डाक- भाग २

आधीच्या भागाची लिंक- डाक- भाग १

हातवारे करतच शांताराम पोस्टात पोचला. खुर्चीत बसला तरी, विचारांच्या तंद्रीतच होता.

अखेर कुलकर्णी मास्तरानी आवाज दिला,

“काय झालं शांताराम ? कसलं टेन्शन आहे.”

“मला सांगा मास्तर, उतळे मामीची मनीऑर्डर कधी आली ? अन आली तर मला कशी नाही माहीत ?”

“अरे, तु चहा प्यायला गेलास तेव्हा आली होती, ….. तार मनीऑर्डर होती अर्जंट….. मीच रजिस्टर मध्ये नोंद करून सॅकमध्ये नोटा टाकल्या होत्या.”

“अहो पण …… ते कार्ड कुठे गेलं….. त्यांच्या नावाचं,…. मी स्वतः …….”

पुढचे “वाचलं होतं” हे शब्द गिळून शांताराम गप्प बसला. कुलकर्णी मास्तर गालात हसले अन म्हणाले,

“कार्डाचं मला माहित नाही हां …..” एवढं बोलून ते आजचे अकाउंट चेक करू लागले.

खरंतर त्यांनी विषय संपवला होता.

पण शांतारामचा गोंधळ संपला नव्हता.

कुणाशी फार चर्चाही करू शकत नव्हता. नाहीतर त्यानं मजकूर वाचला हे सिद्ध झालं असतं.

………………………………………………..

“आज दुपारी, बाराच्या आधी या घरी, …… घास टाकायचाय …….”

“हो …… येतो” म्हणत आधीच उशीर झालेल्या शांतारामने सायकलला टांग मारली.

..

पुन्हा ” ठक ठक ” सुरू झाली.

आज एकाही पत्रातला मजकूर वाचावा, असं वाटत नव्हतं. अगदी यांत्रिक पद्धतीनं तो पत्त्यानुसार गठ्ठे करत होता. तरी त्याची ठक ठक थांबवण्यासारखी गोष्ट समोर आलीच.

पुन्हा तार मनी ऑर्डर,

“कमल राजमाने ” या नावाने, …… कुणी केली पाहिलं तर ‘यादव’ एवढाच उल्लेख आढळला.

रोख रक्कम पाच हजार.

वैतागून, शांतारामने इकडे तिकडे पाहिलं.

सगळे आपापल्या कामात व्यस्त होते.

त्यानंही मुद्दामच विषय काढला नाही.

“येतो का चहाला ?…….” शेख पोस्टमनने विचारलं.

नुसत्या मानेने नकार देत, शांताराम खुर्चीत बसून राहिला.

शेख हसत निघून गेला.

थोड्या वेळाने, शांताराम पुन्हा बटवड्याला निघाला. सॅक खांद्याला लावली.

सायकलला टांग मारली.

आता ही कमल राजमाने नक्की कोण ? पत्ता चावडीजवळचा दिलाय. तिथं जाऊन विचारू.

तसं त्याच्या वाटणीच्या वार्डानमध्ये तो ओळखत नाही, अशी माणसं विरळाच.

सायकल दामटत, चार पाच पत्रं वाचत, तो चावडीवर पोचला. पण दुपारच्या वेळी तिथं कुणी असणं शक्य नव्हतं. नाही म्हणायला एक दोन म्हातारी, दुपारच्या जेवणाची हाळी येईपर्यंत पारावर कलंडलेली.

शांतारामने परश्या पान टपरिवाल्याजवळ सायकल लावली. अन गायछाप घेता घेता विषय काढलाच.

“कमल राजमाने कोण हाय रं गावात?”

पान लावायची फरशी पुसता पुसता परश्याचा हात असा काही थांबला की, त्यानं जणू हॅरी पॉटरला झाडूवरून पडताना पाहिला.

दोन मिनिटांची शांतता, परश्याचा चेहऱ्यावरच्या बदलत जाणाऱ्या रेषांमुळं जास्तच भयाण वाटू लागली. त्या शांततेनंतर, परश्यानं पुन्हा मान खाली घालून, पानाची फरशी पुसायला घेतली. शांतारामची चुळबुळ आणखीच वाढू लागली.

