‘मी’ पणाची लक्तरं
” सुट्टी संपली ग !” शेवटची पोळी तव्यावर टाकत तो म्हणाला .
लॉग आऊट करून , लॅपटॉप बंद करत ती म्हणाली , ” काय काय शिकवलं न ,ह्या काळाने आपल्याला ?.”
” हं …पण प्रचंड हानी झालीये त्याचं काय.”
” अरे , त्यातूनही जमेची बाजू बघ न , कुटुंब म्हणून प्रत्येक घराने आणि नात्याने कशी कात टाकली बघ . मुलांमध्ये हवे असणारे बदल जे की पालक म्हणून आव्हानात्मक होते , ते कसे जमवून आले न? .”
त्याने सिंक मध्ये नीट रचून ठेवलेली भांडी बघून तिला भरून आलं होतं. कोरोनाने बरेच बदल घडवून आणले हे नक्की.
सकाळची प्रसन्न वेळ होती . आम्ही दोघं बागेत सफाई करत होतो , अन शेजारून छोट्या बंटी चा आवाज कानावर आला ,
” ममा बघ , बाबा नंगू !” आम्ही दचकलो .
मान्य आहे की लॉक डाऊन आहे , आपण घरातच आहोत , पण म्हणून काहीही?
इतक्यात बंटी ची ममा ओरडली ,
” वहिनी , बघा न राहुल कडे . पहा न , टकलू कसा दिसतोय.”
आमच्या ह्यांनी लगेच बघितलं , आणि म्हणाले , ” अरे ! .. हँडसम! ”
राहुलने डोक्याचा चमन गोटा केला होता . त्यानेच काय , जवळपास सगळ्यांनीच केलाय सध्या . मोगली होऊन तर नाही फिरू शकत न ? नाहीतर आजूबाजूला सगळेच हिमालयात जाऊन तपश्चर्या करून आल्या सारखे दिसतील . बाहेरून सामान घेऊन आलेला व्यक्ती आपला नवराच आहे न , ह्याची ओळख देखील अवघड होऊन बसेल . विचार करा , की एकाच कुटुंबात तरुण मुलगा , वडील आणि आजोबा असे वाढलेले दाढी मिश्या आणि डोक्यावर जंजाळ घेतलेले …..
त्यात पुन्हा वर्क फ्रॉम होम ! लॅपटॉप समोर बसून , वरती शर्ट टाय , खाली नुसतं टॉवेल गुंडाळला काय , नाहीतर अर्धी चड्डी काहीपण चालतं ..पण डोक्यावरचं झिपरं घरटं?
मामाचा फोन आला तर आमच्या लेकीने सांगून टाकलं , आई बाबांची हजामत करतेय म्हणून .
आता निदान काही महिने तरी सलून किंवा पार्लर मध्ये जायची सोय नाही . त्यामुळे समस्त पुरुष आणि महिलांनी केश कर्तनाचा ऑन लाईन कोर्स करून घ्यावा . गेल्या काही आठवड्यातील आपली फजिती आठवा . पंप बिघडला , पाणी वर चढलं नाही …
रात्रभर अंधार ? कारण काय तर फ्यूज उडाला , किंवा मामुली वायर जोडणी समस्या…
नळाची तोटी खराब झाली ? सतत पाणी वाहतय ….
एक नाही , असंख्य फुटकळ अडचणी …
घरात तीन तीन इंजिनिअर असतील , पण किरकोळ दुरुस्त्या करायच्या असतील तर ही असली कामं आपली नाहीत बाबा म्हणून प्लम्बर , इलेक्ट्रीशीयन , सुतार यांच्यावर अवलंबून रहाणारे आपण त्यांच्या विना किती अगतिक होतो . अशा वेळेला लक्षात येतं की पालक म्हणून आपल्या मुलांना जरुरी व्यवहारी ज्ञान देण्यात आपण किती तोकडे पडतोय . म्हणूनच तर मी म्हणतेय की साऱ्या कुटुंबानेच आता छोटे छोटे ‘कौशल्य विकास’ वर्ग ऑनलाईन करूनच घ्यावेत . पाश्चात्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत , पण कामगारांच्या पोटावर पाय न देता छोट्या किरकोळ दुरुस्त्या शिकून घ्यायलाच हव्यात . शिकवणी वर्गात साऱ्या कुटुंबाने एकत्र नोंदणी केल्यास त्यांना घसघशीत सूट पण दिल्या जावी .
