विधीलिखित- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- माधुरी परांजपे
पतिनिधनानंतर आणि तेही वयाची साठी उलटून गेल्यानंतर माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरु होणार आहे असे भविष्य कुण्या जोतिषाने वर्तवले असते तरी खचितच त्यालाच वेड्यात काढले असते.परंतु विधीलिखित कधी चुकत नाही हेच खरे !आता ह्याला विधीलिखित म्हणावे की योगायोग ?की योगायोग हे ही एक विधीलिखितच असते ?तसेच असावे.नाहीतर बेचाळीस वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझ्यासारख्या धोपटमार्गी बाईस असे आडवळणाचे पाऊल उचलण्याचे कोणतेच प्रयोजन नव्हते.पूर्ण विचारांती मी हानिर्णय घेतला होता.नाखुशीने किंवा दबावाखाली घेतला असेही नव्हते. कुटुंबियांशी विचारविनिमयही केला होता.सर्वांच्या विरोधात जाऊन स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्याही नव्हती.सुरवातीला भुवया उंचावल्या जातील , नाकं मुरडली जातील , वाक्ताडनही झेलावे लागेल ही कल्पनाही होती.ह्या सर्वाला तोंड देण्याची मानसिक तयारीही मी ठेवली होती.
हा निर्णय मी फक्त आणि फक्त स्वतःकरताच घेतला होता. प्रथम माझी ओळख आणि पार्श्वभूमी सांगते.मी मध्यम वर्गीय कुटुंबातली.तीन भावंडांमधे ज्येष्ठ.एक भाऊ आणि एक बहिण.आई पूर्णवेळ गृहिणी , वडिल सरकारी नोकरीत.
दोघे सुशिक्षित , जबाबदार पालक होते.घराला शिस्तीचं वळण आणि संस्कारांचं बाळकडू होतं.घरीं सणवार , वाढदिवस , कुळाचार पाळले जात.एकंदरीत आई –
वडिलांच्या छत्रछायेखाली सुखी , सुरक्षित बालपण गेलं. उपवर आणि पदवीधर झाल्यावर घरात लग्नाची चर्चा सुरु झाली. साठीच्या दशकातील सुरवातीच्या त्या काळात मुलीच्या मनातले जाणून घेण्याची , तिची आवड – निवड पसंती – नापसंती गांभीर्याने विचारात घेण्याची पद्धत नव्हती.
मुलगीही मनातले आई – वडिलांशी मोकळेपणाने बोलण्यास धजावत नसे.प्रेमविवाह अपवादात्मकच होत असत.कुणी केलाच तर तिने काही अपराध केला असे वाटायचे. तिच्या आई – वडिलांवर ठपका ठेवला जायचा.माझ्यासारख्या अबोल आणि भिडस्त मुलीबाबत तर ती शक्यताच नव्हती.
प्रेमविवाह नाही तर विवाहोत्तर प्रेम हा धोपट मार्ग होता. लग्न जमायला फारसा विलंब लागला नाही.सुंदर तर मी खचितच नव्हते ; परंतु नाकारण्यासारखीही नव्हते.उजळ वर्ण ,लांबसडक केस आणि सुदृढ शरीरयष्टी ही जमेची बाजू.
दोन -तीन होकार आले.त्यातील एका अनुरुप वराशी विवाह झाला.कुटुंब सुस्थित , सुशिक्षित होते.एकत्र कुटुंब होतं.यथावकाश दोन अपत्यांचा जन्म झाला.पुढे जागा कमी पडू लागली म्हणून उपनगरात जागा घेऊन आम्ही वेगळे राहू लागलो.
