रंगारी

 
 
       आज सक्काळी सक्काळी दुर्गाक्का  रंगार गल्लीत आली होती .  बाहेर तसं उजाडलं होतं …पाबल्याच्या कोंबडयाने बांग पण दिली होती ,  पण तिच्या पत्र्याच्या  शेड मध्ये मात्र अजून अंधारच होता .  दुर्गाक्काला   दोराबजी  कडच्या चाळीस पडद्याना आज रंगवून द्यायचं होतं .  तिचा लेक सुरज आणि कांता मागनं उशिरा येणार होते . सुरज ला एका कंपनीचं  इंटरव्ह्यू चं पत्र आलं होतं आणि कसले हरखले  होते नवरा बायको .  दुपारून इंटरव्ह्यू ला जायचं होतं त्याला .
मुलाने नोकरी करायला ना नव्हती आक्काची , 
 पण आता ही मोठी  ‘आर्डर’ पूर्ण करायची तर मुलगा सुनेशिवाय शक्य नव्हतं आक्काला .  एकदा का पडदा पिंपात टाकला की आक्काच्यानं काही तो उचलल्या जात नसे .  पाण्याने भिजून जड झालेल्या त्या कपड्याला पिंपातून बाहेर काढणे आताशा जमत नसे तिला .  एकेकाळी  दहा दहा पिंपं उपसणारी आक्का आपल्या ह्या व्यवसायाशी प्रामाणिक रहात  आपल्या फाटक्या उसवलेल्या नशीबाशी झुंजत होती . तसं म्हणायला दोन एकर शेत होतं तिचं , पण अजिबात उपजाऊ नव्हती ती जमीन . खरात काका वहात असत तिचं शेत , आणि बदल्यात पोतं भर ज्वारी आणि गहू मिळत अक्काला . त्यामुळे हे रंगारगल्लीचं कामच अक्कासाठी जगण्याची किल्ली होती .
रंगार गल्लीचे आताशा दोन भाग झाले होते . खालच्या अंगाला बडे शेठ लोकं होते , त्यांच्या कडे मोठाल्या मशीन होत्या , पाण्याचे हौद , त्यावर पंप आणि कपडा वाळवण्यासाठी  ड्रायर पण होते .
त्यांचं काम पण मोठं होतं . मोठमोठ्या मिल चं काम त्यांच्याकडे जाई . 
वरच्या गल्लीत अनेक छोटे मोठे रंगारी होते . ओढण्या , शर्ट , फारफार तर पडदे चादरी रंगवण्याचं काम इकडे वरच्या गल्लीत येई . 
अक्काने कोनाड्यातील कृष्णाच्या मूर्तीला नमस्कार केला . एक झेंडूचं फुल वाहिलं , उदबत्तीचा एक तुकडा पेटवला , आणि कामाला सुरुवात केली . अक्काला वाटायचं , हा सावळ्या सुध्दा एक रंगारीच तर आहे . आपल्या कुंचल्याच्या एक फटकाऱ्याने लोकांना रंकाचा राव बनवतो . आपल्याला पण तर पोटाला पुरेल इतकं दिलंय की ह्या रंगाऱ्याने . त्याचं काम त्याने केलयं …आपलं आपण प्रामाणिक पणे करावं झालं .
” काय दुर्गाक्का , एकटीच का ? पोरगा सून कुठाय ?”  किशन शेठ ने जाताजाता प्रश्न केला .
” त्याचा इंटर व्ह्यू का काय ते हाय आज .येतीलच आता दोघं .  हे काम उरकून उशीरानं तिकडं जाईल तो .” मुलाच्या दिशेने नजर लावून अक्का बोलली .
” तो कसला येतोय आता ? हे तुझं पडद्याचं काम मला देऊन टाक ग दुर्गाक्का . एकटीचं काम नाही ते ! उगाच ऑर्डर जाईल हातून ! काय म्हणतेस?”  किशन सेठ काही चुकीचं बोलला नव्हता , पण त्याचं हे बोलणं जिव्हारी लागलं तिच्या .  गोड बोलून तेव्हढ्यापुरतं तिनं टाळलं सेठ ला . अंगात उसनं अवसान आणून तिने सगळे पडदे गोळा केले . पिंपात पाणी ओतून नेहमीच्या मापाने  लाल आणि  पिवळा रंग दोन पिंपात ओतला . खालून भट्टी पेटवली . तोपर्यंत बाहेर उजाडलं होतं . सूर्य बाहेर येऊन आपली ताकद दाखवायला लागला होता . सूर्याच्या पिवळसर प्रकाशात ती भट्टी आणखीनच उजळली होती . सूरज आणि त्याच्या बायकोची वाट बघत 
