विजया

उन्हें कलायला लागली होती. तरी माणदेशातलं ऊन होतं, लगेच सौम्य होणार नव्हतं. एस टी म्हसवड पर्यंतच होती. ती उतरली अन चालायला लागली. सरळ रस्त्याला लागली. तिला संध्याकाळच्या आत वरकुट्याला पोचायचं होतं. अजून ९-१० किमी चालावं लागणार होतं. वरकुटे गावासाठी अजून एस टी सुरु झाली नव्हती. आणि एक होती, ती एखाद किलोमीटर वरच्या फाट्यावरून जायची ती सकाळीच निघून गेली होती. चालण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि तिची तशी तयारीही होती. उन्हाशी तिची लहानपणापासून दोस्ती होती. ओढ्यावर धुणं धुवायचं असू दे, कि माळाकडच्या रानात आईसोबत भांगलण….. गाय चारायची असू दे कि सरपण आणायचं असू दे उन्हाशी आणि पर्यायानं  “डी” व्हिटॅमीनशी तिची गट्टी होती.

काही अंतर मोठ्या डांबरी सडकेने गेल्यावर तिनं लहान रस्ता पकडला. महादेव मळ्यापासून जाणारा रस्ता चालत्या माणसासाठी जवळचा.  माणगंगेच्या काठाने जाणारा, मध्येच पात्रात उतरून मध्येच माणसात येणारा, हाच जवळचा रस्ता. वाहातं पाणी जवळचा रस्ता शोधून काढतं म्हणतात. तशी माणदेशातली माणगंगा म्हणजे कोरडीच, पावसाळ्याशिवाय पाणी नाही. एरव्ही बैलगाड्यांच्या येण्याजाण्यानं रस्त्यात रूपांतरित झालेला. काखेला मोठी बॅग, हातातल्या बॅगेत, आईने दिलेली थालपीठं आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची भरपूर औषधं, गोळ्या आणि एखादी फाइल.

एकांड्या रस्त्यावर भीती हा तिचा स्वभाव नव्हता. आई सोबत गावापासून 2 किमी दूर आपलंच पडीक शेत कसायला सुरु केलं तेव्हाही ती अशीच बिनधास्त एकटी यायची , जायची. आताही आईला भेटून आली होती. नवीन ऊर्जा अंगात भरली होती. आणि रस्त्यावरच्या वाड्या वस्त्यांवर आरोग्य केंद्रातली हि ताई आता ओळखीची झाली होती. कोणी भेटलंच रस्त्यात , तर एखादी सर्दी पडश्याची गोळी मागणार, दुसर काय? आणि कोण भेटणार रस्त्यात, फारतर माळावर मेंढरं चारणारा एखादा धनगर, ” पाणी प्यायचं का , पोरी? ” असं बापाच्या मायेनं विचारणारा….

दहा वर्षापेक्षा जास्त नोकरी झाली तरी, दूरच्या आडगावातली बदली टळत नव्हती. या आडगावातल्या नोकरीमुळे लग्न ठरुन सुद्धा लांबत चाललं होतं. तिकडे आईची तब्येतही बरी नसायची, त्यामुळं दर रविवारी आईकडे जाणंही भाग होतं.

या सगळ्याचा विचार करायला वेळच नव्हता. चालतानाही डोक्यात कामाचेच विचार घोळत होते. रिपोर्ट फाइल मध्ये अजून थोडं काम बाकी होतं. सोमवारी जिल्हयाचे कुणी मेडिकल ऑफिसर येणार होते. त्यांना फाईल्स दाखवायच्या होत्या. गावोगावी, वाड्या वस्त्यांवर जाऊन केलेले सर्वे, लसीकरणाचा रिपोर्ट, औषधांचा रिपोर्ट सगळं काही रात्री चेक करावं लागणार होतं. इतका सगळा विचारांचा गोंधळ उडाला कि आता रस्त्यात माळावरच फाईली उघडून बसावं कि काय असं वाटायला लागलं. विचारांची गती आणि पावलांची गती वाढत चालली होती.

