फिरुनी नवी जन्मेन मी ….२

आधीच्या भागाची लिंक- फिरुनी नवी जन्मेन मी ….१

तर सरप्राईज म्हणून रूपा त्या दिवशी त्यांच्या वाशीला असलेल्या कंपनीत गेली. मनात हे हि म्हंटल ‘बघू तरी अमोल कुठे इतका बिझी असतो?.

कंपनीत तर रूपालीला  सगळेच ओळखत होते. आल्यावर सगळ्यांनी हसून स्वागत केलं . तिलाही जरा बरं वाटलं.  ती अमोलच्या केबिन पर्यंत आली आणि आत शिरणार इतक्यात त्याच्या केबिन मधून त्याचा आणि एका स्त्रीच्या  हसण्याचा आवाज आला. जाऊ की नको ह्या संभ्रमात असताना मागून factory चे manager जोशी काका आले आणि म्हणाले. ”अरे वा रुपाली ताई आज तुम्ही चक्क factory मध्ये ?, या या … स्वागत आहे तुमचे” आणि त्यांनीच ते दार नॉक करत “may I come in sir ” असं विचारलं आणि रूपालीला आत घेऊन गेले.

ते दोघे दार उघडून आत आले तेव्हा अमोल आणि ती स्त्री  इतके जवळ उभे राहून एकमेकांना टाळ्या देत हसत खिदळत होते की रूपालीला काय इव्हान जोशी काकांना सुद्धा  ते अजिबात आवडले नाही. रुपालीच्या जागी कोणतीही बाई असती तरी तिला हे नवऱ्याचे वागणे अजिबातच आवडले नसते. रुपलालीच ते बघून लाज वाटली आणि तीने खिडकीकडे मान फिरवली आणि उगाचच केबिनचे निरीक्षण करू लागली. मधून मधून तिने त्या स्त्रीकडे लक्ष देऊन तिचेही निरीक्षण केले.  त्या स्त्रीचे कपडे इतके तंग होते की रुपाली  पूर्ण कपड्यात असूनही अंग चोरून उभी राहिली.

“अरे रूपा तू कशी काय आज अचानक? काही बोलली नाहीस येतेस म्हणून . मुळात तू काही काम आहे म्हणून आली आहेस का सहज?”

अमोलच्या प्रश्नांवरून ती तिथे आलेली त्या दोघांनाही आवडले नव्हते, त्यांच्या हसण्या खिदळण्यात  व्यत्यय आला होता ना !

जोशी काकांनी रूपालीला बसायला खुर्ची दिली “ताई तुम्ही बसा , मी चहा सांगतो” असं म्हणून त्यांनी आणलेली फाईल टेबलावर ठेवली आणि अमोलला “सर सह्या हव्या आहेत फाईलवर” असे म्हणून ते निघून गेले. त्या स्त्रीवर मी आल्यामुळे कुठलाच फरक पडलेला दिसत नव्हता. ती अजूनही अमोलच्या खूप जवळ , त्याला  खेटूनच उभी होती. रुपालीने नंतर आलेला चहा कसाबसा संपवला, ती हि तिथेच एका खुर्चीत बसून हाताचे नेलपेंट बघत एकदा माझ्याकडे आणि एकदा अमोलकडे बघत गालातल्या गालात हसत होती. शेवटी अमोलही काही बोलत नसल्याचे बघून रुपालीने “मी येते” असं म्हणून ती तिथून बाहेर पडली .

घरी आल्यावर रुपाली सतत हाच विचार करत होती की अमोल “बिझी” असण्याचे हेच कारण असेल का ?

अमोलेने त्यावेळी काहीतरी सांगून ती वेळ मारून नेली , पण नंतर रुपाली त्याच्यावर लक्ष ठेवायला लागली तेव्हा तिला असे दिसून आले कि ती बाई त्याच्या ऑफिस मध्ये खूप वर्षांपासून काम करत आहे आणि तिची अमोल सोबत खूप घट्ट मैत्री आहे.

एक दिवस अगदीच सहन न होऊन रुपालीने अमोलपाशी विषय काढलाच.

