देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर
डॉ केदार…
सुप्रसिद्ध प्रसूतिरोगतज्ञ…
साधारण तीसेक वर्षांचा दांडगा अनुभव…
त्यांचं अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज हॉस्पिटल…
आठवड्याच्या दोन तीन वारी चाळीस किलोमीटर अंतरावर दुसऱ्या शहरात दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ओपीडी साठी जातात…
त्या शहरामध्ये स्थायिक असे दुसरे प्रसूतिरोगतज्ञ कोणीही नाही…
स्वतः च्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांची चोवीस तास सेवा असतेच…
पण त्या दुसऱ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नेमलेले दोन तीन वार सोडून बाकी कधी गरज लागेल तेव्हा डॉ केदार जातात…
अगदी रात्री अपरात्री सुद्धा…
एकदा रात्री 11.30 वाजता त्या दुसऱ्या शहरातून डॉ केदार यांचा फोन खणाणला…
सर, पेशंट आली आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणं कठीण दिसतंय…
पोटातल्या बाळाच्या मानेला नाळेने विळखा घेतलाय, बाळाने पोटात शी केली आहे, उशीर झाला तर बाळाच्या जीवाला धोका आहे…
शी नाकातोंडात गेली तर बाळ दगावण्याची भीती आहे…
एका अनुभवी नर्सचा फोन…
डॉ केदार यांनी लगेच आवश्यक ती चौकशी करून लागलीच तिकडे जाण्याचा निर्णय घेतला…
त्यांच्या नेहमीच्या ड्रायव्हरला फोन केला…
अक्षरशः पाच मिनिटात ड्रायव्हर हॉस्पिटलात हजर…
प्रसूतिरोगतज्ञ, भुलतज्ञ आणि त्यांचा सारथी असे निघाले…
नको असेल तेव्हाच आणि नको असेल तिथेच पाऊस येतो…
ते तिघे निघाले, चाळीस किलोमीटरचं अंतर, रस्ता जेमतेम आणि आभाळ कोसळल्यासारखा पाऊस…
ड्रायव्हरच्या ड्रायव्हिंगच्या कलेचा पुरता कस लागला होता…
काळोखी रात्र, गाडीच्या काचेवर आपटणारा पाऊस, सतत फिरते वायपर, दोन्ही डॉक्टरांची पेशंटबद्दल चाललेली चर्चा-मसलत आणि ड्रायव्हरची लवकरात लवकर पोचण्यासाठी चाललेली प्रयत्नांची पराकाष्ठा…
तेवढ्यात डॉ केदार यांचा फोन परत खणाणला…
सर, कुठे आहात, लवकर या…
आलोच…
सरांनी नर्सला धीर दिला, आणि पर्यायाने नर्सने पेशंटला…
पाऊस कमी होत नव्हता…
विजांचा कडकडाट वाढत होता…
ढगफुटी होत्ये की काय असं वाटत होतं…
त्यातल्या त्यात सुख म्हणजे ड्रायव्हर त्याच्या कलेचा योग्य वापर करून जास्तीत जास्त अंतर कापत होता…
अखेरीस एक तास दहा मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर हॉस्पिटल दिसलं…
दोन्ही डॉक्टर, त्यांची गाडी बघून तिकडे असलेल्या नर्सेस आणि पेशंटचे नातेवाईक यांच्या जिवात जीव आला…
दोन्ही डॉक्टर गाडीतून उतरून शून्य मिनिटात ऑपरेशन थिएटर मध्ये…
पेशंटला बघितलं, आवश्यक ते चेकिंग आणि फॉर्मलिटीज आटपून भूलतज्ज्ञांनी पेशंटला भुलीचं इंजेक्शन दिलं, काही वेळाने डॉ केदार यांनी सिझेरियनला सुरवात केली…
सगळ्यांनीच देवाचं नाव घेतलं तसंच आई आणि बाळ दोघांची सुखरूप सुटका होऊदे अशी मनोमन प्रार्थना केली…
घड्याळ सेकंदासेकंदाला पुढे सरकत होतं…
सगळ्यांचे डोळे ऑपरेशन थिएटरचा दरवाजा कधी उघडतोय तिकडे लागले होते…
डॉक्टरांपासून सगळ्यांच्या प्रयत्नांना अखेरीस देवाने यश दिलं…
एक नर्स बाहेर सांगत आली..अभिनंदन.. मुलगी झाली..आई आणि बाळ दोघी सुखरूप आहेत…
हे ऐकून पेशंटचे नातेवाईक आणि दूर बाकड्यावर बसलेला ड्रायव्हर यांनी सुटकेचा निःश्वास टाकला…
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत झालेल्या सगळ्यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी आभार मानले…
चेहऱ्यावर प्रचंड आंनद आणि समाधान घेऊन दोन्ही डॉक्टर बाहेर आले…
सगळीकडे आनंदीआनंद होता…
घड्याळात पहाटेचे तीन वाजले होते…
हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना कॉफी ऑफर झाली…
डॉक्टरांना जेव्हा कॉफी विचारली तेव्हा दोन्ही डॉक्टरांनी निक्षून आणि जाण ठेऊन आमच्या सारथीला सुद्धा कॉफी द्या, असं म्हणाले…
आमच्याकडे डिग्री आहे, आम्ही डॉक्टर आहोत हे सगळं खरं असलं तरी या सारथीने जर आम्हांला इथपर्यंत लवकरात लवकर आणलं नसतं तर हे काहीच शक्य नव्हतं…
हे ऐकून सगळ्यांनाच भरून आलं आणि सगळ्यांनी एका सुरात थँक्स म्हणत ड्रायव्हरचेही आभार मानले……………….
© Ashwini R. Athavale
- देवदूत…डॉक्टर आणि ड्रायव्हर - September 18, 2021
- रक्षाबंधन… - August 23, 2021
- एक ओळख..अशीही… - August 20, 2021
Good thought