चौकोन आणि मध्यबिंदू

” बाबा , मला कळत नाहीये , मी कोणत्या तोंडाने मदत मागू , पण आज मला तुमची खूप गरज आहे . आदू  ला सुट्ट्या आहेत , गीता दिल्लीला गेलीये , आणि मला  अचानक यु .एस ला जावं लागतंय . त्याची  आजी , गीताची आई , आजारी आहे , कावीळ झालाय . एक आठवडा आदू ला तिथे  तुमच्यासोबत ठेऊ शकतो का ?…..न …नाही म्हणालात तरी मला वाईट वाटणार नाही , माझा काय अधिकार आता …”  निखिल च्या आवाजातील अगतिकता सुरेंद्रना कळत होती , पण राधिका ला न विचारता …..कसं उत्तर देणार …
” निखिल , तुझी अडचण मला कळाली . माझी हरकत नाही , पण राधिका ला विचारावे लागेल . शेवटी तिलाच काम पडणार माझ्या पेक्षा….आणि आदु पण राहिला पाहिजे न इथे ….किती वर्षाचा झाला आता ? “
“पाच वर्षांचा बाबा .”
…..पाच वर्ष झाले?…..म्हणजे निखिल गीताच्या लग्नाला किमान सहा वर्ष….आपणच जावयाला दुसऱ्या लग्नाचं सुचवलं होतं .
” कुणाचा फोन होता रे ?”
राधीकाला  खरं तर अंदाज आला होता , पण तरीही तिने विचारलेच .
” निखिल चा . आदित्य ला आपल्या कडे आठवडाभर ठेऊ का विचारत होता .”
“मग काय म्हणालास तू ?”
तिच्या प्रश्नात अधीरता होती . म्हणजे मी हो म्हणालो असतो तर बरं झालं असतं असं वाटतंय का हिला ? असे मनात आले सुरेंद्रच्या .
“तुला न विचारता …..नाही म्हणजे आता तो आपला जावई राहिला नाहि , तरीही त्याने अशी मागणी …”
” आपल्याला का? गीताची आई असतांना ..” राधिकाचं ही बरोबरच होतं .
” त्यांना कावीळ झालाय . गीता दिल्ली ला गेलीये ….हे बघ , त्याला विचारवं वाटलं , ठीक आहे , निर्णय तर आपण ..”
“येउदेत त्याला .” नवऱ्याचं बोलणं खोडत राधिका मधेच बोलली .   “मी तरी इथे दिवसभर काय करणार ? नंदन आणि ईरा  सकाळी जातात ते रात्रीच येतात . जावयाचा मुलगा म्हणून नाही तर माणुसकी म्हणून करूयात मदत . “
“मला खात्री होती , तू हो म्हणणार राधिका , खरंच .”
“जे झालं त्यात निखिल चा काय दोष?
आपलाच दाम खोटा ! परिस्थिती माणसाला बदलवते म्हणतात . कालांतराने मतं बदलतात , माणसं लवचिक होतात …हे सगळं फक्त कागदावरच राहिलं . अंकिता ला कशानेच कधीच फरकच पडला नाही .” एक दीर्घ निश्वास टाकत राधिका म्हणाली .
      आज बऱ्याच दिवसांनी अंकीताचा विषय निघाला होता . काळ झपाट्याने जातो म्हणतात . राधिका सुरेंद्र साठी मात्र तो फार प्रदीघ कालावधी होता , कधीही न संपणारा ….सतत मनाला पोखरणारा .
    आठ वर्षांपूर्वी अंकिता आणि निखिल चं अतिशय थाटात लग्न झालं. दोघे चार वर्षे इंजिनिअरिंग ला सोबतच शिकले , सोबतच  एम.एस  केलं , आणि मग लग्न . दोन्ही बाजूने आनंदाने संमती होती . नाकारण्यासारखं काहीच नव्हतं . सुरेंद्र  राधिकाला   आधीपासूनच    निखिल ओळखीचा होता , आणि ही जोडी अशीच असणार याची चाहूल पण लागलेली होती . सगळेच खूष होते . पण
महत्त्वाकांक्षा  फार वाढली की इतर कशालाच महत्व रहात नाही , तसं झालं होतं .
