पाऊस 

आमचा भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे गाव, तसे पाणी आणि पाऊस यांनी दुर्लक्षीत भाग म्हणायला हवा. त्या काळात पाऊस पडुन सर्व जलमय होण्याच्या आठवणींपेक्षा, पाण्यासाठी केलेली पायपीटच जास्त लक्षात आहे. अर्थात पाऊस कधीच पडला नाही असेही नाही.
लहानपणी पाऊस लागला आणि सर्व जलमय झालेच नाही असे म्हणणार नाही. त्यावेळी कौलारु घर होते. संपुर्ण घरावरती मध्यावर उंच भाग आणि दोन्ही बाजूंनी उतरती कौले. त्यांच्या खाली लाकडी फळ्या टाकुन माळवद केले होते. पावसाळ्यात काही कौलं फुटली होती. त्या कौलांतून पावसाचं पाणी गळून फळ्यांच्या फटीतून खाली झिरपायचं. मग त्या ठिकठिकाणी गळणाऱ्या पाण्याखाली एखादे भांडे ठेवायचे. त्यात पण एक शास्त्र असायचं. जिथे काही थेंब पडत तिथे छोटं पातेलं. जिथे धार लागली असेल तिथे मोठं पातेलं. या हिशोबाने भांडी ठिकठिकाणी मांडली जायची.
पाऊस जास्त वेळ चालला तर मग ते भरलेलं भांडं मागच्या अंगणात किंवा पुढच्या अंगणात ओतायचे. मला आठवते, ओसरी, त्यानंतर स्वयंपाक घर, मग मागचं अंगण. उजव्या बाजूला आणखी दोन खोल्या. असं चार खोल्यांचं घर. मागच्या अंगणात समोर डाळिंबाची दोन झाडे, त्याच्या डाव्या बाजूला कोपर्‍यात कमरेइतकं उंच असं तुळशी वृंदावन, त्याच्या मागे लिंबाची झाडं, त्याच्या बाजूला कडिपत्ता आणि त्याच्या डाव्या बाजूला म्हणजे स्वयंपाक घराच्या भिंतीला लागून असलेलं पेरुचं झाडं. पाऊस चालू असताना त्या ओल्याचिंब झाडांवरून ओघळणारा पाऊस पहायला मजा यायची.
रात्री झोपताना जर पाऊस चालू असेल तर मात्र मजा असायची. जवळपासच कुठेतरी पाणी ठिपकत असायचं. त्याचा टिपीक्SSSS टीपीक् आवाज यायचा. एखादं पातेलं भरलेलं असायचं आणि वरतून पडणार्‍या पाण्यामुळे बाजूला झोपलेल्याच्या अंगावर तुषार उडवत असायचं. ते पातेलं कुणी उचलून रिकामं करायचं याचा प्रश्न असायचा. पावसाने सगळे गारठलेले असायचे, त्यामुळे पांघरुणातून बाहेर पडायची कोणाचीच इच्छा नसायची. बर्‍याचदा डोक्यावर पांघरुण घेऊन आपण झोपी गेलोय हा मार्ग अवलंबला जायचा.
लहानपणी इतर भावंडांसोबत म्हणजे अनु, वैजू ताई, सनी आणि राणी (अक्षय म्हणजे मनू तेव्हा अजून जन्माला यायचा होता) मागच्या अंगणात पावसात उड्या मारत असु. हे खेळणं मोठ्यांनी कितीही वेळा सांगून न थांबणारं असायचं. ते शेवटी आई किंवा काकूचा ओरडा किंवा क्वचित प्रसंगी एखादा धपाटा खाऊनच थांबायचं.
आमच्या घरासमोर रस्ता आहे. त्या रस्त्यावरुन पुढे मुख्य पेठेकडे जाता येते. आमचे घर खोलगट भागात असल्याने जोरात पाऊस आला की पेठेकडून जोरात पाण्याचा लोंढा आमच्या घरासमोरून आणखी खालच्या भागाकडे जात असे. मग पुढच्या अंगणात कागदाच्या छोट्या छोट्या होड्या तयार करून पाण्यात सोडणे हा उद्योग सुरू व्हायचा.
पाऊस पडला की लाईट जाणे हे ठरलेले असते. कदाचित शास्त्रच आहे ते. हे आपण आता सुद्धा म्हणजे २०१९ मधेही अनुभवतोय तर मी सांगतोय तो काळ म्हणजे १९८० – १९९० चे दशक. तेव्हा तर लाईट जाण्यासाठी पाऊस प्रत्यक्ष येण्याची गरज नसायची. नुसती पावसाची वातावरणात निर्मीती झाली तरी पुष्कळ असे.
