नैना ठग लेंगे…६

पिनाक त्रंबकेश्वरासमोर अभिषेकाला बसला... शिवलीलामृताचा अकरावा अध्याय म्हणत असतानाच त्याला ध्यानाची आस वाटू लागली.. डोळे मिटून तो पद्मासनात ताठ बसला होता... अध्याय संपला आणि त्याच वेळी त्याची समाधी लागली..
पिनाक 
लांब कुरळे केस, 
कपाळावर त्रिपुंड्र, सतेज कांती, तीक्ष्ण पण शांत नजर,  जाड भुवया मधोमध जोडल्यासारख्या, धारदार नाक, सणसणीत उंची, पिळदार यष्टी अन त्यावर रुळणारं जानवं, आणि ओलेतं सोवळं ...
देखणं रूप...
वयाच्या मानाने तो इतरांपेक्षा जास्त समंजस होता.. त्यामुळेच मित्रांचा गोतावळाही खूप मोठा होता....

त्याची ती ध्यान मूर्ती पाहून पुजारी ही नतमस्तक झाले.. बाहेर कोसळणारा पाऊस,  विजेचा गडगडाट या वातावरणात मंदिरात  संध्याकाळची आरती झाली आणि तरी ही त्याची समाधी ढळली नाही..

आता देवापुढे निरांजन शांत तेवत होतं.. त्याने हातांची ओंजळ केली.. दोन्ही तळवे एकमेकांवर अलगद घासले आणि ते डोळ्याला लावले.. आणि हळूहळू डोळे उघडले..
बाहेरचा पाऊस शांत झाला होता... त्यानं साष्टांग नमस्कार केला आणि सगळं आवरून तो बाहेर पडला..
गावातल्याच एका मित्राला ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी सोडायला सांगितलं... पण तेवढ्यात सुमितचा कॉल आला.. नैना मिसिंग आहे, गावातली पोरं घेऊन हरिहरच्या पायथ्याशी ये..आता त्यानं सोबत म्हणून अजून दोन पोरांना घेतलं आणि ते निघाले..
पिनाक आता गडाच्या अलीकडच्या हॉटेल पाशी पोचला..
पिनाक नैना ला कॉल लावत होता पण .. फोन लागत नव्हता.. विभा सुमित ही नेटवर्क च्या बाहेर... त्यानं थोडं अन्न आणि पाणी पार्सल घेतलं आणि तो पुढे निघाला..
गडाच्या पायथ्याशी एक म्हसोबा मंदिर होतं.. तिथून एक पायवाट जंगलाकडे आणि एक गडाच्या दिशेनी जात होती..
गाव तसं सुधारलेलं होतं.. त्यामुळे मंदिरात दिवाबत्ती होती.. गडाच्या वाटेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक लाईट पोल अजून टिकून होता..
नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण कुंद होतं..
पिनाक ला एकट्याला सोडून मागे फिरावं असं कुणालाच वाटत नव्हतं.. पण पिनाक ला तो नेमका कुठे जातोय हे ही कळू द्यायचं नव्हतं..
इतक्यात जंगलाच्या दिशेनी एक किंकाळी ऐकू आली... आणि विरली...

पुन्हा एकदा किंकाळी... सगळे त्या दिशेनी निघाले... पिनाक सतत नैना ला ट्राय करत होता पण अजूनही रेंज नव्हती.. आणि वाटेत एका बाजूला एक मुलगी गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली दिसली.. सगळे तिच्याजवळ गेले.. ती विभा होती.. भीतीने थरथरत होती... पिनाक ला पाहून तिला जरा बरं वाटलं.. तिने फक्त पुढच्या वाटेकडे बोट दाखवलं..
पिनाक आणि अजून एक साथीदार पुढे आले बाकीचे दोघे तिच्या सोबतीला थांबले..
एकीकडे सुमित आणि त्याचा एक मित्र जखमी अवस्थेत होते... एखाद्या जंगली श्वापदाने हल्ला केल्यासारख्या खुणा त्यांच्या अंगावर दिसत होत्या..
त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना जागं केलं..
नैना कुठाय... सुमित... नैना कुठाय?
पिनाक नैनाच्या काळजीनं अस्वस्थ झाला..
सुमित काहीही बोलण्याच्या परीस्थितीत नव्हता...
नैना sss... नैना ssss...

त्यानं तिला हाका मारायचा सपाटाच लावला..
तिला शोधत तो बराच पुढे आला .. आता एका बाजूला नाथ मठीचा रस्ता दिसला
जे साध्य करायचंय त्याच्या इतक्या जवळ पोचूनही ते साध्य करता येईल का? अशी शंका त्याच्या मनात आली..
... काय करावं या विचारानं त्यानं क्षणभर डोळे मिटले आणि नाथआदेश प्रमाण मानून त्यानं नैनाला शोधायचं ठरवलं..
तो पुढे जाता जाता अचानक थांबला... राहुलच्या वेळी जाणवली होती तशीच हो.. अगदी तशीच थंड शिरशिरी पुन्हा मणक्यात जाणवली.. कुबट वास येऊ लागला आणि अंगातलं त्राण जातंय की असं ही वाटून गेलं..पण तो सावरला..
पुन्हा एकदा कानोसा घेतला.. डाव्या बाजूनं पाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला..
खरतरं अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती घाबरून जाईल पण पिनाक शांत होता..