तसं खाली मान घातलेल्या परश्याच्या चेहऱ्यावर खुदकन हसू फुटलं अन फ्याफ्या करत तोंडातल्या पानाचे तुषार उडवत तो हसू लागला.

शांतारामला त्याचा राग येऊ लागला. शाळेतल्या पहिल्या पावसात, घसरून पडल्यावर पोरांनी हसावं तसा परश्या हसत होता.

“काय राव, पोस्टमन सायेब, नक्की काय काम काढलं, कमळीकडं……. आं.”

शेवटच्या आं वर विशेष जोर देत अन मिश्किल हास्यासह भुवया उंचावत आलेला प्रश्न पाहून शांताराम आणखीच दचकला.

नक्की कोण आहे ही बया.

त्याला काही समजेना.

तरीही स्वतःला सावरत, म्हणाला,

“काही नाही, पोस्टात तिच्या नावानं काहीतरी आलंय, …… म्हणून विचारत होतो.”

“आं, ….. आता तिला व कोण काय पाठवणार. ……. बघू बघू काय आलंय ते.”

“ते तसं सांगता येत नाही परश्या. ज्या त्या माणसाच्या हातातच द्यावं लागतंय. पोस्टाची तशी शिस्तच असते.”

“व्हय का ?” परश्या तोंड वेंगाडत बोलला.”मग जा, स्टँडवर, ती येडी फिरत असंल, नागडी उघडी……. तिचंच नाव हाय, कमल राजमाने…..”

शांताराम स्तंभित झाला. कालपासून हे काय चाललंय. त्याच्या डोक्यात चक्र भिरभिरायला लागली.

त्या वेडीला कोण मनी ऑर्डर करील? का करील? नक्की कुणीतरी भंपकबाजी करतंय. पण स्वतःचे पैसे घालवून कोण असल्या चेष्टा करेल.

पण त्या वेडीला कशी द्यायची मनी ऑर्डर. कधी कपडे असतात, कधी अर्धे फाटलेले , शरीराचं ओंगळवाणं प्रदर्शन घडवणारे असतात. धावत असते चिडवणाऱ्या पोरांच्या मागे. कुणी व्यापारी कधी सणासुदीला अंगावर एखाद कपडा फेकून जातात. कसे घालायचे, कसे गुंडाळायचे हेही माहीत नसलेली …… ती. तिला हाक कशी मारायची. जवळ कसं बोलवायचं. क्षणभर अंगावर, किळसवाणी शिरशिरी येऊन गेली, शांतारामच्या.

आणि ती शिरशिरी, परश्याच्या चाणाक्ष डोळ्यांनी टिपली.

“तसं नव्ह पोंस्टमन सायेब, काय आलंय ते सांगू नका, पण कुणी पाठवलंय ते तरी सांगाल का नाय.”

“कुणीतरी, यादव म्हणून आहे.”भानावर येत, शांता बोलला.

अन परश्याच्या सगळ्या पानवाल्या लीला क्षणात थांबल्या. स्तब्ध झाला तो. अगदी डोळ्यांच्या पापण्याही न हलवता शांताराम कडे पाहत राहिला.

शांतारामला पुन्हा नवीन कोडं परश्याच्या तोंडावर दिसत होतं.

तो त्या कोड्याचं उत्तर त्याच्याकडूनच मिळेल या अपेक्षेनं पहात होता.

अन खिशात, बायको …… फोन वाजवत होती. बहुधा दुपारचा घास कावळ्याला टाकण्यासाठी तिचा हा रिमाईंडर कॉल होता.

(क्रमशः)©बीआरपवार

Image by Bishnu Sarangi from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

5 thoughts on “डाक- भाग २

  • June 29, 2021 at 6:08 pm
    Permalink

    Kahi tari gudh asawa asa watatay… bhagan madhe khand padu deu naka… 🙏🏼

    Reply
  • June 30, 2021 at 5:52 pm
    Permalink

    Khup chhan vatatey katha. Waiting for next part

    Reply
  • July 1, 2021 at 4:26 pm
    Permalink

    Exciting story ahe….
    Maja yetey…

    pudhe kay hoil ……vat baghtoy

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!