माझी होशील का?

Thank you Akshay for your cooperation  & support… 

मितालीच्या फेसबुक पोस्टमधलं हे शेवटचं वाक्य वाचून अनयचा मूड बदलला. आजकाल अक्षय आणि तिच्यामधली वाढत चाललेली जवळीक त्याला प्रकर्षाने जाणवायला लागली होती. आत्ताही गरज नसताना तिने अक्षयला थँक्स म्हटलं होतं. 

मिताली, अनय आणि अक्षय तिघेही एकाच कंपनीत नोकरी करत होते. अक्षय एचआर हेड म्हणून सहा महिन्यांपूर्वीच कंपनीत जॉईन झाला होता. मिताली कंपनीच्या अॅडमिन टीममध्ये तर अनय फायनान्स मॅनेजर होता. अक्षय जॉईन होण्यापूर्वी मिताली आणि अनय सतत एकत्र असत. अनयला मिताली मनापासून आवडायची पण मितालीच्या मनाचा थांगपत्ता लागत नव्हता. ऑफिसमध्ये सतत अनय आणि मितालीमध्ये काहीतरी आहे, अशी चर्चा होत असे. पण अक्षय जॉईन झाला आणि महिनाभरातच सगळे संदर्भ बदलले. कंपनीच्या वर्धापन दिनाच्या सुत्रसंचालनाची सर्व जबाबदारी अक्षयने मितालीला दिली होती, त्यासाठी कार्यक्रमच्या दिवशी त्याचे आभार मानून झाले होते, पुन्हा फेसबुक पोस्टमध्ये आभार प्रदर्शन करायची काय गरज होती? तिची फेसबुक पोस्ट वाचल्यावर अनयला प्रचंड राग आला होता. एकदा मनात आलं की मितालीला मेसेज करावा पण नंतर त्यात वाटलं, आजकाल ती मला टाळत असते. त्यात असा मेसेज केला तर राग येऊन तिने बोलणंच बंद केलं तर? त्यापेक्षा नकोच. 

मनातले विचार बाजूला करून अनयने पुन्हा कामामध्ये मन रमवायचा प्रयत्न केला, पण आज काही केल्या त्याचं मन कामात लागत नव्हतं. वैतागून त्याने फाईल क्लोज केली आणि कॉफी पिण्यासाठी कॉफी मशीनजवळ गेला. ही जागा त्याला प्रचंड आवडायची. समोरच्या खिडकीतून दिसणारी डोंगरांची राग आणि उजव्या बाजूच्या खिडकीतून दिसणारी ट्रॅफिकमधल्या गाड्यांची रांग दोन्ही विरोधाभास एकाचवेळी अनुभवता यायचा तेही कडक कॉफीचा सीप घेत. तो आणि मिताली इथे अनेकदा एकत्र येत असत. पण आज तो एकटाच होता. तेवढ्यात समोरून मृदुला आली. 

“काय अनय, आज एकटाच?”- मृदुला

“आजकाल एकटाच असतो मी.” अनय

“हो ते ही आहेच म्हणा. पण अजून गप्प बसलास तर कदाचित यापुढेही एकटाच राहायची वेळ येईल.

“म्हणजे? मी समजलो नाही.

“अनय सध्या ऑफिसमध्ये मिताली आणि अक्षयच्या रिलेशनशिपबद्दल उलट सुलट चर्चा चालू आहे.”

मृदुलाने त्याच्या जखमेवर मीठ चोळलं होतं. पण तसं न दाखवता अनय म्हणाला, “हो, माझ्याही कानावर आलंय.”

“मग तरीही तू गप्पच बसणार आहेस? तुला मिताली आवडते, हे आता ओपन सिक्रेट आहे आणि मितलीलाही तू आवडतोस हे मात्र तुझ्याही लक्षात आलं नाहीये.” 

“काय? उगाच काहीतरी सांगू नकोस. मिताली म्हणाली का तुला तसं?”

“तू तरी मला कुठं सांगितलं होतंस? तरीही मला कळलंच ना. म्हणून सांगते उशीर करू नकोस. लवकरात लवकर मितालीला प्रपोज कर.” 

