आक्रंदन
रात्री पावणे अकराच्या सुमारास, कस्तुरीची कार तिच्या बिल्डिंगच्या गेटमधून आत शिरली. गाडी बंद करुन, मिनिटभर शांत बसून राहिली कस्तुरी… पुर्णपणे कोर्या मनःस्थितीत. मग आपला मोबाईल गाडीच्या स्पिकरशी कनेक्ट करत, तिने एक गाणं प्ले केलं मोबाईलमधलं. ‘दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो, कोई गीत गाओ’. लताचा आवाज बाॅलरुम डान्स करतच जणू, लहरु लागला कस्तुरीच्या आजूबाजूला. कस्तुरीच्या मनात विचारचक्र फिरु लागलं, त्याच तालावर… “दिलकी गिरह खोल दो… नर्गिस… रात और दिन… ड्युएल पर्सनालिटी… दिवसा एक आणि रात्री एक… आपण काय आहोत मग?… आपलंही तेच तर आहे… दिवसा एक नी रात्री… श्शीsss”. अचानक भानावर येत… कस्तुरीने आपले दोन्ही हात उपडे करत, स्वतःच्या ओठांवरुन फिरवले आलटून पालटून. आणि मग स्वतःच्या उपड्या हातांकडे बघून बोलली ती… “लिपस्टिकही साफ केली साल्याने चाटून – पुसून”. स्वतःचीच शिसारी येऊन, बसल्या जागीच थरथरली कस्तुरी. झटकन गाडीच्या बाहेर पडत, गाडी लाॅक करुन ती भरभर चालतच लिफ्टमध्ये शिरली.
स्वतःकडच्या चावीने कस्तुरीने दरवाजा उघडला. मुलीच्या बेडरुममध्ये फक्त डिमलाईट चालू होता, बाकी पुर्ण घरात अंधार होता. “क्षितिज कियाराला झोपवत असेल बहूतेक”… असा विचार करत फक्त फॅन सुरु करुन, कस्तुरी हाॅलपर्यंत येणार्या त्या मंदशा उजेडातच सोफ्यावर बसली… बांधलेले केस मोकळे सोडून, मान मागे टाकून. दहा मिनिटांतच कियाराच्या बेडरुममधला तो डिम लाईट बंद झाला, आणि क्षितिजने बाहेर येत हाॅलचा लाईट लावला. डोळ्यांवर आलेल्या प्रकाशाने, कस्तुरी दचकुनच उठली. “काय गं?… कधी आलीस तू?… आणि अंधारात काय बसली होतीस?… आज कियूच्या रुममध्ये नाही आलीस ती?… झोपली मग शेवटी तुझं नाव काढतच… काय गं?… अशी लाॅस्ट का दिसतीयेस?… आॅल वेल ना?”. क्षितिजच्या प्रश्नांच्या सरबत्तीतल्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता, कस्तुरी जागेवरुन उठली. “पटकन जरा वाॅश घेऊन येते… तू झोप… तसंही मला जेवायला नकोचेय… सो मी बघते एकदा काय काय उरणारेय, नी किचन आवरेन मग… तू जा”. क्षितिज पडत्या फळाची आज्ञा मानून, त्यांच्या बेडरुममध्ये जाऊन बेडवर आडवा झाला.
दहा मिनिटांत आंघोळ आटोपून, नाईट ड्रेस घालून कस्तुरी उभी राहीली आरशासमोर… कुठली ना कुठली क्रिम्स लावत अंगाला. गोरीपान आणि अतिशय नितळ स्किन असलेली बत्तीस वर्षांची कस्तुरी, प्रचंड सुंदर होती. त्यातून चांगली उंचीपुरी, अन् कोरीव बांध्याची होती कस्तुरी. एकूणच अगदी अजंता – एलोराच्या एखाद्या लेणीसारखीच, मादक होती कस्तुरी. आणि हे ती स्वतः ही अर्थातच जाणून होती. अशीच नेहमीप्रमाणे स्वतःच्याच शरीराची वळणं निरखत असतांना, कस्तुरीच्या मनात विचार आला की… “सांगावं का आत्ताच क्षितिजला आपल्या प्रमोशनचं?… आता मी AVP झालीये आमच्या मल्टि नॅशनल कंपनीची ते… the youngest person to achieve this position in the history of our company… उठवून सांगावं का क्षितिजला?”. हा विचार करत करतच क्षितिजच्या जवळ पोहोचलेली कस्तुरी, त्याला न उठवताच धप्प करत बेडवर बसली. “एवढी गुड न्युज… पण मला ती शेअरच कराविशी वाटत नाहीये… ना क्षितिजसोबत ना… ना देवासोबत… आई म्हणत असे की, जेव्हा कधी काही चांगलं होईल तेव्हा आधी कुलदेवतेला साखर ठेवायची… नी तिला ती गोड बातमी पहिली द्यायची… पण… पण हे असं मिळवलेलं प्रमोशन, आणि त्या प्रमोशनची बातमी… देवाला खरंच सांगावी?… छे… नकोच”. असं म्हणत कस्तुरी पुन्हा वळून, ड्रेसिंग टेबलपुढ्यात जाऊन बसली.
