१ बीएचके
आज थोडे लवकरच फिरायला बाहेर पडलो होतो. लवकर म्हणजे नेहमीपेक्षा जरा जास्त लवकर. सकाळ कसली, भली पहाटच म्हणायची. बाहेर पडलो तेव्हा अंधार होता. लांब डोंगरावर अजूनही धुक्याची शाल पांघरली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने हवा थंड झाली होती. हळूहळू जसं तांबडं फुटू लागलं तशी सगळीकडे गर्द हिरवाई दिसू लागली. काय झरझर पालटतात निसर्गाची रूपं! उन्हाळ्यात रख्ख कोरडी दिसणारी झाडं आता हिरव्याकच्च पानांनी भरून गेली होती. बोडके दिसणारे डोंगर आता हिरव्या रानाने माजले होते. काही मोजक्या पक्ष्यांचे आवाज वगळता सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. उन्हानी अजून डोकं वर काढलं नव्हतं.
इप्सित ठिकाणी पोचलो आणि मनभरून फिरून आलो. लांबवर गावातल्या देवळात जाऊन आलो. हे देऊळ एक कोणत्या झंगडाने बांधलंय कोणास ठाऊक. दरवाजा इतका छोटा बांधलाय की एक माणूस कसाबसा आत जाऊ शकेल. किंवा मुद्दामच तसं बांधलं असावं. पण आतली मूर्ती मात्र सुरेख आहे. देवीपुढे रात्रीची मंद समई अजूनच बारीक तेवत होती. घंटा वाजवायचा मोह झाला पण वाजवली नाही, उगाच या सुखावह शांततेचा भंग व्हायचा.
आता उजाडायला लागलं होतं. वाटेत थोडेसे टेकलो तर लांबून चिवचिवाट ऐकू आला. अगदी सतत नाही पण मधूनच. अचानक खूप दंगा होई मग सगळं एकदम शांत, परत थोड्या वेळाने चिवचिवाट सुरू. वर्गात खूप दंगा करत असणाऱ्या मुलांना मास्तर ओरडतात, थोडा वेळ शांतता पसरते मग परत दंगा सुरू. अगदी तसंच सगळं सुरू होतं. चिवचिवाट कसला, कलकलाटच म्हणायचा खरंतर. पण मधुर कलकलाट. कानांना सुखावणारा. मी उत्सुकतेने आवाजाच्या दिशेला जाऊन पाहिलं. उन्हं आता थोडी वर आली होती. त्या कवडस्यात त्याचा तो पिवळाधमक रंग अगदी स्पष्ट उठून दिसला. काय दिमाखदार रंग असतात यांचे, अगदी अस्सल! शाळेत बहिणाबाईंच्या कवितेत वाचला तोच हा सुगरण. हा बरं का, ही नव्हे, पिलांसाठी खोपा बांधणारा. पंख फडफडवत घरट्याला घिरट्या मारत होता. मधेच आत जायचा, परत बाहेर यायचा. कुठेतरी चोचीने डागडुजी करायचा, परत बाहेर यायचा. इतकी लगबग सुरू होती की विचारता सोय नाही! हे सगळं कोणासाठी? तर मिसेस सुगरणसाठी. मिसेस सुगरण आज घर बघायला आल्या होत्या. त्यांच्या पसंतीला पडलं तर मिस्टर सुगरणांची लॉटरी ! घर आणि बायको दोन्ही मिळणार. नाही पसंतीस पडलं तर परत नवीन घराची पायाभरणी सुरू.
त्यांच्यात असंच असतं. विणीचा काळ जवळ आला की मिस्टर आधी घर बांधायला घेतात. काडी काडी जमवून सुंदर घर बांधतात. बांधताना उंचावर बांधतील अशी काळजी घेतात, म्हणजे साप वगैरे जनावरापासून सुरक्षित राहता येईल. सिव्हिल इंजिनियरच्या तोडीस तोड काम करतात, खूप मेहनत घेतात. एका मिलनासाठी काय काय करावं लागतं यांना! पण ही आत्मनिर्भरता, जबाबदारीची जाणीव किती सुरेख आहे. संसार उभा करायचा असेल तर त्याला आधीपासूनच मेहनत घ्यावी लागते हे या इवलूस्यांच्या अंगी रुजलेलं असतं. मग तो दिवस येतो. मिसेस सुगरण घराची पाहणी करायला येतात. त्या तशा चोखंदळ असतात. उंचावर बांधलेलं घरटं त्यांना जास्त आवडतं कारण तिथे पिलं सुरक्षित राहतात. पूर्ण घराची छानबीन करतात. कुठे एखादं भोक, डागडुजी राहिली नाही ना हे पाहतात. काही झालं तरी पिलांसाठी घरटं एकदम परफेक्ट पाहिजे ना! ही फायनल सही झाली की मगच मिस्टर सुगरण घराचा निमुळता दरवाजा बांधायला घेतात. आतली काही डागडुजी राहिली असेल तर स्वतः मिसेस सुगरण चोचीतून माती आणून घरट्याचं फिनिशिंग करतात. एकदा का तिने फिनिशिंग करायला घेतलं की मिस्टर सुगरण सुखाची चिवचिव करतात. पोरगी पटलेली असते कारण पोरीला घर पटलेलं असतं. स्त्रियांना स्वतःच्या घराची ओढ ही निसर्गनिर्मितच असावी, नाही का? स्वतःच एक छोटं पण नेटकं घर असावं हे प्रत्येक स्त्रीला मनातून वाटत असतं. मोठ्या पण स्वतःच्या नसलेल्या घरात परावलंबी जीवन जगणं हे कुठल्याही स्त्रीला फारसं पसंत नसतं. स्वतःच घर झालं की काडी काडी जमवून त्याला सजवतात, जपतात. मिसेस सुगरणही याला कशा अपवाद असतील?
