गुरफट भाग 5
दिवसेंदिवस तिचं मन उद्विग्न होत चाललं होतं. लाईफ पार्टनर विषयी जितकी घृणा मनात साचली होती, तितकीच आपलेपणाची भावना स्वप्नील विषयी वाढत होती. पण ….. ती ……
त्याची बायको तिच्या डोक्यात खटकत होती. तरीही वरवरची मैत्री करणं गरजेचं होतं. पण ही मैत्री शक्य होईल का ? आणि स्वप्नील विषयीच्या भावना त्याच्या बायकोला समजल्या तर, ती कसं अकांडतांडव करेल माहीत नाही.
नाही, …… पण स्वप्नीलच्या आधारा शिवाय आपलं कसं होईल, ……
या सगळ्या विचाराने ती थरथरायला लागली. पण स्वप्नील मात्र, त्या दोघींची एकत्र भेट टाळत होता. पण आज ती सापडलीच. तिचा पाठलाग करणं गरजेचं होतं. पण ……. पण पाठलाग करून, नक्की काय करायचं , ….. तिच्या समोर पदर पसरायचा, …… शी ….. फिल्मी स्टाईल.
असं कुणी कुणाला आपला नवरा देतं का ? ….. मग ….. हिसकावून, ….. पण स्वप्नील तिला दूर करणार नाही. त्याच्यात तितका कठोरपणा नाही.
मग ……. मग मलाच कठोर व्हावं लागेल. पण ती निष्पाप आहे. तिची त्यात काय चूक. पण ती मला टाळतेय. हा तिचा निष्ठुरपणाच आहे….. ती निष्ठुर आहे….. खरंय, …… ती स्वप्नीलला हवं तेव्हा मला भेटू देत नाही. मला तो ऑफिसमध्ये माझ्यासमोर हवा असतो, अन ऑफीस समोरच्याच रेस्टॉरंटमध्ये, ती त्याला कॉफी प्यायला बोलावते. त्यावेळी अगदी डोक्यात जाते.
काहीही होऊ शकतं, ….. ती समोर आल्यावर कदाचित, काहीही होऊ शकतं, …..माझ्या हातून…. गुन्हा …..नाही हे नाही होऊ शकत. पण तशीच वेळ आली तर……”
पुस्तक बंद झाल्याचा आवाज आला. पण सभोवती अजूनही अंधार होता. मनातले विचार अंधारातून कसे ऐकू येत होते, हे तिला समजलं नाही. तिने अगदी डोळे ताणून, पाहण्याचा प्रयत्न केला. पण नाही. काहीच थांग लागत नव्हता. अंधारात ती स्वतःहून शिरली होती. का? का शिरली होती ?
कुणाला तरी शोधत ती तिथे आली…… आठवलं , स्वप्नीलची बायको …… राईट …. हो तीच…… मघाशी म्हणाली, मागच्या गल्लीत तिचं क्लीनिक आहे म्हणाली ……. म्हणून तर स्वाती इथे आली होती. …… क्लीनिक मध्ये अंधार दिसत असूनही , ती आत शिरली…… कुणीतरी, तिच्या मनातले विचार मोठयाने बडबडत होतं. त्याचा मागोवा घेत ……… ती आत आली.
………………………………………………
इतक्यात, झगझगीत प्रकाश पसरला…… संपूर्ण क्लीनिक उजळून निघालं. पण प्रकाश तिला काहीसा तीव्र वाटत होता. ती क्षणात हाताशी आलेल्या खुर्चीवर मटकन बसली.
समोरच्या रोलिंग चेअरवर बसलेली व्यक्ती मागे वळली, अन इतक्या प्रकाशातही, ती त्या व्यक्तीला डोळे विस्फारून पाहू लागली. स्वप्नील …… स्वप्नीलच होता……. पण धूसर …… जरासा मंगेश सारखा छद्मी हसणारा …… की मंगेशच …… नक्की कोण ? विचारांचं काहूर मनात उसळलं होतं. तिचं डोकं गरगरायला लागलं. मंगेश असेल तर, मला इथपर्यंत आणण्याचा हा त्याचा डाव तर नसेल….. त्यात स्वप्नीलची बायकोही सामील ….. काहीच समजत नव्हतं…. त्यातून हा असा वेगळ्याच प्रसन्नतेने का हसत असेल ? नक्की काय प्लॅन असेल ?…….
विचारांचा भार आता सहन होत नव्हता. ती बसल्या जागी, कोलमडली. खुर्चीतच बेशुद्ध झाली. तरीही विचार चालूच होते. पल्स बंद झाल्यावर, मशीनचा यावा तसा, कान सुन्न करणारा आवाज कानात घुमत राहिला….. माहीत नाही पण कधी …… पण तो हळूहळू बंद झाला.