ह्या लॉक डाऊन च्या काळात साऱ्या समाजाला आणि म्हणूनच प्रत्येक कुटुंबालाही एक वेगळीच दृष्टी मिळालीये हे नक्की . एक उत्तम फोटोग्राफर समोरील चित्र अप्रतिम पकडण्यासाठी चित्र हलवत नाही , तर आपला कॅमेरा हवा त्या कोनात फिरवून बघतो न , तसं . दृष्टी कशी बदलली , तर परवा स्वयंपाक आटोपून मी तोंडावर पाणी मारून येईपर्यंत टेबलावर जेवणाची सगळी तयारी झाली होती . मी प्रवेश केल्याबरोबर सगळ्यांनी चक्क टाळ्या वाजवल्या . कसलं भरून आलं मला . हा बदल किती आल्हाददायक आहे . समोरच्या व्यक्तीच्या श्रमाची , त्यागाची ही किती भावपूर्ण पावती आहे . हे असं एक कुटुंब प्रमुख म्हणून आपण शिकवलं होतं का ? ..तर नाही!
हे आजच्या परिस्थिती ने शिकवलंय .
आपल्यासाठी एक सशक्त ढाल बनून ह्या विषाणूशी लढणाऱ्या प्रत्येक सेवाकर्मी साठी आज आपण अशीच विनम्र भावना ठेवून आहोत . इतर राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि श्रमजीविना आपापल्या राज्यात पोचोवण्यासाठी जेव्हा खास ट्रेन्स आल्या तेव्हा पोलिसांसाहित सर्वांनी टाळ्या वाजवून आपल्या भावना व्यक्त केल्या . हे सगळं मुलं बघताएत . समाज काय किंवा कुटुंब काय दुसऱ्या व्यक्ती कडून सतत सेवा घेत रहाणे हा आपला अधिकार नाहीये , तर त्यामुळे आपण उपकृत होत आहोत ह्याची जाणीव होतेय …ही खूप मोठी बाब आहे .
श्री भारत कृष्ण यांचा एक व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झालाय .
“”द टेंथ अँपल लॉ”” सांगतांना त्यांनी ‘घटत्या उपभोग्यतेचा सिध्दान्त’ आणि ‘घटती कृतज्ञता’ खूप सुरेख मांडली आहे . म्हणजे मनुष्यजवळ उपलब्धता जशी वाढत जाते , तशी तशी त्या बद्दलची कृतज्ञतेची भावना बोथट होत जाते . हीच कृतज्ञतेची भावना कुटुंबात खोलवर आणि कायमची रुजली तर ती सगळ्या जगातील कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार मोठी पुंजी असेल . समाधानाची बाब म्हणजे सगळीकडेच कौटुंबिक पातळीवर त्या दिशेने आपसूक प्रयत्न होत आहेत . लिंग भेद विसरून घरच्या कामाची वाटणी झालीये हे मात्र मान्यच करावे लागेल .
चुकूनही कधी घरातील कामात लक्ष्य न घालणारे पुरुष अचानक ”बेस्ट शेफ”” बनून एकमेकांना चॅलेंज देताएत .
पदार्थ कसाही झाला तरी घरातील बाई अशी तोंडभरून तारीफ करतेय , की नवऱ्याचा हा उत्साह लॉक डाऊन नंतरही कायम राहिलाच पाहीजे . (बायका तशा हुशारच असतात)
आमच्याकडे तर बाबांची नियमावलीच तयार झालीये-
उगाचच उठसूट ट्रॉली मधील भांडी बाहेर काढायची नाहींत .
फुटकळ कामासाठी घेतलेले चमचे , वाट्या प्रत्येकाने तिथल्या तिथे लगेच धुवून टाकायच्या .
जेवतांना मोबाईल ला हात लावल्यास समोरील ताट काढून घेण्यात येईल .
घरात कितीही गबाळे दिसलात तरी चालेल , पण कपाटातील इस्त्री च्या कपड्यांना हात लावायचा नाही . लॉक डाऊन नंतर जड जाईल .
सगळ्यात शेवटी जो अंघोळ करेल त्याला धुतलेले कपडे वाळत घालावे लागतील .