कधीतरीच ओढा भरुन जाणं आणि पूर नामक गोष्ट ऐकिवात येणं असं व्हायचं. आम्ही लहान, त्यामुळे ओढ्याकडे आम्हाला जायला मिळणं आणि तो आमच्या गावाकडे आलेला छोटेखानी पूर पाहणे वा अनुभवणे शक्य नसे. मग कोणी कोणी येऊन सांगितलेल्या पूराच्या चित्तथरारक गोष्टींचं रसभरित वर्णन ऐकणं एवढंच नशिबी असं.
त्यातूनही तो पूर पाहून आलेल्या दोघांत मतभेद असणं आगदी गरजेचे असे. मग त्यातील एक जणांनी सांगितलेल्या पाण्याची पातळी दुसर्‍याने पाहिलेल्या पातळीपेक्षा कशी जास्त होती, हे सांगण्याची स्पर्धा लागे. मग त्या स्पर्धेचा अंत हा दुसरा कसा खालच्या बाजूला होता, मी वरच्या बाजूला जाऊन पाण्याचे रौद्ररुप पाहून आलो या बोलण्याने होत असे.
पाऊस पडला की वडिधार्‍यांच्या म्हणजे आजोबा, बाबा, काका यांच्या मनात मळ्यात कसा आणि किती पाऊस झाला हे पाहायला जाणे औत्सुक्याचं असे. तसे घर ते मळा हे अंतर ३ – ४ किमीच आहे. पण कधीकधी पाऊस गावात पडायचा तर मळ्यात नाही किंवा त्या उलट. त्यामुळे पाऊस उघडला की पहिली मळ्यात चक्कर मारून येणे हे त्यांचे ठरलेले असे.
त्याकाळी छत्री, रेनकोट वगैरे गोष्टी चैनीच्या प्रकारात मोडायच्या. त्यामुळे तेव्हा उपलब्ध गोष्ट म्हणजे पोत्याची खोळ. बारदानाच्या पोत्याची खोळ डोक्यावर घेऊन बाहेर पडणारीच माणसं जास्त दिसत. छत्री घेऊन फिरणारे त्या मानाने कमी असत. खोळींमधे पण जरा उच्च दर्जाचे प्रकार असत. तेव्हा प्लास्टिक आतासारखे मुबलक उपलब्ध नसे. पण काही जणांकडे काही प्लास्टिकची पोती जी त्याकाळी सिमेंट वा तत्सम गोष्टींना वापरत, तशी पोती असत. त्याची खोळ म्हणजे एकदम वॉटरप्रूफ असं असायचं. पोत्याच्या खोळींमधे जास्त पाऊस झाला तर डोके ओले होत असे. ती गोष्ट या प्लास्टिकच्या पोत्यापासून बनवलेल्या खोळीमधे नसे.
कालांतराने लोक पुर्ण प्लास्टिकच्या खोळी करुन वापरु लागले. रेनकोट हे चैन सदरातून जाऊन आवश्यक कॅटेगरीत मोडले जाऊ लागले. लोक आता सर्रास रेनकोट, छत्री वापरतात. गाव पण आता बदलला. हल्लीच्या पावसात गावात जाणे शक्य होतंच असं नाही.
जगण्यासाठी आणि हाता तोंडाच्या लढाईच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाहेर पडलेल्या माझ्या सारख्या अनेकांच्या मनात गावच्या पावसात भिजण्याची, त्या छोट्या छोट्या होड्या करण्याची, ती खोळ पांघरून पाण्याच्या ओघळांतून चालत जाण्याची इच्छा असेल. पण धावत्या आयुष्यात आणि त्या धावत्या वेगात प्रत्येकाला हे शक्य होईलच असे नाही. ज्याला हे शक्य होईल तो आत्ताच्या काळातील सर्वात सुखी माणुस. आमच्या आळीतील पिंपळाच्या पारामागील नृसिंह महाराज ज्याची त्याची इच्छा पुरी करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
– अभिजीत इनामदार
Image by Jiří Rotrekl from Pixabay 
Abhijit Inamdar

Abhijit Inamdar

लेखक परिचय : नाव- अभिजित अशोक इनामदार. सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी इंजिनिअरिंग केले असून एमबीए इंटरनॅशनल मार्केटिंग मध्ये केले आहे. नोकरीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरून झाल्यानंतर सध्या पुणे येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा आहे. काही नाट्यप्रयोग तर काही म्युझिकल शोज चे अँकरिंग केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!