अंकीताला   पी.एच.डी साठी जर्मनी ला जायचं होतं . निखिल ची ना नव्हतीच , पण त्याच काळात अंकिताच्या  प्रेग्नन्सी ची बातमी आली आणि निखिल हळवा झाला . तिने इथेच भारतात राहून पीएचडी पूर्ण करावी म्हणून त्याने तिचे मन
वळवायचा खूप प्रयत्न केला . अंकिता ने ऐकलं नाही . तिच्या नजरेतून तिची प्रेग्नन्सी ही  निष्काळजीपणाने  वाट्याला आली होती , प्लॅनिंग प्रमाणे नाही . तिथे जाऊन   तीन महिन्यांनी तिने आईला फोन करून आपल्याला हे मूल नकोय , नंदन इरा पप्पांकडे बघतील , तू इथे ये म्हणून जिद्द केली . राधिका जर्मनी ला जाऊ शकली नाही ..ती एक युनिव्हर्सिटी तील जबाबदार प्रोफेसर होती . आणि अतिशय मानाचे समजल्या जाणाऱ्या  आंतरराष्ट्रीय सेमिनारची जबाबदारी तिच्यावर होती .
   सुरेंद्र नि  व्हरांड्यावर बसलेल्या राधिकाच्या अंगावर शाल आणून टाकली .
” गार वारा सुटलाय ग , तुला तर लगेच थंडी वाजते , मग आज कशी बसून राहिलीस इथे?”  तिच्या हातात चहा चा मग देत  सुरेंद्र म्हणाले
”  आज अंकिताचं मूल असतं तर सात एक वर्षाचं असलं असतं नाही ? ” कातर आवाजात राधिका म्हणाली .
‘तू कधीपासून भूतकाळात रमायला लागलीस राधा? भौतिकशास्त्राची प्रोफेसर आज भावनेत कशी अडकली?”
” आपल्या नातवंडांच्या
  पिढीचं अनावश्यक ओझं आपण वहायचं नाही , ही खरं तर माझीच थेअरी . पण  आता ती मलाच जड जातेय .”
‘ ह्यालाच तर मानवी भावना म्हणतात न !  आता उद्या सकाळी निखिल  सोबत आदित्य येतोय . तसा आता त्याच्याशी आपला काय संबंध ? पण  शेवटी  ‘मनाचिये गुंती’ .  खूप शांत आहे पोरगा , …..पण तो आपल्याकडे राहील ना ग? “
राधिकाने उत्तरादाखल फक्त सुरेंद्रचे हात थोपटले .
     रात्री  नंदन आणि ईरा  आले . त्यांना आदित्य बद्दल कळाले , पण
ईराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही . शांतपणे खाली मान घालून ती जेवत होती , कशातच नसल्यासारखी .
” आई , हो म्हणण्याआधी विचार करायचा होतास . तुझा अर्थराइटिस चा त्रास उफाळून येइल उगाच . मला किंवा इराला काय प्रॉब्लेम असणारेय , तुलाच सहन नाही होणार …असं परक्याचं मूल ….” नंदन बोलता बोलता गप्प झाला .
       तेव्हा दोघे काहीच म्हणाले नसले तरी त्यांच्या खोलीत गेल्यावर ईरा चा संयम सुटलाच.
  “इरा , तुला इतकं चिडायसारखं काही झालेलं नाहीये .”
” हे तू सांगतोस नंदू ?….अंकिता ला सोबत म्हणून ह्या गेल्या का जर्मनीला ? तिचं आजारपण तिनंच काढलं न? काय तर म्हणे युनिव्हर्सिटी चा मोठ्ठा सेमिनार होता …..”
” अंकिता ने  करायला नको ते सगळं केलं इरा ,अँड यु नो धिस !  पी एच डी साठी अबोर्शन करायची काय गरज होती? निखिल गेला असता तिच्या मदतीला , आई पण नंतर जाणारच होती न ? पण आक्रस्ताळेपणा ने अंकिता ने निर्णय घेतला  आणि निखिल ला कायमचं प्रचंड दुखावलं .”
” अंकिता ताई वाचल्या असत्या नंदू ! आईंनी तिथे जायला पाहिजे होतं . मुलीला गमावून बसल्या त्या कायमच्या .”
” पाच महिन्याचा गर्भ बेकायदेशीर पणे काढायचा निर्णय कुणाचा होता ? ते काय
आई नि सांगितलं होतं का इरा?….उगाच मागचं उगाळू नकोस .
आता आईला आदित्य मुळे त्रास होऊ नये म्हणजे झालं .”
” त्रास झाला तर काय?  आपण आहोतच न निस्तरायला!! पुढच्या पिढीच्या  जास्तीच्या जबाबदाऱ्या नकोत अशी ह्यांची थेअरी  म्हणे !”