बाहेरून आणलेल्या सामानाचे वरचे पॅकिंग सॅनिटायझर ने पुसून घ्यायचे .. ( आणि आणणाऱ्याला पण शुद्धी क्रिया करावी लागेल)
मुलांच्या अभ्यासात अडचण असेल तर तो बालेकिल्ला आईने लढवावा , त्यावेळी असेल ते काम बाबा करण्यास तयार असतील .
गाण्याचे विडिओ बनवायचे असतील तर बनवा , पण सतत ते ऐकण्याची
हद्द म्हणजे सिंक च्या नळाच्या वर एक नोटीस लावलेली आहे .
# ताटात अन्नाचा कणही रहाता कामा नये . तसे आढळल्यास पुढच्या जेवणाची भांडी त्या सदस्याला घासावी लागतील#
ह्या शिस्तीमुळे बऱ्याच असाध्य गोष्टी सहज साध्य झाल्या … जसे ..
भाजी कुठलीही असो , सगळ्यांनी ताटातील अन्न संपवणे ….
मावशी बाईंना किती खरकटं साफ करावं लागतं याची जाणीव….
आपल्या बेशिस्ती मुळे दोन दोन टोपली भांडी पडत होती ह्याची जाणीव….
आणि भांडी घासणं ही एक कला आहे ह्याचे ज्ञान ….
समस्त पतीदेवांनी आपल्या ग्रुप मध्ये फोन वर एकमेकांना भांडी घासण्याची कला आणि त्यातील बारकावे ह्यावर सल्लेही देऊन टाकले . आमच्या भांडेवाल्या मावशी बाई आल्या की आता त्यांना कमी पाण्यात भांडी स्वच्छ करण्याचं टेक्निक शिकवल्या जाणार आहे हे नक्की . मुलांनी तर न सांगताच अनेक छोट्या छोट्या कामांची जबाबदारी घेतलीय . कपडे मशीन मध्ये टाकणे , फर्निचर पुसणे , कपाटं आवरणे , कुंड्यांना पाणी देणे , कितीतरी कामं , जी करवून घेण्यासाठी मातृ वर्ग रक्ताचं पाणी करत असे तीच कामं पोरं आता मस्तं आनंदाने पार पाडतांना बघून मोठ्यांना गहिवरून येतंय .आमच्या शेजारचे भाऊजी गच्चीत फेऱ्या मारून आले , की मुलाने लगेच त्यांचे पादत्राणं फळीवर नेऊन ठेवले . हे बघून वहिनीला ला तर पोराला कुठे ठेवू असं झालं .
आमच्या घराच्या मधल्या पॅसेज मध्ये तर आम्ही कामाच्या वाटणीचं वेळापत्रकच लावलंय . त्यात चक्क मोबाईल इंटरनेट वापराच्या वेळा अधोरेखित करून स्पष्ट केल्या आहेत.
कपाटावर एक छोटी चिकट वही आणि पेन लावलाय . कुणाला अत्यावश्यक सामानातील काय हवंय ते आठवणीने त्यात लिहायचं . बाहेर पडणाऱ्या एका व्यक्तीने त्या चिठ्ठीनुसार सगळं आणायचं .
कसलं भारी!!
सगळं कुटुंब इतक्या मोठ्या काळासाठी निवांत एकत्र …मन मोकळा संवाद झाला . भविष्यातील स्वप्नांची गाठोडी मोकळी झाली …अनेक गाठी सुटल्या …अनेक उसावलेले धागे पुन्हा जोडायला उसंत मिळाली . पदोपदी अधीर होणाऱ्या मनाला संय्यमाची शिकवण मिळाली .
सक्तीने का होईना अनेक जणांची व्यसना पासून दूर रहाण्याची मानसिक तयारी झाली , जी एरवी अत्यंत कठीण बाब आहे .
*हे सगळं खूप छान आहे . त्यामुळेच
जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या ह्या वर्षीच्या जागतिक कुटुंब दिनाचं रूप आणि महत्व वेगळं आहे* .
*घर सगळ्यांचं असतं . पण बहुतांशी सगळ्या जबाबदाऱ्या घरातील स्त्रीवर टाकून सगळे मोकळे होतात . ह्या काळात मात्र घराचा रंगमंच फिरलाय* .
*तसं बघितलं तर सारी पृथ्वीच एक फिरता रंगमंच आहे , ज्यात मानव एक भूमिका निभावत असतो* .