………………………………………………….
तिने डोळे किलकिले केले, तेव्हा तो सुन्न करणारा, मेंदू छेदणारा आवाज ऐकू येत नव्हता. पण काहीजण समोर असल्याचं तिला जाणवलं. डोळे चोळून ती पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करू लागली. समोर अर्पिता, मघाशी भेटलेली स्वप्नीलची बायको, …… अन मंगेश सारखा दिसणारा स्वप्नील ?…. तिघे उभे होते.
“कशी आहेस स्वाती ? ……”
“मी …… मला काय झालंय ?”
“मला वाटतं मोकळेपणाने बोलण्याची वेळ आलीय.”
“ओह, …… तुला समजलं वाटतं स्वप्नील अन माझ्याविषयी.”
“कोण स्वप्नील ?…”
“तुझा नवरा ….” समोर बोट दाखवत स्वाती बोलून गेली.
“हा माझा नवराही नाही अन स्वप्नील देखील नाही.”
“फसवतेस ? वेड्यात काढतेस ?”
“मी सायकीयाट्रीस्ट रुपाली …… बाय द वे …… कादंबरी खुप छान लिहिलीय…… यु आर ग्रेट रायटर ….”
“स्तुती ?….”
“ब्लु लगून ” दीर्घ श्वास घेत डॉक्टर रुपाली बोलू लागली, ” त्यातला स्वप्नील मात्र देखणा आहे अगदी.”
“म्हणजे तुला काय म्हणायचंय …..” स्वाती जरा वैतागलीच.
“स्वप्नील फक्त एक पात्र आहे.”
“मग हे समोर काय आहे ? त्याचं भूत ?” ती चिडली.
“हो भूतच …… तुझ्या मानगुटीवर बसलेलं. तूच काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या कादंबरी मधलं. त्या पानांमधून निघालं अन तुझ्या मानेवर बसलं. समजूतदार, देखणा, आपल्या मैत्रिणी साठी काहीही करायला तयार असलेला….. तुच लिहिलं आहेस हे सगळं.”
स्वाती अजूनही अविश्वासाने त्या सगळ्यांकडे पाहत होती.
“म्हणजे मघाशी मला इथं आल्यावर ऐकू येत होतं ते ……..”
“तुझंच पुस्तक होतं ते …… हा मंगेश वाचत होता ….. अन तुला तुझ्या मनातले विचार ऐकू येत असल्याचा भास झाला.”
“नाही खोटं बोलताय तुम्ही …..” हे बोलताना ती मंगेशचं निरीक्षण करत होती. मघाशी स्वप्नील अन मंगेश एकमेकात का मिसळले होते , त्याचा तिला थोडासा थांग लागत होता. पण तरीही हे सगळं तिला कुभांड वाटत होतं.
“मला माहित आहे, स्वप्नील हे कॅरॅक्टर मीच लिहिलंय, पण …… तो खरा आहे ……. माझं मन मला सांगतंय.”
“नाही स्वाती, ……. आपल्या बॅच मध्ये , आपल्या कॉलेज ग्रुपमध्ये कुणीही स्वप्नील नव्हता…… हवं तर मी तुला बॅचची लिस्ट देते …..” अर्पिताने अगदी ठाम सांगितलं.
“तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा ? ……. तूच तर घात केलास माझा ?”
“आपण तिच्या मिस्टरांना बोलावू इथं, तेच सांगतील, की कधीपासून अर्पिता बेंगलोरला आहे….. आणि त्यांचा आपसातला वाद मिटलाय ते.” आता …… मंगेश बोलत होता. ती अगदी हतबल होऊन त्या तिघांकडे पहात होती. हे मला वेडी ठरवण्याचा कट करत आहेत का ? असाही विचार तिच्या मनात येऊन गेला.
