नशीबवान!
बरेचदा स्वतःचं दुःख कुरवाळताना दुसऱ्याच्या मनस्थितीची जाणीवही राहत नाही, आणि मग आपल्यापेक्षा सगळं जग नशीबवान वाटू लागतं. त्यातलेच हे काही नशीबवान!
नशीबवान!
ह्याही महिन्यात पुन्हा अपेक्षाभंग झाल्याने नेहाचा चेहरा अगदी पडला. बाथरुमहून आल्यावर जागेवर बसताना त्याच्याकडे बघून अंगठा खाली करून, ह्याही महिन्यात काही गोड बातमी नाही हे तिनं सुचवलं. ऑफिसच्या धकाधकीत त्यांची मैत्रीच नेहाला विसाव्याचे क्षण देत. तो समलिंगी असल्याने, जगाच्या दृष्टीने नाही म्हंटलं तरी टेहाळणीचाच विषय होता. नेहाला मात्र त्याची मैत्री आवडायची. इतर मित्र-मैत्रिणीसारखा तो तिला सतत गुड न्यूज कधी देणार?, लग्नाला पाच वर्षं झाली- क्लॉक इज टिकिन्ग… असे टोमणे नाही मारायचा. शिवाय त्याला फारसे मित्र-मैत्रिणी नसल्यानी नेहासाठी त्याच्याकडे वेळही भरपूर असायचा. मन मोकळं करण्यासाठी नेहा बेधडक त्याला सगळं काही सांगत होती. शिवाय मुलगा असूनही समलिंगी असल्याने तिच्या नवऱ्याला किंवा समाजाला त्यांच्या मैत्रीला नाव ठेवण्यासारखं काही वावगं वाटत नव्हतं. आणि तोही वेळोवेळी नेहाची खंबीरपणे साथ द्यायचा. आजही नेहाचा मूड चांगला करण्यासाठी त्यानं कॉफी मागवली, आणि तिला घेऊन ऑफिसच्या टेरेसवर घेऊन गेला. कधी बोलायचं आणि कधी शांत राहून समोरच्याला बोलतं करायचं हे त्याला बरोब्बर अवगत होतं. काही न बोलता तो शांतपणे कॉफीचे घुटके घेत राहिला. थोड्या वेळानी नेहाच बोलती झाली, “हा महिनाही निराशाच! आता काय सांगू घरी जाऊन? दर महिन्यात सगळ्यांना आशा असते, आज-काल तर मला वाटतं माझं कॅलेंडर BBC वर पब्लिश होतंय. घरी सगळेच पाळत ठेवून आहेत असं वाटतंय. डॉक्टरही म्हणतायेत की, दोघांमध्येही काहीच दोष नाही. वेळ आली की होईल सगळं. हे सगळं सांगायला सोपं आहे रे, पण कंटाळले आहे मी आता. दर महिन्यात आशा ठेवायची आणि पाळी आली की पुन्हा त्यातून स्वतःला सावरायचं. तू नशीबवान आहेस रे, तुला ह्या सगळ्यातून कधीच जायचं नाहीये!”
“लग्न म्हणजे तडजोड! घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं, एकाने पसरवलं तर दुसर्याने आवरायचं” हे ऐकतच ती मोठी झालेली. जुन्या पिढीचे संस्कार, त्यांनी केलेले त्याग, न बोलता प्रेम समजून घेणं, मोठ्यांना उलटून न बोलणं, जुळवून घेणं ह्याचं बाळकडूच मिळालेलं. त्यातून स्वतःच्या आवडीने, घरातल्यांशी भांडून केलेलं लव्ह मॅरेज! त्यामुळे आपलेच दात अन आपलेच ओठ, अशी अवस्था. छोट्या- मोठ्या होणाऱ्या कुरबुरी मागे टाकत जाऊन पुढे जात रहायचं, जुळवून घ्यायचं हेच तिला माहित होतं. त्यामुळेच इतकी वर्षं एकत्र राहूनही तिनं कधी तोंडातून ब्रही काढला नाही.
