धानी- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन-भारती देव

आर्ट गॅलरीतल्या त्या सुंदर प्रदर्शनात सईच्या कितीतरी शिल्पकृतीना वाहवा मिळत होती .प्रत्येक शिल्पात तिने जीव ओतला होता.संकल्पना  मोहक होत्या.मूर्तीत जीवंत असं देखणेपण , पशु आणि  पक्ष्यांच्या  घाटदार आकृत्या,बाकदार चोची,निरागस डोळे ,सुबक ,डौलदार‌ गाय-वासरु,बैलजोड्या,बैलगाड्यानी अर्धेअधिक प्रदर्शन व्यापले होते.

‌ मध्यभागी विळा घेतलेली स्त्री आणि धावणारी आक्रमक  गाय , अशी शिल्पकृती ठेवली होती.पण Not for sell असं लेबल लावून. गेल्या कित्येक प्रदर्शनात अशीच मांडणी सई करत आली होती. सुमित्रा, सईची मैत्रिण  तिला या गोष्टीची खूप उत्सुकता  होती.

“का गं? नेहमी या शिल्पाला not  for sell च लेबल ,काही विशेष आहे वाटतं?”

सुमीच्या अचानक प्रश्नाने सई बावरली.

” नाही गं ! तसं काही नाही.”

एवढंच त्रोटक उत्तर तिनं दिलं पण चेहऱ्यावरची निराशा तिला लपवता आली नाही.

सुमीनेही ती अचुक टिपली.असं खुपदा घडलं.

नुकत्याच झालेल्या प्रदर्शनाचा शीण  घालवण्यासाठी सई  लोळत पडली होती. तेवढ्यात फोन खणखणला.वाजणा-या  फोनकडे तिनं  बघत ती वैतागली.

” कोण कडमडलं यावेळी”

पुटपुटतच तिने फोन उचलला.

“हाय!,काय म्हणताय,शिल्पकार ,सई मॕडम”

सुमित्रा पलीकडुन बोलत होती.

” काही काम होत का?आराम करु दे ग जरा”

सई वैतागून  बोलली.

“म्हणजे कामाशिवाय फोनही करायचा नाही वाटतं आता.बरयं चल ठेवते” .

सुमित्राने तिला चिडवलं.

“बरं !बंर! ठेव मग”

सई उत्तरली.

“ए! अगं ठेव काय,महत्वाचे  काम आहे तुझ्याशी ,सॕडविच हाउसला ये”.

“एवढया  उन्हात  कसलं काम………”?

सईला सॕडविच हाउसला पोहचेपर्यत टळटळीत उन झालं होत.खुर्चीत  बसताबसताच सईने विचारलं.

“हं बोल काय काम होत ते?”.

सुमित्रा शब्दांची  जुळवाजुळव करत होती.

“अगं तुझ्या प्रदर्शनाची खूपच चर्चा  होतं आहे. कुलकर्णी सर विचारत होते. आमच्या शेजारच्या काकूही विचारत होत्या.  पुढचं प्रदर्शन कधी भरवायच.”?

“बघु गं!,थांब थोडं”.

सई  बोलली.

पण सुमित्राने विषयाला हात घातलाच.

“उरलेली सगळी शिल्पं आता काय  करायची सई “?

“सगळी म्हणजे”?

सईने डोळे विस्फारून  प्रतिप्रश्न  केला.

“अगं, म्हणजे त्या not for sell शिल्पांबद्दल विचारतेय मी, काय रहस्य गं त्याचं?,सांगं ना !”

‌        सईच्या मनातल मळभ डोळ्यात दाटल.काळ्याकूट्ट आठवणीने डोळ्यातल्या अश्रूंचा कधी कडेलोट झाला,तिलाच कळल नाही. तिच्या मनाचा बांध फुटला.

“सुमे, आज नको गं प्लीज !…….तो विषय जाऊ  दे”.

” नाही, नाही आज तुला सांगावचं लागेल”

सुमित्राने हलकेच तिचा हात हातात घेवुन आश्वासक सांत्वन केलं.

