डाक- भाग ४

“ठक ठक …… ठक ठक ” करत नेहमीप्रमाणे शांताराम बटवड्यासाठी वॉर्डांनुसार गठ्ठे बनवत होता.

बाकी सकाळी सकाळी गर्दी नसल्यामुळं, पोस्ट ऑफिस मधला प्रत्येक जण खालमानेन आपापल्या डेस्कवर व्यस्त होता. जे व्यस्त नव्हते ते स्मार्ट फोनमध्ये गुंतले होते.

शांतारामच्या शिक्के मारण्या व्यतिरिक्त, कसलाही आवाज नव्हता. पोस्ट कर्मचाऱ्यांना अशा शांततेची विनाकारण आवड असते.

पण त्या शांततेला भेदत, सकाळीच ब्रँच मधला फोन खणाणला. मास्तरांच्या टेबलवर असल्यामुळे, त्यांनीच उचलला.

“हॅलो, पोस्टमास्टर कुलकर्णी बोलतोय…… बोला.”

“……”

“हॅलो बोला, ….. नीट कनेक्ट झालेला दिसत नाही…..”

“…….”

“हॅलो, …. आवाज अजिबात येत नाही तुमचा.”

मास्तरांनी वैतागून फोन ठेवला.

“फोन नीट कनेक्ट झाला नाही बहुतेक, ….. कोण होतं काय माहीत ….. करेल पुन्हा .”

असं पुटपुटत, ते जागेवरून उठले, आणि काउंटरवर, बायकोने पाठवलेल्या नाश्त्याच्या डब्यात , झाकण उघडून संशोधन करू लागले.

पुन्हा फोन खणखणला.

“शांता उचल रे तेवढा फोन, ….. कोण आहे बघ, काय असेल तो निरोप घे.”

शांताराम आज्ञाधारकपणे फोन घ्यायला उठला.

“नमस्कार,…. कोण बोलतंय.”

पलीकडून अस्पष्ट आवाज……

“मामींना निरोप द्या……. साबुदाण्याची खिचडी करा उद्या .”

“काय ? …… कोण बोलताय ?”

“उद्या एकादशी ना , ……  दुपारच्या थोडं आधीच येईन, …… खिचडी खायला……”

“अहो, पण कोण बोलताय ?”

“……….” फोन ठेवल्याचा टोन वाजू लागला होता.

शांतानेही वैतागून फोन आपटला.

त्याचं तसं फोन आपटणं पाहून, कुलकर्णींचा नाश्त्याचा हात थांबला. त्याच्याकडे पाहू लागले.

“खिचडी करा म्हणतोय, …… साबुदाण्याची” शांता वैतागुन बोलला.

“कोण ? आणि तू करणार खिचडी ? ….. हे काय उपाहारगृह वाटलं काय ?” शेखने तोंड घातलं.

“कोण ते सांगत नाही. ….. म्हणतोय मामींना सांगा, उद्याच्या एकादशीला खिचडी तयार ठेवा म्हणून सांगितलं.”

…………….

“काय ? साबुदाण्याची खिचडी ? टेलिफोन एक्सचेंजला फोन लावून विचार, आताचा फोन कुठून आला होता.”  नाश्ता तसाच बंद करून, कुलकर्णींनी फर्मान सोडलं.

शांता अन आणखी एक क्लर्क सीआयडी च्या आवेशात आले.

“नंबर डिटेक्ट होत नाही, असं म्हणतात एक्सचेंजवाले.”

कुलकर्णी तोवर हात धुवून आपल्या खुर्चीवर स्थानापन्न झाले होते. रिटायरमेंटला आलेलं, अनुभवी व्यक्तिमत्त्व. त्यांचा शब्द पोस्ट खात्याच्या पुणे विभागात महत्वाचा मानला जायचा.

“मला माहित आहे , कुठून फोन येतोय. तु जा बिनधास्त, बटवड्याला. मी बघतो काय करायचं ते.”

कुलकर्णी मागे रेलत बोलून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच हास्यलकेर होती.

“बरं ” म्हणत, शांतारामने सॅक उचलली.

“हां , फक्त त्या उतळे मामींना निरोप दे….. फोनवर मिळालेला.”

