सोळा नंबरच्या आजी

हॉस्पिटलच्या रुममध्ये आजी भकास चेहऱ्याने पलंगावर लवंडलेल्या असतात. अंगावर त्यांना नको असलेले हॉस्पिटलचा वास येणारे कपडे, आजूबाजूला औषधांची शिसारी आणणारी गर्दी, खाली लावलेला कॅथेटर आणि त्यांच्या खोल गेलेल्या डोळ्यात फक्त निराशा. नव्वदी कधीच पार झालेली असते, जगण्याची इच्छा फारशी राहिलेली नसते. रोज सकाळी दोन्ही हात कसेबसे जोडून ईश्वराकडे प्रार्थना करतात, आता फार वाट पाहायला लावू नकोस. झालं जगून आता. हे जर्जर झालेलं शरीर,  थकलेली गात्रं घेऊन जगण्यात अर्थ नाही. आपला इतरांना उपयोग नाही, होतो तो फक्त त्रास. मग का जगवतोस बाबा इतका? एखादी अशी झोप दे की त्यातून जागच येऊ नये.” पण तो वर बसलेला आजींचं ऐकत नाही. जन्म आणि मरण आपल्या हातात असतं तर अजून काय हवं होतं? आजी यांत्रिकपणे जगत राहतात.
संध्याकाळी आजींची नात येते. आजींना ही एकच नात, त्यामुळे त्यांची लाडकी. तिची दहावी झाली तेव्हा कौतुकाने आजीने घड्याळ्याच्या दुकानात नेऊन तुला हवं ते घड्याळ घे म्हणून तिचं पहिलं घड्याळ बक्षीस म्हणून दिलं होतं. पुढे कितीतरी वर्ष नात ते घड्याळ वापरत होती. नातीला पाहील्यावर आजींना जरा हुशारी येते. तिने बोललेला एक शब्द देखील ऐकू येत नसला तरी त्या तिच्याशी बोलत राहतात, खाणाखुणा करत राहतात, जुन्या आठवणी सांगत बसतात.
काल तर त्यांनी एक अगदी विचित्र आठवण सांगितली. तिला म्हणाल्या, “तुझ्या बाबांवर ना, एका मुलीचं प्रेम होतं. तिला त्यांच्याशी लग्न करायचं होतं. फार मागे लागली होती ती त्यांच्या. पण त्यांचं प्रेम तुझ्या आईवर. आली का आता अडचण?! तुझ्या बाबांनी खूप समजावलं तिला. पण तिने ऐकलं नाही. अन शेवटी एक दिवस आत्महत्या केली. माझ्या मनाला फार लागली ही गोष्ट. इतके वर्ष कोणाला सांगावस वाटलं नाही पण आज तुला सांगते आहे. आता वर गेल्यावर ती भेटली तर तिची मनापासून माफी मागेन.” नात आश्चर्याने तिच्याकडे फक्त पाहत राहते. पाच मिनिटांपूर्वीचं आठवत नाही हिला पण मागचं इतकं सगळं आठवतं? आजींना बोलताना मधेच एखादा कढ दाटून येतो आणि डोळ्यातून अश्रू ओघळतात. म्हातारपण विचित्र असतं हे खरं.
नात रात्रीचं जेवण घेऊन आलेली असते. आजींना तशी कसलीच इच्छा नसते, गेल्या काही दिवसांत तर अन्नावरची वासनाही उडालेली असते.  नको नको च म्हणत असतात. शेवटी नर्स येऊन रागावते, आजी थोडं खाऊन घ्या, नाहीतर शुगर लो होईल. आयुष्यभर चांगलं चुंगलं खाल्लेल्या आजी नातीला विचारतात, “काय आणलं आहेस? चार घास खाईन. मग तू आपली घरी जा. मुलं वाट बघत असतील तुझी. उगाच उशीर करू नकोस. सासुरवाशीण आहेस, किती वेळ थांबशील!” या वयात आणि अवस्थेतसुद्धा त्यांना प्रपंचाचा विसर पडत नाही.
नात कॅसेरॉल मधून गरम गरम मुगाच्या खिचडीचा डबा काढते, त्यावर तुपाची फोडणी घातलेली  गोडसर कढी घालून ती कालवते आणि आजीला भरवायला सुरू करते. सोबत एकच तळलेल्या तांदळाच्या पापडाचा तुकडा. तांदळाचा पापड तिच्या खास आवडीचा आहे हे नातीला माहीत असतं. पहिला घास खाऊनच आजी हुशारतात. खूप छान आहे खिचडी अशी बोटांनीच छान ची खूण करून नातीला सांगतात. नात त्यांना भरवत राहते. दहा मिनिटांपूर्वी जेवण नको म्हणणाऱ्या आजी मटामटा कढी खिचडी संपवतात. डब्यात एक कणही ठेवत नाहीत. त्यांना त्याक्षणी मनापासून हव्या असलेल्या दोन गोष्टी नातीने बरोबर ओळ्खलेल्या असतात, एक म्हणजे गरम जेवण आणि दुसरी म्हणजे आपल्या माणसाची माया.
जेवण झाल्यावर आजींना भलतीच हुशारी येते. “थोडं चालून येऊया, चल. डॉक्टर म्हणतात रोज थोडं चाला, पण मीच कंटाळा करते.” त्या. वॉकर धरून उठून उभ्याही राहतात. नातीबरोबर कॉरिडॉरमध्ये आधी हळूहळू आणि मग भरभर अशा चालायला लागतात. त्याचा कॅथेटर मधे येतो पण नात तो ऍडजस्ट करते. आजूबाजूच्या खोलीतले लोक कौतुकाने आजींकडे बघतात, गेले चार दिवस झोपून असणाऱ्या आजी आज भराभर चालायला पण लागल्या म्हणून! दोन राउंड झाल्यावर कॉरिडॉरच्या शेवटी आजी थोड्या थांबतात. नात खुणेनेच विचारते, “काय ग, काय झालं, काही होतंय का?” आजी इवलूसं हसून म्हणतात, “कढीला फोडणी फार छान झाली होती. जिऱ्याचा वास मस्त लागला होता, मला फार आवडली.” आयुष्यभर चांगलंचुंगलं बनवलेली, खाल्लेली, खायला घातलेली जुनी खोडं ही, यांना अश्या गोष्टी लक्षात नाही आल्या तरच आश्चर्य! आजींचे किती दिवस राहिले आहेत माहीत नाही, पण त्यांचा शेवटचा दिवस आणि शेवटचा घास गोड व्हावा ही नातीची इच्छा मात्र कायम राहील.
खोलीत परत येताना नर्स, वोर्डबॉय, मावशी सगळे कौतुकाने आजींकडे पाहत एकमेकांना म्हणतात, “सोळा नंबरच्या आजी बऱ्या होत आल्या की!” सोळा नंबरच्या आजींनी तेवढ्यापुरतं तरी जिंकलेलं असतं. मरण यायचं तेव्हा येणारच असतं पण आहे ह्या जीवनात चार आनंदाच्या क्षणांवर सर्वांचाच हक्क असतो, तो आपण नाही हिरावून घेऊ शकत.
©गौरी ब्रह्मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!