“तू चुकीचा अर्थ काढतीयेस  ईरा. नातवंडांची काळजी घेण्यास तिचा मुळीच  विरोध नाहीये . तिला उलट आवडतं मुलांबरोबर वेळ घालवायला . छोट्यांचा  आयुष्यातील काही जबाबदाऱ्या ह्या आजी आजोबांच्या नसाव्यात , तो मुलांच्या आई बाबांचा विषय आहे असे तिचे मत आहे …..जे अगदी बरोबर आहे ……तू बघतेय न , त्या बंटीचा सगळा अभ्यास त्याची आजी घेते . त्याचं डॉक्टर कडे जाणं , शाळेचं सामान आणण हे आजोबा बघतात …..ह्याला आईचा विरोध आहे .मुलं  मानसिक आणि भावनिक रित्या आईवडिलांशी  जोडले जाण्यासाठी पालकांनी आवर्जून काही गोष्टी कराव्यात असे ती कायम सांगत आलीये आणि तसे वागतही आलीये .  तू गैरसमज नको करून घेऊस . “
त्याचे हे स्पष्टीकरण ईरा ला पटले …आपली सासू ही एक उच्चशिक्षित आणि  बॅलन्सड स्त्री आहे ह्याची तिला पुनः एकदा जाणीव झाली .
      सकाळी निखिल आला आदित्य ला घेऊन . सोबत अत्यंत काळजीपूर्वक सगळं आणलं होतं . कपडे , मोजे , पाण्याची बाटली , खाऊचे प्रकार आणि राधिकाला आवडते म्हणून गरम जिलेबी पण .
त्याचा स्वभाव होताच तसा . अतिशय काळजी घेऊन समोरच्याच करण्याचा .
अंकीताला कळलाच नाही का निखिल ? ….तिने आपल्या करिअर पालिकडे जाऊन  विचार केला असेल का त्याचा? ……आत्ममग्न लोक दुसऱ्याला फक्त काटेच देतात का?  पुरूषांमधील एक दुर्मिळ आवृत्ती म्हणजे निखिल……मग हे सुख ओळखताच आले नाही अंकिताला. …..
राधिका शून्यात नजर रोखून एकटक बघत होती आणि
एकदम सुरेंद्र च्या आवाजाने  भानावर  आली .
“अग काय विचारतोय निखिल ..?…लक्ष कुठाय तुझं ? “…………सुरेंद्र ने तिला भानावर आणलं .
     तिने मान वर करून निखीलकडे बघितलं .
‘ तब्बेतीने जर झटकलाय  , पण देखणाच  आहे निखिल’
” त्याच्या साठी मऊ वरण भात आणलाय , आत्ता थोड्या वेळाने खाईल तो …..आता आपल्या हाताने खातो सगळं ….मी लावलीय सवय त्याला .”  निखिल चा  आवाज जड झाल्यासारखा वाटला . त्याने पिशवी आणि बाकी सामान आत नेऊन ठेवले .
“मी केलंय रे सगळं त्याच्यासाठी ! कशाला आणलस ?”….ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली ,   “निखिल , प्रत्येक वयाला प्रेमाची गरज असते . त्या त्या वयानुसार ते प्रेम कुणाकडून मिळणार हे ठरतं …….पण ते हवं असतं , हे नक्की . …तू अजिबात काळजी करू नकोस . आदित्य सोबत आमचा वेळ मस्तं  आनंदात जाईल अगदी . तो देखील रमेल इथे .”
“त्या बाबतीत पूर्ण खात्री आहे , म्हणूनच तुमच्याकडे घेऊन आलो त्याला…..निघतो मी”
      नंदन ईरा जरी ह्या निर्णयाने नाखूष असले तरी  सुरेंद्र राधिका अतिशय खूष होते . आदित्यसाठी गीताचा  फोन आला होता . आदी ने धावत जाऊन फोन घेतला . त्याला वाटलं त्याची मम्मा त्याला न्यायला येतेय , पण तिला आणखीन काही दिवस उशीर होणार होता . आदी ते ऐकून खट्टू झाला होता .
        राधिकाने शेजारच्या छोट्या सिम्मीबरोबर आदीसाठी सगळं आठवडा प्लॅन करून ठेवला .