“पण कुणाचा फोन होता असं सांगू ?”

“ते मामीला आपोआप कळेल. तु फक्त निरोप दे.”

शांतारामने सायकलला टांग मारली.

आणि कुलकर्णी मास्तरनी फोनचा ताबा घेतला. कुठं कुठं फोन फिरवत राहिले. अस्पष्ट आवाजात काहीबाही बोलत राहिले. बराच वेळ बोलल्यावर मात्र त्यांचा चेहरा विचारांनी ग्रस्त झाला.

दोन्ही हातावर हनुवटी टेकवून, विचारात पडले. आणि हे पूर्ण स्टाफ पहात होता………………………………………………..

“मामी sss  …… आहेत का घरात, मामी ssss ”

“आले ……. आले, बस दोन मिनिटं, चहा घेऊन जा.”

“अहो मामी, मी फक्त निरोप द्यायला आलोय….. फोन आला होता पोस्टात…. चहा नंतर घेईन.”

“मला कसलं कोण फोन करतंय ? आधी चहा घे.” म्हणत त्या आत वळल्या.

ओट्यावरच्या प्लास्टिकच्या खुर्चीत शांताराम स्थानापन्न झाला.

मामीकडून बरीच माहिती मिळेल, अशी त्याला आशा होती. कोड्याच्या बऱ्याच बाजू उलगडतील असं त्याला वाटत होतं.

“हं सांग, काय निरोप आणला बाबा माझ्यासाठी, आणि कुणी दिलाय निरोप या म्हातारीला.” अर्धा कप चहा त्याच्या हातात देत मामी बोलल्या.

“कुणी दिलाय हे नाही माहीत मला. पण उद्याच्या एकादशीला तो येणार आहे तुमच्याकडे.”

“कोण येणार रं माझ्याकडं? आणि कशापायी ?”

“मी पहिल्यांदाच सांगितलं, कोण ते माहीत नाही, पण एकादशीची खिचडी खायला येणार म्हणतो. तुम्ही दुपारच्या आधी खिचडी तयार ठेवा फक्त.”

मामी गप्प झाल्या. बराच वेळ शून्यात पहात राहिल्या. नंतर आपसूक , धरणात कोंडलेलं पाणी सुटावं तशी बडबड सुरू झाली.

“माझ्या खिचडीला एकच गिऱ्हाईक……. मनोज……. माझ्याकडं जेवायला यायचा……. तेव्हा मी खानावळ चालवायची…….. माझी लेकरं लहान होती. शाळा शिकत होती. खानावळीत जेवायला, पाच सहा पोरं असायची. कुणी डबा न्यायचं. कुणी इथंच जेवायचं. ………..

मनोज मात्र, घरीच जेवायचा, माझ्या हातचं गरमागरम जेवायला आवडायचं त्याला. मग भाकरी असू दे का चपाती,….. पोटभर जेवायचा. माझा लेकच जणू……… साबूची खिचडी लै आवडायची त्याला. कधी पण बनवीन की त्याच्यासाठी खिचडी. त्याला एकादशीच कशाला पाहिजे ? येवून येतोय तर पितरात….. असूं दे, येऊ दे तरी, नुसत्या खिचडीवर नाही पाठवायची त्याला. बाबानं लगीन केलं का नाय काय माहीत.”

तिची दृष्टी पुन्हा शून्यात गेली.

बराच वेळ गेलाय हे शांतारामच्याही लक्षात आलं.

“मामी निघतो, ……. पण तुमच्या मनोजला भेटायला उद्या येईन नक्की.”

एवढं बोलून तो निघाला.

आणि भूतकाळाचा उंबरठया पल्याड पोचलेली उतळेमामी, नजर शून्यात लावून बसून राहिली. (क्रमशः)©बीआरपवार

Image by Bishnu Sarangi from Pixabay 

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

2 thoughts on “डाक- भाग ४

  • July 7, 2021 at 8:20 am
    Permalink

    Khup chhan ahe goshta. Veglich ahe pan mast. next part chi vat baghtey

    Reply
  • July 7, 2021 at 4:47 pm
    Permalink

    Story chan ahe…pan ..Pahili katha….v hi …kahi relation ahe ka??….
    Vichar karayla lag to ahe…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!