देव तारी…
“अरे तुला सांगतो, आमच्या ऑफिसातले लालवानी साहेब म्हणजे नं एक अजीब नमुना आहेत. साहेब आहेत असं सांगूनही अनोळखी माणसाला कळणार नाही. अरे ऑफिसात पाऊल ठेवलं की पाचव्या मिनिटाला त्यांचे ते गडगडाटी हसू कानावर पडतं. साला ऑफिसमध्ये काम सगळ्यांनाच असतं रे, पण लालवानी साहेब असले नं की हसत खेळत चक्क कामाचा फडशा पडतो आम्ही! कधीही विचारा,सगळेच ओव्हर टाईमसाठी एका पायावर तय्यार. सगळ्यांसाठी जेवण मागवणार, बायकांना घरापर्यंत सुखरूप सोडण्याची सोय करणार. तू येच एकदा त्यांना भेटायला.”, अभिजीत शेजारी जोरजोरात चालू असलेल्या भजनी मंडळींच्या वरचा सूर लावून सांगत होता. शेवटी जेव्हा गाडीने विक्रोळी सोडलं, तेव्हा तो लगबगीने घाटकोपरला उतरायला निघाला. डोंबिवलीहून सात बावन्नची लोकल पकडून आम्ही सगळेच एकमेकांच्या सोबतीने मुंबईच्या लोकलमधला प्रवास एन्जॉय करायला शिकलो होतो. अभिजीतचं लालवानी पुराण दर काही दिवसांनी ऐकायला मिळायचं. हल्ली तर आम्ही त्याला, “आला लालवानी फॅन” असंच चिडवायला लागलो होतो.
तर एकदा त्याच्या बँकेत जाण्याचा योग जुळून आला. माझ्या बाबांचे पेन्शनचं काम नेमकं त्याच्याच शाखेत निघालं. त्याच्याकडे कागदपत्र देऊनही काम झालं असतं, पण लालवानींना निदान दुरून तरी बघावं म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून प्रत्यक्ष जाण्याचं ठरलं. आणि खरोखरच मी बँकेत पाऊल टाकतो नं टाकतो तेवढ्यात ते जगप्रसिद्ध गडगडाटी हसू ऐकू आलं. मान वळवली आणि लालवानी साहेबांच्या आधी त्यांच्या शर्टाच्या बटणांची परीक्षा बघणारं थुलथुलीत वर-खाली होणारं पोटच आधी नजरेस पडलं. स्वतःच केलेल्या कुठल्यातरी विनोदावर ते खुश होऊन मनसोक्त हसत होते, टाळ्या देत होते. अभिजीतनं माझी ओळख करून दिली. लगेच त्यांनी मला, “साला, लंच टाईम होईलच आता, आता तू जेवल्याशिवाय काय तुला सोडत नाय आपण. अरे ये बाबू, बिर्याणी मागव रे त्या खालच्या राजधानीकडून, आणि हां बिल हा शाला अभिजित देईल काय!”, असं म्हणून पुन्हा गडगडाटी हसायला लागले. मग हो-नाही करता करता माझ्यासाठी बिर्याणी मागवली गेली, बाकी सगळ्यांचे डबे होतेच. पण त्यांच्यासाठीही कुल्फी मागवली गेली. लालवानी साहेबांनी कुल्फीकडे तिरप्या नजरेनी बघताच गोरे बाईंनी त्यांच्याकडे डोळे वटारून बघितलं. “लालवानी साहेब, शुगर वाढलीये नं? आपलं काय ठरलंय?”, असं म्हणून प्रेमळ धाकानी दटावले. गोरे बाई त्या शाखेतल्या सगळ्यांच्याच आजी होत्या, यंदा निवृत्ती घेणार होत्या. एकंदरीत त्या ऑफिसमध्ये खरंच खेळीमेळीचं हल्लीच्या दिवसात दुर्मिळ होणारं दृश्य होतं. गोरे बाईंचं लक्ष नसताना लालवानी साहेबांनी कुल्फी मटकावलीच आणि त्यांनी बघितल्यावर, आता काय उष्टी झाली, खावीच लागणार अशा नजरेनी पुन्हा ते पोट हलवत हसायला लागले. तर असे हे लालवानी साहेब- मधुमेह, उच्च रक्तदाब, गेला बाजार ऍसिडिटी ह्या सगळ्या रोगांना फाट्यावर मारून मनमुक्त हसत होते आणि सगळ्यांना हसवत होते. आणि त्यांच्या अघळ-पघळ ओसंडून वाहणाऱ्या शरीराकडे बघून बघून अभी मात्र प्रचंड टरकून होता.