हेअर ब्रशने कस्तुरी आपले केस विंचरतच होती की, अचानकच तिला दिसला तो गडद लाल असा बोटाच्या पेराएवढा डाग… तिच्या काॅलरबोनच्या जरा खाली. कस्तुरी दचकलीच… “Oh sheet… love bite?… love bite my foot… its a lust bite… दिलेलं प्रमोशन डुकराने, चापून – चोपून वसूल केलंय”. एकदा झोपलेल्या क्षितिजकडे तिरपा कटाक्ष टाकत, कस्तुरीने घाईतच स्वतःचा मेक-अप किट उघडला. त्यातून फाऊंडेशन घेत ते त्या लाल डागावर लावणारच, तितक्यात थांबली ती. स्वतःशी विचार करु लागली कस्तुरी, आणि एक ठामपणा झळकू लागला तिच्या चेहर्यावर. पुन्हा एकदा आपला चेहरा आरशात न्याहाळत, एक मोठा सुस्कारा सोडत… कस्तुरी जागेवरुन उठत हाॅलमध्ये गेली. प्रमोशन आॅर्डरचं एन्व्हलप हातात धरुन आणत, क्षितिजपाशी गेली ती. त्याचा खांदा हलवत कस्तुरीने जागं केलं त्याला. तत्पुर्वी गाऊनचं पहिलं बटण, मुद्दामहूनच उघडं ठेवलं होतं तिने.
डोळे चोळतच उठलेल्या क्षितिजला, कस्तुरीने तिचं प्रमोशन लेटर दाखवलं. क्षितिजने ते वाचलं… “लागोपाठ दोन वर्षांत दोन प्रमोशन्स?… thats too in MNC?… तुझा बाॅस तुझ्यावर जरा जास्तच मेहेरबान झालाय, असं नाही वाटत तुला?… I mean… its great bt actually very hard to believe on”. क्षितिज हे बोलला मात्र, त्याचं लक्ष गेलं खाली मान घालून बसलेल्या कस्तुरीकडे. कस्तुरीच्या हनुवटीला धरुन चेहरा वर करत, तिच्या डोळ्यांत डोकावला क्षितिज अगदी खोलपर्यंत. आणि तेवढ्यात दिसला त्याला तो लाल डाग, कस्तुरीच्या छातीवरचा. झराझर एक्स्प्रेशन्स बदलले क्षितिजच्या चेहर्यावरचे. बघता बघता तो क्रुद्ध झाला. आणि आपल्या दोन्ही हातांनी कस्तुरीच्या खांद्यांना पकडून, क्षितिजने तिला खस्सकन जवळ खेचली. त्या घट्ट पकडीमुळे वेदना होत, कस्तुरी कळवळली… आणि दोन्ही डोळ्यांतून एकेक अश्रू ओघळला गालांवर तिच्या. पण तरीही… ना कस्तुरी स्वतःला सोडवत होती क्षितिजच्या पकडीतून, ना त्याला सांगत होती सोडायला. क्षितिजने तसंच कस्तुरीला जोरात मागे ढकलून दिलं… “You bitch… you slept with your boss?… just for the sake of promotion?… तुझ्या लेकीला सांगू का तुझे प्रताप… भले तिला आत्ता कळणार नाही पण… नाहीतर एक काम करतो… तुझ्या आई – बाबांनाच सांगतो… आणि माझ्याही… बरोबर काढतो थांब तुझ्या अब्रूचे धिंडवडे… you just wait… आत्ताच काॅल करतो”. इतकं बोलून क्षितिज तिरमीरीतच उठला जागचा.