त्यानं जवळच पडलेली एक मजबूत फांदी उचलली आणि तो पुढे चालू लागला..
रातकीड्यांचा किर्रर्रर्र चित्कार, मधूनच काजव्याचा मंद उजेड, आकाश स्वच्छ झाल्यानं अवसेचा गूढ पांढुरका प्रकाश..
पायतल्या ओल्या पाचोळ्याचा चिप चिप असा आवाज...

अंदाज घेत तो पुढे आला.. एक छोटासा झरा खळखळत होता.. त्यानं मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या पाण्यात त्याला अचानक लालसरं ओघळ दिसला.. एखादं जंगली जनावर आजूबाजूला नाही ना.. याची खात्री करून घेतली आणि तो पुढे आला.. इतक्यात त्याच्या मानेवर काही थेंब पडले.. पावसाचे फांदीवरचे ओघळ असतील असं समजून दुर्लक्ष केलं.. आणि पुन्हा एकदा काही थेंब त्याच्या अंगावर पडले यावेळी तो मागे सरकल्यामुळे छातीवर पडले.. टॉर्च च्या उजेडात पाहिलं तर ते रक्त होतं... त्यानं झटकन वर पाहिलं आणि एक हात लोंबकळला..
तो झटकन बाजूला झाला तर समोरून एक आकृती झाडामागे जाताना दिसली...
एव्हाना सुमित विभा सावरले होते.. बाकीचे मित्र त्यांना त्या हॉटेलवर पोचवून वाटाड्या ला घेऊन जंगलात पिनाक ला शोधायला परत आले होते..
इतक्यात पिनाकचा फोन वाजला...
त्याच्या गावातल्या मित्रांनी वाटाड्याच्या मदतीने त्याला गाठलं..
झाडावरच्या त्या व्यक्तीला खाली उतरवलं.. तो सुमितचाचं मित्र होता, तोंडावर पाणी मारलं तसा तो शुद्धीवर आला..
नैना अद्याप सापडली नव्हती..त्यानं पुन्हा तिला कॉल करायचा प्रयत्न केला.. पण फोन काही लागला नाही..इतक्यात विभाचा कॉल आला.. नैना हॉटेलला पोचलीये.. तू लवकर पोच..सगळे सापडल्यामुळे तो जरासा निश्चिन्त झाला..
पण अजूनही ती झाडामागे जाणारी आकृती कोण होती याचा उलगडा झाला नव्हता..

तो हॉटेलवर पोचला तेव्हा नैनाआणि विभा चेंज करून बाहेर येत होत्या..
नैना विभाला धीर देत होती.. सुमित आणि बाकीच्या दोन्ही मुलांना जवळच्या दवाखान्यात नेलं होतं..
पिनाक समोर दिसताच नैना उठून बाहेर आली.. आणि त्याच्या डोळ्यांत पाहत त्याला बिलगली.. त्याच्यासारख्या साधकासाठी हे वर्ज्य होतं.. पण तिच्या डोळ्यांत त्याला तिचं त्याच्याकडे आधारासाठी झुकणं दिसलं आणि त्यानं तिच्या डोक्यावर अलगद थोपटलं..
तिचे हिरवे निळसर डोळे आता हरिहर गडाकडे पाहत होते आणि तिच्या 'निरागस!' डोळ्यांकडे तो एकटक पाहत होता..
पण तेवढ्यात मोबाइल चा मेसेज टोन वाजला.. त्यानं मेसेज वाचला..नचिचा होता..
राहुल गेल्याचा मेसेज होता तो..
नैना पुन्हा आत गेली आणि त्यानं हेडफोन घातला.. नचि ला फोन करायला आणि मालकानं रेडिओ लावला..
खर्रर्रर्र खर करत स्टेशन सेट केलं..

आणि गाण्याचा आवाज आला..

भला मंदा देखे णा , पराया ना, सगा रे
नैणो को डसने का चस्का लागा रे
नैणो का जहर नशीला रे 
बादलो में सतरंगीयां बोवें
भोर तलक बरसावे
बादलो में सतरंगीयां बोवें
नैणा बावरा कर देंगे
नैणा ठग लेंगे....

नैनाच्या आईला आज समोरच्या पिंपळावर काळपट वेल चढलेली दिसली...आणि तिने खिडकी घट्ट बंद करून घेतली..

#नैना हॉटेलला कशी पोचली?
#सुमित आणि त्याचे मित्र सांगू शकतील नेमकं काय झालं?
#कसा मॅनेज करेल  पिनाक या सगळ्या परिस्थितीला..
#नैना च्या आईचा यां सगळ्याशी काही संबंध असेल?

क्रमश :
©मनस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!