त्यांचा हा सगळा खेळ मी जवळजवळ तासभर पाहत होते. मिस्टर पंख फडफडवत घरट्याभोवती फिरायचे, चिवचिव करायचे, स्वतःचा पिवळाधमक रंग फुलवून फुलवून दाखवायचा, जेणेकरून मिसेसनी जरासुद्धा इकडे तिकडे बघू नये. कितना फ्लर्टींग करना पडता है रे बाबा ईनको!! मग मिसेस सुगरण एन्ट्री घ्यायच्या, सगळ्या बाजूंनी घर नीट पाहायच्या, आत जाऊन यायच्या. मग दोघे तिथे जवळच बांधलेल्या दुसऱ्या एका घरट्यात जाऊन यायचे. हे पण करावं लागतं बरं का मिस्टर सुगरणना. दुसरं घर तयार ठेवावं लागतं म्हणजे पहिलं नाही तर निदान दुसरं घर तरी मिसेस सुगरणना पसंत पडेल. She needs to be given an option or else she puts you for an option. हा कायदा आहे त्यांच्यातला. अनेकदा तिला पसंत पडेपर्यंत मिस्टर सुगरण घर बांधत राहतात कारण तिचा शब्द हा शेवटचा असतो. कमाल आहे ना पक्ष्यांमधली women power! म्हणूनच तर एका झाडावर अनेकदा सातआठ घरटी टांगलेली दिसतात. ही सगळी एका मिसेस सुगरणला खुश करायला बांधलेली असतात. आणि बरेचसे आळशी मिस्टर सुगरण या आधीच बांधलेल्या घरट्यांमध्ये एखादा रेडी पझेशन फ्लॅट पण मारतात बरं का! लबाड नुसते! मजाच आहे सगळी.
अखेरीस तासाभरानंतर या मिसेस सुगरणना घर बहुदा पसंत पडलं असावं. घरट्याच्या आत काडी, कापूस यांनी सुरेख उबदार बेडरूम सजवलेली असते. नव्या कुटूंबासाठी एक सुरेख वन बीएचके फ्लॅट तयार झालेला असतो. सिव्हिल काम मिस्टरांचं आणि इंटिरियर डिझाइन मिसेस सुगरणांचं. एकदा घर बांधून झालं की मिस्टर सुगरण मोकळे होतात. मग पुढचं सगळं काम, पिल्लांना जन्म देणं, त्यांचं खाणंपिणं सगळं मिसेस सुगरण पाहतात. बऱ्याच पक्ष्यांमधलं division of work असंच आहे. विणीचा काळ संपला की घरटी ओकीबोकी झाडाला लटकलेली दिसतात. हे बाकी छान आहे. चार महिने live-in मध्ये राहा, मजा करा, कुटुंबसुख घ्या, नंतर परत सिंगल लाईफची
मजा घ्या.
तासभर होत आला होता. हा विलोभनीय हिरवापिवळा खेळ बघायचा सोडून खरंतर निघवत नव्हतं पण आता परत जायला हवं होतं. मी निघाले तेव्हा मिसेस सुगरण निवांत त्यांच्या वन बीएचके मध्ये जाऊन बसल्या होत्या, मिस्टर सुगरण खोप्याला वरून शेवटची काडी विणत होते. त्यांच्या नवीन कुटुंबाला थोड्या दिवसांनी भेट द्यायचं नक्की करून, त्यांना Happy married life च्या शुभेच्छा देऊन मी तिथून निरोप घेतला.
Photo Credits : पल्लवी ताम्हाणे
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
mastach !
खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला… छान लिहिलं आहे.
Khup chhan
छान लिहिता तुम्ही..
Nice as usual
मस्त!👌
म्हातोबाची / ए आर ए आय टेकडी आणि तिथली घरटी समोर आली… काय काय करावं लागतं ह्या मिस्टर लोकांना….☺️
कथा …Nice ..as usual….
भारीच
Amazing…As always !!