मागच्या पोस्टिंगवरही अशीच उपकेंद्रावर व्हिजिट होती, …… मेडिकल ऑफिसरची.

अन तिला नेमका मेमो मिळाला होता.

माणगंगेच्या पात्रासोबत चालता चालता, मन मात्र, मागे मागे जात होतं. तिला मागच्या पोस्टिंगमधल्या व्हिजिटची उजळणी चालली होती. ऐन व्हिजिटच्या दिवशी, गावातल्या मनूकाकांचा पप्या जखमी झाला होता. बैलांनं त्याला शिंगावर घेऊन आपटलं होतं. केवढं रक्त वहात होतं. नववीतला पप्या बेशुद्ध झाला होता. दृश्य पाहून गावकऱ्यांपेक्षा हीच जास्त घाबरलेली. कशीबशी सावरत, तिने जखमा बांधल्या. लोकांच्या त्या भाऊगर्दीत ती कधी जीपमध्ये बसून पप्या सोबत, साताऱ्याला गेली, तिचं तिलाही कळलं नाही. पूर्ण रस्ताभर, तो कसा शुद्धीत राहील याचीच काळजी घेत राहिली. साताऱ्यातल्या डॉक्टर्सच्या ताब्यात दिल्यावरच ती निर्धास्त झाली. पण तोवर, मोठे डॉक्टर गावात येऊन गेले. उपकेंद्रावर चिटपाखरूही नव्हतं. आता सारखे मोबाईल हाताशी नव्हते. लाल शेरा पडला. त्यावेळी ते साताऱ्यातल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधले, पप्याला ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्स मदतीला धावून आले. त्यांच्या फोनमुळं मेमो कसाबसा क्लिअर झाला.

विचारांगणिक तिचा वेग वाढत होता. तिची पावलं झपाझप पडत होती. तिचा मुक्काम पूर्वी नानाच्या वाड्यात असायचा. नाना ….. गावातलं वडील माणूस. नानी तशी गावात खडूस, पण या ताईला लेकीसारखी जपायची. पण पेशंटची वाड्यात लाईन वाढायला लागली तशी तीन तिचं शेजारचं मोठं घर रिकामं करून दिल.

” मांड हिथं तुझं औषधाचं दुकान, काही लागलं तर सांग, रात्री सोबतीला यिन मी झोपायला.”

डोक्यावरचा पदर सांभाळत नानीने तिच्या या लेकीला घर लावून दिलं. इथली घरं धाब्याची, खाली जाड लाकडी फळ्या, लाकडी अढी अन वर छान पांढरी माती. त्यावर कितीक वेली अन फुलझाडं उगवायची. हे असं डोक्यावर बाग घेऊन रहायचा गमतीशीर प्रकार तिच्यासाठी नवीन होता. उन्हाळ्यातल्या सूर्याच्या अवकृपेला, धरणीच्या मायेचा पदर छतावर पांघरून दिलेलं हे उत्तर म्हणजे हि धाब्याची घरं……

उजवीकडे मळ्यातली घरं दिसायला लागली होती. म्हणजे अजून दोन तीन किमी ….. मग आलंच वरकुटं. माळावरच्या कुसळातून संध्याकाळची गार हवा झिरपू लागली होती.

घरात पाणी असणार नव्हतं. हापस्यावर जाऊन पाणी भराव लागणार होतं. बरंच काम बाकी होतं. गावात आरोग्य केंद्राची अशी स्वतंत्र इमारत नव्हती. हीच घरच गावाच प्राथमिक आरोग्य केंद्र बनलं होतं. त्यामुळं घराच्या परिसराची स्वच्छतासुद्धा करणं गरजेचं होतं.