“अमोल त्या दिवशी मी ऑफिस मध्ये आलेले , तेव्हा जी स्त्री तुझ्याशी अति मोकळेपणाने बोलत होती ते मला नाही आवडले . नंतर मला तुमच्या खूप वर्षे असलेल्या खास मैत्रीबद्दल कळले.  नाही आवडली हि तुमची खास मैत्रीमला , म्हणजे हे मैत्रीच्या पलीकडे जे वागणे आहे ते मला खटकत आहे. तू माझ्यासाठी , रीयासाठी थोडाही वेळ काढू शकत नाहीस आणि ऑफिस मध्ये तुला हिच्यासोबत हसायला खिदळायला  मात्र वेळ असतो?”

“तू काहीही बोलत आहेस रुपाली, अगं मेधा किती वर्षांपासून आहे आपल्या कंपनीत , बाबांना सुद्धा माहित आहे आमची मैत्री , तू उगाच काही बाही डोक्यात आणु नकोस, आम्ही कामाबद्दल बोलताना खेळीमेळीच्या वातावरणात असतो. जरा हसलो बोललो तर एवढं काय त्यात?”

तिला कळून चुकले की कितीही आपण बोललो तरी हा अशीच सारवासारव करणार . तिने आजच्या दिवसापुरता तो विषय तिथेच stop केला.

पण नंतर तिने त्याच्या मोबाईलमधले मेसेजही अनेकदा वाचले आणि  त्यांचे नाते मैत्रीपलीकडे आहे ह्या गोष्टीवर शिक्का मोर्तब झालं.

रुपाली तरीही नंतर खूप शांत शांत रहायला लागली . तिचं खरंतर कशातच लक्ष नसायचं. एक दिवस अमोल बोलला “ तू ही बाहेर जात जा , मित्र मैत्रिणी वाढव , एन्जॉय कर ना आयुष्य तुझं” बहुदा त्याच्या चुका झाकण्यासाठी तो रूपालीला हे असे सल्ले देत असावा.

तिने गप्प राहणेच पसंत केले ह्याहीवेळी.

बहिणीकडचे लग्न झाल्यावर महिन्यांनी रूपालीचे भाऊ बाहीने सगळे परत एकदा तिच्या बहिणीच्या घरी भेटले.  आणि तेव्हा खऱ्या अर्थाने तिची आणि अनिकेतची घट्ट मैत्री झाली.

“तुम्ही रुपाली ना , म्हणजे सोनालीची बहिण”? रुपाली चहाचे कप भरत असताना मागून एक भारदस्त आवाज आला आणि तिने मागे वळून बघितले. अतिशय बोलके डोळे असलेला, हसऱ्या चेहऱ्याचा ,सहा फुट उंचीचा अनिकेत रुपालीच्या अगदी मागे उभा होता. आणि तिला तो अगदी लख्ख जसाच्या तसा लग्नात बघितला होता तो आठवला.

“हो मीच रुपाली , सोनूची बहिण , आणि तुम्ही अनिकेत ना ? आपली भेट झाली होती कि लग्नात,”

“अगदी बरोबर , चांगली मेमरी आहे तुमची”

“हो तर , अहो आणि मी काही म्हातारी नाही हे असं महिन्यात कुणाला विसरायला”

“गंमत केली हो, आणि तुम्ही तर माझ्या पूर्ण लक्षात आहात , मी सोनालीला विचारलं होतं तेव्हा कि अख्ख्या hall मध्ये उठून दिसणारी ही मुलगी कोण ?”

“मुलगी ??, काहीही तुमचं, अहो मी तर ….”

“कळलं मला नंतर तिच्याकडून कि तुम्हाला एक गोड मुलगी आहे अठरा वर्षांची म्हणून”

“हो , रिया , माझं सर्वस्व”

“मी घेऊ का चहाचा ट्रे, खूप आहेत ना कप , तुम्ही पेस्ट्रीजच्या डिश आणा मागून , मी चहा नेतो” असं म्हणत त्याने रुपालीच्या उत्तराची वाटही न बघता चहाचा ट्रे उचलला आणि एक गोड स्माईल देऊन तो बाहेर गेला सुद्धा, आणि रुपाली मात्र त्या स्माईल मध्येच अडकली , आणि तेवढ्यात तिच्या बहिणीचा,  मितालीचा बाहेरून आवाज आला आणि ती पटकन डिश घेऊन बाहेर आली.