आणि आज इतक्या वर्षांनी तिची आई, तिचं सर्वस्व मृत्यूच्या दारात शेवटचे क्षण मोजत होती. तिच्यासाठी हिचा जीव तीळ-तीळ तुटत होता. पण घरच्या जबाबदाऱ्या, ती उठून आईकडे गेली तर तिच्या तान्ह्या बाळांकडे कोण बघेल? आई मात्र त्याही अवस्थेत जावयाचं कौतुक करत होती, “आमच्या जावयाच्या नं खूप ओळखी आहेत. डॉक्टरांनाही सांगून ठेवलं असेल माझ्याकडे जातीनं लक्ष द्यायला. बघाच तुम्ही!” हिनं कधी फोन केला की, स्वतःच्या तब्ब्येतीपेक्षा घरी कोणाची आबाळ करून मला भेटायला येऊ नकोस, हे समाजवण्यातच आईचा वेळ जायचा. हॉस्पिटलहून घरी आली की, दिवाळीच्या सुट्टीत जा भरपूर दिवस, अशा बोलीवर त्यानं समजूत काढलेली. कामाच्या व्यापात तो कायमच इतका काही बुडालेला की, हॉस्पिटलच्या ठरून दिलेल्या वेळेत तिच्या आईला फोनही करणं त्याला जमलं नाही. आणि नियतीनं तिचा डाव साधलाच! आभाळाएवढं दुःख देऊन आई निघून गेली, न परतीच्या प्रवासाला. परगावात असल्यामुळे, तिच्यासाठी कोणी थांबणं शक्यच नव्हतं.
“आता सगळे आटोपल्यावर शाळांच्या दिवसात तू तिकडे जाऊन काय करणार आहेस? आई तर आता दिसणार नाही नं. फोनवरच बोलून घे तू घरच्यांशी, मन हलकं होईल. मी तरी आता काय बोलू? वयपरत्वे हे होणारच नं? मी आहे गं तुझ्याबरोबर!”, तो समजूत काढत होता. ती दिग्मूढ होऊन मनातल्या वादळाला थोपवत तडजोड म्हणजे काय हे नव्याने अनुभवत होती.
आईचं दहावं आलं, मनातून पूर्णपणे कोलमडलेली ती मूकपणे दिवस ढकलत होती. सगळ्या दैनंदिन जबाबदाऱ्या पार पडत होती. संध्याकाळी त्यानं त्याच्या मित्राला आणि फॅमिलीला घरी बोलावलं, बाहेरून जेवण ऑर्डर केलं, तिला गुलाबजाम खायचा आग्रह करू लागला. तिनं सगळ्यांसमोर, “नको अरे, खूप पोट भरलंय, नंतर खाईन”, असा म्हणून डोळ्यात आलेले अश्रू लपवण्यासाठी बाथरूममध्ये पळ काढला. तरी जाता-जाता त्यांचा संवाद कानावर पडलाच. तो सांगत होता,” माणसानी जरा प्रॅक्टिकली विचार करावा रे. आता जवळचं कोणी गेले तर आपण काय जगायचं सोडून द्यायचं का? हे तर होणारच नं. तरी बरं मी म्हंटलं अरे हिला,आपण तुझ्या भावाला सांगू की हॉस्पिटलचं बिल आपण भरू. आपल्याला तिथे जाणं जमलं नाही निदान एवढं तर आपण करून शकतो.” त्यावर मित्राची बायको म्हणाली “किती नशीबवान आहे नं ही, किती काळजी घेतो हिचा नवरा!”
एका मैत्रिणीचा बुधवारी दुपारी टेक्स्ट मेसेज आला, “आज भेटशील का? आजी गेल्याचं कळलं गं.” तिनं लगेच हो म्हणून कळवलं. हातातली कामं झरझर संपवायला सुरुवात केली. त्यातच दोन मिटींगच्या मध्ये मुलांना सांभाळणाऱ्या मावशींना फोन केला, “मावशी, आज प्लीज दोन तास जास्त थांबाल का? रात्रीचा वरण-भाताचा कुकरही लावा आजच्या दिवस. मला आज नीरजाकडे जायला लागेल, तिची आजी गेली. खूप घाई आहे आता, नंतर सविस्तर बोलते.” असं म्हणून त्यांच्या होकाराची वाटही नं बघता ती पुढच्या मीटिंगला पळाली. मावशींनांही एव्हाना माहिती होतं की अगदीच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय ही अशी विनन्ती करणार नाही. धावत पळत फास्ट लोकलमध्ये उडी मारून उभ्याने प्रवास करत ती उलट्या दिशेनं नीरजाच्या घरी पोहोचली. तिला भेटून नीरजा मन मोकळं करू लागली, “तसं तर माहितीच होतं गं की, आजी जाणार आहे. मागचे सहा महिने ती अंथरुणाला खिळूनच होती. येणारे जाणारे म्हणतायेत की, सुटली बिचारी. पण तसं नसतं नं गं. आपलं जवळचं माणूस गेलं की सगळं कळूनही वळत नाही. आजीसाठी इतकी वर्षं आई-बाबाही गावीच राहतायेत. किती वेळा म्हंटलं की आता तुमचंही वय झालंय, चला माझ्याबरोबर मुंबईत राहायला. तरीही ते ऐकतच नाहीत. तू नशीबवान आहेस गं, तुझे आई- बाबा लहानपणीच गेल्याने तुला आता काही ह्या चिंता नाहीत मागे!”
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023