“आणि काय नकार ऐकू? तिला आता माझ्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. अर्थात आधीही होता की नाही कुणास ठाऊक?”

“हे बघ अनय,  अक्षय आणि तिच्यामध्ये काय नातं आहे मला माहिती नाही. पण एक नक्की मिताली तुझ्यावर प्रेम करते. हा सध्या ती तुझ्यापासून दूर राहून अक्षयशी खूप क्लोज असल्याचं का भासवते हे मलाही कळत नाहीये. पण मी आणि मिताली गेले दोन वर्षे एकत्र काम करतोय, मी तिला जेवढं ओळखते त्यावरून ती खूप चांगली मुलगी आहे. क्षणिक आकर्षण आणि प्रेम यामधला फरक कळण्याइतकी ती सुज्ञ आहे. म्हणूनच म्हणतेय, एकदा तिच्याशी मोकळेपणाने बोल. असं झुरत बसण्यापेक्षा एकदाच काय तो निर्णय लागेल. चल येते मी.” 

मृदुला निघून गेल्यावर अनय कितीतरी वेळ समोरच्या डोंगररांगाकडे बघत होता. विचारांमध्ये तो इतका हरखून गेला होता की अचानक वाजलेल्या मोबाईलच्या रिंगनेही दचकला. त्याला कोणाशीच बोलण्याची इच्छा नव्हती म्हणून फोन कट करून तिथून जायला निघाला तोच अचानक त्याच्यासमोर मिताली आली. क्षणभर दोघांची नजरानजर झाली. अनय तिला काही बोलणार तेवढ्यात अक्षय तिथे आला. त्यामुळे काहीही न बोलता तो तिथून निघाला. “हा अक्षय आला नसता, तर आज मी मितालीशी काहीतरी बोललो असतो. तिच्यासाठी आणि तिच्यासोबत कॉफी प्यायली असती. पण हा अक्षय सतत मध्ये येतो.” अनय मनातून वैतागला होता.

आज काही केल्या अनयचं कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून त्याच्या मनात मितालीच्या फेसबुक पोस्टमधलं वाक्य घोळत होतं. विचारांच्या चक्रात अचानक मनाने यु टर्न घेतला आणि त्याला मृदुलाचं बोलणं आठवलं. “खरंच विचारू का मितालीला. एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागेल. तसंही आता कुठे नीट बोलते माझ्याशी, पण मगाशी एका क्षणासाठी का होईना पण तिच्या डोळ्यात मला बघून आनंद तरळला होता. खरंच माझ्यावर प्रेम करत असेल ती? मग ती आणि अक्षय….” विचार करून करून त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. 

संपूर्ण दिवस उदासच गेला. बघता बघता घड्याळात सहाचे टोले पडले आणि अनयने लॅपटॉप बंद केला. खरंतर सहाच्या ठोक्याला तो ऑफिसमधून कधीच निघत नसे. पण आज कामात लक्षच लागत नव्हतं. लॅपटॉप बंद करूनही कितीतरी वेळ तो उगाचच तसाच बसून राहिला. अखेर वैतागून जायला निघाला. ऑफिसच्या बाहेर आल्यावर त्याला मिताली दिसली. अचानक त्याच्या मनात काय आलं काय माहिती तो तडक मितालीजवळ गेला आणि म्हणाला, “मिताली थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे.”

“आत्ता? आपण नंतर बोलूया का? आज मी जरा गडबडीत आहे”, मिताली.

“कितीही महत्वाचं काम असलं तरी आज मला तुझ्याशी बोलायचं आहे. चल मी येतो तुझ्यासोबत. जेव्हा तुझं काम होईल, तेव्हा बोलू.” 

“अनय, मला खरंच… मिताली काही बोलणार तेवढ्यात अक्षय तिथे आला. 

“हॅलो अक्षय, मला मितालीसोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे, तुझी काही हरकत नाही ना?” 