तो दिवस खरंच संस्मरणीय होता रुपालीसाठी .

खूप गप्पा टप्पा . नंतर हॉटेल मध्ये लंच आणि नंतर एक मुव्ही आणि ह्या सगळ्यात अनिकेत होता सतत सोबत रुपालीच्या. सतत त्याने रूपालीला  चोरून बघणे , तिच्याशी बोलायचा प्रयत्न करणे हे सगळं सगळं तिला  एक वेगळीच अनुभूती देत होतं , जे कधीतरी आपल्यासोबत घडावं असं जे तिला वाटत होतं ते … ते तिला सगळं अश्यारितीने अनुभवायला मिळत होतं.

त्या दिवशी त्या दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्स्चेंज केले. आणि मग chatting , हळूहळू फोनवर बोलणं सुरु झालं एकमेकांशी. नंतर असं व्हायला लागलं की एक दिवस जरी बोलणं नाही झालं तरी चैन पडेनासे झाले रूपालीला आणि त्याला सुद्धा. सतत त्याचेच विचार, तोच असायचा नजरेसमोर.

रूपालीचे तिच्या बहिणीसोबतच अनेक वेळा आणि नंतर पण एक दोन वेळा त्याच्या घरी जाणे झाले होते. एकमेकांशी त्यांचा आता व्यवस्थित परिचय झाला. एकमेकांच्या आवडीनिवडी वगैरे ते जपू लागले. त्या नात्याला काय नाव द्यावं दोघानाही कळत नव्हतं, पण रुपालीला तरी अनिकेत एक खूप जवळचा मित्र किंवा सखा भासत होता.

अनिकेत त्याच्या flat वर एकटाच राहत होता, त्याचे आईवडील नागपूरला त्याच्या बहिणीकडे राहत होते. तिची जुळी मुलं सांभाळायला तिला खूप त्रास व्हायला लागला , तेव्हा तिने अनिकेतला विचारून त्या दोघांना नागपूरला काही दिवस रहायला बोलावून घेतले. त्याचा पाच खोल्यांचा प्रशस्त flat होता आणि त्याने तो एकदम नीटनेटका  ठेवला होता. तो सोफ्टवेअर इंजिनीअर होता. मोकळ्या स्वभावाचा , हसरा आणि देखणा होता अनिकेत.

अनिकेतने अजूनही लग्न नव्हते केले . कॉलेज मध्ये असताना त्याचे एक ब्रेकअप झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता कि लग्नच करायचे नाही. पण जेव्हापासून रुपालीची आणि त्याची  ओळख झाली होती त्याचा मैत्री आणि प्रेमावर पुन्हा विश्वास बसायला लागला होता.

क्रमश:

Image by PublicDomainArchive from Pixabay 

<

Chapekar Manasi

Chapekar Manasi

कविता ,लेख ,ललित आणि कथा लिखाण,नवीन पदार्थ तयार करणे आणि खिलवणे म्हणजेच एकंदर स्वयंपाकाची आवड , अभिवाचन, आणि गाण्याची आवड आहे ,आणि हे उत्तम जमते . ओंजळीतील शब्दफुले ह्या स्वलिखित आणि स्वरचित कवितांच्या कार्यक्रमाचे 40 कार्यक्रम संपन्न अनेक कवी संमेलनात आमंत्रण आणि कथेला बक्षिसे प्रभात वृत्तपत्रात दर शुक्रवारी अस्मिता ह्या सदरात लेख प्रकाशित .तसेच अनेक वृत्तपत्र आणि मासिकांत लेख ,कथा ,कविता प्रसिद्ध निसर्गाचे फोटो काढण्याची आवड ,कारण फोटो ग्राफरची नजर लाभली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!