गुरफट भाग तिसरा
दुसरीकडे अर्पिताशी मंगेशची जवळीक वाढत होती. तो भारतात आल्यावरही फोन कॉल्स वाढले होते. मेसेजेस चमकत होते. आणि स्वाती मात्र चक्क दुर्लक्ष करत होती. तिनं स्वप्निलचा मोह टाळला असला तरी, मंगेशला ती मुद्दाम वाव देत असल्या सारखं वाटत होतं.
नकळतपणे मंगेश मात्र अर्पिताच्या मोहात ओढला जात होता. भारतात असेल तेव्हा, मित्रांना घेउन जुन्नर कडे ट्रिप्स निघत होत्या. छोटे छोटे ट्रेक्स आखले जात होते. ग्रुप पेक्षा या दोघांच्या सोयीने ट्रेक्सच्या डेट्स ठरत होत्या. आणि अशाच एका भंडारदर्याच्या कॅम्पिंग मध्ये, तो मोहाचा क्षण आला. टेंट मध्ये दोघेच होते…….. क्षणाक्षणाला जवळिक वाढत होती……….. एकेक बंधनं सैल पडत चालली होती……………. सभ्यतेची आवरणं गळुन पडत होती………… अन इतक्यात, कधी नव्हे तो स्वाती चा फोन …………………….
मंगेशने फोन कट केला की उचलला , त्याचे त्यालाच कळले नाही. पुढचे सगळे आवाज स्वातीने, कॉल रेकॉर्ड करुन घेतले. ….. रात्रभर पुन्हा पुन्हा ऐकले……… अन अगदी सकाळीच, ब्लॅक कॉफीचे घोट घेत स्वप्नीलला फोन केला. रात्रभर ती जागीच होती. अन मनाशी काहीतरी घोळवत होती.
……………………………………………….
अन त्या नंतर स्वप्नीलची सतत सोबत, तिची गरज बनत गेली.
अगदी आज मंगेश राहत असलेल्या, टॉवर खाली ती कार पार्किंग मध्ये वाट पहात होती, तेव्हाही स्वप्निलशीच फोनवर बोलत होती.
“मुलीची वाट पाहतेय, …… हो ती येईल आता खाली…… तिला घेऊन दोन दिवस फार्म हाऊस वर जाणार आहे. तु येशील का ?”
“नाही नको, तुम्ही दोघी एन्जॉय करा …….”
“हो , नाहीतर तुझी बायको तुला खाऊन टाकेल…. नाही का ?”
“स्वाती, ….. मी काय म्हणतो, वर जाऊन स्वतः मुलीला घेऊन ये ना ……तिला तु त्या घरात गेल्यावर खूप आनंद होईल. तिच्यासाठी तरी जा .”
” नाही …” स्वाती निश्चयाने म्हणाली.” त्या घरात मी पाऊल ठेवणार नाही, असं मी वचन दिलंय, मलाही अन त्यालाही….. बघ ना एखादी वेळ किती वाईट असते ना, …… ज्या घरातली, अगदी चमचा , पळी पासूनची भांडी, टीव्ही च्या वॉलवरचा वॉलपीस, ….. डायनिंग टेबलचं डिजाईन, ….. अगदी बारीकसारीक गोष्टी, मी निवडल्या होत्या, त्याच घरात, माझं जाणं गैर ठरलंय….. चल निघते, सृष्टी आलीय खाली. बोलू रात्री निवांत…… माझ्या फार्म हाऊसच्या टेरेसवरून , चांदणं पडलेलं असेल, तेव्हा कॉल करीन…… उचल नक्की …. की बायकोला घाबरशील …… तिला एकदा भेटायचं आहेच. चल बाय.”
एवढं बोलून, ती मुलीला घेऊन निघाली सुद्धा, …… मनात खूप साऱ्या भावनांचा झिम्मा चालला होता. मंगेशला न भेटता, निघाल्याचा माज, तिच्या नाजूक हातांनी, सजवलेला घराचा एकेक कोपरा आठवत हळवं झालेलं मन, लेकीविषयीचं प्रेम, अन स्वप्निल सारखा सोबती मिळाल्याचं समाधान, आणि नुकताच त्याच्या बायकोविषयी वाटू लागलेली असूया …… असं बरंच काही. डोक्यात काहूर माजलं होतं.
पण इतकं सगळं डोक्यात असलं तरी, तिने फार्म हाऊस वर पोचेपर्यंत स्वतःचं डोकं शांत केलं. तसं करणं गरजेचं होतं. कारण तिच्या आधी फार्म हाऊसवर, काही पत्रकार मंडळी पोहोचली होती. तिची मुलाखत त्यांना हवी होती.
आज तिथेच तिच्या बेस्ट सेलर पुस्तकातले काही उतारेही ती वाचणार होती, पुस्तकाचं नाव होतं,
“ब्ल्यू लगून “……
…………. . . . . . ……. ………… ………… ……
का कुणास ठाऊक पण …… हल्ली सृष्टी देखील तिच्या मम्मी पासुन काही तरी लपवत होती. खरंतर अर्पिता, मंगेश सोबत राहु लागली होती. आणि ही शंका स्वातीला आली होतीच. पण तिला सृष्टी बाळाकडुन कन्फर्मेशन हवं होतं. त्या साठीच तर तिला फार्म हाउस वर आणलं होतं. वेळ पडलीच तर कोर्टात तिने आपल्या बाजुने कौल द्यावा अन आपल्या कडेच राहायला यावं, ही पण एक सुप्त इच्छा होतीच.