क्षितिजला कसंबसं अडवत, त्याचा हात पकडत… त्याला बेडवर बसवलं कस्तुरीने. “हे बघ क्षितिज… झाली चूक… पडले मी बळी प्रलोभनाला… he didn’t force but gave me an offer & I… I accepted it… आपल्या हाऊसिंग लोनचा EMI, कियूचं पुढचं शिक्षण, माझ्या छोट्या बहिणीचं लग्न, माझ्या बाबांची कॅन्सरची ट्रिटमेंट… I don’t know… I… I really don’t know what the hell I thought at that moment, but I said yes to him… आणि डिल झालं आमच्यात की… की जेव्हा जेव्हा तो म्हणेल तेव्हा तेव्हा… जे झालं ते झालं क्षितिज… मी तुला डिव्होर्स देते… कियूलाही अर्थातच मी सांभाळेन… मी निघून जाईन ह्या घरातून… पण… पण तू कियूला किंवा तुझ्या – माझ्या घरच्यांना हे सांगू नको प्लिज… मी… मी तुझ्या पाया पडते… बाबांचे तसेही कमी दिवस राहिलेत रे… आणिक लवकर जातील ते… प्लिज क्षितिज… प्लिज”. क्षितिजसमोर हात जोडून उभी होती कस्तुरी. आता क्षितिज काहीसा शांत झाला होता. दोन्ही हातांनी गच्च डोकं पकडून, बेडवर बसला होता तो. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात क्षितिजने मान वर करत कस्तुरीकडे पाहिलं, नी तिला डोळ्यांनीच खाली बसायची खूण केली.
“कस्तुरी… लास्ट इअर आमच्याकडे एक MBA, Finance मुलगा भरती झाला… टिपिकल असा पंचविशीचा वगैरे… ओव्हर स्मार्ट आणि ओव्हर एन्थ्यु असा… बाॅसच्या मागे – पुढे करणारा… त्याची चाटूगीरी करणारा… आॅफिस वर्कमध्ये मात्र जेमतेमच… आणि कालच कळलं की, स्साल्याला प्रमोशन मिळालं… एकाच वर्षात… आता बेसिक्स माझ्याकडून शिकलेला हा कालचा पोरगा, बारा वर्ष सर्व्हिस झालेल्या माझ्या डोक्यावर येऊन बसणार… मला आॅर्डर्स सोडणार… आणि मी ह्याला यस्स सर, यस्स सर करायचं… bloody foot… आणि ह्या बारा वर्षात माझी प्रमोशन्स किती झाली?…तर दोन… फक्त दोन”. एवढं बोलून क्षितिज जागचा उठला, नी फेर्या मारु लागला अस्वस्थपणे. एका पंजाची मुठ करुन, ती दुसर्या हाताच्या पंजावर आपटू लागला तो. “This whole system is bloody fraud… and you know what… अशी कन्फर्म बातमी आहे की, आमच्या बाॅसचं त्या प्रमोशन मिळालेल्या मुलाच्या बहिणीशी… I mean they both are in relationship”. अचानक क्षितिज फेर्या मारायचा थांबला, आणि बेडवर बसलेल्या कस्तुरीच्या पुढ्यात आला तो. तिच्याकडे अतिशय थंड आणि काहीशा विचित्र नजरेने बघत बोलला क्षितिज… “माझ्या सारख्या एखाद्याला प्रमोशन मिळवायचं असेल, तर मला धाकटी बहिणही नाही… मग… मग मी काय आयुष्यभर सिन्सिअॅरीटीच कुरवाळत बसायची?… तर नाही… मला बहिण नसली म्हणून काय झालं?”.
एक विकृत चमक तरळत होती, आता क्षितिजच्या डोळ्यांतून. पुन्हा मघासारखेच कस्तुरीचे खांदे घट्ट पकडत, क्षितिजने उभं केलं तिला. हे सारं काही ऐकून पायांतून त्राणच गेलेली कस्तुरी, कशीबशी उभी राहिली… नी विस्फारलेल्या डोळ्यांनी, पांढर्या फटक चेहर्याने बघत राहिली क्षितिज कडे. क्षितिजने अगदी सावकाशीने प्रत्येक शब्दावर भार देत, आपलं मघाचं वाक्य पुर्ण केलं… “मला बहिण नसली म्हणून काय झालं… खूप खूप सुंदर अशी बायको तर आहे… आणि पुन्हा तिची रिक्वेस्टही आहे की, तिची सिक्रेट्स घरच्यांना कळता कामा नयेत… मग आता इथेही एक डिल तर करावं लागणारच ना?… हो की नाही… अब मै भी देखता हूँ स्साला, मेरा प्रमोशन कैसे रुकाता है कोई”. हे इतकं बोलून क्षितिज, अतिशय थंडगार डोळ्यांनी प्रचंड विखारी असं हसला. कस्तुरीचे पकडलेले खांदे क्षितिजने सोडून देताच, ती अक्षरशः लोळागोळा होऊन खाली जमिनीवरच पडली. क्षितिजच्या हसण्याच्या आवाजाचा जोर जसा वाढत गेला बाहेर, तसाच वाढत गेला कस्तुरीच्या आतील आक्रंदनाचा जोरही… अजिबात आवाज नसलेला… मूक असा.
Horrible!
Khup kahi ahe yawar bolayla apn bolun kahi fayda nahi ….. Ashich situation ahe
Sab moha maya hai…