डाक- भाग ५
“काय रे काल निरोप दिलास का मामीला.”
“हो दिला.”
“काय म्हणाली ?” चहा पिता पिता शेखच्या चौकशा सुरू होत्या.
“म्हणाली कुणी मनोज येणार आहे….”
“वाटलंच…..”
“म्हणजे तू ओळखतोस मनोजला?”
“हो…….”
“कोण ?”
“तोच …… मनोज …… मनोज यादव” शेखने थेट बॉम्ब टाकला शांतारामवर.
“काय ?”
“हो, तोच …… आपला पोस्टमन.”
“अरे बाप रे, म्हणजे तो दोन्ही मनी ऑर्डर करणारा, यादव अन हा मनोज एकच? तरीच म्हटलं…….”
“काय ?” आता शेख बुचकळ्यात पडला.
“अरे उतळे मामींना मनीऑर्डर करणाराही यादवच होता. मी आजच पाहिलं रजिस्टरमध्ये.”
“हं, बरोबर, जेवण करायचा ना त्यांच्याकडे. त्यांचे काही पैसे देणं लागत होता, तो, …… इथून जाताना. पण मामीचा लेकरावर नसेल एवढा जीव त्याच्यावर. दिले सोडून पैसे.”
“अरे पण चांगली पोस्टाची नोकरी असताना, उधारी का केली त्याने.”
“त्याला पैसे द्यायला वेळच कुठं मिळाला.”
“म्हणजे ?”
“कशी बशी स्वतःची हाडं गोळा करून गेला इथून.”
“काय ? ….. ” शांतारामची उत्सुकता शिगेला पोहोचली.
“प्रेम होतं त्याचं एका पोरीवर.”
“मग ?”
“तमासगीरनीची पोरगी होती.”
“……..”
“पोरीच्या आईने तमाशा केला अख्या गावात…… तिला पोरीचं लग्न करायचंच नव्हतं…… गावातले चार पंच हाताशी धरले अन मोठा कांगारावळा केला.”
“बाप रे…..”
“आपल्याच पोस्टातून कार्ड लिहून द्यायला जायचा पठ्ठ्या तिच्या फडावर……. तिला पत्र देऊन निघून यायचा…… मग ती पत्रांचं उत्तर द्यायला, पोस्टात यायची….. तिथंच कार्ड लिहून त्याच्या हातात द्यायची.”
“………”
“त्या पत्रांमधलीच काही पत्रं त्या तिच्या आईनं पोलिसांना दाखवली अन कमळीला नाही तर तिलाच लिहिली म्हणून सांगितलं……. प्रेमपत्रात नावाचा उल्लेख कुठं असतो….. काहीतरी लाडाची नावं लिहितात हे प्रेमवीर.”
“म्हणजे कमल ? ……… कमल राजमाने ?”
“हां, आता बरोबर पत्त्यावर पोचलास बघ.”
“मग तो पळून गेला ?”
“नाही, त्याला लग्न करायचं होतं , कमळीसोबत. ठाम उभा राहिला पोलिसांसमोर. पण त्याची दुसऱ्यांची पत्रं वाचून लोकांना मदत करायची सवय नडली. तीन चार लोकांनी कार्ड वाचतो म्हणून त्याच वेळी कम्प्लेन्ट केली. सगळंच त्याच्या विरोधात गेलं. कुलकर्णी मास्तरांनी मध्यस्थी करून नोकरी वाचवली त्याची. पण त्याची लग्न करायची इच्छा अपुरीच राहिली.”
“किती सॅड लव्ह स्टोरी आहे !”
“अरे अजून ऐक, ……. त्याच रात्री पठ्ठ्या तिच्या फडावर पोचला. तिथुन कमळीला घेऊन पळून निघाला. पण रस्त्यात त्या तमासगीरनीच्या मारेकऱ्यांनी त्या दोघांना गाठलं. मोठी हाणामारी झाली ओढ्यात त्या रात्री. बरंच रक्त सांडलं. ऐनवेळी पोलिसांनी धाड मारली म्हणून, यादव वाचला.
पण कमळी पळाली, रानावनात ती बरेच दिवस आलीच नाही. आली तेव्हा …… वेडी बनुनच आली.”
“बाप रे…… शहारे आणणारी स्टोरी आहे या हिरोची.”