रटरटत्या रंगात पडदे बुडवून तिने काठीने दाबून धरले . दहा मिनिटं ढवळत ठेवल्यावर आता पिंपातून ते बाहेर काढायचे म्हणजे अक्काचा जीव गोळा झाला .  अक्काचा इतक्या वर्षांचा अनुभव इथे कामी आला. अक्काने सरळ भट्टी विझवून पिंप मोरीत अडवा केला . थोडासा हात भाजला , थोडा रंग वाया गेला , पण वजन पेलण्या पेक्षा हे सोयीचं होतं . 
एकेक करत सगळे पडदे तिने पसरवून  मोकळ्या जागेत वाळत घातले . घामाघूम झालेल्या अक्काने  समाधानाचा श्वास घेत डबा उघडला . डब्यात भाकरी भाजी आणली होती तिने .
सूर्य डोक्यावरून गेला तरी सुरज आणि सुनबाई आलेच नाहीत . 
तेली आळीतला बबन हातात एक ओढणी सारखं काहीतरी घेऊन आला .
“अक्का , ही ओढणी रंगवून देशील का ? ” 
“थकलेल्या अक्काने ओढणी हातात घेतली , आणि पलीकडच्या घंगाळात टाकली .
अक्का कडे बघून काय ते समजून म्हणाला , ” थकलीस न माय ? आता हे काम बंद कर आक्के ! सुरज दादा आणि कांता वहिनी तर गेले मुंबई ला . ते आता नाही येणार न वापस? .” 
चमकून अक्का म्हणाली , ” मुंबईला गेले ? कधी ? पण त्याचा तर इथच इंटरवू होता ! मला न सांगता  कसा गेला तो ? वापस यायचं काही बोलला का ?”
” कायमचा गेला न ग , सोबत भांडी कुंडी पण होती की ! तुला कसं नाही माहीत? “
    काहीसं आठवून अक्का ताडकन उठली . भांडी नेली ? म्हणजे ?.. “चल बाबन्या , तुझ्या सायकल वर घरला घेऊन चल मला . चल लवकर !”  वाळत घातलेल्या पडद्या कडे बघ असं शेजारच्या  शांती ला सांगून आक्का सायकलवर बसली .
      खोली पाशी आल्यावर  तिनं बघितलं , कुलूप कडीत फक्त अडकवलं होतं . म्हणजे घर तसं च टाकून गेले होते दोघं . कळशी , बादली , परात , आणि काही भांडी गायब होती . तांदूळ आणि पीठंही नेली होती दोघांनी .
धपापत्या उराने अक्का ने कोनाड्यातील मोठ्या डब्या मागं ठेवलेला अलमीन चा डबा काढला . डबा रिकामा होता .  जमवलेले चार पैसे घेऊन पळाले होते दोघं . अक्का धपकन खाली बसली . फळीवर असलेल्या देवाच्या तसबीरीत एक बाळकृष्णाची चांदीची मूर्ती होती …तिच्या संसारातला एकमेव चांदीचा देव… तोही जागेवर नव्हता . विश्वाचा रंगारी सुद्धा धोका खातो , मग  आपली काय मामलात असं वाटलं तिला .
पैसे आणि मूर्ती गेल्याचा धक्का नव्हता  बसला अक्काला …दुःख होतं ते आपल्याच पोराने केलेल्या विश्वासघाताचं . मुलाने रंगारी काम करावं असा आग्रह कधीच नव्हता धरला आक्काने …उलट त्याला इतर कामाला प्रोत्साहन देत होती ती . कधी भांडण किंवा फार मोठा वादही झाला नव्हता ,   मग पोरानं हे असं करावं ह्याचं खूप वाईट वाटत होतं तिला . फक्त ही दोराबजी कडची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी आपली मदत करावी इतकंच तिने मुलाला बोलून दाखवलं होतं . 
