कोई जब राह दिखाये….भाग १

हे माझं जग. ते त्याचं जग. मधे हे जेमतेम कमरेपर्यन्त असलेलं भिंतवजा कुंपण.

त्याचं म्हणजे ‘आरजे’चं. मैने रखा है उसका नाम| मला त्याचं नाव माहीत असायचं काही कारण नाही. पलीकडे, त्याच्या जगात एक बगीचा आहे. रेड कलर का जॉगिंग ट्रॅक है| वो हर सुबह जॉगिंग करने आता है| रेड जॉगिंग ट्रॅकपे दौडनेवाला – इतकीच ओळख आहे त्याची मला. म्हणून मी त्याला ‘आरजे’ म्हणतो. आमच्या बसमध्ये म्यूजिक लावतात. त्यात ऐकलेय् मी ‘आरजे’.

मी झारखंडहून इथे आलो. छोटी-मोठी वेल्डिंगची कामं करत होतो. मेरे दूरके एक रिश्तेदार चाचाने मुझे कहा और मै इधर काम करने लगा| मेरी उमर भी होगी करीब करीब ‘आरजे’के जितनी. मी इथे आलो, तेव्हा इथे फक्त मोकळं मैदान होतं. गवत साफ केलं. मजुरांना राहण्यासाठी ४ शेड बांधल्या. प्रत्येक शेडमध्ये ८ खोल्या. खोलीला एक दरवाजा, एकच खिडकी. छताला पत्रा आणि नाखुशीने फिरणारा पंखा. गर्मी के दिनोंमे हालत बहोत खराब हो जाती है| लेकिन हम ठहरे मजदूर, आमच्यासाठी कशाला आरामाची जिंदगी?

त्याच्या जगात असणार आराम. चांगल्या घरचा दिसतो. कॉलेजमध्ये असावा. कपडे भी सही है उसके , टी-शर्ट और ट्रॅक पॅंट. क्या हीरो के माफिक लगताय| शूज भी एकदम स्टाइलमे हं. पळताना किंवा एरवीही तो गाणी ऐकत असतो. कानात ईयर प्लग घालून. मोबाइल असतो दंडावरच्या पट्ट्यात. इधर उधर देखताच नही है| अपनीही धून में रहता है|  मुझे क्या लेना-देना उससे? 

*************

गेली दोन वर्षे येतोय जॉगिंगला. आज पहिला राऊंड झाल्यावर का कोण जाणे, असं वाटलं दोन डोळे पाठलाग करतायत आपला. छे! आपल्याला उगाचच भास होतोय. पलीकडे मुंबई मेट्रो बांधकामावर काम करणार्‍या मजुरांची वसाहत आहे. तात्पुरत्या शेड दिसतायत. कुंपण काही फार उंच नाहीये. पलीकडचं दिसतंय. त्यांचा दिवस सुरू झालाय. आळसावलेला कुणी दात घासतोय, कुणी टॉयलेटला चाललाय, कुणी बाहेर आंघोळ करतोय, कुणी फोनवर बोलतंय, गावाकडे, फॅमिलीसोबत बोलत असणार. शेडमध्ये फक्त झोपत असावेत, बाकी सर्व आवराआवर बाहेर! इतके दिवस आपलं लक्ष नाही गेलं, आज मात्र खिडकीतून दोन डोळे… हा मन्ना डे पण मुलायम आवाजात तेच गातोय कानात – पर रुक जा, मन की सदा भी सुन दीवाने, तेरे नैना तलाश करें जिसे वो है तुझी में कही दीऽवाऽनेऽ. कानातून डायरेक्ट मनात शिरतोय हा. आणि ते डोळे, ती नजर? ती का रोखलेली आहे आपल्यावर कुंपणापलीकडून? दुसरा राऊंड झाला, साला ह्या मन्ना डे लाच बदलून टाकतो. गाण्याचा आनंद सोडा, नको ते विचार परत परत मनात येताहेत. अरिजीत सिंग आला कानात. तरी डोळे पिच्छा सोडतायत कुठे? पुढच्या राऊंडला त्या कुंपणाजवळच्या ट्रॅकवरुन जायचं नाही.