अनय असं काही बोलेल, विचारेल याचा अक्षयने  विचारच केला नव्हता. त्याला काय उत्तर द्यावं तेच त्याला सुचेना. त्याने फक्त नकारार्थी मान हलवली. 

“थँक्स अक्षय, थँक्स फॉर युअर को ऑपरेशन अँड सपोर्ट”, असं म्हणून अनय मितालीला म्हणाला, चल मिताली आपल्या नेहमीच्या कॉफी शॉपमध्ये जाऊया. 

अक्षय प्रमाणेच मितालीलाही अनयचं वागणं अनपेक्षित होतं. काय बोलावं, काय करावं काहीच सुचत नव्हतं. त्यामुळे ती काहीही न बोलता अनयसोबत कॉफी शॉपमध्ये गेली. सुदैवाने त्यांचं नेहमीचं टेबल रिकामं होतं. दोघंही तिथे जाऊन बसली. थोडावेळ असाच गेला कोणीच काही बोललं नाही. तेवढ्यात वेटर आला. त्याने विचारलं, “दोन कोल्ड कॉफी बरोबर ना साहेब?”

“हो, बरोबर”, अनय सहज बोलून गेला. मितलीनेही विरोध दर्शवला नाही. 

“बोल काय काम आहे?”

“मिताली….”

“तू मला प्रपोज करणार असशील, तर एका विधवा खुनी मुलीशी लग्न करायची तुझी तयारी आहे का हे आधी ठरव.” अनय काही बोलणार इतक्यात मिताली म्हणाली.

आज काय घडत होतं ते दोघांनाही कळत नव्हतं. नकळतपणे दोघही आपआपल्या मनातलं एकमेकांसमोर व्यक्त करत होते. मितालीच्या अनपेक्षित बोलण्यावर कसं व्यक्त व्हावं, हेच अनयला कळत नव्हतं. कसेबसे शब्द जुळवून तो म्हणाला, कोण खुनी विधवा? तू?”

“हो, अनय. कॉलेजला असताना मी एका मुलाच्या प्रेमात पडले. त्याच्या गोड बोलण्याच्या, फिल्मी वागण्याच्या मोहात अडकले. तारुण्यसुलभ आकर्षणाला प्रेम समजून बसले. त्याचं शिक्षण म्हणजे धड ग्रॅज्युएटही नाही. घरची परिस्थितीही यथातथाच. पण माझ्या मनात कुठलाच विचार आला नाही. वेड्यासारखी त्याच्या प्रेमात वाहवत गेले. माझ्या सुखवस्तू पण कर्मठ कुटुंबात माझ्यावर असंख्य बंधने होती, पण त्याच्या सहवासात एका वेगळ्याच विश्वात असायचे. सुख म्हणचे त्याचा सहवास असंच मला वाटत असे. जेमतेम १९ वर्षांची होते मी तेव्हा त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. लग्नानंतर शहरातल्या बकाल वस्तीतल्या त्याच्या दोन खोल्यांच्या घरात संसार सुरू झाला. तरीही मी खुश होते. पण नव्याचे नऊ दिवस ओसरले आणि मी किती मोठी चूक केली हे माझ्या लक्षात आलं. लग्नापूर्वी त्याच्या ज्या हिरोगीरीला भाळले होते, ती किती फोल आहे ते लक्षात आलं. दारू, सिगारेट, मावा, जुगार सगळी व्यसनं त्याला होती. हळूहळू त्याने मला मारहाण करायलाही सुरवात केली. सहा महिने होऊन गेले होते. माझं कॉलेज अर्धवट राहिलं होतं. बरोबरीच्या मुलांना जीव ओतून ग्रॅज्युएशनचा अभ्यास करताना, करिअरची स्वप्न रंगवताना बघून स्वतःच्या चुकीबद्दल पश्चात्ताप होत असे. मी सुद्धा खूप यशस्वी करिअरची स्वप्न बघितली होती. त्या क्षणी मनात आलं. काय हरकत आहे पुन्हा नव्याने सुरवात करायला. एक वर्ष वाया गेलं ते काही परत येणार नाही, पण तरीही वेळ गेलेली नाही. अजूनही माझं भविष्य, माझं करिअर मी घडवू शकते. एक दिवस मनाशी पक्का विचार करून कॉलेजला जायला निघाले. कॉलेजच्या रस्त्यावर आल्यावर जुने दिवस आठवले. त्यावेळच्या नवथर प्रेमाच्या गुलाबी आठवणींनी मन मोहून गेलं. करिअर घडवण्यासोबत नवऱ्यालाही सुधारायचं हा निश्चय करून कॉलेजच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे ऍडमिशनची चौकशी करून येत असताना मुद्दाम आम्ही भेटायचो त्या जागी गेले. तिथे मी माझ्या नवऱ्याला कोणा दुसऱ्या मुलीच्या मिठीत बघितलं आणि पायाखालची जमीनच सरकली. 