आता आमच्या सहजीवनाविषयी.मी मितभाषी तर त्यांना बोलायला कोणताही विषय पुरेसा असे.माझ्या शीघ्रकोपी स्वभावावर त्यांचा शांत स्वभाव हा नामी उतारा होता.पण स्वभाव उतावळा.अतिउत्साहाच्या भरात चटकन निर्णय घेत. त्यांच्या चांगुलपणाचा अनेकदा गैरफायदा घेतला जायचा.पण त्यातून बोध घेत नसत.मला चांगली नाटकं सिनेमा पहायला आवडे.त्यांना ते तीन तास कंटाळवाणे वाटत.प्रवासाची दोघांना आवड.मुलींना घेऊन खूप प्रवास केला. सढळपणे खर्च व्हायचा.मुलींचे सगळे हट्ट , क्वचित् अवाजवीही , पुरवले जायचे.माझ्या शाळेतील नोकरीमुळे
आर्थिक स्थैर्य होते.घराकडे, मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत असल्यामुळे कोणतीच तक्रार नव्हती.एकंदरीत देवाच्या दयेने आयुष्याची गाडी मजल दरमजल करत सुरळीतपणे चालू होती.
आमच्या लग्नाचा पंचेचाळिसावा वाढदिवस आमच्या मुलींनी घरगुती पद्धतीने साजरा केला.आम्हा दोघांना दिखाऊपणा , भपका ह्यांचे वावडे.जवळच्या नातेवाईकांनी फोनवरुन ,व्हाॅटस् – अॅपवरुन शुभेच्छा दिल्या.त्यावर पाच – सहा महिने गेले.दोन दिवस त्यांची तब्बेत नरम होती.काविळीची लक्षणे वाटत होती.घरगुती उपायांबरोबर डाॅक्टरी इलाजही सुरू केले.काविळ असाध्य रोग नसल्यामुळे त्यांनी स्वतःही ते गांभिर्याने घेतले नाही.पण काविळ हटत नव्हती.शरीर पिवळे दिसू लागले.डाॅक्टरांनी हाॅस्पिटलमधे भरती करण्याचा सल्ला दिला ; पण उशीर झाला.
माझ्यावर हा आकस्मित आणि मोठाच आघात होता. मी सैरभैर झाले.स्वतःलाच कोसूं लागले. मनाने खचून गेले.आयुष्यात कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली . घर खायला उठू लागले.कशातच मन लागेना. वेळ जाता जाईना.मुली फोन करत.त्यांची नोकरी ,संसार संभाळून देता येईल तेव्हढा वेळ देत.त्यांची धावपळ मलाही दिसत असे.शेजारणी विचारपूस करीत ; परंतु त्यांचा वे ळ घेणं किंवा त्यांना त्रास देणं मला प्रशस्त वाटत नसे.वेळ घालवण्यासाठी नातवंडांचं बेबी – सिटींग करावं अस कुणीतरी सुचवलं;पण वयोमानानुसार ही पूर्णवेळ जबाबदारी मला झेपण्यासारखी नव्हती.शिकवण्या मी कधी घेतल्या नव्हत्या आणि आताही नकोशा वाटत होत्या.भजनी मंडळ ,सप्ताह , पारायणं ह्यात माझं मन कधीच रमत नसे.नास्तिक नव्हते .माझी आस्था माझ्यापुरतीच मर्यादित होती.टी व्ही वरच्या कंटाळवाण्या सिरिअल्स बघणं म्हणजे शिक्षाच वाटत असे.वाचनाची आवड होती ; पण किती वाचणार ?
