घरघर…..
माझ्या हाॅलमधे एक फोटोफ्रेम आहे.
खरं म्हणजे बाहेरच्या खोलीत.
मी आपलं ऊगाच त्याला हाॅल म्हणतो.
फ्रेममधे एक चित्र.
त्यात एक घरंय.
एकटं.
कुठल्यातरी बेटावरचं.
छोटंसं.
कौलारू.
घराबाहेर छोटसं अंगण.
अंगणातली ऊंचच ऊंच नारळाची झाडं.
चित्राला हिरवा रंग देणारी.
अंगण संपलं की, समुद्र.
त्यात माझी छोटीशी बोट पार्क केलेली.
दोरीनं बांधलेली.
बांधली नाही तर, ती जणू पळून जाणार होती.
घरानं जरा हात पाय पसरले असते तर, पाण्यात बुडाले असते, ईतकं सीफेसींग.
समुद्राच्या रूपेरी वाळूत रूतलेलं.
झाडांमागे डोकवणारा ऊगवतीचा चंद्र.
चंद्राचा डीम लाईट आख्ख्या चित्रात पसरलेला.
खरं तर या चित्रात मी कुठंच दिसत नाहीये.
तरीही…
माझ्या मेंदूत कोरलं गेलेलं ते चित्र.
माय ड्रीम हाऊस.
निवांत समाधान देणारं.
पण शेवटी ड्रीम हाऊसच ते.
ड्रीमच राहणार.
त्याची हाऊस अनपरवडणेबल.
हा फ्लॅट घेतानाच, मी फ्लॅट झालेलो.
सोफ्यावर फ्लॅट होवून, मी माझं ड्रीम हाऊस डोळे भरून बघत बसायचो.
डोळे मिटले तरी मला ते दिसायचं.
पाच दहा मिनटं मी माझ्या त्या घरात, राहून यायचो.
मजा यायची.
मग हळूच रिअॅलिटीत परत.
काहीही असो , त्या घरानं माझ्या घराला घरपण दिलं होतं.
परवाचीच गोष्ट.
ख्रिसमसची जोडून सुट्टी.
कोकणच्या हाका ऐकू येत होत्या.
मोचेमाडचा बेत केला.
म्हणलं जरा निवांत असेल.
खरंच होतं.
तुरळक गर्दी होती.
आमचं रिसाॅर्ट बीचपासून दोन मिनटाच्या अंतरावर.
चालत चालत बीचवर आलो.
पोरी किल्लेदार झालेल्या.
बायको सुपरवायझर.
मी आपलं बीचवर फिरत होतो.
बीच बापाच्या मालकीचा असल्यासारखा.
अचानक हा दिसला.
हा फोटोतला.
एकटाच.
वाळूत रूतून बसलेला.
वेळेचं भान विसरलेला.
पाण्याकडे टक लावून बघणारा.
समुद्राचं गाणं…
एकटाच मन लावून ऐकणारा.
थेट माझ्या मनात रूतून बसला.
पांढरा शुभ्र.
पांढरं कंपाऊंड.
त्याला समुद्राची निळाई देणारं, निळ्या रंगाचं ग्रील.
माझ्या चित्रातल्यासारखीच नारळीची झाडं.
ऊतरतं छप्पर.
थोडंस युरोपिअन स्टाईल.
आत पाच सहा खोल्या नक्की असणार.
खिडकीतून डोकवणारं इटालियन मार्बल.
हा बंगला अगदी माझ्या ड्रीमहाऊससारखा.
माझ्या स्वप्नातल्या घराचा जुळा भाऊ.
मी टाचा ऊंचावून आत डोकावू लागलो.
मालक जाम पैसेवाला असणार.
पण दर्दीही असावा.
अभिरूचीवाला.
मला त्याचं कौतुकच वाटत होतं.
साध्या माणसाच्या कुवतीबाहेरचं होतं ते सगळं.
कुवत संपली की जेलसी संपते.
मग फक्त कौतुकच वाटतं.
मी बाहेरच्या वर्हांड्यात बघितलं.
एक डुली खुर्ची.
त्यात एक नवम्हातारा.
बहुतेक नुकताच रिटायर्ड झाला असावा.
एकटाच दिसत असावा.
त्याची बायको ?
घरात नोकर चाकर असणारच.
कुणीही दिसत नव्हतं.
तो आणि त्याचा बंगला.
दोघेही एकटेच.
एकमेकांची सोबत करत असावेत.
मी मनातल्या मनात तिथं रहायला गेलो.
त्याच खुर्चीत डुलायला लागलो.
समुद्रात डुंबणारा मावळतीचा सूर्य.
मी त्यातच बुडालेलो.
एकदम पदर खोचून ही बाहेर.
तावातावानं बोलायला लागली.
” कुठं आणून ठेवलंय बेटावर ?
साधी भाजी घ्यायला ,दोन किलोमीटर तंगडत जावं लागतं.
मी नाही राहणार ईथं.”
तेवढ्यात पोरी वाळूत खेळून आल्या.
” बाबा , बाकी सगळं ठीकेय.
पण शाळा फार लांब पडते रे ईथनं.
जवळपास कुणी फ्रेन्डस्ही नाहीत.
जाम कंटाळा येतो.”
एकदम मलाही जाणवतं.
च्यायला आपली गँग मिस करतोय आपण.
ती गर्दी , तो गोंगाट , ते घड्याळाचं गुलाम होणं.
कितीही बोंबा मारल्या तरी, तेच आवडत होतं.
करमत नाही त्याशिवाय.
झक मारली अन् ईथं आलो.
सगळी कमाई ओतली अन् हे घर बांधलं.
आता परतीचे रस्ते बंद…
एकदम भानावर आलो.
च्यामारी ,हे माझं घर नव्हतंच.
एकदम रिलॅक्सलो.
माझी एकटेपणाची नशा ऊतरली.
घरापासून लांब पळालो.
परत पोरींच्या किल्ल्यापाशी आलो.
बायको समुद्राकडे एकटक बघत ऊभी.
मला एकदम माणसात आल्यासारखं वाटलं.
फोन किणकिणला.
शेजारच्या जोशींचा फोन.
” तुमचा बाहेरच्या खोलीतला लाईट चालूच आहे.
बंद करतो.
माझ्याकडे किल्ली आहे .”
माझ्या खर्याखुर्या ड्रीमहाऊसच्या आठवणीनं, मला गलबलून आलं.
एकदम माझ्या फ्लॅटची आठवण यायला लागली.
काही घरं स्वप्नात सुद्धा, न परवडणेबल असतात.
नुसती घरघर…
………कौस्तुभ केळकर नगरवाला.
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021