मी तडक तिथून निघाले. घरी गेल्यावर आसवांना वाट मोकळी करून दिली. सकाळचा सगळा निश्चय एका क्षणात कोलमडला होता. त्या रात्री तो उशिरा घरी आला. तरीही मी त्याला जाब विचारला. दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं त्याने मला खूप मारलं. अगदी कंबरेच्या बेल्टने सपासप मारलं. मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर घरातून बाहेर पडला आणि दोन दिवसांनंतर घरी आला. या दोन दिवसात मी कशी होते, काय केलं, काय खाल्लं कसलीही चौकशी त्याने केली नाही. घरी आल्यावर आवरून पुन्हा बाहेर पडला आणि रात्री उशिरा एका माणसाला घेऊन आला. पूर्वीही त्याने त्याच्या मित्रांना घरी बोलवून दारू पिण्याचा प्रकार केला होता. तेव्हा माझं भांडण झालं होतं. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा माझ्यावर हात उगारला होता. पुन्हा तमाशा नको म्हणून मी झोपण्याचं नाटक करून आतल्या खोलीत पडून राहिले. पण माझ्या कानावर काही गोष्टी आल्या त्यावरून मला कळलं की कसलातरी सौदा होतोय, माझा… हो माझाच सौदा करत होता तो. या दोन खोल्यांच्या बदल्यात या घराच्या मालकाला तो मला देणार होता. प्रचंड दुःख, राग, संताप सगळ्या भावना एकत्र दाटून आल्या. मी ताडकन उठून बाहेर गेले आणि त्या माणसाला घरातून जायला सांगितलं. नेहमीप्रमाणे माझ्या नवऱ्याने माझ्यावर हात उगारला पण त्याक्षणी मी अंगातली सगळी ताकद एकवटून त्याच्या कानाखाली मारली. तो चवताळला अंगावर धावून आला. मला काहीच सुचलं नाही मी बाजूच्या टेबलावरची त्याची दारूची बाटली उचलून त्याच्या डोक्यात घातली. हा सगळा प्रकार बघून घरमालक घरातून पळून गेला. पण माझा राग शांत होत नव्हता. त्या तुटलेल्या बाटलीच्या काचेच्या तुकड्याने त्याच्या अंगावर असंख्य वार केले. एव्हाना अख्खी वस्ती घराबाहेर जमा झाली होती. कोणीतरी पोलिसांनाही कळवलं होतं. मला काही समजायच्या आतच मला अटक झाली होती. पोलीस जबानीत मी सगळं खरं सांगितलं. माझा गुन्हा कबूल केला. माझी कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले. त्या चौकीतल्या सब इन्स्पेक्टरांनी इंस्पेक्टर साहेबांना हा स्वसंरक्षणार्थ केलेला खून आहे, आपण या मुलीला मदत केली पाहिजे असं सांगून त्यांची समजूत काढली. त्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांनीच मला सहकार्य केलं आणि स्वसंरक्षणार्थ झालेला खून असा शेरा मारून केस बंद केली. सब इन्स्पेक्टर स्वतः मला माझ्या घरी घेऊन गेले, पण माझ्या कर्मठ घराची दारं माझ्यासाठी कायमची बंद होती आणि ती बंदच राहिली. 