डोळे दुखायचे.रिकामपण ,एकटेपण वाढू लागलं .मी सोशल मिडियावर जास्त वेळ घालवू लागले.माझ्या काॅलनीतील जुन्या मैत्रिणी , वर्गमैत्रिणी , जुने सहकारी ह्यांच्याशी नव्याने संपर्कात येऊ लागले. त्यांच्या बरोबर अपडेटस् शेअर करु लागले.मधल्या काळात घडलेल्या घटनांची माहिती मिळू लागली.काही परदेशी गेले होते.बर्याच जणींना सुना ,नातवंडे झाली होती.एक दोन मोहरे हरपले होते.मैत्रिणींच्या संपर्कात राहिल्यामुळे एकाकीपणाची बोच कमी होऊ लागली.भेटी गांठींमुळे वेळही जाऊ लागला. एक दिवस एका जुन्या मैत्रिणीचा मेसेज आला.तिच्याकडे आयोजित केलेल्या पार्टोचे आमंत्रण देणारा.जुन्या मैत्रिणींची भेट होईल म्हणून मी जाण्याचे ठरवलं.नियोजित वेळी त्या ठिकाणी पोहचले.पार्टीला तो ही आला होता.तो म्हणजे श्रीधर.आम्ही एकाच काॅलनीतले.लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो.मला तीन -चार वर्षांनी सिनिअर होता.शाळेत हुशार विदयार्थी म्हणून ओळखला जायचा.तेव्हा आम्ही सगळेच तारुण्यात प्रवेश करत होतो. मुलामुलींना परस्पर आकर्षण वाटलं तरी व्यक्त करायची संधीच मिळत नसे.साठीच्या दशकाच्या सुरवातीला मुला – मुलींचे विलगीकरण शिगेला पोहचले होते.कोणी एकमेकांच्यावार्यालाही उभे रहात नसे.चालणं बोलणं तर दूरच; नुसतं बघण्याचीही चोरी होती .अशा प्रतिकूल वातावरणात किती प्रीतीफुले उमलण्यापूर्वीच कोमेजून गेली असतील कुणास ठाऊक ? पुढे सगळेजण आपापल्या मार्गाने गेले.
अशा व्यक्ती एकाएकी सामोर्या आल्या की मन एकदम फ्लॅशबॅकमधे जाते.मनाच्या तारा छेडल्या जातात.स्मृतींच्या कुपीतील आठवणींचा सुगंध दरवळू लागतो. सुरवातीला आमचं जुजबी बोलणं झालं.विचारपूस झाली तेव्हा कळलं की त्याची पत्नी पोटाच्या कुठल्याशा विकाराने दोन वर्षांपूर्वी निवर्तली होती., दोन्ही मुलं अमेरिकेत होती सध्या तो एकटाच रहात होता.त्याचा स्वतःचा इंटिरिअरचा बिझिनेस होता.अजून कार्यरत होता.मानसिकदृष्ट्या थोडा खचल्यासारखा वाटला.माझी सद्यस्थिती त्याने जाणून घेतली.भेट तेव्हढ्यावरच संपली.पुनर्भेटीची शक्यता नव्हती.
मध्यंतरी दोन महिने गेले.एक दिवस अचानक त्याचा फोन आला.मैत्रिणीकडून त्याने माझा नंबर मिळवला होता.त्याची मुलं सहकुटुंब तीन आठवड्यांसाठी भारतात आली होती. त्यांच्यासाठी त्याने गेटटुगेदर ठेवले होते.मला आमंत्रण दिले होते.त्याच्या मुलांना ती शाळकरी असतांना पाहिले होते.मुलेही काॅलनीची माहेरवाशिण म्हणून मला ओळखत होती.तेव्हाच मुलींशीसुद्धा त्यांची जुजबी ओळख होती. मुलांना ,त्यांच्या बायकांना भेटण्याची उत्सुकता होतीच .आमंत्रण स्वीकारून मी गेटटुगेदरला हजेरी लावली. त्याचे मुलगे आय् टी कंपनीत काम करत होते.त्यांच्या बायकांशी ओळख झाली.गप्पा झाल्या.त्यांच्यात आणि माझ्यात एक दोन काॅमन ओळखी निघाल्या. फोटो सेशन झाले.त्यांना घरी येण्याचे आमंत्रण देऊन मी परतले .त्यांच्याकडे दिवस कमी असल्यामुळे ते येऊ शकणार नव्हते.ठरल्यादिवशी ती मंडळी अमेरिकेला रवाना झाली.त्यानंतर दोन दिवसांनी त्याला एकटं वाटत असेल ह्या विचाराने फोन केला.पार्टीची परतफेड म्हणून घरी चहाचं औपचारिक आमंत्रण दिल.तेव्हा बाहेर कुठेतरी भेटूया असं त्याने सुचवलं.