“अगं मम्मी, कोण अर्पिता आंटी ? …… तीच का ? जिच्यावरुन तुम्हा दोघात भांडणं झाली ती ? तिच्यामुळेच तु केस फाइल केलीस ना गं ?”
“ हो तीच ती …… तु खरं खरं सांग, ती तिथे तुमच्या सोबत राहायला आलीय ना ?”
“ मम्मी,…. कुणीही रहात नाही, माझ्या अन डॅडी शिवाय तिथं. ती अर्पिता आंटी कशी दिसते तेही मला माहीत नाही. मला तिचा फोटो दाखव ना. फारफार तर, स्वयंपाक करणार्या मावशी येतात. आणि कोणीही नाही. ”
“मग कशाला हवाय फोटो ? …… आठवण येतेय वाटतं तिची खुप …… हल्ली माझ्याशी पण खोटं बोलायला लागलीस तु.” एवढं बोलुन स्वाती झोपाळ्यावरुन उठली अन सरळ झोपायला गेली. तिला सृष्टीच्या खोटं बोलण्याचा राग आला होता. पण तिला अजिबात दुखवायचं नव्हतं. शक्य तितका जास्त लळा लावायचा होता. त्यामुळं तिने तिचं खोटं बोलणं, कानामागे टाकलं. पण अजूनही डोक्यातल्या गोष्टी तिचा पिच्छा करत होत्या.
पण जर आता, मंगेशशी डायवोर्स घ्यायचं पक्कं केलं आहे, तर मग कशाला हव्यात त्याच्या चौकशा ?….. असाही एक विचार मनात येत होता. ज्या माणसाला, कॉलेजपासून असलेल्या आपल्या प्रेमाचा विसर पडला. जो सहजपणे दुसऱ्या स्त्री मध्ये गुरफटत जातोय, अशा व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय , या गोष्टीचा विचार, अन चौकशा मी कशाला करू ? खरंतर निश्चयाने ज्या व्यक्तीपासून ती दूर जायचा विचार करत होती, त्या व्यक्तीचाच ती जास्त विचार करत होती. गेले कित्येक महिने, तिने मंगेशचं तोंडही पाहिलं नव्हतं. कायमची दरी तयार झाली होती. विचार करून डोक्याचा भुगा झाला होता.
आज स्वप्नील हवा होता सोबत. किमान त्याच्या खांद्यावर अश्रूंचा भार हलका केला असता. स्वप्नील खरंतर बराचसा पूर्वीच्या मंगेश सारखाच होता. त्याला तिच्या मनातलं बरोबर समजायचं. पण अजूनही त्याचा तिच्याविषयीचा निर्णय काय आहे, हे समजत नव्हतं. तिला मात्र त्याचा प्रचंड मानसिक आधार वाटत होता. पण त्याचीही स्वतःची फॅमिली होतीच की. त्यांना तो धोका देईल असं वाटत नव्हतं. विचार करता करता, नकळतपणे स्वातीला, स्वप्नीलच्या पत्नीची असूया वाटायला लागली. तिला स्वतःला हतबल वाटू लागलं होतं.
तसं तिने स्वप्नीलच्या बायकोला पाहिलं होतं, ….. काही महिन्यांपूर्वी, ….. इटर्निटी मॉल मध्ये….
कॉफी पित होते, खूप गप्पा मारत होते. एकमेकांशी खुप जुळतंय असं वाटत होतं. अगदी मान डोलावत, तो तिचं ऐकत होता. मग …. मग …… माझ्याशी….. तिला पुन्हा एकटं वाटू लागलं.
विचारांच्या तंद्रीत, तिचा कधी डोळा लागला तिचं तिलाही कळलं नाही.
…….………………………………………………
आज तिची बेंगलोर क्लायंट सोबत काही मीटिंग होती. सकाळी निघाल्यापासून, ड्राइव्ह करतानाही, ती त्या मीटिंगच्या विचारातच होती. सगळ्या फाईल्स पेन ड्राइव्ह मध्ये सेव्ह केल्यात ना ? नक्की कोणते मुद्दे हायलाईट झाले पाहिजेत ? फायनान्शिअल टर्म्स आपल्या बाजूने कशा वळवायच्या? नक्की कोण कोण येतंय त्यांच्या बाजूने ?…. असे असंख्य प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होते. तिचे फोन चालुच होते. पोहोचेपर्यंत एक फिमेल मॅनेजरही आहे … क्लायंटसोबत असं कळलं. असेल कोणी शोभेची बाहुली, मला फिकीर करायची गरज नाही.
या सगळ्या विचारात, तिचा कॉन्फरन्स रूम मध्ये प्रवेश झाला……. सगळे उठून उभे राहिले. अन पावलं थबकली. ती स्तिमित होऊन पहात होती.
“हाय ……” समोरून कॉन्फिडंट आवाज आला. “अगं ओळखलं का मला तू ?”
“अं …. हो हो …. हॅलो ……. हॅलो एव्हरीवन ….”
ही कशी काय इथे …. ही तर जुन्नर मध्ये होती ना …. काकुबाई …… अवतार बघा, ….व्हॉट अ मॉड ऍटायर….
असले काहीबाही विचार करतच, तिने लॅपटॉप उघडला, अन बोलायला सुरुवात केली.
पण मनातलं, कुतूहल ती लपवू शकत नव्हती.
मध्येच डोळे तिच्याकडे फिरत होते….. पण अर्पिता मात्र, आत्मविश्वासाने तिच्या कंपनीचे मुद्दे मांडत होती. पूर्ण चर्चा चालू असताना, स्वातीच्या मनात, राहून राहून एकच मुद्दा येत होता, …. हे कसं शक्य आहे. (क्रमशः)
©बीआरपवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022