इन्स्पेक्टर साहेबांनी एका महिलाश्रमात माझ्यासाठी शब्द टाकला. पण सब इन्स्पेक्टर साहेबांना मात्र पटत नव्हतं. एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते मला देवधर आजींकडे घेऊन आले. त्यांना एका केअर टेकरची गरज होती. त्यांची दोन्ही मुले अमेरिकेला होती. त्यामुळे त्याच्या बंगल्यात त्यांच्या सोबत राहण्यासाठी कोणीतरी विश्वासू स्त्री हवी होती. घरात प्रत्येक कामाला बाई होती. पण त्यांना अशी सोबत हवी होती जी त्यांचं सगळं आपुलकीने करेल. त्यांची काळजी घेईल, त्यांचं डाएट सांभाळेल, औषध पाणी बघेल. देवधर आजींना माझी सगळी हकीकत सांगितल्यावर त्या मला ठेवून घ्यायला कितपत तयार होतील याबद्दल शंका होतीच, पण चक्क त्यांनी मला सांभाळाची तयारी दाखवली आणि म्हणाल्या, “आम्ही एकमेकींचा आधार बनून राहू. मी ठेवून घेईन हिला माझ्या घरी पण अट एकच, हिने सगळं शिक्षण पूर्ण करायचं आपलं आयुष्य घडवायचं”.  त्यांचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले आयुष्यात पहिल्यांदा आजीची माया अनुभवली होती नाहीतर माझी आजी माझ्याविरुद्ध माझ्या बाबांचे कान भरण्यात कुठलीच कसर ठेवत नसे. मी झाले तेव्हाही पहिली मुलगी झाली म्हणून नाक मुरडलं होतं तिने.

देवधर आजींच्या प्रेमळ सहवासात मी हळूहळू भूतकाळ विसरले. शिक्षण पूर्ण केलं. एमबीए झाले. नोकरीला लागले. तिथे तू भेटलास. पुन्हा लग्न करायचं नाही ठरवूनही तुझ्याकडे आकर्षित झाले. पण नंतर मात्र भानावर आले. माझा भूतकाळ माझ्या वर्तमान आणि भविष्यावरही घाला घालायला पुरेसा आहे याची जाणीव झाली. त्याच दरम्यान अक्षय ऑफिसमध्ये जॉईन झाला. अक्षय आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. आमची  कॉलेजपासूनची मैत्री आहे. त्याने मला चटकन ओळखलं. मग त्याला माझी सगळी कर्मकहाणी सांगितली. त्यालाही माझ्याबद्दल सहानुभूती वाटली. जुनी मैत्री नव्याने सुरू झाली. 

एक दिवस मी काही कामासाठी अक्षयच्या केबिनमध्ये बसले होते, तेव्हा तुझ्या इन्श्युरन्सच्या फाईलमध्ये तुझ्या वडिलांचा फोटो बघितला. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, तर माझं आयुष्य नव्याने घडवणारे सब इन्स्पेक्टर देवळेकर होते. तुझ्या घरची सून होण्याची माझी लायकी नाही अनय. ज्या माणसाने माझं आयुष्य सावरायला मदत केली त्या माणसाच्या उपकारांची परतफेड करण्याऐवजी त्याच्याच घरात सून म्हणून जाण्याचा कृतघ्नपणा मी नाही करू शकत. मला माफ कर”, एवढं सगळं एका दमात बोलून मिताली तिथून निघून गेली. 

मितालीचं बोलणं ऐकून अनय सुन्न झाला होता. आत्ता जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य हेच त्याला कळत नव्हतं. अखेर खिन्न मनाने तो कॉफी शॉप मधून बाहेर पडला. त्यानंतर दोन दिवस अनय ऑफिसलाच आला नाही. अनय तिला स्वीकारेल ही अपेक्षाच नव्हती तिला! पण, त्याच्या ऑफिसला न येण्याने तिला त्याची काळजी वाटू लागली होती. या दोन दिवसात तिने केलेले फोन कॉल्स त्याने घेतले नाहीत, तिचे मेसेजेस वाचूनही त्याने तिला रिप्लाय केलं नाही. पुढे दोन दिवस विकेंड असल्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. मिताली सातत्याने त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होती पण ना तो तिचे फोन घेत होता, ना मेसेजला रिप्लाय करत होता. 