घामाघूम होत घरात पोचली न पोचली तोच नानी आली चहा घेऊन. नानीने सगळं अंगण झाडून साफ केलं होतं. कुणी सायब यायची खबर तिला पण लागली होती. नानीच्या नातवाने कळशी भरून आणून ठेवली. फ्रेश होऊन ताईने सगळ्या फाईली ओळीने मांडल्या. एकेक कागद तपासून , अपूर्ण कागद पूर्ण करत राहिली. औषधांचा हिशोब लावत राहिली.गावोगावी फिरून, बाया बापड्यांना औषध, आवश्यक व्हिटॅमिन गोळ्या देत रहायचं. त्यात या औषधांविषयी अनेक गैरसमज , अन्धश्रद्धा. सगळं सांभाळत पुन्हा घरोघरी कुटुंब नियोजनाचा डोस पाजत रहायचं. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं.

कुटुंब नियोजनाच्या केसेस ची फाइल भली मोठी झाली होती. समोर नानी तिच्याकडं बघत बसली. विचार करत राहिली,  तिची लेक शिकली असती तर अशी कागद लिव्हत बसली असती.

………………………. . . . . . . . . . . . . . . .

दुसरा दिवस उजाडला. मेडिकल ऑफिसर आणि त्यांची टीम येणार होती. त्यामुळं आज कुठं व्हिजिटला जाणं शक्य नव्हतं.  दिवसभर कुणी ना कुणी घरी येऊन औषध घेऊन जात होती. शाळेतल्या पोरांची आठ्वड्याभराची व्हिटॅमीनच्या गोळ्यांची पाकीट सकाळी शाळेच्या बाईंकडे देऊन टाकली होती. दुपार झाली तरी अजून टीमचा पत्ता नव्हता. टीम तशीही पंधरा मिनिटांपेक्षा जास्त थांबणार नव्हती. पण अजूनही टीमचा पत्ता नव्हताच.

इतक्यात नानी धावत आली. सूर्यवंशी वस्तीवरच्या आबांच्या सुनेला कळा सुरु झाल्या होत्या. बैलगाडीने म्हसवडला नेणं भाग होत. आबांनी बैलगाडी तयार केली होती. पण या औषधवाल्या ताईने सोबत जावं अशी सगळ्यांची इच्छा होती. आता ती द्विधेत फसली होती. इकडे कुणी साहेब यायचा होता. नानीला उमजत होतं. पण आबांच्या सुनेला घेऊन जाणंही गरजेचं होतं. गावातल्या दाईकडून डिलिव्हरी करून घेणं म्हणजे गुन्हाच ठरला असता.

तिनं घराला कुलूप लावलं अन काही प्राथमिक औषध घेऊन बैलगाडीत बसली. गादीवर बाळंतीण पडली होती. म्हसवडच्या दिशेनं बैलगाडी निघाली. गाडीत बाळंतीण असल्याचं जणू बैलांनाही कळलं होतं. अगदी आबदार गाडी म्हसवडला तास दीड तासात पोचली. बाळंतीण तिथल्या डॉक्टरांच्या ताब्यात गेली. आता चिंता नव्हती.

इकडे डॉक्टरची टीम पोचली होती. पुन्हा तोच प्रसंग. जवळजवळ उन्हं मवाळ झाली होती. नाना नानीने चहा टाकून ताईची बाजू सांभाळली होती. तोपर्यंत डॉक्टर तिथं पडलेल्या फाईल्स चाळत राहिले. फाईलवर्क चोख होतं. पण आरोग्यसेविका जाग्यावर नसणं थोडं अपमानजनक वाटत होतं. मग कारण कितीही योग्य असलं तरी पोस्टचा इगो , वेळ जाईल तसा वाढत चालला. नाना आपलं उगाच डॉक्टरच्या मागं पुढं करत होते. प्यारसिटमाल असले शब्द वापरुन आपलं वैद्यकीय ज्ञान दाखवायचा प्रयत्न करत होते.

