गुरफट भाग दोन

आधीच्या भागाची लिंक- गुरफट भाग एक

आजही ती पुन्हा एकदा नव्या प्रश्नचिन्हाला लटकली होती.
सृष्टीचा अकरावा वाढदिवस होता. स्वातीने सेलिब्रेशनची सगळी आखणी केली होती. पण ऐनवेळी त्याचा मेसेज आला. त्याने त्याच्या पद्धतीने कार्यक्रम आखलाय. सहा वाजता तो येतोय.
त्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये तिचं जाणं, वादाला निमंत्रण ठरणार होतं. तिने सृष्टीची समजुत काढली.
गाडीत बसताना, सृष्टीने भरल्या डोळ्यांनी वर पाहीलं……. अन गाडीत बसली.
ही अशी फरफ़ट नेहमीचीच झाली होती, स्वाती साठी….. अन सृष्टीसाठीही. मार्ग वेगवेगळे होईपर्यंत, कदाचित हे असंच चालणार होतं. पण नंतरही सृष्टी हा दुवा दोघांमध्ये राहणार होताच……. दोघांमधला शेवटचा पुल किंवा भांडणासाठी एकत्र येण्याचा प्लॅटफॉर्म.

रात्री साडेअकराला बेल वाजली. सृष्टीला खालीच सोडून मंगेश निघून गेला होता. त्यानंतर डोळ्यातल्या आसवांनी सजत राहीला मायलेकीचा सोहळा…….

सोहळा,…….. तसा आयुष्याचाही सोहळाच झाला होता. ….. दोघांच्याही.

सोळा वर्षापूर्वीच्या त्या  रात्री तिने त्याच्या कॉम्प्युटर मधले फोटोज पाहिले अन वादळाला सुरुवात झाली. तिने नसतं पाहिलं तर बरं झालं असतं. नाईट आऊट पार्टी, दुबईमधलं कुठलं तरी, वाळवंटातलं मॉटेल. त्याच्या कंपनीची इन्फॉर्मल मीट होती. वाईन्स, कॉकटेल्स, फॉरीनर्स……. आणि फोटोमध्ये त्याला खेटून बसलेली, रशियन असिस्टंट.

फोटो पाहून, तिचा पारा चढत गेला. त्याच्या आणि असिस्टंटच्या अनैतिक संबंधापर्यंत विषय वाढत गेला. त्या रात्री भांडण करून, तो निघून गेला. कुठे गेला , कुठे राहिला, काहीच थांगपत्ता नव्हता तिला. तो त्याच्या गावी असलेल्या, आईवडिलांकडे जाऊ शकत नव्हता. लव्ह मॅरेज केलेल्यांसाठी ते संबंध कधीच तुटलेले असतात. मित्रांशी हा विषय शेअर करू शकत नव्हता….. मग गेला कुठ? तिला सुरुवातीला खूप प्रश्न पडले. पण विचार करून थकल्यावर झोप लागली.

दुसऱ्या दिवशी तो घरात नव्हता तरीही,  ती नॉर्मल होत गेली. तिच्या करिअरमध्ये , ती पुन्हा व्यस्त झाली होती. कुठल्याही मित्राला तिने फोन लावला नाही. पुढे काय घडणार, याचा विचार तिने करणं सोडून दिलं होतं. तो थेट चौथ्या दिवशी, घरी आला. त्याची परतीची फ्लाईट, रात्री होती. त्यानं बॅग भरायला घेतली. यावेळी त्याचं प्रोजेक्ट रशियामध्ये असणार होतं. पण तो काहीच बोलत नव्हता. अन त्याला काही विचारणं, तिच्या शान के खिलाफ होतं.

दरवेळी सारखी, ती त्याला एअरपोर्ट वर सोडायला गेली नाही. त्यालाही जरा सुटसुटीत वाटलं. नेहमीचा इमोशनल फॅमिली ड्रामा होणार नव्हता. एक छोटीशी बॅग घेऊन तो निघून गेला. ……. तिला तो मुंबईत जॉब करायचा, त्यावेळचा, त्याचा लोकल प्रवास आठवला. फर्स्ट क्लासच्या डब्यातही इतकी गर्दी असायची की, तिने दिलेला डबाही, त्याला नकोसा व्हायचा. अशीच लोकल पकडताना, हात सुटेल या भीतीने त्यानं, डबा फेकून दिला होता. दोन दिवस ती रडत होती. तिच्या भावनांची कदर त्याला नाही, अशी ठाम समजूत तिने करून घेतली. …….. खुप साऱ्या रुसव्या फुगव्यांनंतरचे लाडाचे दिवस, क्षणात तिच्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

ती भानावर येऊन, गॅलरीत आली तोवर, तो कधीच टॅक्सीत बसून, नजरेआड झाला होता.

………………………………………………………….

बऱ्याच दिवसांनी, तिला कळलं, त्या चार दिवसात तो जुन्नरमध्ये होता. पण कुणाकडे ते तिला समजलं नाही, अन लक्षातही आलं नाही. त्याचा कोण नातेवाईक, कोण मित्र जुन्नरमध्ये असेल, हे तिच्या गावीही नव्हतं.

“Flowers are most tender ever, when someone offers you from the past…..”

अर्पिताचं हे स्टेटस, स्वातीने लाईक केलं……. अन विचारचक्रं फिरू लागली. कारण अर्पिता, जुन्नरमध्ये सेटल होती…….. एकटी, …… on the verge of divorce…..

………………………………………….

