एक ओळख..अशीही…

साधारण दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट…

तेव्हा मी मुलुंडला कॉलेजमध्ये असल्याने रोज डोंबिवली ते मुलुंड प्रवास ठरलेला…

माघी गणेशोत्सव, शिमगा अशा सणांना आई बाबा गावाला जायचे…

मग मी माझा डोंबिवलीतला संध्याकाळचा क्लास आटोपून रात्री साडे आठ-नऊच्या सुमारास मुलुंडला जायचे…

मुलुंडला आजीकडे राहायचे…

दुसऱ्या दिवशी सकाळी आजीकडून कॉलेजमध्ये जायला बरं पडायचं…

मी जेव्हा रात्रीचा ट्रेन मधून प्रवास करायचे तेव्हा डाऊनला म्हणजे डोंबिवलीतुन मुलुंडला जायला लेडीज डब्यात अजिबात गर्दी नसायची…

एकदा मी डोंबिवलीतून ट्रेनमध्ये चढले तेव्हा अवघ्या दहा बारा बायका होत्या डब्यात…

त्यातल्या पाच-सहा पुढे मुंब्र्याला उतरल्या…

आणि तीन-चार तृतीयपंथी डब्यात चढले…

मला भितीच वाटायला लागली…

त्यातली एक तृतीयपंथी माझ्याकडे बघून हसली…

मी अजूनच घाबरले…

मी आपला बॅगेतून मोबाईल काढत त्यावर टाईमपास करत बसले…

तिची आणि माझी परत नजरानजर होऊ नये म्हणून…

तितक्यात ती सिटवर माझ्या बाजूला येऊन बसली…

माझी पाचावर धारण बसली…

बेटी, पेहेचाना नही क्या?

मी नकारार्थी मान हलवली…

अरे मैने तो तुमको चार पाच बार देखा है, तुम्हारी मम्मी भी मुझको पेहेचानती है…

लहानपणी आईने सांगितलेलं असतं ना की बाहेर कोणा अनोळखी माणसाशी बोलायचं नाही, त्याची आठवण झाली मला…

ही तर तृतीयपंथी…

मी घाबरत विचारलं..आप हमारे यहा आते हो?

आती हूं ना बेटी…

मला आठवत नाही, मी म्हणाले…

नाम क्या तेरा? तिने विचारलं…

मी सांगितलं माझं नाव अश्विनी…

आणि तुमचं? मी विचारलं…

त्यावर ती तोंडाने ‘शैला’ म्हणाली पण हाताने आणि मानेने नाही म्हणाली…

(म्हणजे ते तीचं खोटं नाव होतं)

तो हात मी अजूनही विसरलेले नाही…

पुढे कळवा स्टेशन आलं आणि ती उतरली…

तीने उतरताना मला विचारलं..किधर? मी म्हटलं, मुलुंड…

एका दुसऱ्या तृतीयपंथी कडे बोट दाखवत म्हणाली, वो कमिनी है..भांडुप तक, उस्के साथ बैठ…

मी ते निमूटपणे ऐकलं…

दुसऱ्या दिवशी त्याच ट्रेनला परत आमची गाठभेट झाली…

तीने मला विचारलं, तू कॉलेज जाती है क्या?

मी हो म्हटलं…

त्यावर ती म्हणाली, हम तो बस जी रहे है…हमारी कोई इज्जत ही नही है, समाज मे…

हे ऐकून मी शांतच झाले…

त्यानंतर बरेच दिवसाने ती आमच्या घरी आली…

आईने नेहमीप्रमाणे तीला पैसे दिले…

तेव्हा मी घरात होते…

तीने मला विचारले, बेटी, पेहेचानाना ना?

मी हो म्हटलं…

तीला खूप आनंद झाला…

नंतर ती जेव्हा जेव्हा घरी येई, तेव्हा तेव्हा माझी विचारपूस करत असे…

अगदी व्यवस्थित ओळख झाली आमची…

एकदा मी डोंबिवलीला फडके रोडवर मित्र मैत्रिणींबरोबर उभी होते तेव्हा तिकडेही ती मला भेटली..हसली माझ्याशी..मी तीला पैसे दिले…

माझे मित्र मैत्रिणी हे बघून अवाक् झाले…

तुझ्या ‘ही’ ओळखीची?

मी हो म्हटलं…

नंतर माझं लग्न झालं, ती लग्नाच्या आधल्या दिवशीही घरी आली होती…

तेव्हा तीला साडी पैसे असं दिलं आईने…

ती खूप खुश झाली..

सुखी रहो हमेशा..आशीर्वाद दिला…

नंतर आमचा संपर्क तुटला…

ट्रेनचा प्रवास थांबला…

पण ती फुलपाखरासारखी माझ्या मनात माणुसकीचा रंग भरून गेली………….

Image by cm_dasilva from Pixabay 

© Ashwini R. Athavale

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

One thought on “एक ओळख..अशीही…

  • October 8, 2021 at 2:51 pm
    Permalink

    KHUP CHAN, TE PAN MANUS AHET TYANAHI SAMAJAT ADARACH STHAN MILAL PHAIJE

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!