बाळंतीण म्हसवडला डॉक्टरांच्या ताब्यात देऊन ताई त्याच बैलगाडीने पुन्हा वरकुट्यात पोचली. रात्री कधीतरी डिलिव्हरी होईल असा डॉक्टरांचा अंदाज होता. इकडे टीम पोचून पाऊण एक तास झाला होता.

आल्या आल्या समोर डॉक्टर उभे होते. डॉक्टर घड्याळात पहात होते.

” सॉरी डॉक्टर, ….. पण बाई अडली होती. घेऊन जाणं भाग होतं. घरच्याघरी डिलीव्हरी करू नका म्हणून आपणच जनजागृती करत फिरतो. मग तिला अर्ध्यात कुठं सोडणार ? मी दाखवते सगळे रेकॉर्ड्स तुम्हाला.

“मी बसल्या बसल्या सगळ्या फाईल्स चेक केल्यात ताई …… तुम्ही बसा शांत. नानीने केलेला चहा घ्या. हे माने म्हणत होते, …… निघून जाऊ या म्हणून….. पण बरं झालं थांबलो…… तुमची भेट तरी झाली.”

नाना बारकाईनं पहात होते. मघाशी वैतागलेला डॉक्टर, ताई आल्यावर एकदम मवाळ कसा झाला, हे त्यांना समजत नव्हतं.

“मेमो देऊ नका प्लिज …… या आडगावातल्या  गैरसोयीमुळं आज बाळंतीण १० किमी बैलगाडीतून न्यावी लागतेय. या गावात उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत हवी खरंतर. इथं माझ्या घरातच सगळं चालतंय. यासाठी आजही गाव तुमच्याकडे खेटे घालत असतं. त्याचं काहीतरी बघा.”

“ताई, लाजवू नका हो प्लिज. तुम्हाला मी काय मेमो देणार.” आणि नानांकडे वळून पहात डॉक्टर म्हणाले,

” नाना, उद्या किंवा परवा साताऱ्याला या आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या स्वतंत्र इमारतीचं पत्र ताब्यात घ्या. पी डब्लू डी च्या  वर्क ऑर्डरचं मी बघतो. आणि या ताईंनी कुटुंब नियोजनासाठी केलेल्या कामाची फाइल मी पाहीलीय, फाइल सोबत घेऊन चाललोय, पारितोषिकासाठी पाठवतोय.”

विजयाला, डॉक्टर चेष्टा करतात की खरं बोलतात हेच कळत नव्हतं.

पुन्हा एकदा चहा घेऊन डॉक्टर निघण्यासाठी उठले, अन पटकन विजयाच्या पायाशी वाकले. ती जरा मागे सरकली.

“ताई, मागे सरकू नका….. हा तुमचाच मान आहे. तुम्हाला आठवत नसेल पण, तुम्ही त्या दिवशी , धावाधाव केली नसती तर, आज हा डॉक्टर आपल्या पायांवर तुमच्यासमोर उभा नसता……. इतका वेळ झाला पण या पप्याला ओळखलं नाहीत तुम्ही.” ! असं म्हणत डॉक्टर पुन्हा वाकले.

तिच्या डोळ्यात पाणीच तरारलं. कोण कुठलं लेकरू, आठवण ठेवून इतक्या वर्षांनी कृतज्ञता दाखवत होतं. सेवेचे बंध कितीही तात्पुरते असले तरी, त्यातला ओलावा टिकतो म्हणतात.

“पुढच्या वेळी येईन तेव्हा जेवायला येईन ताई.”

एवढं बोलत डॉक्टर गाडीत बसले आणि गाडी धूळ उडवत निघून गेली.

नानांनी तो धुरळा डोळ्यात गेल्यागत केलं अन डोळ्यातलं पाणी लपवत ताईला म्हणाले, ” पोरी, नावापरमान  आक्षी “ईजया” हायेस.”

©बीआरपवार

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

3 thoughts on “विजया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!