एका प्रसिद्ध हाॅटेलमधे भेटण्याचे ठरले.जेवण माझ्यातर्फे ह्या अटीवर.स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेताना जुन्या वेळच्या आठवणी निघाल्या.मी खोदून कोणतीच चौकशी केली नाही , पण त्याच्या बोलण्यातून कळलं की व्यवसाय बंद करुन एव्हढ्यातच कायम मुलांकडे जाण्याचा त्याचा विचार नाही.सांपत्तिक स्थिती उत्तम होती.घरकामाला , स्वयंपाकाला बाई होती.मित्र संपर्कात होते.एकटेपणाची सवय झाली होती.कामात असल्यामुळे बिझी रहात होता. दुसरा विवाह करण्याचं तर वयच नव्हतं.जेवण झाल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
पूर्वपरिचय असला तरी स्वभावाची नव्यानेच ओळख होत होती.मला वाचनाची आवड आहे हे कळल्यावर त्याने त्याच्या संग्रही असलेली काही पुस्तके मला देऊ केली.त्याच्या बायकोला चांगली पुस्तकं विकत घेऊन संग्रही ठेवायची आवड होती.ती देण्यासाठी एका रविवारी आधी कळवून तो घरी आला.पुस्तकं देऊन चहापाणी झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून अर्ध्या पाऊण तासाने निघाला. दोन आठवड्यांनी वाचून झालेली पुस्तके परत करण्यासाठी उभ्या उभ्या जाऊन यावं म्हणून गेले.स्वारी आरामशीरपणे कुठल्यातरी विनोदी नाटकाची कॅसेट बघत होती.थोडा वेळ मीही नाटक बघत थांबले.मग पुस्तकं परत करुन निघाले .
असाच एक दिवस कोणतासा सण होता.त्याला व्हाॅटस् अॅपवर शुभेच्छा दिल्या. तेव्हा कळले की त्याच्या स्वयंपाकाच्या काकू चार दिवस गावी गेल्या होत्या. त्याने बाहेरून जेवण मागवले होते.मी त्याला ते पॅकेट घेऊन घरी येण्यास सांगितले.आमच्या एका काॅमन फ्रेंडला , सरितालाही बोलावले.हसत – खेळत जेवण झालं.मग महिन्यातून एक रविवारी आमच्या तिघांचा हा प्रघातच पडला.अधून मधून नाटकाला ,एक दिवसाच्या सहलीला जाऊ लागलो.
त्याचा एक पत्ते क्लब होता.मला पत्त्यांची आवड होतीच. मी उत्तम ब्रीज खेळत असे.एकदा त्यांचा एक प्लेअर आजारी असल्यामुळे गैरहजर होता .तेव्हा त्याने मला बोलावून घेतले.तेव्हापासून अधून मधून मी त्यांच्या खेळात सहभागी होत असे. एकदा आम्ही तिघांनी म्हणजे तो , मी आणि सरिताने एक दिवसाची एक ट्रिप बुक केली.आयत्या वेळी काही घरगुती कारणामुळे सरिताला येणं कॅन्सल करावं लागलं.आयत्या वेळी तिकिटं रद्द करुन काहीच फायदा नव्हता.म्हणून आम्ही दोघांनी जायचे ठरवले.एकांत होता.वृत्ती उल्हसित होत्या.
ती ट्रिप खूप एंजाॅय केली.गप्पांच्या ओघात मी त्याला सहज विचारले की शाळा काॅलेजच्या दिवसांत तो कधी कोणाच्या प्रेमात पडला होता का.थोडा विचार केल्यासारखे दाखवून त्याने होकारार्थी मान हलवली.मी साहजिकच विचारलं, “मग पुढे काय झालं ?”
“पुढे काहीच झालं नाही.”
” का?”तिच्या मनात तसं काही नव्हतं का? ”
“ते मला कधीच समजलं नाही.ती मुलखाची लाजरी-
बुजरी आणि भिडस्त स्वभावाची होती.”
“अरे मुली अशाच असतात.निदान त्या काळी तरी असायच्या.”
“मग मी काय करायला हवं होतं?”
“अशावेळी मुलानेच पुढाकार घ्यायचा असतो.काही
संकेत द्यायचे.कुणाची तरी, तुझ्या मित्राची किंवा तिच्या मैत्रिणीची मध्यस्थी घ्यायची. ”
“माझे मित्र आणि तिच्या मैत्रिणी काॅलनीतल्याच होत्या.
