन पाहते तर, तुम्ही पडलेला दिसलात तिला बेशुद्धावस्थेत… म्हणून मग तिने लगेच बिल्डिंगमधल्या दोघा – तिघा पुरुषांना बोलावलं, नी तुम्हाला उचलून पलंगावर ठेवलं… तिला माईही दिसेनात घरी कुठे… बर्याच हाका मारल्यावर शांभवीच्याच लक्षात आलं की, बाथरुमचं दार बंद आहे पण कडी बाहेरुन नाही अर आतून लावलेली आहे… त्या सगळ्यांनी मिळून दरवाजा कापायचं ठरवलं… तोडून आत जायचं म्हंटलं, आणि नेमकं माईंचं डोकं दाराला चिकटून असतं तर?… म्हणूनच मग कार्पेंटरला बोलावून दरवाजा कापून काढला… माईसुद्धा बेशुद्धच पडल्या होत्या खाली… मग त्यांनाही उचलून पलंगावर ठेवलं, नी अॅम्ब्युलन्सला फोन केला शांभवीने… तुम्हा दोघांना अॅडमिट केल्यानंतर, मग मला फोन केला शांभवीने आॅफिसमध्ये… निरोप मिळताच मी ही तातडीने आलो इथे”
“आणि… आणि आमच्या मुलाला – सुनेला निरोप पोहोचला की नाही?”
“नाना आराम करा आता… मी डाॅक्टरना सांगून येतो, तुम्हाला शुद्ध आल्याचं”
“शशांक… आमच्या लेकाला निरोप दिलेलात की नाही, ते सांगितलं नाहीस तू… सांग शशांक”
“नाना… शांभवीने काॅल केलेला परागला… पण… पण तो बिझी होता जरा मिटिंग्जमध्ये… सो… पण तो येऊन जातो म्हणालाय”
“कधी?”
“नाना… जाऊद्या ना…”
“कधी शशांक… कधी म्हणालाय?… ते ही येतो नाही, तर येऊन जातो”
“दोन – चार दिवसांत”
“————-“
“नाना… तुम्ही का हिरमुसताय?… अहो मी आणि शांभवी आहोत ना तुमच्यासोबत”
इतक्यात शांभवी आली रुमचा दरवाजा उघडून, आणि तिच्या सोबत होत्या माई… तिचा हात पकडून… रडत – रडत नानांकडे बघत उभ्या. नानाही जरासे उठून बसले मग, शशांकच्या मदतीने… शांभवीने माईंना धरत नानांच्या बेडवर बसवलं… शशांकने शांभवीला ‘चल बाहेर थांबू’ अशी खूण केली.
“माई – नाना जे काही बोलायचंय, ते दोन मिनिटांत बोलून घ्या… तशाही घरी पडल्या पडल्या, दोन तास छान गप्पा झाल्यायत तुमच्या… बेशुद्ध पडण्याआधी… तेव्हा आटपा बरं का वेळीच… डाॅक्टर आम्हाला तासतील नाहीतर… आम्ही बाहेर उभे आहोत… युवर टाईम स्टार्ट्स नाऊ”
शांभवी हसतच शशांकसोबत बाहेर गेली, नी दरवाजा ओढून घेतला तिने. माईंनी नानांच्या छातीवर डोकं टेकवलं. नाना म्हणाले…
“आपली मोठी लेक, अगदी झाल्या झाल्याच गेली होती ना… तिनेच घेतलाय बघ हा पुनर्जन्म”
“अगदी मनातलं बोललात हो… रोज न चुकता येते माझ्याशी गप्पा मारायला… कदाचित तेच बघायला की, आपण व्यवस्थित आहोत ना… हे असे रेशमी बंध कितीतरी पक्के हो, उगिच कोणाबरोबर तरी दोरखंडाने बांधील असण्यापेक्षा”
नानांनी थोपटलं माईंच्या डोक्यावर. पुढचं दिड मिनिट मग, दोघे एकही शब्द बोलता वाट बघत होते… त्यांच्या मुलीच्या आत येण्याची.
—सचिन श. देशपांडे
Image by Godsgirl_madi from Pixabay
👌👌
खूप छान
👌👌👌
Sunder bandh!
सुंदर
सुंदर
Wah….khup chhan 👌