स्पर्शाचं देणं
परवा एक दृश्य पाहिलं. अगदी साधं कधीही नजरेला पडणारं. एक आजोबा त्यांच्या परिचित असणाऱ्या एका बाईशी बोलतं होते. तिथेच तिचा छोटा चार एक वर्षांचा मुलगा पण होता. गोडं, मस्तीखोर डोळे असलेला. सहज बोलता बोलता त्या आजोबांनी त्याच्या काळया कुरळ्या केसांमधून हात फिरवला. आणि ते असे पटकन विस्कटून टाकले. आणि मग परत परत सरळ करत ते त्याला थोपटतं राहिले. काय नव्हतं त्या स्पर्शात….. माया, वात्सल्य, प्रेम, आनंद, आपुलकी. हे असं नेहमी घडणारं काही खरंतर. त्यामुळेच कदाचित ते टिपलं जात नाही. पण कधी कधी असा काळ येतो. ज्या गोष्टींची आधी कधी साधी दखल सुद्धा घेतली नव्हती ती नुसती घेतलीच जातं नाही तर आपल्याला त्याचं अप्रूप वाटतं. आणि ते सुद्धा भयंकर.
स्पर्श, काय असतो स्पर्श. काय देऊन जातो तो नक्की आपल्याला? इतका ओळखीचा, सवयीचा, बेदखल वाटण्याइतका आपला असतो तो. का आणि कशासाठी? माझ्या मते स्पर्शाचं नातं थेट आपल्या मनाशी असतं. जरी आपण तो शरीरानं करतो. कधी हाताने, कधी ओठांनी, कधी नुसत्या बोटांनी तर कधी मारून घट्ट मिठी. कधी हातात हात धरतो, मुलांचे आपल्या. तेव्हा तोच स्पर्श प्रेमळ, उबदार बनतो. जेव्हा त्याच हातांनी फटके देतो तेव्हा तोच शिस्तीचा, टोकदार बनतो. आपण लहान असतांना ज्यांनी आपले धरले होते त्याच हातांना ते सुरकुतल्यावर धरतांना मग वेगळंच वाटतं. ते हात तेव्हा पण देतातच काही. अनुभव, गेलेल्या क्षणांची ग्वाही. कधी फुंकर मारतात आपल्या कष्टांवर, कधी दिलासा देतात. आणि आपण सुद्धा देतंच राहतो त्यांना एक आश्वासकता. आपण तिथं असण्याची, त्यांच्या सोबत. कधी जेव्हा आपण आशीर्वादासाठी आपल्या गुरूंच्या, शिक्षकांच्या, जेष्ठांच्या समोर झुकतो. तेव्हा त्यांची प्रेमळ थाप पडते पाठीवर. किंवा हात आपल्या डोक्यावर जो घेऊन जातो आपल्या सोबत आपले ताण-तणाव, दुःख. मानसिक चिंता, त्रास. आणि देऊनही जातो मनःशांती, आनंद. चिंता मिटवून टाकण्याचं किती मोठं सामर्थ्य आहे स्पर्शात. जे आपण किती गृहीत धरून चालतो.
स्पर्श, किती तऱ्हा असतात त्याच्या. सहेतुक, अहेतुक, निष्पाप, निर्व्याज, अनोळखी, किळसवाणा, वखवखलेला, भीतीदायक, क्रूर. कधी रोमांचित करणारा. कधी शहारा आणणारा. कधी काटा फुलवणारा स्पर्श. कधी जगण्याचं बळ देणारा. कधी पायाखालची जमीन हादरवणारा स्पर्श. घडवणारा, बिघडवणारा, फुलवणारा आणि कुस्करणारा पण स्पर्शच. इंद्रियांच्या कंपनांमधून भेटणारा. स्पंदनांमधून उरणारा स्पर्श. कधी कवेत घेणारा. कधी मिठीत सामावणारा. कधी हुरहूर दाटून आणणारा. तर कधी काळजीतून ठिबकणारा स्पर्श. स्पर्शाचं कोंदण. त्याने अंगभर उमटवलेलं स्वतःचं गोंदण. तो कधी उडून जातो अत्तरासारखा. कधी रुतून बसतो बाणासारखा. कधी पाऱ्यासारखा निसटून जातो. कधी फुलपाखरांच्या पंखासारखा अलवार. खरंच किती देऊन जातो स्पर्श आपल्याला.
स्पर्श म्हटलं की मला सिनेमा आठवतो नसीरचा. इतका सुंदर अभिनय. त्यातले बारकावे, त्याचं ते डोळ्यातून बोलणं. स्पर्शानं अंदाज घेणं. चाचपणं. त्याचं व्यक्त होणं. आणि तरीही व्यक्त होता होता अव्यक्त राहणं. निव्वळ लाजवाब. स्पर्श असा दिसत राहतो त्याच्या न दिसणाऱ्या नजरेमधून, आपल्याला. कधी स्पर्श येतो भेटीला कवितांमधून. इंदिराबाईंच्या, ग्रेसांच्या. विरहाच्या, संध्याकाळच्या. कधी तो चित्रांमधून भेटतो. माधव सातवळेकरांच्या चित्रांमधून तर तो किती भेटतो. त्यांच्या एका चित्रामध्ये सुटलेला अंबाडा बांधणारी बाई आहे. किती हुकमी रेषा. असं वाटतं की ही बाई आता उठेल चटकन गाठ बांधत अंबाड्याची आणि दार उघडेल घराचं तिच्या. आणि हातात हात धरेल आपले आणि म्हणेल, “अग काय पत्ता, होतीस कुठे”. तो तिच्या खरखरीत हातांचा स्पर्श. मुलायम वाटून जाईल आपल्याला. असं कसं काढतात ते चित्र. इतकं सजीव. असं दिसतं नां त्या कलाकारांना जे रंगातून, शब्दांमधून, स्वरांमधून, रेषा रेषांच्या जाळीमधून जिवंत करतात. स्पर्श. खरंच किती देऊन जातात ते आपल्याला. हे असं स्पर्शाचं देणं. कसं फेडणारं आहोत आपण ह्याचं ऋण. उत्तर सापडतच नाही.
असा हा स्पर्श. जन्मल्यापासून मृत्यू पर्यंत साथ देणारा. जाणीव, ओळख, सवय अशा एक एक पायऱ्या चढत आपल्याला भेटणारा आणि भिडणारा. कधी ह्याची सय येते. कधी गंध. कधी हा डोळा ओला करून जातो. कधी आठवणी मागे ठेवून. असा हा त्याचा प्रवास माणसाच्या जाणीवेतून जन्मणारा. आणि नेणिवेतून उरणारा….स्पर्श आणि ते देणं त्याचं…..
© प्राची बापट
- सुशीच्या पल्याड….. - August 6, 2021
- स्पर्शाचं देणं - July 14, 2021
- तुकड्या तुकड्याने जगतांना…. - June 8, 2021
हा कलम व्दारे स्पर्श