त्यांची मदत मिळण अवघड होत. सगळच बिंग फुटलं
असतं.तो धोका पत्करण शक्यच नव्हत.”
“म्हणजे ती काॅलनीतली होती तर !मग माझ्या माहितीतली
नक्कीच आहे.कोण होती ती ?”
त्यावर त्याने मौन बाळगले.
मी काॅलनीतील दोन तीन मुलींची नाव घेतली.
त्यावरही त्याची चुप्पी.
“अरे ,आता सांगायला काय झाल?तिला कुठे कळणार आहे?
एक जमाना गुजर गया.”
“एव्हढ्यात नाही.योग्य वेळ आल्यावर सांगेन.”
“त्यात कसली आली आहे योग्य वेळ?”
“ते जाऊन दे.तू सांग.तू प्रेमात पडली होतीस का?”
“हं ”
” मग पुढे काय झालं ? ”
“पुढे काहीच झालं नाही.”
“का ?”
” माझा स्वभाव ”
“म्हणजे ?कोणता स्वभाव ?”
“हाच.लाजरा- बुजरा.आणि भिडस्त.”
मी त्याचीच खेळी त्याच्यावर उलटवत म्हणाले.
आता आश्चर्य करण्याची त्याची वेळ होती.
” काॅलनीतला होता ?”
“हं”
“कोण होता? ”
मी गप्प.
“आता सांगायला काय हरकत आहे ? कुणाला कळणार आहे ?”
“तू कुठे सांगितलस ?”
” माझी गोष्ट वेगळी आहे.”
“ती कशी ?”
“ते तुला समजणार नाही.बर ते जाऊन दे.तू का नाही कुणाला
मध्यस्थी करायला सांगितलीस ? ”
” तेव्हढं माझ्या विश्वासातलं कोणी नव्हतं.त्याच्याबद्दल ही शंभर टक्के खात्री नव्हती?”
” म्हणजे पन्नास टक्के होती ? ”
” तसं समजूया हवं तर.”
“कशावरून ? ”
” बाईला एक सिक्स्थ सेन्स असतो ज्यामुळे न सांगताही तिला बरंच काही समजतं”
“पुढे ?”
” पुढे तो हाॅस्टेलवर निघून गेला आणि वेळही निघून गेली.”
” I feel sorry for you”
“Never mind.We were in the same boat. ”
या नंतर बराच वेळ आम्ही दोघेही गप्प गप्पच होतो.तो कसल्याशा विचारात गढून गेला.
“A penny for your thoughts.” मी म्हणाले.
“काही नाही. जरा घटनांची लिंक जुळवतोय.”
“मी काही मदत करु शकते का ?”
“तूर्तास नाही.”
या नंतरच्या दुसर्या दिवशीची गोष्ट.व्हाॅटस् अॅपवर त्याचा
मेसेज आला.मेसेज शायरीच्या स्वरूपात होता.
“काश ! गुजरा जमाना वापस आता
और हमारे हाथमें मोबाईल होता,
तो दिलकी बात टेक्स्ट करतें
और इन्शाल्ला बात बन जाती ”
ह्यावर मीही त्याला शायरीतच उत्तर दिले.
“नजरोंसे नजरे मिला नही पाएँ
जुबांपर लब्ज ला नही पाएँ
कंबख्त एक चिठ्ठी तक लिख नहीं पाएँ
मोहब्बतमें दोनों ही निकम्मे निकलें ”
हा मेसेज पोहचला असेल नसेल तोच मोबाईलची रिंग वाजली.
“Hallo.what do you mean , दोनों?I mean ,do you
mean….what I mean..to say…”
त्याला मधेच थांबवत मी म्हटले.
” yes;I mean exactly what you mean. ”
ह्यावर बराच वेळ त्याच्या तोंडून शब्दच फुटेना. मी शांतपणे फोन खाली ठेवला.