” तुझ दुःख मोकळ केल्यावर तुझ्या शिल्पांमध्ये जीवंतपणासोबत  हास्याची लकेरही येईल ”

कुठुन सुरुवात करावी तेही सईला कळत नव्हतं.खुप वाईट आठवणी सईला भुतकाळात घेऊन गेल्या.

निसर्गाने  नटलेला सुंदर असा आमचा गाव होता.धुक्याची दुलई अलगद उतरुन पहाट सूर्यकिरणाच्या स्वागताला यायची. सूर्याचे सहस्त्र किरण धरीत्रीला भेटायला अधिर व्हायचे.दवबिंदूचे मोती पहाटपानावर अजुनही चमकत होते.मिटलेल्या डोळ्यांनी कळ्या पहुडल्या होत्या.जणू पाकळ्याच्या पापण्या हळुहळू उघडत होत्या.फुलपाखरे  भिरभिरत होती.झाडांची हिरवी सळसळ  ऐकु येत होती.शिवाच्या मंदिरातला पहीला घंटानाद घुमला. तसा कळसावरच्या पाखरांनी एकच कलकलाट केला.घंटानादाने अर्धवट झोपेतला गाव खडबडून जागा झाला.घराघरातून पेटलेल्या धुरकट बंबातून पाणी तापू लागले.

गाव तसा साधा होता. गावाला कष्टाची सवय होती. खंडूतात्याच्या धानी गाईला छानसं वासरु झालं होत.ती हंबरुन वासराला मायेने चाटत होती.खिडकीतून तिच्या घुगुंरमाळेचा नाद सईच्या कानापर्यत पोहचायचा अवकाश,साखरझोपेतून उठून ती ओसरीतून धावतच अंगणात जायची . वासरु  गाईच्या  आचळाना बिलगल होत. मऊ मऊ कापसासारख , काळ्याशार डोळ्यांच वासरु  सईला खूप आवडायचं. त्याच्या डोक्यावर धानीसारखाच चंद्रबिंदु होता . सई खंडु आजोबांची लाडकी नात, तिला धानीचा खूप लळा होता.धानी पण सईला बघून हंबरायची.सई धानीच चारापाणी करायची,वासराला कुरवाळायची. आजही तसच झाल.सगळीकडे सडासारवणाचा मातकट गंध पसरु लागला,सुबक रांगोळ्यानी अंगण सजू लागले,शेतात,खळ्यात,मळ्यात घुगुंरमाळाचे नाद ऐकु येऊ लागले.सई मात्र धानी आणि  वासरातच दंग होती.

नळ आले ,नळ आले एकच गलका झाला तशी सईची तंद्री भंगली.

आजीची लगबग सुरु होती कारण आज सईची कमाआत्या येणार होती. त्यामुळे आजीचे कामही सुरु होतं आणि  तोंडाची टकळीही. सईने बादलीनं पाणी  भरल.नंतर  कढत पाण्यानं अंघोळ करुन सई छान तयार झाली.

८-९ वर्षाची सई,लिंबासारखी कांती,कमरेपर्यत लांब केसाचा शेपटा,मोठे मोठे डोळे.तिच्या गोब-या गालांवर,नकट्या नाकावर निरागस बालपणाच्या छटा होत्या.पण निर्सगाने तिच्यावर जरा जास्तच  कृपादृष्टी केली होती.ती वयापेक्षा बरीच मोठी दिसायची. गुलाबी फ्राॕक तिला अजुनच खुलवायचा.

कमाआत्या आणि  तिची दोघ मुल आली. गो-या गो-या रंगाची,नाजुक चेहऱ्याची कमाआत्या, हिरव्यागार पातळात छान दिसत होती.तिच्या हातभर बांगड्या अन् सोन्याच्या पाटल्या किणकिणत होत्या.

तिच सगळचं गोल ,गरगरीत होत,थेट तिने रेखलेल्या मोठ्या  गोल कुंकवासारखं. रंगनाथ आणि  महादू तिची दोघ मुल.महादू थोडा वेडसरच होता. रंगनाथ विक्षिप्त होता.सारखा काहीबाही बोलायचा.सईला कळायचं अजिबात नाही आणि आवडायचं त्याहून नाही.त्याच अंगचटीला येण,विक्षिप्त हसण,बघण याकडे तिच लक्षच नसायचं.

