नीलम हाऊसिंग सोसायटी
मयांक खुप आनंदात होता. आज या नवीन घरातला पहिला दिवस, …… खरंतर पहिली रात्रच. आज संध्याकाळीच तर सगळं सामान शिफ्ट झालं होतं. जुन्या सोसायटीतले मित्र सोडून येताना, त्याला फार वाईट वाटत होतं. पण तिन्हीसांजेला इथं पोहोचले तेव्हा, त्याच्या वयाची बरीच मुलं खेळताना दिसली. त्याच्याकडे पाहून स्मायली देणारे चेहरे आठवत त्याला छान झोप लागली.
त्याच्या डॅडीला, ….. सुरेशला स्वतःच घर घ्यायला नेहमी नकोसं वाटायचं. इन्व्हेस्टमेंटची कसलीशी कॅल्क्युलेशन्स करून दाखवायचा तो. मम्मीलाही मग रेंटल घर घेणं कसं योग्य ते पटायचं. दर दोन वर्षांनी मग घर बदलावं लागायचं. नवीन घर , नवीन शेजार, नवीन मित्र…… ऍडजस्ट होण्यात काही काळ जायचाच.
सुरेश अन रश्मी दोघेही नोकरी करायचे. त्यामुळं दुपारी शाळेतून आल्यावर, मयांक एकटाच घरी असायचा. बिचारा टेलिव्हिजनमध्ये गुंगुन जायचा. मम्मी डॅडी दोघेही सातनंतर उगवायचे. मग कुठं घर भरल्यासारखं वाटायचं. मागच्या काही दिवसात मात्र दोघेही, रात्री बऱ्याच उशिरा घरी पोहोचायचे. घर बदलण्याचे संकेत होते. ऑफिसमधून दोघे निघून, मग नवीन जागेची निवड करायला त्यांना वेळ मिळायचा. इथं, या जागी, दोघांच्याही तीन चार चकरा झाल्या होत्या. पण तिन्हीसांजेनंतरच. आश्चर्याची बाब म्हणजे ही नीलम हाऊसिंग सोसायटी दिवसा कशी दिसते हे त्यांनी फक्त व्हाट्सअप्प वर एजंटने पाठवलेल्या फोटोतच पाहिलं होतं.
आज मयांक लवकर झोपला होता. सुरेश अन रश्मी दोघांनीही उद्याची सुट्टीच टाकली होती. तसा फ्लॅट फुल फर्निशड होता. पण तरीही , सामान लावायला एक दिवस पुरणार नव्हताच. पण किमान अनपॅकिंग करून गरजेपुरत्या वस्तू तरी बाहेर काढायला हव्या होत्या. आज उशीर झाल्यामुळं, स्वीगीवरून काहीतरी मागवलं होतं. मयांक झोपल्यामुळं सुरेशने त्या सामानातून बरोब्बर वाईनची बॉटल काढली. दोघांचे टोस्ट खणखणले. या जुन्या इमारतीच्या, सहाव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून, दिसणारा नव्हे पण ऐकू येणारा समुद्रही त्यांना पुरेसा होता. रात्रीच्या नीरव शांततेत, त्याची गाज त्यांच्या पर्यंत पोहोचत होती. पहिल्यांदाच सुरेशने राहण्यासाठी सी साईड निवडली होती. त्यामुळं हा अनुभव, त्या दोघांसाठीही नवीन अन आल्हाददायक होता.
मुंबईत स्वतःच्या कष्टानं, कमावलेल्या पैश्यातून, हायप्रोफाइल नीलम सोसायटीत, स्वतःच नसेल पण रेंटवर तरी घर घेण्यातली नशा, वाईन इतकीच गोड अन प्रभावी होती. त्यात समुद्रावरून येणारी मध्यरात्रीची थंड हवा, प्रशस्त बाल्कनीतुन येऊन, घरभर हळुवार वावरत होती. दिवसभराच्या पॅकिंगमुळे दोघेही खरंतर पॅक झाले होते. हातातले वाइन ग्लास जेमतेम बाजूला ठेवत, दोघेही सोफ्यातच गाढ झोपी गेले.
………………………………………………
सकाळी कुठल्याशा विचीत्र पक्षाच्या चिरचिरण्या मूळे मयांकला जाग आली. खिडकीतून सूर्यप्रकाश बेडपर्यंत झेपावला होता. सूर्यप्रकाशात घर वेगळं दिसत होतं. विशेष करून भिंती बऱ्याच वर्षात, पेंट झाल्या नव्हत्या बहुतेक. डॅडीने असं जुनाट घर का निवडलं असेल या प्रश्नाचं उत्तर, डोळे चोळत तो शोधू लागला. इतक्यात, जुनाट लाकडी घड्याळाच्या सात घणाघाती ठोक्यानी सात वाजल्याचं त्याच्या लक्षात आलं. हे घड्याळ, रात्री वाजत नव्हतं. ते फोटो सेन्सिटिव्ह असेल का ? असा काही तरी विचार करताना, तो पूर्ण जागा झाला. मम्मी डॅडी बहुतेक आधीच उठले होते.
तो उठून हॉल मध्ये आला. तिथल्या भिंतींचीदेखील तीच परिस्थिती. जुनाट पिवळट रंगाच्या भिंती, त्यावर सोफ्यावर बसणाऱ्यांच्या डोक्याचे डाग. सोफा देखील अगदी, अँग्लोइंडियन काळातल्या डिझाईनचा, ……. त्यावरच्या कळकटलेल्या गाद्या…… हे सगळं पाहून डॅडीला एजंटने फसवलंय हे मयांकला मनोमन पटलं. समोरच्या प्रशस्त बाल्कनीत पानांचे प्रचंड ढीग पाहून तर तो स्तब्धच झाला. अगदी पावला गणिक चुरचुर आवाज यावा, इतकी पानं एका रात्रीत कुठून जमा झाली. मुंबईत काल रात्री, वादळ तर नाही ना आलं. नाही म्हणायला समोर भव्य जुनाट भव्य आम्रवृक्ष होता. आणि त्याच्या फांद्या यांच्या बाल्कनीला आलिंगन देऊ पाहत असल्यासारख्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या.