ह्यानंतर गोष्टी वेगाने घडू लागल्या.एकत्र रहायचं नाहीतर भेटीगाठी स्थगित करायच्या.पुनर्विवाह दोघांनाही नको होता. त्यामुळे मुलामुलींशी संबंधित आर्थिक आणि कायद्याच्या अडचणी उभ्या रहाण्याच्या शक्यता होत्या.आम्ही वकीलाला आणि काउन्सेलरला भेटलो.त्यांनी आमच्या दोघांची पार्श्वभूमी जाणून घेतली.आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो ही तिला मोठी जमेची बाजू वाटली.
“हे तुमचं आयुष्य आहे.मुलांचं म्हणाल तर ते आपापल्या संसारात गुंतून पडले आहेत.इच्छा असली तरी ते तुम्हाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत.त्यांच्याकडून फार अपेक्षाही ठेवता येत नाहीत.त्यांना ह्यात कमीपणा वाटण्याचं कारण नाही.कुबड्यांपेक्षा कुणीतरी विश्वासाने पुढे केलेला हात धरणं केव्हाही चांगलं.शिवाय अनिर्णित अवस्था केव्हाही घातकच.तेव्हां लवकरात लवकर निर्णय घ्या आणि तो अमलात आणा.”
सर्वात आधी दोघांच्या मुलांना विश्वासात घेणं आवश्यक होतं.त्याची मुलं ज्या देशात रहात होती तिथे ही लिव्ह – इन – रिलेशनशिप सर्रास रुळलेली होती.त्याच्या मित्रमंडळीतील काहीजण असेच रहात होती.त्यामुळे त्यांना हा विचार धक्कादायक वाटला नाही.त्यांनी फारसा विरोध केला नाही.उलट वडिलांची काळजी घेणारं , आधार देणार कुणीतरी असेल तर त्यांचीही काळजी मिटणार होती.शिवाय मी पूर्वपरिचित असल्यामुळे वडिलांच्या आयुष्यात येणारी स्त्री कशी असेल , कशी वागेल ही अनिश्चितता नव्हती.ह्यातून पुढे कोणतीही कायदेशीर समस्या उद्भवणार नव्हती.मुलांनी सहमती दर्शवली.
ही कल्पना माझ्या मुलींच्या पचनी पडली नाही.
“आई , आम्ही आमच्या सासरी काय सांगू? त्याच्या प्रश्नांना काय उत्तर देऊ ? ”
“तुमच्या सासरच्यांचा विचार करून मी कोणताही निर्णय घेणार नाही.त्यांना तो नाही पटला – आणि बहुतेक नाहीच पटणार – तर मी निर्णय बदलू ? ”
“आई , मग तू हा निर्णय नेमक्या कोणत्या हेतूने घेतला
आहेस ? ”
” मी एकटी रहाते.एकटं रहाणं आजच्या जगात खूप अवघड आहे.कुणाच्या तरी आधाराची गरज वाटते. सुरक्षितताही महत्त्वाची आहे.”
“आई , आम्ही आहोत ना ! आम्ही धावून येऊ तुझ्या मदतीला”
“तुम्ही नक्की याल ह्याची मला खात्री आहे.पण तुम्हाला तुमचे घर , संसार , नोकर्या आहेत.मला पूर्णवेळ , हक्काचं माणूस मिळेल.अजून आमच्या आयुष्याची दहा – पंधरा वर्षं
गृहीत धरली तर हा निर्णय सगळ्यांच्या दृष्टीने फायद्याचा ठरेल असं मला वाटतं.
“” आई ,मग तू रितसर पुनर्विवाहच का करत नाहीस? ”
“त्याची अनेक लीगल ,फायनान्शिअल झेंगटं आहेत.ती टाळायची असतील तर हाच एक पर्याय आहे.”
” पण आई आमच्या वडिलांची जागा दुसर्या कुणी घेतली
तर आम्हाला आवडेल का ? ”
“नेमक हेच ह्या नात्यात टळणार आहे हेच मला तुमच्या लक्षात आणून द्यायचे आहे.मी त्याच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र बांधणार नाहीये.माझं नाव आणि माझं स्टेटस् तेच रहाणार आहे.त्यात काहीही बदल होणार नाहीये .तुमच्या आणि माझ्या जीवनात तुमच्या वडिलांचं स्थान अबाधित रहाणार आहे.”