****************        

‘आरजे’ रोज दिसतो, त्यामुळे एखादा दिवस नाही दिसला, तर चुकल्यासारखे वाटते. आज जरा गोंधळल्यासारखा वाटला. मी त्याच्याकडे बघतोय हे त्याला कळलंय का? ऐसा नही करना मुझे| तेरी दुनिया उथलपुथल नही करनी यार. मुझे जलन नही हो रही| तू रोज सकाळी दिसलास की माझ्या दिवसाची सुरुवात चांगली होते. आदतसी हो गयी तुम्हारी| दोस्त जैसा लगने लगा है अभी तू|

*****************

इतकं ठरवून सुद्धा त्याच ट्रॅकवरून गेलो. काय झालंय मला? माझं मनच ऐकत नाहीये माझं. तरी ठरवलं की खिडकीच्या आत बघायचं नाही. अभावितपणे नजर तिथे गेली. तो तिथेच होता. ३-टियर बंक बेडच्या मधल्या खणात. झोपून. बसू शकत नव्हता तो, इतकी कमी ऊंची होती, त्याच्या आणि वरच्या बेडमध्ये. नजरेला नजर मिळाली. चोरी पकडली गेल्यासारखी दोघांनी नजर चुकवली.

****************         

उन्हाळ्याचे दिवस. आज नेहमीपेक्षा लवकर जाग आली. बाहेर फक्क उजेड आला होता. ‘आरजे’ दिसला नाही. काय झालं याला? परीक्षा-बिरीक्षा असेल का त्याची. अच्छे नंबर मिलने चाहिये, बहुत पढाई करना| साइटवर न्यायला आमची बस ९ वाजताची होती. पटकन बाहेर गेलो सिंटेक्सची एक मोठी टाकी आम्हा मजुरांसाठी होती, दात घासले दातूनने. बाहर एक लाइनमें टॉयलेट ब्लॉक्स थे| स्नान मै शाम को करता था, सब काम होनेके बाद| थकान ऐसे छू हो जाती थी| सगळं आटोपून आत आलो, तरी बराच वेळ हाताशी होता. ‘आरजे’ अजूनही आला नव्हता. विचार करत खिडकीपाशी उभा होतो. सैनी, दारा, शिवा कधीचे उठून बाहेर गेले होते आवरायला. बाकीचे झोपेत होते. कोपर्‍यात एक मार्कर पेन पडलेले दिसले. कुणाच्या तरी खिशातून पडले असावे. हात सुरसुरू लागले. लहानपणी भिंतीवर, जमिनीवर, वाळूत, दगडांवर, झाडांवर, मिळेल त्या कागदावर चित्र काढत होतो आपण. माँला काहीबाही रेखाटताना बघत आलो आपण. अंगणात रांगोळी काढायची, पिठात चित्र काढून दाखवायची, हळदी, वेगवेगळी फुले, पाने, चायपत्ती यांच्यापासून रंग तयार करायची. मार्कर घेतले. कुठे काढावे चित्र? भिंत फार खडबडीत आहे. दरवाजा तुटका आहे. आपल्या बेडवर वरच्या बेडचा पत्रा आहे. तिथे काढावं. कुणाला दिसणार नाही. कुणी पुसण्याची भीती नाही. झोपलो. म्हणजे आडवा झालो. त्याशिवाय चित्र कसं काढणार. गावातलं दुर्गा मातेचं मंदिर आठवलं. माँसोबत जायचो. ती सिंहावर आरुढ झालेली, अष्टभुजा, तिच्या सगळ्या हातातली शस्त्रे, राक्षसाला मारतानाचा तिचा आवेश. तिचा तेजस्वी रणरागिणी अवतार. तो झपाटल्यासारखा पत्र्यावर मार्करचे फटकारे मारत गेला. पांढरास्वच्छ कॅनव्हास जणू! भानावर आला तेव्हा बसची वेळ झाली होती. धावत सुटला बसच्या दिशेने.

