अनवट ……

“मम्मा, तू आता या बालकाला कायमची सोडून जाणार …….”

जरा फिल्मी होत ईशान बोलला, अन मनिषाने डोळे वटारले,

“काय रे गधड्या , काय बोलतोयस …”

“काही नाही ग काल तुझ्या त्या बाबू पाटीलचे मेसेज वाचत होतो…… हल्ली तुझा बाबू बदललाय ना.”

अजूनही फिल्मी टोन ईशान सोडत नव्हता.

मुलाने तिचे मेसेज वाचण्याची ही पहिली वेळ नव्हती. पण कुणाला तरी बाबू शोना असं मेसेज मध्ये लिहिण्याचं हे अघटित, तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलं होतं. आणि नेमके ‘ते’ मेसेज डिलीट करायचे राहिले. तिला लाजल्या सारखं झालं. उगाच रागावल्यासारखं करत तिने आपला मोबाईल उचलला अन ईशान समोर, कॉफीचा कप आपटला.

खरंच हे सगळं सोपं नव्हतं.

लवकर लग्न करून, संसाराला लागलेली मनीषा, मूल अजून पाळण्यात असतानाच, त्या बेवड्या विकृत माणसापासून वेगळी झाली होती.

चाळीशीत येता येता, थोडं वारं लागलं अन जमीन एकच इंच काय सूटली, तर समोर, अठरा वर्षांचा मुलगा तिची मेसेजेस वरून फिरकी घेत होता.

“ए मम्मी, सांग ना, कोण हा बाबू ?……. सांग ना थोडंतरी, ……. बघ तू फ्रेंड आहेस ना माझी.”

मुलगा आता लाडात येऊन तिच्या दंडाला चिकटला होता.

बाबू कसला? चांगलं रवी पाटील नाव आहे त्याचं.

मागच्या दिल्ली कॉन्फरन्स मध्ये भेट झाली. त्या मॅनेजमेंट कॉन्फरन्स मध्ये नेमकं त्याच्यासोबत टेबल शेअर करावं लागलं. अन मैत्र जुळलं.

जुळणारच, ……. स्वभावच होता तसा त्याचा. अगदी त्या गोल टेबलशी बसता बसता त्याने दोघांमधला फ्लॉवर पॉट बाजूला सरकवून ठेवला. मनिषाच्या शिस्तबद्ध स्वभावाला ते कृत्य जरा आगाऊपणाचं वाटलं पण नंतर तिला तेच आवडू लागावं इतपत तरी त्याचा स्वभाव गोड होताच. हळूहळू मैत्री वाढत गेली. अगदी दुसऱ्याच दिवशी, त्याने कॉफी साठी विचारलं.

का कुणास ठाऊक, पण एरव्ही तिच्या स्टाफला रुड वाटणारी ती, त्याला नाही म्हणू शकली नाही.

बोलतानाचा त्याचा मोकळेपणा, तिला मोकळं करू लागला. हॉटेल रूममध्ये आल्यावरही, रिकाम्या वेळात, सोळाव्यात असल्यासारखी ती त्याचे मेसेज शोधू लागली. नवीन मेसेज नाही दिसला तर खट्टू होऊ लागली.

एरव्ही, आई बाबा या दोन्ही जबाबदाऱ्या उचलताना, ती बाबाच अधिक झाली होती. स्त्रीत्व विसरून गेली होती. लाजणं वगैरे खूप दूर राहिलं होतं. त्या कॉन्फरन्सच्या चार दिवसात, मात्र गालावरची खळी तिची तिलाच, आरशासमोर खेचून आणत होती. हे स्वतःमध्ये घडणारे बदल, तिच्या नकळत तिला हवेहवेसे वाटत होते. अन दुसरीकडे, रवी या माणसाविषयी कुतूहल, थोडं आपलेपण, आणि त्या सोबत येणारा सावध पवित्रा असं सगळं संमिश्रपणे ती अनुभवत होती. त्याच्यासोबत गप्पांच्या तासनतास मैफिली रंगवताना, त्याला पारखत होती. यातलं काहीही सत्यात उतरण्यासारखं नाही, हे तिलाही जाणवत होतं. त्याचं स्वतःच चौकोनी कुटुंब होतं, सुखी होतं. तिच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या होत्या.

पण …..

पण त्या कॉन्फरन्सच्या दिवसात, का कुणास ठाऊक, सगळं विसरायला झालं होतं.

आणि या सगळ्या पॉजिटीव्ह वातावरणात, रवी कधी पॉजिटीव्ह झाला, हे कुणालाच कळलं नाही. त्याचं पॉजिटीव्ह होणं म्हणजे तिची टेस्ट पण पॉजिटीव्ह येणार हे जवळजवळ निश्चित झालं.

आणि दिल्लीमधला मुक्काम वाढणार हेही निश्चित झालं. त्या पॉजिटीव्ह होण्याचं टेन्शन येण्याऐवजी तिला गंमतच जास्त वाटत होती.

कॉन्फरन्समध्ये आणखी पाच सहाजण पॉजिटीव्ह आले, आणि कॉन्फरन्स बंद झाली. आयोजनकर्त्यांनीच हॉटेलमध्येच, आयसोलेशनची सोय केली. डॉक्टर्स व्हिजिट करत होते. मेडिसिन देत होते. ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू झाली.