“आई ,अगदीच बिकट परिस्थिती आली तर वृद्धाश्रमाचा पर्याय आहे.त्याचाही तू विचार कर. ”
“ह्या मुद्द्याकडे मी वळणारच होते.वृद्धाश्रमाचा पर्याय कुणी खुशीने निवडत नाही..हा पर्याय मी राजीखुशीने निवडला आहे.वृद्धाश्रमाची जन्मठेप मला नको आहे. ह्यात आमच्या स्वातंत्र्यावर , हिंडण्या फिरण्यावर कोणतीच आंच येणार नाही.पडलोच आजारी तर लक्ष द्यायला घरातलं माणूस असेल.”
“आई,तुला एक प्रश्न विचारू ? विचारलेला तुला आवडणार नाही कदाचित ; पण विचारल्या शिवाय रहावत नाही.आई ,तू बाबांशी प्रतारणा करत आहेस असं नाही तुला वाटत ?”
“सुरवातीला माझ्याही मनात हा विचार आला होता.पण मी पुनर्विवाह केला तर ती प्रतारणा नाही आणि लिव्ह – इन मधे राहिले तर ती प्रतारणा हे तर्कट कोणते ? मी आज आणि ह्यापुढेही त्यांची विधवा म्हणूनच जगणार आहे ;त्यांची ex-wife म्हणून नाही.त्यांच्याबद्दल मला आजही खूप आदर आणि प्रेम वाटते.दुर्दैवाने ते आज हयात नाहीत.त्यांच्या पश्चात उद्भवलेल्या परिस्थितीचाच हा परिपाक आहे.”
” त्यांना काही अपरिहार्य कारणाने अमेरिकेला मुलांकडे जावं लागलं तर तू काय करशील ?”
“परत यायला मला माझं घर आहे.माझी माणसं आहेत .त्याच्याशी विवाह करून मी ती नाळ तोडणार नाहीये.”
“त्यांनी तुला बरोबर नेण्याची तयारी दाखवली तर तू जाशील ?”
“ह्या क्षणी तरी माझ्याजवळ ह्या प्रश्नाचे उत्तर नाही.पण मला शक्यता कमी वाटते. ”
” मग तुझा निर्णय पक्का आहे तर ?”
“माझ्या मेंटल फॅकल्टीज आणि फिजिकल अॅबिलिटिज्
अजून शाबूत आहेत. I have nothing to lose and everything to gain.I think this is a win – win situation. ”
” And if didnt work out ? ”
“हा अलिखित करार आहे.त्यातून बाहेर पडायचं.विवाहितांचे सुद्धा घटस्फोट होतातच की. ”
“हा विचार नेमका तुमच्या मनात केव्हा आणि कसा आला?”
“सुरवातीला आमच्या दोघांच्याही मनांत काही नव्हत॔
.जुनी ओळख होती.समदुःखी होतो.अहेतुकपणे ,प्रसंगोपात घटना घडत गेल्या.स्नेह वाढत गेला. आमच्या काॅमन फ्रेंडने खडा टाकून बघितला.तो निशाणावर लागला.”
मी जास्त खोलात न शिरता त्यांना पटेल असं उत्तर दिलं. मुलींच्या उलट तपासणीला मी आत्मविश्वासाने तोंड दिलं आणि जमेल तेव्हढ त्यांच्या शंकांचं निराकरण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.माझी पारदर्शकता त्यांनाभावली. त्यांनी अप्रत्यक्ष , मूक संमती दिली.त्यांचा दुरावा मला कदापि स्वीकार्य नव्हता. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या माणसांनाही विश्वासात घेण जरूर होतं. भाऊ आणि भावजयीने माझी बाजू शांतपणे ऐकून घेतली. ” तू पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहेस.पण ह्याला समाज मान्यता नाही हे तुला माहित असेल ना ?”