*मग कुटुंबातील कलाकारांच्या* *भुमिकांची काही प्रमाणात*
*अदलाबदल झालीये का* ? . *त्यात दुसरी भूमिका निभावतांना कराव्या लागणाऱ्या तयारीची कल्पना आलीये का*? *आणि आली असेल तर इतरांच्या भूमिकेचा त्याने कायम आदर केला पाहिजे* .
कुटुंबातील थोरांकडून आपली संस्कृती , मूल्य आणि संस्कार पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होतात . संय्यम , परोपकार , भूतदया , सामाजिक बांधिलकी , स्वार्थत्याग ,घरातील मोठ्यांची मदत आणि दानाचं महत्व मुलं आपल्या वर्तणुकीतून , अनुकरणातून शिकतात . पण ह्या काळात मृत्यू आणि संकटाची गडद छाया ह्यांनी मुलांना सगळं लगेचच शिकवून टाकलं . चिमुकल्यानी आपल्या हातानी आपल्या पिगी बॅंक्स निधी मध्ये जमा केल्या . आजी आजोबांकडून त्यांच्या काळातील गोष्टी ऐकून वेगळ्याच जगाची सफर घडली . आजोबांनी पण आपला जपून ठेवलेला खजिना : जुनी नाणी , साखळीचं घड्याळ , जुने फोटो बाहेर काढले .
लॉक डाऊन मधील काळात कुटुंबात छोट्या मोठ्या चकमकी , ठिणग्या आणि खुमासदार कुरघोड्या पण झाल्या .
…….
” आई , तुमचा सावळा राजकुमार आताशा चक्क गोरा गोमटा दिसतोय हो !”
……
” यू ट्यूब चॅनेल सुरू करू का ग ?
“”‘बैठक , एक खेळ मैदान !”‘” असं काही?
…….
” बाबा , आता शाळेत जातांना माझ्या
वेण्या तुम्हीच घालत जा , अजिबात सुटत नाहीत.”
……
बाबांनी नवीन पदार्थ शोधून काढलाय .
“””पाण्यात तरंगणारी खिचडी!”””
……..
होणारा जावई सगळा स्वयंपाक शिकलाय ,आता काळजी नाही बाई! …
असे बारीक बारीक फटाके पण फुटले . ह्यामुळे कुटुंबातील वातावरण कसं मस्तं हलकं फुलकं झालं .
कुटुंब म्हणजे फक्त रक्ताच्याच नात्यातील लोकांचा समूह असतो का ?
किंवा त्यात नात्यातील इतर व्यक्तीच असतात का ? मग जीवाला जीव देणारे आणि संकटकाळी धावून येणारे समाजातील इतर घटक? ते पण तर विस्तारित कुटुंबाचाच भाग आहेत न ?
गृहिणी चार पदार्थ करतांना थोडं जास्त का करतात? लहान मुलं आपल्या पेक्षा शेजारी का आनंदाने जेवतात ? भिंती वरून पदार्थांची देवाण घेवाण का सुरू असते .
ज्ञानदेवांनी तर पसायदानात
“”अवघे विश्वची माझे घरं”‘ म्हटलंय .
वसुधैव कुटुम्बकम !!! ही भावना जोपासणारे आधुनिक संत आहेत न आजच्याही काळात!
श्री.रतन टाटा , बिल गेट्स , जॅक मा आणि अनेक जणांनी महामारी च्या रिलीफ फंडाच्या झोळीला असामान्य
वजन प्राप्त करून दिलं , आणि आपल्या वैश्विक कुटुंबाच्या प्रमुखाची भूमिका चोख निभावली .
एका फिरत्या रंगमंचासारख्या ह्या पृथ्वी वर आनंद चित्रपटात म्हटल्या प्रमाणे आपण एक कठपुतळी आहोत , ज्याला ‘तो’ नाचवतोय . हे समजावून घेतलं तर ‘मीच सगळं करतोय / करतेय’, ‘माझ्या मुळेच घर नीट चाललंय’ मधला ‘मी’ गळून पडेल . निकोप कुटुंबासाठी ते फार आवश्यक आहे .
अपर्णा देशपांडे
Image by Gordon Johnson from Pixabay
Latest posts by Aparna Deshpande (see all)
- आत्तु-भाग ३ (शेवटचा भाग) - June 17, 2022
- आत्तु- भाग २ - June 7, 2022
- आत्तू- भाग १ - June 3, 2022