‘स्कूल चले हम !
”नीट कडेकडेने जा..
गाड्या बघून रस्ता क्राॅस करा.
फार वेळ काढू नका…
सावकाश जा.
तंद्री लागल्यासारखं तिथंच थांबू नका..
लवकर घरी या…
ऊगा आमच्या जिवाला नसता घोर….’
माईंची धडधड एक्स्प्रेस थांबेचना.
आण्णांचं एका वाक्यात ऊत्तर..
“येतो गोऽऽ”
आण्णा लकडी की काठी करत शाळेपाशी.
आजी ,म्या ब्रह्म पाहिले !
पाखरांची शाळा नुकतीच भरत आलेली.
किती तरी दिवसांनी ऐकू आलेला किलबिलाट.
आण्णांना एकदम फ्रेश वाटलं.
नई ऊम्मीद,नई आशा.
आण्णांना दूरदेशीचा नातू आठवला..
तो ईथं असता तर माझं बोट धरून,
शाळेत पोचवला असता…
ईलाज नाही.
त्याला ईथं येणं शक्य नाही आणि मला तिथं जाणं.
स्वगत..
रोजच्या एकांकिकेतलं आण्णांचं स्वगत म्हणून झालं..
अचानक पडदा पडला..
आण्णा तंद्रीतून जागे.
ऊशीर झालेलं एक कोकरू.
शिक्षा होणार म्हणून घाबरलेलं.
“माझे आजोबा व्हाल आजच्या दिवस ?”
आण्णा एका पायावर तयार.
आण्णांचं बोट धरून कोकरू शाळेच्या गेटपाशी
“माझ्यापायी ऊशीर झाला हो त्याला.
घ्याहो माझ्या नातवाला शाळेत..”
‘ पुन्हा पुन्हा नको असं व्हायला.’
गेट पलीकडनं दरडावणी.
‘नाही होणार..’
कोकरू आनंदात शाळेत शिरतं..
“लव यू आजोबा !”
आण्णा खूष.
नवीन रोल फारच आवडतो त्यांना.
ईतकी तंगलतोड केल्याचं चीज झालं.
भर झालं मेला तो कोरोना..
अन् ही पाखरांची शाळा भरली..
“शाळा सुटली, पाटी फुटली..”
लहानपणीचं हे गाणं आठवत,
दुडक्या चालीनं आण्णा घरी निघाले.
स्कूल चले हम !
जय हो !
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
जय हो