फिरुनी नवी जन्मेन मी ….१
“मम्मा,कित्ती गोड दिसते आहेस अगं” असं म्हणत रियाने रूपालीला एक घट्ट मिठी मारली आणि रुपाली एकदम दचकलीच.
रुपाली तिच्या तंद्रीतच आरश्यात बघून आवरत होती आणि डोक्यात विचार आजच्या “त्याच्या” नी तिच्या भेटीचे चालले होते .
आज ‘त्याचा’ म्हणजे अनिकेतचा वाढदिवस होता, म्हणून मुद्दाम वेळ लावून रुपाली तयारी करत होते. त्याच्यासाठी रूपालीला सुंदर दिसायचं होतं. तशी ती त्याला कशीही राहिले तरीही तितकीच आवडत होती, म्हणजे म्हणायचा सुद्धा गमतीत ,”तू माझ्याहून पाच वर्षांनी मोठी ,पण दिसतेस लहानच .,तू कशीही राहिलीस अगदी कितीही साधी राहिलीस आणि जरी पुढे कितीही म्हातारी ,अगदी वाईट दिसलीस तरीही मी तुझ्यावर आत्ता इतकंच प्रेम करणार”. पण आज रूपालीला खास त्याच्यासाठी नटायाचा मूड आला होता.
रिया रुपाकडे एकटक बघत तिला म्हणाली “अशी नेहमी का नाही दिसत गं मम्मा तू सुंदर”?
तिला काय सांगणार होती ती ,की ती हल्ली का इतकी सुंदर दिसायला लागली आहे ?
प्रेमात माणूस सुंदरही दिसायला लागतो हे तिला कळायला अवकाश होता अजून.
रुपालीची आणि त्याची …म्हणजे अनिकेतची भेट रुपालीच्या नात्यातीलच एका समारंभात झाली. म्हणजे तिच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याचा अनिकेत हा मित्र. खूप दिलखुलास ,बडबड्या, लाघवी. अनिकेत एका multinational कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होता.
त्या दिवशी जांभळ्या रंगाच्या पैठणीत ,सासूबाऊंची मोठी मोत्यांची टपटपीत नथ, तनमणी, मोत्यांचेच वेल हे सगळं घालून रुपाली खरंच खूप सुंदर दिसत होती ,पण रुपालीच्या नवऱ्याला ‘अमोलला’ आता तिच्याबद्दल कसलेच कौतुक किंवा, तिच्या दिसण्याबद्दल काहीही अप्रूप उरले नव्हते . अनेक नातेवाईकांनी रुपालीच्या सौंदर्याचे , तिला भेटून कौतुक केले. रुपालीच्या मोठ्या बहिणीने तर नजर पण काढली तिची. एक भाऊ मजेत म्हणाला की “ताई, जपून बरं का!, कोणीतरी पळवून वगैरे न्यायचं” एकंदर त्या लग्नात नवरीहून रूपालीच चर्चेत होती ,आणि अमोलला तिच्या नवऱ्याला त्याचं जराही कौतुक नव्हतं. रुपालीच्या बहिण भावंडानी मात्र त्या दिवशी खूप धमाल केली.
रूपालीचे वयाच्या विसाव्या वर्षीच अमोल बरोबर लग्न झाले आणि बरोब्बर वर्षाने रियाचा जन्म झाला. आज रिया अठरा वर्षांची होती , आणि त्यामुळे रुपाली केवळ ३९-४०. अनिकेतची भेट व्हायच्या आधी रूपालीला जाणीवच नव्हती की ती इतकी सुंदर दिसते . मुळात ती सुंदर म्हणूनच तिला अमोलच्या घरच्यांनी मागणी घातलेली होती. पण लग्न झालं , रिया झाली तरीही अमोलचे रुपालीवर खूप प्रेम होते किंवा आहे असे तिला मनापासून कधीच जाणवलेच नाही. मुलीला समोरून मागणी घातली , म्हणून रुपालीच्या घरचे तर हुरळून गेले होते. आणि रूपालीही तेव्हा त्या श्रीमंतीला आणि अमोलच्या एकूण parsonlity ला बघून हरकली होती . ठाण्यात एक बंगला, नाशिकला एक बंगला आणि स्वतःची एक मोठी कंपनी. काय हवं असतं एखाद्या मुलीला सुखी आणि आनंदी होण्यासाठी ?
आणि ह्या क्षणी रुपाली एक सगळ्यात सुखी स्त्री होती , म्हणजे समाजाच्या दृष्टीने तरी … कारण सगळेच तर होते तिच्यापाशी. Handsome नवरा , गोड आणि सुंदर मुलगी, नोकर चाकर हाताशी, दोन मजली बंगला आणि पोर्च मध्ये चार गाड्या. सासू सासरे सुद्धा स्वभावाने उत्तम, पण ते नाशिकला रहायचे, कारण त्यांना तिकडचे मोकळे वातावरण आवडायचे, फक्त सणासुदीला किंवा अधून मधून ते इकडे किंवा हे सगळे तिकडे जात असत. पण हे इतकं सुख असूनही रूपालीला काहीतरी कमतरता जाणवत होती तिच्या आयुष्यात आणि ती भरून काढली अनिकेतने.
तिला प्रेम हवे होते आणि त्यासाठी ती आसुसलेली होती. ते मिळालं तिला अनिकेत कडून.