अर्पिता या नावाशी , स्वातीने अनेक कथा जोडल्या आहेत, हे मंगेशला खूप उशिरा कळलं. ….. अशाच एका कडाक्याच्या भांडणात.
त्याला तिच्या कल्पनाशक्तीचं हसूही येत होतं, अन स्वतःचा रागही येत होता. त्याने जी आर्थिक मदत अर्पिताला केली, त्या मनी ट्रान्सफरची पोच पावती, दाखवून, अर्पिताचे प्रॉब्लेम्स स्वाती समोर मांडावे…… आणि त्या खेरीज काही नाही , हे ओरडून सांगावं …….. असं क्षणभर त्याला वाटलं देखील. पण स्वाती त्या मनस्थितीत नव्हती. तिला फक्त गुन्हेगार मंगेश दिसत होता.
………………………………………………………………………………………………………………..
दिवसेंदिवस दोघांमधला ताण वाढत होता. तिच्याही कामाचा लोड वाढत चालला होता. प्रमोशन्स वेळच्या वेळी होत होती. पुण्याचं ऑफिस आता ती हेड करत होती. मीटिंग्ज, प्रेझेंटेशन्स, ग्राफ्स यात ती अड्कत चालली होती. व्ययक्तिक आयुष्याचा ग्राफ मात्र रसातळाला चालला होता.
“मे आय कम इन मॅम ?”
“येस ……..” नजर वर न करताच ती बोलुन गेली. त्याने समोर कॉफीचा मग ठेवला अन तिने वर पाहिलं.
“स्वप्निल? …….. व्हॉट अ सरप्राइज़ ? …….” ती जवळ जवळ जाग्यावरुन उठलीच. कॉलेज मध्ये असताना, भेटायचे तसे अंगठ्याने हात मिळवत त्याची गळाभेट घेणारच होती, खरंतर………..
पण ग्लास केबिन मधली ती बॉस होती, हे क्षणार्धात तिच्या लक्षात आलं अन तिने स्वतःला आवरतं घेतलं. पण तरीही तिचा आनंद त्या केबिन मध्ये मावत नव्हता. एके काळचा तिचा जिवलग मित्र, सुख दुख शेअर करण्याची हक्काची जागा…….., अगदी मंगेशच्या चुगल्या , तक्रारी सगळं ओतण्याची ती जागा म्हणजे ………. स्वप्निल. तो तिच्या समोर उभा होता.
“आहेच ग तो मंग्या तसा ……… तु मला हो म्हणाली असतीस तर ……. तुला एकही तक्रारीला वाव दिला नसता.” मंगेशविषयी कम्प्लेंट्स ऐकल्यावरचा, स्वप्निलचा नेहमीचा पंच होता हा ……….
“ए गप रे, ………. तु उशिर केलास, त्याला मी काय करणार……” इतपत खट्याळपणा तीही करायची.
आज तोच स्वप्निल तिचा ज्युनिअर म्हणुन तिच्या समोर बसला होता.
………………………………………………………………………………………………………………..
“ म्हणजे डिवोर्स पर्यंत आलीस तर …………..” ब्ल्यु लगूनचा ग्लास खाली ठेवत तो बोलुन गेला.

ती कसनुसं हसली. “ आज नेहमीचा पंच नाही मारणार ?”

ओल्या पापण्या सताड उघड्या ठेवत, ती तिच्या डोळ्यांमधली धुंदी त्याच्या डोळ्यात ओतत होती.
सयाजी मधला, कोझी कॉर्नर, ……….. धुंद संध्याकाळ, समोर ब्ल्यु लगुनचे उष्टावलेले दोन दोन पेग ……… अन तिच्या डोळ्यांमधलं अपार दुख़ त्याला विरघळण्यासाठी पुरेसं होतं. कधी ओठांवर ओठ टेकले अन ग्लास पेक्षा त्यांचीच नशा अधिक चढत गेली, हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.

सकाळी थेट जाग आली तेव्हा नऊ वाजले होते. ती स्वप्नीलच्या बेडरूममध्ये होती. समोरचे पडदे ओढले नव्ह्ते. त्यामुळं उन्हं थेट अंगावर येत होती. डोळे चोळत ती उठली पण तिच्या अंगावरच्या वस्त्रांचा अंदाज तिला येत नव्ह्ता. ती शोधण्यासाठी ती वळली अन शेजारी विवस्त्रावस्थेत झोपलेल्या स्वप्निलला पाहुन क्षणभर दचकलीच. पुन्हा भानावर येत ,स्वतःला सावरत, कशीबशी बाथरुम मध्ये घुसली.

“हे घडायला नको होतं, ……. आपल्यात.” तिचा आवाज अजुनही घोगरा येत होता. पण स्वप्निल मात्र काहीही न बोलता, कॉफी पीत होता. तिने पुन्हा विषय छेडला.
“ आजपर्यंतची आपली शुद्ध मैत्री….” तिला बहुधा पश्चाताप होत होता.
“ पण माझं नेहमीच तुझ्यावर प्रेम होतं.” स्वप्निलने पश्चातापाची ती कोंदट शांतता भंग केली. पण स्वातीने मात्र, हे पुन्हा घडुन द्यायचं नाही, हे मनातल्या मनात पक्कं केलं होतं. (क्रमशः)
बी आर पवार

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

2 thoughts on “गुरफट भाग दोन

  • September 8, 2021 at 8:51 am
    Permalink

    Mast …Khup interesting

    Reply
  • September 8, 2021 at 4:11 pm
    Permalink

    Superb… Interesting… Next parts pls lavkar post kara nahitar link tithe… Thx

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!