तब्ब्येतीची इतकी काळजी घेत होता. रोज पहाटे उठून प्राणायाम, नियमित सूर्यनमस्कार, मोजका आहार आणि व्यसनांना चार हात दूर ठेवूनच असायचा. अधून मधून लालवानी साहेबांनाही काही काही व्हाट्सअँप ज्ञान पाठवत होता. पण त्यांचं आपला एकच, “साला जिंदगी भेटते एक टाइम. हे तुमचा डाएट नि एक्सरसाईझ करून जिंदगी लंबी झाली ने तरी पन बुढाप्याचे दिवस वाढवेल! अभी तो मेरे खेलने- कुदने के दिन है|” आणि स्वतःवरच खूश होऊन गडगडाटी हास्य! अभिजित त्यांना समजवायचा,”नियतीच्या मनात काय असतं काय माहिती, आपण काळजी घेत राहायची…” पण लालवानी साहेबांनी जरी ते साहेब असल्याची कोणाला जाणीव करून दिली नसली तरी अभी स्वतःला ते कधीही विसरू देणार्यातला नव्हता.
अशात वर्षा सहल काढण्याची टूम निघाली. सगळ्यांनी येत्या रविवारी खोपोलीला भेटून जवळच्या धबधब्यांना भेट द्यायचं ठरलं. डोंबिवलीहून उठून खोपोलीपर्यंत प्रवास करण्याची अभिची अजिबात इच्छा नव्हती. पण लालवानी साहेबांचे किस्से दुसऱ्या कोणाकडून ऐकायचेही नव्हते. शेवटी होता-ना करता करता तो तयार झाला. खोपोलीला पोहचल्यावर लालवानी साहेबांनी त्यांची बॅग उघडून दाखवली- त्यात सर्व प्रकारची सोय तब्ब्येतीत होती. बियर, चकणा, आणि विविध रंगांच्या पेयांनी भरलेली ती बॅग बघून सगळेच खूष झाले. “अभि, आज तरी शाला तू तुजा भाटगिरी शोड रे. पिऊन तर बघ…” “नको नको मला ते तसलं काही नको.” “हाय कंबख्त तुने पीही नहीं|”, असं लालवानी साहेबानी म्हणताच सगळेच गालिब झाले. कधी नव्हे ते अभिजितनेही आज आपण थोडी घेऊन बघूया असं ठरवलं. सगळे धबधब्याजवळ पोहोचले. लालवानी साहेबांनी एक बाटली चढवली आणि ते आता बाकीच्यांना सामील व्हायला निघाले. पाणी पडून पडून खालचा दगड मस्त गुळगुळीत सोफ्यासारखा झाला होता आणि त्यावरून पाणी खळखळत येऊन पुन्हा खालच्या दगडांवर पडत होतं. मूळचा घाबरट अभी खालीच उभा राहून अंगावर तुषार झेलत मजा घेत होता. तर लालवानी साहेब त्या कोसळत्या धारा अंगावर घेण्यासाठी उघडबंब पोटानी त्या गुळगुळीत दगडावर बसले.डोळे मिटून मानेवर पडणाऱ्या धारांमुळे त्यांची चांगलीच तंद्री लागली होती. धो धो कोसळणाऱ्या पाण्यानी कोणाला कोणाचा आवाज ऐकू येत नव्हता. आणि कोणाच्या काही लक्षात येण्याच्या आतच वरून निखळलेल्या दगडाने लालवानी साहेबांचा घात केला होता. वरून एक दगड निखळला आणि लालवानी साहेबांच्या मानेवरच येऊन आदळला. त्यांच्यामुळे खाली असलेला अभिजित मात्र थोडक्यात वाचला. पुढे काय झालं, ऍम्बुलन्सला कोणी बोलावलं आणि लालवानी साहेबांना वेळेत हॉस्पिटलमध्ये कोणी नेलं ह्याचा ताळमेळ कोणालाच सांगता येणार नव्हता. थोडक्यात लालवानी साहेबांच्या जीवावरचा धोका टळला होता. पण मणक्यांचा चक्काचूर झाल्याने डॉक्टरांनी उरलेलं आयुष्य जे काही उरलं असेल ते अंथरुणातच काढावं लागेल असं सांगून टाकलं.