” नक्कीच.पण अशा अनेक अवैध गोष्टी समाजात सतत घडत असतात.विवाहबाह्य संबंध आहेत , दोन बायका करणं आहे ,ठेवलेली बाई आहे.हे सगळं चोरी छुपे चालू असतं.समाज तिकडे दुर्लक्ष करतो. ते ही समाजाला भीक घालत नाहीत.आम्ही निवडलेला ह्यापैकी कशातच मोडत नाही.शिवाय आम्ही सर्व खुल्लेआम,समजून उमजून करत आहोत.”
“समाजाच्या टीकेला ,रोषाला तोंड द्याव लागेल.”
“तिकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं आहे.त्यांना नैतिकतेचा ठेका कुणी दिला?त्यांची पर्वा करायच मला कारण नाही. माझ्या निर्णयाशी त्यांनाही देणं घेणं असता कामा नये.”
“समाजाचं एक वेळ जाऊन दे.मुलींच काय ?मुलींच मन दुखवून तुला ह्यातून निर्भेळ आनंद मिळेल का ?”
“त्यांचं मन मी वळवल आहे.त्यांची समजूत पटलीआहे.. .त्याच्या पाठिंब्याशिवाय एव्हढं मोठं पाऊल मी उचलणार नाही हे त्या जाणून आहेत.त्यांच्या आईच्या नावासह त्यांचे सर्व हक्क अबाधित रहाणार आहेत.In fact त्यांच्या भविष्याचा आणि भल्याचा विचार करूनच मी हा मनाला पूर्णपणे न पटणारा निर्णय घेतला आहे ह्याची त्यांना खात्री पटली आहे.”
“ठीक आहे.After all it is your life.तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडणार असेल तर मी त्यात आडकाठी घालणार नाही. श्रीधरला मी जवळून ओळखतो.तो एक सभ्य ,जबाबदार मुलगा आहे.तू त्याच्यावर जो विश्वास दाखवला आहेस त्यास तो पात्र आहे असे मला वाटते.भाऊ ह्या नात्याने तुझ्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल.”
भावजयीच्या कपाळाला आधी आठ्या पडल्या.ती एवढच म्हणाली , ” ह्यातून चांगलच घडेल अशी आशा करुया.हा निर्णय तुम्ही तुमच्या अखत्यारीत घेतला आहे.काही अघटित घडलं तर ती सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल.बाकी आम्ही आहोतच.”
सासरच्या माणसांशी सुद्धा मी चर्चा केली.त्यांनी माझी मतें सहानुभूतीने ऐकून घेतली.मला त्यांच्या परिवाराचा सदस्य म्हणून राहू देण्याची माझी विनंती त्यांनी मान्य केली.माझे नाव न बदलल्याचा हा लाभ होता .त्यांच्या लग्नकार्यात, सणासमारंभात मला सहभागी करुन घेण्याचं आश्वासन दिलं तेव्हा मला मी घेतलेल्या निर्णयाची योग्यता जाणवून अतीव समाधान झालं.
मी मिळवलेल्या नैतिक आधाराच्या जोरावर सेकंड इनिंग खेळण्यास मी सिद्ध झाले.ह्या गोष्टीला आता पाच वर्षं झाली.आज आमची वयं अनुक्रमे अडुसष्ट आणि एकाहत्तर आहेत.दोन वर्षापूर्वी अमेरिकेला जाऊन मुलांचा पाहुणचार घेऊन आलो.मुलीही निःसंकोचपणे भेटायला येतात.आम्ही आयोजित केलेल्या समारंभाला दोन्हीकडचे नातेवाईक हजेरी लावतात.कुणी आमच्या धाडसाचे कौतुक करतात. म्हातारपणच्या समस्यांवर एकत्रितपणें मात करून बंधनमुक्त सहजीवनाचा आनंद घेत आहोत. मनाचा कौल स्वीकारा. सर्व सुरळीत होईल हा आमचा अनुभव आहे.तुम्हाला पटतय का?
Image by Free-Photos from Pixabay
- प्राजक्ताचा दरवळ - September 7, 2023
- सोळा नंबरच्या आजी - February 10, 2022
- पुढचं पाऊल- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन- सुचेता गोखले - July 7, 2021
सुरेख👌👌
काळाची गरज आहे ही
Beautiful….