ओल्या मातीत खेळणी बनवायची, वासरासोबत खेळत राहायचं तिचा छंद होता.आजीने सांगितलेली काम करता करता ती कंटाळायची.वसुबारसच्या दिवशी,ताम्हणातल्या पीठाची छान गोल चांदकी [छोटी भाकरी] सईने बनवली,तेव्हा कमाने डोळे विस्फारले पण ते बघायला सई थांबलीच नाही.कधी एकदा धानीला भाकरी खाऊ घालते अस तिला झाल होतं. धानीला भाकरी खाऊ घालून मातीत खेळणी बनविण्यात ती रमून गेली.

अचानकपणे तिच्या उभारानां पाठीमागुन कुणीतरी करकचून धरले.तिने वेदनेने कळवळून मागे पाहिलं…. तर रंग्या खिदळत उभा होता.गोठ्यात काम करणारी सखू सालदारीणं बघतच होती.सई तशीच ओसरीकडे रडत ,धावत सुटली.कमा ओसरीतल्या झोपाळ्यावर  मस्तपैकी झुलत होती.

“आत्या,हा नाव घेतो गं! सारखा माझं!

एक हात दुख-या छातीवर ठेवत, रंग्याकडे बोट दाखवत केविलवाण्या स्वरात सई सांगत होती.

“मग अंगाला भोक पडली होय तुझ्या,आधी चिखलाचे हात धू ते!”

तिच पुरत ऐकून न घेताच कमा डाफरली.ह्या घटनेनंतर रंग्याला जरा जास्त चेव चढला.

रंग्याच्या अशा काळ्या कुरापती  त्यांचे आजोबा  खंडूबाबाच्या कानावर बरेचदा आल्या होत्या.आता घरातही….घडतंय,हे त्यांच्या नजरेतून सुटत नव्हत.यापूर्वीही त्यांनी रंग्याला कडक शब्दात समज दिली होती.कमालाही रंग्याला कामधंद्याला लाव म्हणजे तो ठिकाणावर येईल अस खडसावलं होत.  पण कमाच्या ते पचनी पडत नव्हतं.

रंग्या  कुठल्या  थराला जाईल हे खंडूला माहीत नव्हतं .एके दिवशी रंग्याच्या गैरवर्तनामूळे खंडूच्या रागाचा पारा चढला, त्यांनी रंग्याला एक मुस्काटात लावून दिली.

” खबरदार! पोरले हात लावशी  तर”

खंडूतात्या गरजले .

आता त्यांची करडी नजर रंग्यावर होती.रंग्या इरेला पेटला होता,त्याला छोटी सई हवी होती.

त्या रात्री महादेवाच्या देऊळात,किर्तन होत.आवाराआवर झाल्यावर सगळा गाव मंदिरात लोटला होता.खडूतात्यानी सईला सखू सालदारणीच्या सोबत बसवलं आणि  ते बुवांच्या पायांशी टाळ घेऊन बसले. बुवांचं अध्यात्म आणि  भक्तीवरच विवेचन रसाळ होत.कान्होपात्राच्या भक्तीत ते रंग भरत होते.

“जय जय रामकृष्ण  हरी  जय जय रामकृष्ण  हरी ! …….

सगळा जनसमुदाय आकंठ भक्ती रसात बुडाला होता.सखूचही ध्यान लागलं होत.

बोला  ऽऽऽ …पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल…..!

सखूने डोळे  उघडले आणि …….सई, सई शेजारी नाही बघुन ती भांबावली.

मंदिराच्या आजुबाजुला पोर कुठेच दिसेना.तिच्या मनात काहुर माजलं.‌ भितीनं तिच हदय धडधडु लागल.रात्री धा158नीला बडल्यावर (शेतातला गोठा) बांधायचे तिकडे तर नसेल गेली पोर…..अन सखू बडल्याकडे पळत सुटली…….

