आदिशक्ती….
अंजली चार घरची काम करून तिचं आणि तिच्या मुलीचं म्हणजे दुर्गाच पोट भरत असे. तसं बरं चाललं होतं दोघींचं. गावाबाहेर लांबवर लहानसं घर होतं त्यांचं. दोघीच होत्या एकमेकींना आणि अंजलीला आंबेमातेची साथ होती. म्हणजे तिची देवीवर प्रचंड श्रद्धा होती. म्हणूनच मुलीचं नाव दुर्गा ठेवलं होतं तिने. नवरात्रात नऊ दिवस अंजलीच्या अंगात यायचं. दोन दोन तास ती देवीसमोर घागर फुंकायची आणि घुमायची. दुर्गाला ह्याची खूप लाज वाटत असे. दुर्गा सात आठ वर्षांची झाल्यावर अंजलीला म्हणायची देखील की “आई ही नाटकं बंद कर!” अंजलीने कितीही समजावून सांगितलं तरी दुर्गाला ते पटत नसे!
दुर्गा बारा वर्षांची असताना एका नवरात्रात अंजलीच्या अंगात आलेलं असताना तिथे आणखी एक अंगात आलेली बाई येऊन घागर फुंकू लागली. नंतर आणखी चार जणी आल्या. त्या दिवशी अचानक दहा बायका घागर फुंकू लागल्या. दुर्गा तो प्रकार पाहून चिडून घरी निघून गेली. जेवून झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तर अंजली बाजेवर झोपलेली. शेजारी कालच्या त्या घुमणार्या बायकांपैकी एक बाई. दुर्गाला काळजी वाटली.
दुर्गा- काय झालं आई तुला?
बाई- काल घागर फुंकताना बेशुद्ध पडल्या. मग आम्ही घरी घेऊन आलो.
दुर्गा- मी म्हणत होते इतकी वर्षे की ही नाटकं बंद कर म्हणून. पण ऐकलं नाहीस तू.
दुर्गाच्या लक्षात आलं की आईला ताप आलाय.
दुर्गा- थांब मी डॉक्टरला घेऊन येते.
अंजलीने तिचा हात धरला आणि म्हणाली-
अंजली- दुर्गे…मी जाते आहे ग. मला माझी अंबामाता बोलावते आहे. ती बघ…
दुर्गाने अंजली बोट दाखवत होती तिथे पाहिल. तिथे फक्त खिडकी होती.
दुर्गा- आई, मी आणते डॉक्टरला…
अंजली- तितका वेळ नाहीये दुर्गे. मला काळजी आहे की माझ्या नंतर तुझं काय होणार? लहान आहेस ग तू अजून…
त्यावर शेजारी बसलेली बाई म्हणाली-
बाई- ताई मी शांता. मी घेईन काळजी दुर्गाची. माझं कोणीच नाहीये जगात. भीक मागून जगते मी. मला छप्पर मिळेल आणि दुर्गाला आधार! मी वचन देते. दुर्गा सज्ञान होईपर्यन्त मी तिचा सांभाळ करेन. मला आत्ताच देवीचा आदेश आलाय!
हे ऐकून अंजली दुर्गाला म्हणाली-
अंजली- दुर्गे मला वचन दे की तू शांता बरोबर राहशील. दे वचन. ही माझी शेवटची इच्छा आहे.
दुर्गा कडून वचन घेऊन अंजलीने शांतपणे डोळे मिटले. कायमचे! अंजलीचं असं अचानक जाणं दुर्गाला खूप लागलं. शांता तिथे राहू लागली पण दुर्गा तिच्याशी कधीच बोलली नाही. शांता मात्र दुर्गाचं सगळं मनापासून करत असे. नवरात्रात आरती ऐकू आली तरी दुर्गाला अंगात आलेलं आवडत नाही म्हणून शांता कानात बोळे घालून कान बंद करून आरती ऐकू येणार नाही ह्याची काळजी घेत असे!
आज सात ऑक्टोबर. घट स्थापनेचा दिवस आणि दुर्गाचा तारखेने एकोणीसावा वाढदिवस. आज शांता ने जेवायला खीर केली. दुर्गाला आवडते म्हणून. दुर्गा जेवली. शांता सकाळपासून थोडी अस्वस्थ आणि आजारी वाटत होती. दुर्गाने दुर्लक्ष केलं. शांता दिवसभर पडून होती. संध्याकाळी दुर्गा दारातून ओरडली-
दुर्गा- दांडियाला जाते आहे. उशीर होईल.