अन पुन्हा एकदा शेजारीच रूम्स आल्या. दोघेही असिम्पटोमॅटिक असल्याने, तिथेही गप्पा सत्र सुरू झाली. मागच्या बाल्कनीतून कॉफी अन बरंच काही सुरू झालं. आपापल्या बाल्कनीत बसून, कधी नजरेतून, कधी शब्दातून, संवाद सुरू झाला. हे छान होतं. आपापल्या मर्यादेत राहून, अमर्याद मैत्री करण्याचं तंत्र दोघांनाही आवडलं. त्या बाल्कन्या जणू त्यांच्या संसाराच्या आखीव मर्यादांच्या द्योतक होत्या.

इस लाईन को क्रॉस करना मना है, याची जाणीवही करून देत होत्या. आणि एकमेकांना खेटून असल्यामुळं, रवी आणि मनीषाला मानसिक रित्या जवळही आणत होत्या.

पाहता पाहता चौदा दिवसांचा, आयसोलेशन पिरियड संपला. दोघेही मनातून खट्टू झाले. पण तसं न दाखवता, बॅगा भरू लागले.

तो कोल्हापूरला जाणार होता…… ती पुण्याला.

फोनवर बोलणं होणार होतच.

पण भेट ? …… माहीत नाही , ….. कधी ….. कुठे….

………………………………………..

“रवी मला तुझ्याशी बोलायचंय.”

“बोल ना मग…..”

पुण्यापर्यंत एकच फ्लाईट, मध्ये एक सीट रिकामी सोडून पलीकडे रवी बसलेला.

“हे सगळं पुढे कंटीन्यू होईल वाटत नाही……”

“म्हणजे ?”

“उद्यापासून मी बिझी होईन, तू बिझी होशील…… तुझ्या करिअरमध्ये, तुझ्या संसारात…… मी साधा मेसेजही करू शकणार नाही, आणि तुही.”

“मैत्रीची कंटीन्यूटी ही फक्त मानसिक स्टेट आहे. ती मेसेज किंवा कॉल्सनी डिफाईन होत नाही….. असं मला वाटतं.”

“म्हणजे ?”

“हे बघ मनीषा, आपण कॉन्टॅक्ट मध्ये असू किंवा नसू देखील. पण जेव्हा जिथे जसे भेटू, आज ज्या पातळीवर आपण निघतोय, त्याच पातळीवर भेटू. एकमेकांसाठी आपण तसेच असू……. कॉल्स होतील किंवा न होतील, मैत्र कायम राहील.”

त्याच्या या अशा क्लिष्ट गोष्टी , सहज सोप्या करून टाकण्याच्या सवयीमुळेच तर ती त्याच्याकडे मनापासून ओढली गेली होती.

तेव्हापासून खरंच मेसेजेस कमी झाले,…… कॉल्सदेखील. दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. तरीदेखील, …..

तरीदेखील, तो दूर गेल्याची जाणीव, तिला झालीच नाही. अन ती दूर गेलीच नाही हीच जाणीव, रवीसोबत राहिली. जेव्हा कधी कॉल होई, दोघांचा बोलण्यातला उत्साह जराही कमी नव्हता. एकमेकांविषयी तक्रार नव्हती. ओढ कायम होती.

……………….

आणि त्या आयसोलेशन काळातले, ते ‘बाबू……. शोना’ असे मेसेज मात्र, डिलीट करायचे राहून गेले. त्यावरूनच आज मुलगा तिला चिडवत होता.

तिच्या चेहऱ्यावरचे, लाजणे आणि रागावण्याचे संमिश्र भाव पाहून, हसत होता.

शेवटी मान खाली घालून, तिने उत्तर दिलं….

“तुझी मम्मा, आयुष्यात कधीतरी, जमीन सोडून एखाद इंच हवेत जाऊ शकते ना …….. तुझी मम्मा सुद्धा शेवटी माणूसच आहे ना ?…….. आणि काळजी करू नकोस, ती सध्या जमिनीवरच आहे, तुला सोडून कुठंही जाणार नाही.”

तिचं हे माणुसकीचं अपील, अठरा वर्षाच्या लेकराला पटण्यासारखं होतं. त्याने तिचा हात हातात घेतला.

“माहीत आहे ग मम्मा, तु मला सोडून जाणार नाहीस, याची खात्री आहे मला. मी फक्त जरा फिरकी घेत होतो.”

इतपत समजुतदार मुलगा घडवल्याबद्दल, तिनेच तिची पाठ मनोमन थोपटली, अन ईशानला कुशीत घेतलं. सगळं मळभ कसं स्वच्छ झालं होतं.

इतक्यात, दारावरची बेल वाजली. ईशानने दार उघडलं. सोसायटीचे उत्साही सेक्रेटरी, जोशीकाका होते.

“नमस्कार, काही विशेष नाही, सहजच बेल वाजवली, …… म्हटलं नवीन शेजारी आलेत, खबर द्यावी तुम्हाला……  तुमच्या शेजारचा दुर्व्यांचा फ्लॅट विकला गेला……. कुणीतरी, कोल्हापूरचे रवी पाटील आहेत म्हणे, नवीन मालक……”

एवढं पुटपुटत, जोशी काका निघून गेले, अन ईशानने खट्याळ स्माईलसह, आश्चर्याने आ वासून बसलेल्या मम्मा कडे मोर्चा वळवला.

©बीआरपवार

Image by Free-Photos from Pixabay 
B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

2 thoughts on “अनवट ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!