बदल
आमच्याकडे गेली अनेक वर्ष घरात सत्यनारायण, गणपती प्रतिष्ठापना, लक्ष्मीपूजनाची पूजा माझे सासरे सांगतात. त्यांना त्याची आवडही आहे आणि सवडही असते. त्यांनी प्रत्येक पूजा स्वतःच्या सुवाच्य अक्षरात लिहून, लॅमीनेट करून ठेवली आहे. गरज पडली तर इतर कोणीही ते वाचून पूजा सांगू शकेल अशी. स्वतः शिस्तप्रिय असल्याने अतिशय व्यवस्थित आणि साग्रसंगीत पूजा सांगतात. गुंडाळपट्टी चालत नाही. उच्चार सुस्पष्ट असल्याने प्रत्येक मंत्र नीट ऐकू येतो, पत्री, फुलं, दुर्वा नीट वाहिल्या जातात. घरचेच गुरुजी असल्यामुळे आम्हालाही तयारीत, वेळेत थोडी सूट मिळते.
यावर्षी मात्र त्यांना थोडं बरं नसल्याने पर्यायी व्यवस्था करावी लागली. एखादी वर्षानुवर्षे चालत आलेली प्रथा एकदम मोडणं, बंद करणं, बदलणं तसं अवघड असतं, विशेषतः घरातल्या जुन्या खोडांसाठी. अनेक वर्ष एकाच पद्धतीने काही गोष्टी केलेल्या असतात, त्याच बरोबर असतात हे मनावर ठसलेलं असतं. But change is the only constant. उगाचच एखाद्या प्रथेवर, परंपरेवर अडून बसण्यात हशील नसतं. “आमच्याकडे असंच असतं” या वाक्यात कितीतरी अर्थ लपलेले असतात. त्यातला बहुतांश अर्थ “आम्हाला अजिबात बदलायचं नाही!” याकडे झुकणारा असतो. पण बदल गरजेचा असतो. वाहतं पाणी स्वच्छ राहतं आणि साठलेलं पाणी खराब होतं हे कायम लक्षात ठेवावं असं मला वाटतं. जुन्या रूढी, परंपरा पाळताना नवीन गोष्टींचा अंगीकार केला तर त्या सण, उत्सवात मजा आहे, आनंद आहे. एखाद्याला दुखावून, मन मारून उत्सव साजरे होत नाहीत, फक्त प्रथा पाळल्या जातात.
उदाहरणादाखल सांगते. मी लग्न होऊन घरात नवीन आले तेव्हा गौरीजेवणासाठी माझ्या सासूबाई आणि चुलतसासूबाई नैवेद्याचं ताट वाढायच्या. माझी कामं लिंबूटिंबु असायची. नैवेद्याचे पदार्थ भरपूर असतात, त्यात काकडीची कोशिंबीर, लाल भोपळ्याचं भरीत यासारखे थोडे लिक्विड पदार्थही असतात. नैवेद्याच्या चांदीच्या दोन मोठ्या वाट्या पक्वान्नासाठी ठरलेल्या असायच्या. बाकी ताटात पदार्थांची भरपूर गर्दी असायची. नैवेद्याचं ताट झाकून ठेवायचं आणि रात्र खायचं अशी प्रथा होती. भरलेल्या ताटात इतकी गडबड असायची की सगळे पदार्थ एकमेकांत मिसळायचे आणि रात्री धड कशाचीच चव लागायची नाही. त्यात सगळं अन्न गार झालेलं असायचं. नैवेद्य असल्यामुळे खावं तर लागायचंच. मी दोन चार वर्ष वाट पाहिली आणि एका वर्षी बाजारात जाऊन बारा छोट्या स्टीलच्या वाट्या आणल्या. सासूबाईंना समजावून सांगितलं पदार्थ या वाट्यात वाढू म्हणजे एकमेकांत मिसळणार नाहीत. रात्री जो कोणी तो नैवेद्य खाईल त्याला नीट जेवण मिळेल. माझ्या सासूबाईंना ही कल्पना आवडली (नशीब!) आणि त्यांनी यावर कडी करत मला सांगितलं, “गौरी, या वर्षीपासून आपण नैवेद्य दुपारीच घेत जाऊ. अजिबात रात्रीपर्यंत ठेवायचा नाही. रात्री कोणी धड जेवत नाही, त्यात ते गार अन्न, ते ही पावसाळ्याच्या दिवसांत तू ही खायचं नाहीस आणि मी ही नाही. तुम्ही दोघी (मी आणि माझी जाऊ) गौरींचं इतकं मन लावून करता ना? मग दोन्ही देवींची ताटं तुम्ही घेत जा. माझ्या सुना माहेरवाशिणीच आहेत असं समजायचं.” माझे डोळे भरून आले. खूप वर्ष चालत आलेली एक प्रथा माझ्या सासूबाईंनी एका झटक्यात मोडली होती पण त्याचं पाप न लागता केवढं तरी पुण्य त्यांच्या वाट्याला येणार होतं.
तर आम्ही यावर्षी पहिल्यांदा ऑनलाईन पूजा केली. युट्युबवर गुरुजी सांगत होते त्याप्रमाणे सर्व करत गेलो. हवं होतं तिथे पॉज केलं, मग पुढे गेलो. उत्तम पूजा झाली. युट्युबचे गुरुजी चांगलेच होते. उगाचच नावं ठेवण्यात अर्थ नाही. दक्षिणा ठेवताना मात्र प्रश्न आला. शेवटी सासरेच म्हणाले, “फोनसमोर दक्षिणा ठेवा, नमस्कार करा. नंतर एखाद्या देवस्थानाला तुमचं ते ऑनलाईन ट्रान्सफर काय ते करा.” नंतर मात्र गालातल्या गालात हसत म्हणाले, “तेवढा प्रसाद मात्र ऑनलाईन देऊ नका. तो शक्यतो ऑफलाईनच द्या.” म्हणजे बदल पचनी पडला होता तर. पाणी वाहतं झालं होतं. नुकतीच प्रतिष्ठापना झालेली, सर्व गुणांचा आणि कलांचा अधिपती, गुणग्राहक, बुद्धीची ती देवता आमच्याकडे पाहून प्रसन्न हास्य करत होती की काय असं वाटून गेलं.
Latest posts by Gauri Brahme (see all)
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
👌👌
मस्त ❤️
Very well written