खरंतर रूपालीला संसाराची खूप हौस , अगदी बारीकसारीक गोष्टींत ती लक्ष द्यायची. घरात प्रत्येक कामाला नोकर असूनही जेवण मात्र ती तिच्या हातानेच बनवायची .इतर अनेक गोष्टी असतात घर म्हंटल की, आणि रूपालीला स्वतःचे घर सजवायची सुद्धा आवड होती. पण संसार हा दोघांचा असतो. अमोल बिझनेस मध्ये जरी व्यस्त असला तरी त्याच्याजवळ रुपाली आणि रीयासाठी कधीच वेळ नसायचा.
रिया लहान होती तेव्हा रुपलीकडेही वेळ नसायचा. ह्या गोष्टींचा तिनेही नव्हता विचार केला. पण रिया मोठी झाली , शाळेत जाऊ लागली तेव्हा मात्र अमोलने रूपालीला वेळ द्यावा ही तिची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. आणि दिवसेंदिवस तो अतीच दुर्लक्ष करू लागला घराकडे आणि रुपाकडेही.
सुंदर बायको , गोड मुलगी आणि वडिलोपार्जित असलेला बिझनेस ह्यामुळे तो नेहमीच टेचात असायचा. रूपा जितकी भावनाशील होती , तो मुळीच नव्हता. रुपाला तो नेहमी हसायचा “काय बारीक सारीक गोष्टीत डोळ्यांतून पाणी आणतेस. एका यशस्वी बिझनेसमनची बायको आहेस , थोडी टफ हो , attitude येउदे तुझ्यात”.पण तिला हे कधीच जमले नाही , कारण मुळात तिचा स्वभाव तसा नव्हताच.
त्या दिवशी सकाळी नाश्ता करताना रुपालीने अमोल जवळ विषय काढला
“आज येशील का रे लवकर घरी ? रियासाठी शाळेची खरेदी करायला जायचं आहे. तिला बरं वाटेल तू आलास तर”
“बघतो मी, पण जमेल असं वाटत नाही, तू जा ना कोणाला तरी सोबत घेऊन, नाहीतर असं कर त्या आपल्या बंगल्याच्या बाजूच्या बिल्डींग मध्ये तुझ्या मैत्रिणी आहेत ना , सो कॉल्ड,मिडिल क्लास वाल्या ज्या मला कधीच आवडल्या नाहीत त्यांना घेऊन जा , खुश होतील गाडीतून फिरायला मिळालं की” असं म्हणून तो कुत्सित हसत निघूनही गेला factory मध्ये.
अमोलला कधीच आपल्यापेक्षा कमी ऐपत असलेल्या लोकांसोबत मैत्री करायला आवडले नाही. गरीब लोकांचा त्याला तिरस्कार होता. पण रुपाली ज्या परिस्थितीत , ज्या लोकांमध्ये वाढलेली होती तो समाज मध्यम वर्गीय कुटुंबात मोडणारा होता . खाऊन पिऊन सुखी असणारा समाज . जरी गरीब तरीही मानी , कोणापुढेही पैश्यासाठी हात न पसरणारा समाज. अमोलला रूपा हवी होती , पण हा समाज किंवा हि मध्यम वर्गातली माणसं नको होती . संसाराला उत्तम आणि दिसायला सुंदर म्हणून बहुदा रुपाला ह्या घरात लग्न करून आणले असावे असाच ह्या गोष्टीचा अर्थ होता ..एक शोभेची बाहुली म्हणून रूपा त्या घरात रहात होती.
रिया मोठी होत होती . आणि रूपा अमोलला तिच्या कुठल्याच बाबतीत गृहीत धरत नव्हती. कारण आता रूपाने त्याचा विचार करणं सोडून दिलं होतं . रूपा आणि रिया त्या दोघींचे इतके सुंदर bonding झाले होते , की तिचे तिच्या मम्मा शिवाय पानही हलायचे नाही. अमोलकडे चुकून वेळ असला आणि तो रियाशी गप्पा मारायला बसला तरी ती ही त्याच्यात इतकी involve होत नव्हती. कारण प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं हे त्याला कधीच कळणार नव्हतं. तिच्या प्रगती पुस्तकावर सही करणारा पिता इतकीच काय ती त्याची तिच्या बाबतीत जबाबदारी.
रिया एकदा शाळेत गेली की रूपालीजवळ भरपूर वेळ असायचा. त्या दिवशी सहज तिच्या मनात आलं , आणि तिने म्हंटल की आपली एवढी मोठी factory आहे . जरा बघून तर येऊ. आपणही B.com झालो आहोत .फायनान्सचा कोर्से झाला आहे, जर काही फावल्या वेळात थोडं काम जमलं तर करू अमोलला आवडलं तर….
क्रमश:
पुढील भागाची लिंक- फिरुनी नवी जन्मेन मी ….१
Image by PublicDomainArchive from Pixabay
- शर्वरी…(कथा संग्रह) - September 12, 2022
- निसरडी वाट- 1 - September 17, 2021
- फिरुनी नवी जन्मेन मी ….२ - July 27, 2021
Changli ahe katha
Pingback: फिरुनी नवी जन्मेन मी ….१ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: फिरुनी नवी जन्मेन मी ….१ – LekhakOnline – Excellent Marathi Articles
Pingback: फिरुनी नवी जन्मेन मी ….२ – LekhakOnline – Excellent Marathi Articles