जास्त सरळ वागणं देखील चांगलं नाही , त्यामुळे कधी कधी माणसं वाकड्यात जातात हेच खरं ..खैर …जे होईल ते बघू म्हणत निग्रहाने उठून पुन्हा पायी अंतर कापत ती रंगार गल्लीत पोहीचली . सुरेख पिवळ्या रंगांत रंगून पडदे जणू तिचीच वाट बघत होते . शांती बिचारी राखण करत बसून होती तिथेच . शांत मनाने तिने वाळलेले पडदे गोळा केले . केशू परिटाची बायको ठरल्याप्रमाणे आली , तेव्हा तिच्या टेम्पोत ते सगळे पडदे कडक इस्त्री करण्यासाठी पाठवून अक्का घरी आली . 
         माशाचं कालवण आणि भाकरी खाऊन अक्का बराच वेळ आढयाकडे बघत पडून होती .  शेजारच्या वत्सला ची हाक आली , तशी लगबगीने उठून अक्का तिच्याकडे गेली .  अख्ख्या आळी मध्ये फक्त चार पाच लोकांकडेच टेलिफोन होता . असं बोलावणं आलं म्हणजे फोन असणार हे समजायचं . 
“अक्का बाई , दोराबजी साहेबांना तुझे पडदे खूपच आवडले ग !  उद्या तुला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलंय  त्यांनी .” दोराबजींच्या ऑफिस मधून फोन आला , तसं अक्काला आभाळ ठेंगणं झालं .
तिने कुणाच्याही मदतीशिवाय हे काम केलं होतं . इतकी मोठी ऑर्डर मिळाली आणि नेमका त्याच वेळेला सुरज निघून गेला होता . बोलून दाखवावं अशी माणसं आजूबाजूला नसतील तर आपलं यश 
देखील ‘यश’ वाटत नाही . तसंच झालं होतं आक्काचं . 
दुसऱ्या दिवशी त्यातल्या त्यात बरं लुगडं नेसून आक्का दोराबाजींच्या ऑफिस मध्ये गेली . त्यांचे मॅनेजर शंकरलाल तिला भेटले . 
” आक्काबाई , तुमचं काम आवडलं साहेबांना . त्यांनी मुंबईत नवीन हॉटेल सुरू केलंय .
त्या नव्या हॉटेल साठी पडदे रंगवायचं पूर्ण काम तुम्हाला देऊ शकतो आक्का . पण तुमच्या कडे किती माणसं आहेत , किती मशिन्स आहेत ते सांगा . पाचशे पडदे , आणि गाद्या च्या अंगच्या चादरी रंगवून लागतील ..बोला इतकं मोठं काम झेपेल ? पैसे तुम्ही सांगाल तसे देऊ .”
आक्का च्या डोळ्यात पाणी आलं . गेले वीस वर्षे  आपण ज्या कामाची आस लावून बसली होतो , ते काम मिळालंय ..पण  नेमकं आज ….
चट्कन भानावर येत आक्का म्हणाली , ” जरूर झेपेल ! का नाही ? माझ्या हाताखाली माणसं आहेत , जागा आहे ..बस ऑर्डर पक्की करा तुम्ही .”  हातात ऍडव्हान्स रकमेचा चेक घेऊन अक्का घरी आली . कितीतरी काळानंतर बँकेत पैसे जमा होणार होते . सातवी पर्यंत शिकलेली असल्याने  बँकेचा व्यवहार जमायचा अक्काला . 
काही महिने लोटले . कांता आणि सुरज ची काहिच खबर नव्हती . साधा फोन करून आईला कळवावं देखील वाटलं नाही मुलाला ?  आई जिवंत आहे का मेली हे देखील बघितलं नाही त्याने ह्या विचाराने आक्का मनाशीच हसे . 
 
