डाक- भाग ३
दुपारच्या जेवणानंतर, उरलेली पत्रं वाटून, शांताराम पुन्हा येऊन खुर्चीत येऊन टेकला.
‘हुश्श ‘ करत सॅक टेबलवर ठेवली.
मास्तरांनी चष्मा खाली करून त्याच्याकडे पाहून घेतलं, अन पुन्हा अकाउंट रजिस्टर मध्ये तोंड खुपसून बसले.
“कमल राजमानेची मनी ऑर्डर आहे.”
शांता ने विषयाला तोंड फोडलं.
“काय ?…… कोण ? …… आणि तू मला का नाही सांगितलं ?” कुलकर्णी मास्तरांची उलटतपासणी सुरू झाली.
“मला काय माहीत कमल कोण ?….. त्या पानवाल्यानं सांगितलं तेव्हा कळलं कोण ते.”
“ठीक आहे, किती पैसे आलेत.”
हाताची पाच बोटं दाखवून, शांतारामने उत्तर दिलं.
“ठीक आहे, पाटलांना बोलावून घेतो, म्हणजे तिच्यासाठी त्या पैशातून काहीतरी करतील. नाहीतर तिच्या हातात पैसे दिले तर, ती रस्त्यावर उधळेल फक्त.”
कुलकर्णी मास्तरांना एवढंच सुचलं.
पण तेही सुन्न झाले होते.
अर्ध्या तासात, पोलीस पाटील हजर झाले.
मास्तरांनी त्यांच्याकडे पैसे देऊन त्यांची सही घेतली.
“तिच्यासाठी काय करता येईल, ते पहा ,….. या पैशातून.”
“आवो त्यात काय एवढं, अजून चार पैसे त्यात घालून तिच्या जेवण्या राहण्याचा बंदोबस्त हुन जाईल. तिच्याकडं दिलं तर, उगा तिच्या जीवाला धोका हुईल. कधी स्टँडवर, कधी स्टेशनवर कुटंबी झोपतीय ती……. पर मी काय म्हणतो, कोण हाय कोण ह्यो दिलदार म्हणायचा….”
मास्तरांनी अर्थातच, शांतारामकडे पाहिलं.
“कुणीतरी यादव आहे. फक्त यादव एवढाच शब्द आलाय. कोण माहीत नाही.”
एवढं ऐकलं अन पाटलाच्या डोक्याची शीर हलली.
“बेणं, अजून सुधारलं नाही म्हणायचं. बरं बगू, ….. आपल्याला तर आपलं काम केलं पाहिजे. उद्याच्या उद्या तिची सगळी सोय लावतो बगा…… हे खरं आपल्या गावानं आधीच करायला पाहिजे होतं. पण आज त्या बेण्यामुळं आपल्याला सुचतंय , हे बी खरंय.”
“जाऊ द्या , त्याच्या निमित्ताने तुमच्या कडून एक सामाजिक काम होईल. एका आश्राप जीवाचा, आशीर्वाद लागंल. बघा, करा काहीतरी.”
“व्हय पण बेणं अजून पुण्यालाच असतंय का कसं?”
पाटलांमधला पोलीस पाटील अजून चौकस होता.
“हो हो पुण्यातच आहे अजून.”
“बरं बरं, निगतो मी, काय त्याचं कळलं तर कळवा.”
असं म्हणत, पाटील करकर करणाऱ्या चामड्याच्या चपल्या वाजवत निघून गेले.
अन शांतारामच्या चेहऱ्यावर, आणखी एक प्रश्नचिन्ह चिकटवून गेले.
कुलकर्णी मास्तर स्वतःहून काही सांगतील असं वाटेना, त्यामुळं शांताराम तिथून उठला. शेखला खुणावले. दोघे मिळून बाहेरच्या टपरीवर चहासाठी निघून गेले.
मास्तर पुन्हा एकदा गालात हसले.
शांतारामची उलघाल त्यांना समजत होती. पण त्यानं त्या खोल पाण्यात शिरू नये, असं त्यांना वाटत होतं.
“आता ही काय नवीन भानगड, ?”
“कसली ?” शेखने चहाचा भुरका मारता मारता निष्पाप चेहऱ्याने विचारलं.
“आता हा यादव कोण ?”
“………”
“अरे बोल की, ……. मघाशी पाटील पण शिव्या घालुन गेले त्याला. तो पानटपरीवाला सुद्धा पांढरा फटक पडला होता. कोण आहे हा यादव ?”
“आहे एक तुझ्यासारखाच…..”
“माझ्यासारखा म्हणजे ?”
“पोस्टमन.”
“आपल्या ब्रँचमध्ये ?”
“हो”
“मग आता ….?”
“मघाशी ऎकलंस ना …. जीपीओ ला असतो.”
“पण तो का पाठवेल, मनीऑर्डर ?’
“परोपकारी आहे तो, …… तुझ्यासारखा दुसऱ्याच्या दुःखात बुडून जाणारा. तु फक्त विचार करत बसतोस, तो थेट मदत करतो……… इथं असतानाही तो हेच करायचा. जणू तुझंच दुसरं रूप….”
शांताराम आता विचारात गढून गेला होता.
त्यानं स्वतःचेच मन स्कॅन केलं.
खरंच त्या दिवशी, त्यालाही उतळे मामीला मदत करावी असं वाटलं होतं.
खरंच तो त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा कुणीतरी मनकवडा असल्यासारखं घडलं होतं त्या दिवशी. तो स्वतःशीच हसला.
कोड्याच्या भिंतीमधल्या बऱ्याचशा विटा आता पडल्या होत्या.
पण तरीही चित्र स्पष्ट नव्हतंच.
(क्रमशः)
Image by Bishnu Sarangi from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Story chan ahe…..
Pan answer ne samadhan hot nahi….
Need more clarification in next story….
Superb writting…
Good going