धानी मोठमोठ्याने हंबरत होती,रंग्याने गावातले टवाळ पोर गोळा केले होते.भेदरलेली, केविलवाणी सई धानीच्या मागे लपली होती.धानी कुणाला पुढे येऊ  देत नव्हती.बडल्याला लोखंडी  कुलुप,,….. सखूने दगडाने ते तोडुन टाकलं.तिच्या भीतीने  आता संतापाची जागा घेतली. करारी डोळ्यांत आग उतरली.रंग्याने फिदीफिदी हसत तिची कुचेष्टा केली.

“सखुबाई ,आयतीच आली की……….”

त्याच्या किळसवाण्या शब्दांना धरबंद नव्हता

.”रंग्या !”……….

सखू ओरडली.

पलीकडे हंबरणा-या धानीजवळ, घाबरलेली सई आणि  सखू मध्ये रंग्या आणि  टवाळ पोरांनी

सखूची वाट अडवुन धरली होती .सखूची त्यांच्याशी झटापट सुरु झाली.रंग्याच्या दोस्ताने सखूच्या कासोट्याला हात घातला……तसा तिने कमरेचा विळा बाहेर काढला.

मंदिरात बुवा शेवटचा अभंग आळवत होते.

नको देवराया, अंत आता पाहू

प्राण हा सर्वदा, जाऊ पाहे

हरीणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले

मजलागी जाहले तैसे देवा.

बडल्यावर सखू रंग्या आणि त्याच्या दोस्तांना  आवरली जातं नव्हती .तिच्या काळ्या सावळ्या देहात जणू काली संचारली होती. झटापटीत विळा रंगाच्या मित्राच्या हातावर चालला आणि त्याचा हात शेतातली भाजी चिरावी तसा  चिरला गेला. त्याची जायबंदी अवस्था बघून आणखी दोघ घाबरून पळत सुटले रंग्या ही वाट फुटेल तिकडे सैरावैरा पळायला लागला.

इतका वेळ सुटण्यासाठी आकांत करणारी, हंबणारी धानी, शेवटी तिने एकच हिसका कासऱ्याला दिला. मातीतली खुंटी  उचकटून बाहेर निघाली. धानीने रंग्याच्या दिशेने धाव घेतली.रंग्या सैरावैरा पळायला लागला,त्याच्यामागे धानी.त्याचे सगळे मित्र जिकडेतिकडे पांगले. धपापणारा रंग्या नेमका मंदिराबाहेर दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवून थांबला. मागुन धावत येणाऱ्या खवळलेल्या धानीने त्याला शेंगांवर उचलून फेकलं.रंग्याच्या मस्तकातून रक्ताच्या  चिरकांड्या उडाल्या.मंदिरातला जनसमुदाय आवाक झाला.रंग्या निपचित पडला तो कायमचाच. सई अजुनही सखूला बिलगून थरथरत होती.एक निष्पाप  कळी खुडण्यापासून वाचली होती.

‌           त्याचं कळीच आज फुल झालं होतं.तिच्या जीवनात तिने बनविलेल्या असंख्य शिल्पांमध्ये धानी आणि  सखूच्या मूर्त्या अनमोल होत्या. Not  for sell च्या क्रमवारीत जाऊन बसल्या होत्या. सुमित्रा आपोआपच त्यापुढे नतमस्तक झाली . त्या दोघी समोर सँडविच गार होऊन पडले होते.पश्चिम  क्षितिजावर केशर फुललं होत.सूर्य  मावळतीला निघाला होता.पण…… सुमित्राच मन प्रकाशाने भरुन गेल होत.सई मोरपिसासारखी हलकी झाली होती.

Image by Free-Photos from Pixabay 

4 thoughts on “धानी- तृतीय पारितोषिक विजेती कथा. लेखन-भारती देव

  • July 3, 2021 at 3:07 pm
    Permalink

    Wow.., मस्त शब्दांकन केलं आहे. छान आहे कथा

    Reply
  • July 3, 2021 at 5:43 pm
    Permalink

    खूपच सुंदर

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!