सोमवारी मिताली ऑफिसला गेली तेव्हाही अनय ऑफिसमध्ये दिसला नाही. ती तडक अक्षयच्या केबिनमध्ये गेली आणि अक्षयला म्हणाली, “अक्षय मला अनयची खूप काळजी वाटतेय. आपण जाऊया का त्यांच्या घरी?”

तेवढ्यात अक्षयला फोन आला.फोन झाल्यावर  अक्षयने तिला सांगितलं, “आपल्याला आत्ता घरी जावं लागणार आहे. बाकी सगळं मी तुला नंतर सांगतो.”

मितालीला काहीच कळत नव्हतं. आधीच तिला अनयची काळजी वाटत होती. त्यात आता देवधर आजींचीही काळजी वाटू लागली.  वाटेत अक्षयला तिने बरेच प्रश्न विचारले, पण तो काहीच बोलत नव्हता. घरी आल्यावर मिताली धावतच घरात गेली, तर आतमध्ये सोफ्यावर सब-इन्स्पेक्टर देवळेकर आणि अनय आणि त्याची आई बसली होती. देवधर आजींनी तिला प्रेमाने जवळ बसवलं. 

सब इन्स्पेक्टर देवळेकर म्हणाले, “बाळा, माझ्यामुळे माझ्या मुलाशी लग्न करून माझ्या घरात यायला तयार नाहीस, इतका वाईट वाटते का मी तुला? ही अनयची आई. हुंडा दिला नाही म्हणून भर मांडवातून हिची वरात मागे गेली तेव्हा मी तिच्याशी लग्न केलं आणि तिच्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मी आली. आमच्या घरात लक्ष्मी आहेच आता साक्षात दुर्गा घरात यावी अशी माझी इच्छा आहे. एवढी इच्छा पूर्ण करशील? माझ्या मुलासाठी तुला मागणी घालतोय, माझ्या घरात सून म्हणून येशील?”

मितालीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. 

“मिताली, आजही मी तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं पूर्वी करत होतो. मी तुला तुझ्या भूतकाळासकट स्वीकारायला तयार आहे. माझ्याशी लग्न करशील? असं म्हणून अनयये सर्वांसमक्ष तिचा हात हातात घेतला. मिताली लहून गोरीमोरी झाली. 

तेवढ्यात देवधर आजी म्हणाल्या, “आजच्या दिवसाचं सगळं क्रेडिट अक्षयला जातं, बरं का. त्याने तुमच्या प्रेमाबद्दल मला सांगितलं आणि तोच मला देवळेकर साहेबांकडे घेऊन गेला. देवळेकर साहेब म्हणजे देवमाणूस. या लग्नाला ते नकार देणार नाहीत याची खात्री होतीच मला, पण अक्षयने खूप हुशारीने सगळी परिस्थिती हाताळली.

देवळेकर साहबांनी सर्वांसमोर अनय आणि मितालीच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि म्हणाले,  “अरे हो, महत्वाचं राहिलंच, Thank you Akshay for your co -operation & support…त्यांच्या या बोलण्यावर अनय आणि अक्षय दोघेही गालातल्या गालात हसत होते. 

मानसी जोशी 

Manasi Joshi
Latest posts by Manasi Joshi (see all)

Manasi Joshi

कायद्याची पदवी. सात वर्ष लीगल फिल्डमध्ये काम केल्यावर नंतर स्वखुशीने स्वीकारलेला 'हाऊस वाईफ'चा जॉब. आवड म्हणून सुरू केलेलं लिखाण आता प्रोफेशनमध्ये बदललं आहे. सध्या अर्थसाक्षर.कॉम या वेबसाईटसाठी एडिटर आणि कंटेंट मॅनेजमेंटचं काम करते. - मानसी जोशी

3 thoughts on “माझी होशील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!