*****************      

आज मुद्दाम उशिरा आलो. ती धारदार नजर चुकविण्यासाठी. पण ती नजर गुंतली होती, आडवे पडून वर कुठेतरी खिळली होती. पाच राऊंड झाले, तरी त्याला पत्ताच नव्हता. एरवी तर माझ्याकडे टक लावून पहात असतो. बरं झालं. हा नजरेचा खेळ तरी संपेल. दुसर्‍या दिवशी ९ वाजल्यानंतर गेलो. मला देखील उत्सुकता होती, तो काय करत होता याची. मन फार विचित्र आहे. एकदा वाटत होतं, आपला त्याचा काय संबंध? कशाला जिवाला नसता घोर लावून घेतलाय? आपल्या दोघामध्ये हे जे कुंपण आहे, राहू दे ते तसेच. जसे गिटार, व्हायोलिनच्या तारा कंप पावल्यावर रेझोनन्स होतो, तसं आमच्या मनाच्या तारा एकाच वेळी छेडल्या जातायत का? पहिला राऊंड घेतानाच कळलं, तो नाहीये. दुसर्‍या राऊंडला जरा थांबलो. बघितलं, तर खोलीत कुणीच दिसलं नाही. कामावर गेलेले असतील सगळे. तिसर्‍या राऊंडला थोडा अंदाज घेतला. आजूबाजूला पण कुणीच नव्हतं. पटकन कुंपणावरून उडी मारली. खिडकी नावापुरती होती. तिला काचा नव्हत्या. छोटी खोली, चारही भिंतींना लागून ३-टियर बंक बेड. जागा मिळेल तिथे कपडे लटकलेले. सगळीकडे धुळीचे साम्राज्य. त्याचा बेड खिडकीजवळ होता. थोडी मुंडी आत घातली तर वरच्या बेडच्या खालच्या पत्र्यावर काहीतरी चित्र काढल्यासारखं वाटलं. आता राहवेना. काय काढलंय याने म्हणून काल माझ्याकडे लक्ष गेलं नाही? आता फक्त मुंडीच नाही, तर अर्धा आत गेलो. दुर्गा! दुर्गेचं चित्र, मार्करने काढलेलं. कुठे कुठे मार्कर उठलं नव्हतं. अगदी हुबेहूब दुर्गा माता. किती लयबद्धता होती रेषांमध्ये. आखीव चेहरा, कपाळावर मोठं कुंकू, अन्याय सहन करू शकत नाही असे भेदक डोळे, सिंहारुढ मूर्तिमंत आक्रमकता! आजोबांनी सांगितलेली महिषासुरमर्दिनीची गोष्ट आठवली. सामान्य मार्कर, त्याहून अतिसामान्य पत्रा. अस्सं जिवंत चित्र, की त्यात रंग नसून मला पिवळट सिंह दिसला, मातेचं रक्तिम वस्त्र दिसलं, तिचे सोनेरी अलंकार, मुकुट दिसला, पांढरा शंख दिसला, तळपतं खड्ग दिसलं, तिच्या त्रिशूळामधील शक्ति दिसली. एका दृष्टिक्षेपात ते चित्र, कॅमेर्‍याने टिपल्यासारखं माझ्या मन:पटलावर कोरलं गेलं.

**************      

क्रमश:    

Supriya Waray

Supriya Waray

Supriya Waray is an electrical Engineer, with 35 years of rich experience in fields such as education, content development and mentoring on life skills. She loves interacting with young minds and takes great pleasure in teaching concepts through fun games and activities. She has passion for writing and writes in Marathi and English. She likes to translate interesting English articles into Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!