अभिजीतआमच्या गाडीच्या मित्रांना हा किस्सा सांगत असताना, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होतं. “लालवानी साहेब त्या जागी नसते ना, तर माझीच वेळ होती जाण्याची. पण म्हणतात ना देव तारी त्याला… तसा थोडक्यात वाचलो रे मी. पण आता त्यांच्याकडे बघवत नाही रे.” खरंच नियतीच्या मनात काय असतं कोणालाच कळत नाही. त्या दिवशी लालवानी साहेबांच्या त्या जागी असण्याने अभिजीतच्या जिवावरचे अरिष्ट टळलं होतं.
काळ कोणासाठीच थांबत नसतो. बघता बघता बँकेत सगळ्यांना लालवानी साहेब नसण्याची सवय झाली. अधून मधून कोणीतरी त्यांचा विषय काढायचं, मग त्यांच्या जुन्या आठवणी काढून सगळे थोडा वेळ हळहळायचे आणि पुन्हा आपापल्या कामाला लागायचे. असंच काही वर्षांनी पुन्हा एकदा अभिजीतच्या बँकेत जायचा योग आला. माझं काम झालं आणि लालवानी साहेबांची आठवण निघणं अनिवार्य होतं. अभीशी बोलत असतानाच पुन्हा तेच गडगडाटी हसू कानावर पडलं. चमकून आम्ही दाराकडे बघितलं तर काठीच्या आधाराने चालत लालवानी साहेब शाखेत अवतरत होते. त्यांना आलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. डॉक्टरांना खोटं पाडून लालवानी साहेब पुन्हा स्वतःच्या पायांवर उभे होते आणि पुन्हा एकदा अभी मला सांगत होता, “देव तारी त्याला कोण मारी… बघ तूच.”
माझं काम संपवून मी हाफ डे लागू नये म्हणून धावत पळत ऑफिसला जायला निघालो. लालवानी साहेबांच्या येण्याच्या खुशीत अभिजीत राजधानीची बिर्याणी आणायला स्वतः खाली उतरला. खरं तर बाबूवरच ही जवाबदारी असायची, पण लालवानी साहेबांमुळे जीव वाचल्याची जाणीव असलेला अभिजीत स्वतः सगळ्यांना बिर्याणी खिलवणार होता. तो खाली उतरून रस्ता ओलांडणार तेवढ्यात भरधाव येणाऱ्या ट्रकने त्याला उडवलं. अभी रस्त्याच्या कडेला फेकला गेला आणि आपलं काय झालं हे कळण्याच्या आधीच त्याची शुद्ध हरपली. आजूबाजूच्या लोकांनी ते बघताच चपळाईने ऍम्ब्युलन्स बोलावली. अभिजीतला आत ठेवत असतानाच, अभिजीतसाहेब त्यांचं पाकीट जागेवरच विसरून घाईघाईत उतरले म्हणून बाबू त्यांचं पाकीट घेऊन खाली आला. समोरचं दृश्य बघून त्याच्या मनात आलं, “आज अभिजीत साहेबांच्या जागी मी असतो तर? खरंच देव तारी त्याला…”
– केतकी जोशी.
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023
निशब्द
धन्यवाद!
केतकी सु…….रेख.
धन्यवाद, रुपाली 😊