“या सगळ्या भानगडीतून वाचवायला, कुलकर्णी मास्तरांनी शब्द टाकून त्याची बदली, पुण्यात जीपीओला केली. पण पठ्ठ्या अजून बिन लग्नाचा राहिला.”
“………… ” शांताराम निशब्द झाला होता.
“मग आज भेट त्या हिरोला……”
“हं …….” म्हणत शांताने मोठा उसासा सोडला.
……………………………………………..
दुपारपर्यंत बराचसा बटवडा पूर्ण करून, शांताराम मामींच्या घरी पोचला. तेवढ्यात, कुलकर्णी मास्तरांची स्कुटर वाजली.
अर्थातच, मास्तर यादवला भेटायला आले असणार.
दोघेही एकमेकांकडे पाहून कसनुसे हसले. मनोज यादव, कसा दिसत असेल, किती वय असेल, कसा बोलत असेल, सगळंच कुतूहल, शांतारामच्या डोळ्यात साठलं होतं.
“या या मास्तर, माझ्या मनोजला भेटायला आलात ना ? येईलच एवढ्यात…… मला दिलेला निरोप कधी खोटा नाही पडून द्यायचा तो…… मी कधीच खिचडी मिसळून ठेवली. तो आला की कढईत टाकते. त्याला शेंगदाण्याचं मोठं कूट आवडायचं. अगदी तसंच केलंय बघा……. अन दुधीची खीर अन चपाती केली त्याच्या आवडीची…….”
एवढं बोलत म्हातारी उठली….. “हाड्या ssss …… हाड्या ssss, बया या कावळ्यांनी नुसता उच्छाद मांडलाय. येणारा माझा पावणा नाही रे बाबांनो, लेक आहे माझा. ”
बाहेर खरंच कावळ्यांनी घराच्या डोक्यावर बसून, घर डोक्यावर घेतलं होतं.
“मामी, तुम्ही खिचडी परतायला घ्या……. त्याची यायची वेळ झाली.” कुलकर्णी मास्तर, जरा खालच्या आवाजातच म्हणाले.
मामींनी खिचडी परतली.
“ताटात थोडी वाढून आणा मामी.”
मामींनी तशी आणलीदेखील.
“चला बाहेर” म्हणत मास्तर अंगणात घेऊन गेले. मामी अन शांताराम त्यांच्याकडे कुतूहलाने पहात होते.
“त्या भिंतीवर ठेवा ते ताट.”
क्षणार्धात वरचा ओरडणारा कावळा खिचडीवर तुटून पडला. मास्तर दोघांकडे वळले, मोठा श्वास घेतला….. अन म्हणाले,
“हाच आपला मनोज यादव…… सांगितल्या प्रमाणे आलाय……. मी कालच संध्याकाळी पुण्याच्या जीपीओला फोन केला होता. मनोज जाऊन काही महिने झालेत. करोना झाला होता त्याला. त्याला पुढचं मागचं कुणीच नव्हतं, त्यामुळं त्याचे पैसे, त्याच्या खात्यात, तसेच पडून होते. ज्या दोन मनी ऑर्डर्स आल्या, त्या त्याच्या खात्यातूनच डेबिट झाल्यात. हे कसं झालं, याचा शोध पोस्ट खातं घेतंय. पण त्याचा प्रवास थांबला नाहीय……. आज पुन्हा त्याच्या शाळेच्या नावाने मनी ऑर्डर आलीय.”
हे सगळं ऐकून, मामी जागीच, मटकन बसल्या. अन शांताराम त्यांना सावरायला खाली बसला. पण त्याच्याही डोळ्यामध्ये न मावणारा धक्का होता, अन तो धक्का, त्याच्या पापण्याही मिटून देत नव्हता. अनिमिष डोळ्यांनी तो फक्त, समोर मामीच्या खिचडीवर ताव मारणाऱ्या मनोज यादवला पहात होता. (समाप्त)©बीआरपवार
Image by Bishnu Sarangi from Pixabay
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
निशब्द…👌😢
Heart touching story………
No words to express feelings…
धन्यवाद 🙏
Stunning
आज सगळे भाग एकत्र वाचले .
सुरेख विषय आणि तितकीच भावस्पर्शी लेखणी.
👌👌👌
👌👌