“मम्मी , …. डॅडी …..” अशा हलक्या आवाजात हाक देत तो बाल्कनीकडे निघाला. कित्येक महिने पहुडलेल्या पानांच्या चादरीवरून, चालत, तो बाल्कनीत पोहोचला. कुणी खाली खेळायला आलंय का? ….. खरंतर ही उत्सुकता होती. पण खालचं दृश्य आणखी भयाण होतं. वाळक्या पानांच्या चादरी खालच्या मोकळ्या जागेतही पसरल्या होत्या. काल पाहिलेल्या, खाली पार्क केलेल्या, मॉडर्न एसयूव्ही कुठेही दिसत नव्हत्या. कंपाउंड वॉल जवळ एक जुनी काळी, बऱ्यापैकी गंजलेली अँबॅसिडर उभी होती. ही काल तर दिसली नव्हती. त्यावरची धूळ, पानं अन कबुतरांचं नक्षीकाम तिला जास्तच भयानक बनवत होतं. रात्री गोड हसणारा, सलाम मारणारा, वॉचमन देखील कुठं दिसत नव्हता.
तो धावत, मम्मी ला शोधत, किचनकडे गेला. जुनाट हिरवट पडलेली तांब्याची भांडी, एक जुनी बीडाची शेगडी अन काही चिनी मातीतली क्रोकरी याव्यतिरिक्त तिथं काहीही नव्हतं.
तो भिरभिरल्या सारखा, फ्लॅटभर फिरत राहिला. घरात तो एकटाच, बराच वेळ फिरतोय, ही फिलिंग त्याला अगदी हादरवून गेली. टाइम मशीनमध्ये बसून मागे गेल्यासारखं, त्याला वाटत होतं. अन त्यात नेमके मम्मी डॅडी मशीन बाहेर राहिले की काय ? हा असला प्रश्न त्याला भेडसावत होता. तो धावतच, फ्लॅटबाहेर पडला. जिन्याला लावलेल्या लाकडी कठड्यावरची धुळदेखील त्याला घाबरवत होती. सहा मजले उतरुन येईपर्यंत, त्याला माणूसच काय, पण एखादं काळतोंड मांजर देखील, दिसलं नाही.
खाली पुन्हा तीच वाळक्या पानांची चादर चुरचुरत होती. तो इकडे तिकडे धावत होता. संपूर्ण जुनाट इमारतीमध्ये, कित्येक वर्षात, मानवी निवास नसावा. तो आणखी हादरला. त्यातून मम्मी डॅडी देखील गायब झाले होते. तो धावतच सोसायटीच्या गेटवर पोहोचला. काल सताड उघडं असलेलं ते गेट, आज साखळीने बांधून बंद होतं. त्याला एक गंजलेलं कुलूप. आता मात्र त्याला गुदमरल्यासारखं वाटलं.
त्याच्या मागे पाने चुरचरल्याचा आवाज झाला. तो झटकन मागे वळला. अन कुणीतरी त्याच्या तोंडावर हात ठेवला………
जीवाच्या आकांताने त्याने, टाहो फोडला.
“मम्मी sssss ”
पण तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. पायात जणू साखळ्या बांधल्याचा भास होऊ लागला. आवाजही लॉक झाला होता. कसातरी त्याने तोंडावरचा पंजा बाजूला फेकून दिला. सर्व ताकदीनिशी तो धावला.
.
.
.
.
अन तोंडावरचे पांघरूण त्याने पायांनी उडवून लावलं होतं.
नव्या घरातल्या, नव्या चकचकीत बेडरूममध्ये तो दचकून उठून बसला होता. सकाळी सकाळी त्याला घाम फुटला होता. तो धावतच बेडरूम बाहेर आला. मम्मी डॅडी शांतपणे चहा पीत होते.
“गुड मॉर्निंग …… बाळा” मम्मीचा गोड आवाज त्याच्या डोक्यात किणकिणला. तरीही त्याच्या चेहऱ्यावरची भीती जात नव्हती. तो धावतच, बाल्कनीत गेला. बाल्कनी स्वच्छ होतीच, शिवाय सकाळीच डॅडीने काही गुलाबाच्या कुंड्या तिथे मांडल्या होत्या. तो घाईघाईने खाली डोकावला. खालचा वॉचमन, कुठलासा न्यूज पेपर वाचत बसला होता. काही जण घाईघाईने ऑफिससाठी बाहेर पडत होते. खालच्या इंपोर्टेड एसयूव्ही चे अनलॉकिंगचे आवाज, ऐकून खुप हायसं वाटत होतं.
तो आत आला, भिंतीवरचे घड्याळ जुन्या पद्धतीचं नव्हतं.
“ओह , हे स्वप्न होतं तर ……..” असा विचार करत तो डॅडुच्या गळ्यात पडला. एक छान पापी मिळाली. पुन्हा काहीतरी आठवून, तो पटकन बाल्कनीत आला.
पार्किंगच्या कोपऱ्यात, कंपौंड वॉल जवळ, एक काळी , धुळीने माखलेली, पानांनी झाकोळलेली, कबुतरांनी सजवलेली जुनाट गंजकी अँबॅसिडर मात्र तशीच उभी होती.
- Poked you …… - July 31, 2023
- एमएटी - June 10, 2022
- पत्रास कारण की… - April 21, 2022