दुर्गा गेली. शांता क्षीण आवाजात “उशीर नको करू” असं म्हणून डोळे मिटून पडली. ती तापाने फणफणली होती!
दुर्गा घराबाहेर थांबलेल्या तिच्या कॉलेज मित्र आशिष बरोबर गावाकडे निघाली. दुर्गाचं घर आणि गाव ह्यात दोन मैलांचं अंतर. वाटेत ओसाड जंगल. दिवसा लोक गुर चारायला आणायचे. रात्री चिटपाखरू नसे तिथे. दोघे गावाकडे चालत निघाले होते. आशिषच्या मनात पाप. घरापासून दूर झाडीत आल्यावर आशिषने दुर्गाला मागून मिठी मारली आणि तिला काही कळायच्या आत तिला मातीत आडवी पाडली. दुर्गा एकदाच किंचाळू शकली. मग तिच्या तोंडात आशिषचा रुमाल कोंबला गेला. त्यांच्यात झटापट सुरू झाली. आशिषच्या ताकदीपुढे दुर्गाचा विरोध कमी पडत होता. आशिष तिचा ताबा घेणार इतक्यात आशिषच्या पोटात जोरात लाथ बसली. आशिष कळवळला. तिथे शांता उभी होती. डोळ्यात अंगार. इतक्यात गावात आंबेमातेची आरती सुरू झाली. आरतीचा आवाज कानात पडल्यावर शांता अंगात येऊन घुमू लागली. आशिष ने संधीचा फायदा घेत तिथेच पडलेली एक फांदी उचलली आणि शांताच्या डोक्यावर प्रहार केला. अचानक आशिषच्या डोक्यातून काहीतरी प्रहार झाल्यागत रक्त येऊ लागलं. आशिष वेदनेने ओरडला. मग रागाने खवळलेला आशिष घुमत असलेल्या शांता वर प्रहार करत राहिला आणि तो जिथे जिथे तिच्यावर प्रहार करत होता त्याच्या त्या त्या अंगावर मार पडत होता! आशिष दमला, घाबरला, भेदरला आणि दुर्गाला म्हणाला-
आशिष- ही कोण आहे?
दुर्गा- ही शांता आहे. आमच्या घरी इतक्या वेळा भेटला आहेस तरी विचारतोस?
आशिष- (वेडा होत) तुझ्या घरी? तुझ्या घरी तू एकटीच राहतेस इतकी वर्षे. सगळ्या गावाला माहित्येय. ही कुठून आली अचानक?
हे ऐकून दुर्गाने शांताकडे पाहिलं. आता शांताच्या जागी तिला आत्ताच पूजा झालेली तेज:पुंज अंबाबाई दिसत होती. दुर्गाचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अंबाबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली-
अंबाबाई- दुर्गे, मी अंजलीला दिलेलं माझं वचन आज संपलं. जाते मी आता. काळजी घे पोरी.
दुर्गाचे हात नकळत जोडले गेले. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आशिषला फक्त रडणारी दुर्गा दिसत होती.
दुर्गा- माते मला माफ कर. मी आईच्या श्रद्धेवर अविश्वास दाखवला. तुझ्याशी फटकारून वागले. नको जाऊ तू.
अंबाबाई- दुर्गे, ज्याच्या मनी श्रद्धा त्याच्या जवळ मी आहेच ग. पण आज वचनातून मुक्त झाले. जाते मी.
दुर्गा- माते, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर आजपासून दर नवरात्रीचे नऊ दिवस माझ्या अंगात वास कर तू!
अंबाबाई ने वात्सल्याने एक स्मित केलं आणो अंबाबाई दुर्गेच्या शरीरात अंतर्धान पावली!
त्या रात्री दुर्गा अंबाबाईच्या देवळात दोन तीन तास घागर फुंकत घुमत होती. गावकरी आपापसात कुजबुजत होते की “गावाबाहेरच्या एकटी दुर्गा आज कशी काय घुमू लागली?”
दुर्गाला मात्र घुमताना शेजारी घागर घेऊन घुमत असलेली, डोळ्यात आनंदाश्रू असलेली अंजली दिसत होती. गाभार्यात आंबेमाता तेजस्वी स्मित करत दुर्गाला आशीर्वाद देत होती. उदो बोला उदो अशी आरती जोरात सुरू होती!
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023