          दीड एक वर्षात परिस्थितीपुढे मान तुकवून सुरज आणि कांता रंगार गल्लीत वापस आले . मिळालेली नोकरी अप्रामाणिक पणाने गमावल्या नंतर सुरज ला कुठेच नोकरी नाही मिळाली . अत्यंत हाल होऊ लागले तशी आपल्या आईची आठवण आली त्यांना . पा आता 
आक्काचे  ना पूर्वीचे घर तिथे होते , ना रंगार गल्लीतील पत्र्याची टपरी तिथे होती . 
        आपल्या  छोट्याश्या वातानुकूलित ऑफिस मध्ये अक्का निवांत हिशोब करत बसली होती . बबन आणि शांती तिचे स्वीय सहकारी होते . स्वतःचं खोपटं आणि शेत जमीन दोराबाजीलाच विकून अक्काने आपलं स्वप्न पूर्ण केलं होतं . आता आक्काकडेही मोठी जागा , मोठ्या मशिन्स होत्या . आजूबाजूच्या हॉटेल्स , कंपन्यांची कामं आक्काला मिळू लागली होती .
        बबन ने कांता सुरज आल्याची खबर दिली . दोघांना ह्याच्या अवस्थेत बघून आतून  हलली अक्का . अत्यंत दरिद्री अवस्थेत आपल्या चरणाशी लिन झालेल्या मुलाकडे बघून आक्काचं आईचं मन कळवळलं . पण लगेच तिच्यातील यशस्वी व्यावसायिक जागा झाला .
” इथे मागच्या खोलीत बिऱ्हाड थाटायचं , आणि माझ्या कारखान्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी चार काम करायचं . बबन , ह्याला आठशे रुपये ऍडव्हान्स दे . थोडंफार सामान आणतील . आणि हो , सुरज ,  माझं सगळं चोरून नेलेलं समान तर तुम्ही बिकून खाल्लं असणार ..पण माझ्या रंगाऱ्याची म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती मला वापस हवी . त्यासाठी थोडे थोडे पैसे दर महिन्याला गाठीला टाकत जा , काही घाई नाही .”
अविश्वासाने आपल्या आईकडे बघत सुरज कांता मान खालीघालून बाहेर पडले . अक्काने तिच्या
ऑफिस मधील संगमरवरी कृष्णाच्या मूर्तीला , म्हणजे आपल्या रंगाऱ्याला भरल्या डोळ्याने नमस्कार केला .
© अपर्णा देशपांडे
 
Image by DWilliam from Pixabay 
 
           
 

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

17 thoughts on “रंगारी

    • August 6, 2021 at 8:24 am
      Permalink

      रंगारी कथा खूपच आवडली.

      Reply
    • August 5, 2021 at 7:35 am
      Permalink

      सुरेख कथा!👍👍👌👌 फार आवडली

      Reply
      • August 17, 2021 at 5:39 pm
        Permalink

        धन्यवाद

        Reply
    • August 17, 2021 at 5:40 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • August 5, 2021 at 5:46 pm
    Permalink

    Khup chhan ahe Kathaa

    Reply
    • August 17, 2021 at 5:40 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
    • August 17, 2021 at 5:42 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply
  • August 6, 2021 at 11:07 am
    Permalink

    फारच छान

    Reply
    • August 17, 2021 at 5:41 pm
      Permalink

      धन्यवाद

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!