रक्षाबंधन…

कॉर्पोरेट मध्ये कसलं आलंय रक्षाबंधन आणि कसली आलीये सुट्टी…

दरवर्षी राहुल रात्रीच येणार मीराकडे राखी बांधायला…

ते ही रात्री दहा वाजता…

अर्थातच बॉस सोडेल तेव्हा…

दिवसभरात मीरा बाकीच्या बहिणीच्या भावांना राखी बांधण्यासाठी आलेले बघायची…

जीव कासावीस व्हायचा तिचा…

पण राहुल मात्र रात्री दहा वाजता येणार हे ठरलेलं…

आला की बांध गं पटकन राखी…

आणि जेवायला वाढ…

घरी जायचंय लवकर…

उद्या परत सकाळी लवकर उठायचंय…

अरे हो, पण दोन शब्द बोलशील की नाही…

नको गं..जेवता जेवता बोलू…

तू आवर पटकन…

मला जायचंय…

मीरा हिरमुसायची…

दिवसभर वाट बघून दमलेली असायची बिचारी…

त्यात राहुलची आल्यावर घाई…

धड बोलत नाही नि धड जेवतही नाही…

ऑफिसमध्ये संध्याकाळचा काहीतरी नाष्टा झालेला असतो नि मग भूक नसते…

पण काय करणार…

नो अदर ऑप्शन…

याला कोणाचाच काही इलाज नव्हता…

राहुलची नोकरीच तशी होती…

पण यावर्षी चित्र थोडसं वेगळं होतं…

कारण…

कारण यावर्षी रक्षाबंधनाला रविवार आला होता…

मीरा भलतीच खूष होती…

तिने राहुलला चार दिवस आधीच फोन केला होता…

रक्षाबंधनाला रविवार आहे…

तू सकाळी उठलास की लवकर आवरून माझ्या घरी ये…

आपण निवांत गप्पा मारू…

तुझ्या आवडीचा सगळा स्वयंपाक करेन मी…

आग्रहाचं वाढेन तुला…

राहुलला पण बहिणीचं मन मोडता नाही आलं…

तो क्षणाचाही विलंब न करता ‘हो, येतो’ असं म्हणाला…

मीराचा उत्साह ओसंडून वाहत होता…

कधी एकदा तो दिवस येतोय असं झालं होतं…

मीराची जोरदार तयारी चालू होती…

तयारीमध्ये शनिवारचा दिवस कसा गेला समजलंच नाही…

संध्याकाळ झाली…

मीराने रात्रीचा स्वयंपाक केला…

जेवायला बसणार तेवढ्यात घराची बेल वाजली…

मेलं, हे नेहमीचंच झालंय, जेवायला बसताना हमखास कोणीतरी येणारच, सुखाने जेवून पण देत नाहीत…

मीरा तावातावाने उठली आणि दरवाजा उघडला…

अहो आश्चर्यम्…

मीराला हवा असलेला पाहूणा आला होता…

चक्क राहुल आला होता…

मीराला एक क्षण वाटलं, आज नाही ना रक्षाबंधन…

राहुलने आज कमालच केली होती…

ऑफिसमधून डायरेक्ट मीराच्या घरी…

मीराचे प्रश्न संपत नव्हते…

तू?

आत्ता?

आत्ता कसाकाय?

रक्षाबंधन उद्या आहे ना?

हो हो, अगं मीरे घरात तरी घेशील की नाही मला…

अरे हो, ये ना…

आता ऐकशील माझं?

बोल ना…

अगं नेहमी आपलं रक्षाबंधन घाईघाईने होतं ना…

म्हणून यावर्षी मी मुद्दाम तुझ्याकडे आधल्या दिवशीच राहायला आलोय…

आज रात्री आणि उद्या दिवसभर मनसोक्तपणे गप्पा मारू आपण…

तू काय देशील ते खाईन मी…

तुला हवा तेवढा आग्रह कर तू…

नेहमी तू नाराज असतेस ना, मी उशिरा येतो म्हणून…

यावर्षी मी आधल्या दिवशीच आलोय…

तुझ्याकडून मनसोक्त लाड करून घ्यायला…

हे ऐकून मीराचा आनंद गगनात मावेनासा झाला…

न जेवताच आज मीराचं पोट भरलं होतं…

आज रात्री भावा बहिणीच्या गप्पांचा पाऊस पडणार होता…

यावर्षीचे रक्षाबंधन मीरासाठी खास होते…

मेमोरेबल रक्षाबंधन…

न भूतो, कदाचित न भविष्यती……………….

Image by Shantanu Kashyap from Pixabay 

Ashwini Athavale

Ashwini Athavale

स्वतः बद्दलची माहिती- अलिबाग, रायगड येथे JSM महाविद्यालयात प्राध्यापिका. वाचन, लेखनाची आवड आहे. हलक्याफुलक्या कथा, आत्मचरित्र लिहायला आवडतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!