“लॅपटॉप मधले मंगेशचे फोटो, तु पाहिलेस, … अन तुझी विचारचक्रं फिरू लागली. अन त्या मानसिक गुंतागुंतीच्या काळात, मंगेशकडून नेमकं दुर्लक्ष झालं. मंगेश अन अर्पिता दोघां विषयीची कॉलेजमध्ये असताना पासून असलेली तुझी शंका, उफाळून वर आली. त्याच्या नेहमीच्या , सुटी मिळाली की ट्रेक करायच्या इव्हेंटमध्ये, अर्पिताचं माहेर, जुन्नर पुन्हा पुन्हा येऊ लागलं. अन तुझ्या मनातली कथा , “ब्लु लगून” च्या मार्गाने धावू लागली. नेहमी नेहमी होणाऱ्या भांडणांमुळं मंगेशच्या परदेशवाऱ्या अन साईट व्हिजिट वाढल्या. तो जास्तीत जास्त दूर राहू लागला. आणि हीच अक्षम्य चूक त्याला महागात पडली. त्यातून तुझ्या कादंबरीमधला स्वप्नील तुला प्रचंड आवडला होता. त्याचं स्वप्नात येणं जाणं वाढत गेलं. ते इतकं वाढत गेलं की, आपली चूक सुधारण्यासाठी, उपरती झालेला मंगेश तुझ्या समोर आला अन तु स्वप्नील म्हणून किंचाळलीस……
खरंतर, तुझी कादंबरी अनेकदा, वाचलेल्या मंगेशला हा धक्का पचवणं अवघड होतं. पुढे जाऊन तु त्याच्या प्रेमात पडलीस …… काल्पनिक पात्राच्या नावाने, बायको पुन्हा आपल्याच प्रेमात पडलीय, एवढाच आशेचा किरण घेऊन तो माझ्याकडे आला.”
डॉक्टर रूपालीच्या एवढ्या विस्तृत विश्लेषणानंतरही खुर्चीत बसलेली स्वाती नकारार्थी मान डोलवत होती, “कसं शक्य आहे ? मी पुन्हा मंगेशच्याच प्रेमात का पडेन ?”
“तु तुझ्या कादंबरीत प्रियकर म्हणून वर्णन केलेला स्वप्नील हा कॉलेजमध्ये असताना , तुझ्यावर हळवं प्रेम करणाऱ्या मंगेश सारखाच नाही का ? ” अर्पिताने अगदी आत्मविश्वासाने पण हळुवारपणे विचारलं. “आपल्या ग्रुपला अजूनही तोच , तुझ्यासाठी काहीही करायला तयार असलेला मंगेश लक्षात आहे.” यावेळी मात्र , अर्पिताच्या डोळ्यात पाणी तरळलं. स्वातीला कसा विश्वास द्यावा हे तिला अजूनही उमगत नव्हतं.
“लग्नानंतर करिअरच्या घोडदौडीत, तुझ्याकडे दुर्लक्ष करणारा मंगेश, तुझ्या कादंबरीमधला नायक आहे, अन कॉलेजमध्ये हळुवारपणे प्रेम करत राहणारा , मंगेश, ….. तुझ्या कादंबरीत स्वप्नील झालाय…… म्हणजे खरंतर तुच लिहिलाय. पण तु गुरफटत गेलीस. त्या पात्रांमध्ये. तुझं डिलुजन वाढत गेलं. जसजसं कादंबरीचं यश वाढत गेलं, तसतशी ती पात्रं तुझ्याभोवती फेर धरू लागली. मंगेशने कादंबरी वाचली होती, त्यामुळं त्याला काही मिनिटात समजलं की कोण स्वप्नील तुझ्या डोक्यात आहे ते ? तो हादरला होता. माझ्याकडे आल्यावर, मी त्याला पात्र वठवत राहायला सांगितलं. पूर्ण कादंबरी वाचून काढली. कादंबरीच्या शेवटच्या पर्वातली गुन्ह्याची घटना होण्याआधी, तुला इथं आणणं आवश्यक होतं. आणि हे डिस्कस करायला वारंवार मंगेशला भेटणं व्हायचं. तु मला त्याची बायको समजलीस आणि माझं तुला इथं आणायचं काम सोपं झालं……..” डॉक्टर रुपालीच्या एवढ्या बोलण्यावर, स्वाती लगेच पूर्ण विश्वास ठेवेल असं नव्हतं. पण समोर गुडघ्यावर बसलेल्या मंगेशच्या डोळ्यातल्या अश्रूंनी , तिला मंगेशची ओळख पटवून दिली होती.
………………………………………………….
मनालीच्या बर्फाच्छादित शिखरांवर, पसरलेली सोनेरी सकाळ पहात, स्वाती कॉफी घेत होती. मागून मंगेशने येऊन मिठी मारली.
“गुड मॉर्निंग ….” असं हळूच कानाशी पुटपुटत, त्याचे ओठ तिच्या गालावर विसावले. मार्चच्या पहिल्या आठवड्यातला , सुर्यप्रकाश समोरच्या शिखरांना उजळवत होता……. आणि त्यासोबतच मनाची सगळी गुरफट, पूर्णपणे निवळली होती.(समाप्त) ©बीआर पवार
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022
Khupach sundar
dhanywad
Gd 1
Wah khupach chaan hote saglech bhag, mastt lihilyet hi katha!
Thanks