  एक दिवस बागेत , एक दिवस झू मध्ये , कधी गच्चीत खेळायला , तर कधी मॉल मध्ये  ‘गेम झोन ‘ ला असा भरगच्च कार्यक्रम होता . अमेरिकेहून निखिल रात्री फोन करायचा आणि तितका वेळ आदित्य मुद्दाम जागा रहायचा . आपल्या बाबाला तो  मोठ्या उत्साहात त्या दिवसाची गम्मत सांगायचा .  तो गीताची म्हणजे आईची फारशी आठवण काढत नाही , आणि  गीता देखील  जास्त फोन करत नाही हे तिला आता खटकायला लागलं होतं . आपल्या आईचं असं बिझी असणं आदिनी स्वीकारलं होतं
रविवारी तर नंदन ईरा त्याला एक कार्टून फिल्म दाखवायला घेऊन गेले होते . ईरा पण नाही नाही म्हणत ओढल्या गेली त्याच्याकडे .
       दुपारी राधिका भाजी निवडत बसली होती . आदित्य शेजारी कागदावर काही बाही काढत रंग भरत
होता .
“आज्जी ,”
“बोल राजा ,”
” स्कुल सुरू झाली की मी इथूनच जात जाऊ स्कुल ला ?” हातातील रंगीत तेलखडूने फुल रंगवत त्याने विचारले .
” आता दोन दिवसात तुझी मम्मा येणार !!!! मग मज्जा !!” ती अंदाज घेत म्हणाली .
” मला नाही जायचं !” आदित्य ओरडून म्हणाला . तशी राधिका गंभीर झाली .
सिम्मी आली म्हणून आदि खेळायला पळाला . सुरेंद्र बाहेरून आले होते .चेहरा गंभीर .
“काय झालं?”
” काही कळत नाहीये . आत्ता फडतरे चौकात मला आदित्यची आजी , गीताची आई दिसली .  छान हसून खिदळून बोलत होती कुणाशीतरी …..मग निखिल का म्हणाला ….की ..कावीळ..”   सुरेंद्र काय काय सांगत होता , आणि राधिका आपल्याच विचारात होती …
   राधिका ने आदित्य काळ काय म्हणाला ते सांगितलं …..कदाचित ही गीता पण आपल्या अंकीतासारखीच  अति महत्वाकांक्षी तर नाही ?……निखिल च्या वाट्याला पुन्हा तेच ?….पण अंकीताच्या अशा वागण्याचा दोष त्याने आपल्या माथी नाही मारला. उलट मोकळेपणाने मदत मागितली ……त्याला गीताच्या आईकडे आदीला पाठवण्यात तो मोकळेपणा नसेल वाटलं….  म्हणून त्याने आजीचे कावीळ चे कारण सांगितले असेल!….इतक्या  विवेकी माणसासोबत आपण थोडी  तडजोड करून राहावे असे नाही वाटले अंकिताला ?…….राधिका चा जीव भयंकर अस्वस्थ झाला  होता……
  एका दृष्टीने बरंच झालं का अंकिता गेली ते ?………..काय भयंकर विचार करतेय मी आई असून?… पण मग निखिल सारख्या हळव्या माणसालाच का अशी शिक्षा?
” आजी , ए आजी !!” आदित्य मांडीत येऊन बसला होता .
” बाळा ला आता काय खायचं ?”
” मी बाळ नाईये !!”
“मग ? तू काय आजोबा आहेस का ?”
” नाई , मम्मा बोलते , तू आता बिग बॉय झालाय .”
“मम्मा ला फोन करायचा आपण ?”
“नाई , तिला  काम असतं!!” तो इतका पटकन म्हणाला की
तिला धस्सकन झालं .
“बाबांना करायचा?”
“बाबा मला रोज फोन करतो .”
“मम्मा तुला पोएम शिकवते ?”
” नाई , बाबा शीकवतो पोएम …मम्मा ‘लॅपतोप’  वर ऑफिस च काम करते.”
“तू स्कुल वरून आल्यावर आजी कडे जातोस?”
” नाई  , कारटून बगतो”
“एकटा?”
त्याने मान हलवली  “पारु माशी सोबत. बाबा आला की माशी घरी जाते “
          त्या सात दिवसात फक्त दोनदा गीता चा फोन आला ,  इतकं कोरडं कसं रहाता येतं ? ….अंकिता सारखच गीताला देखील मूल नको होतं की काय? …..ही कुठली महत्वकांक्षा ? …मग लग्नच का करतात ह्या मुली ?…..हवं ते सुख विकत मिळतं न बाजारात …..निदान जोडीदाराचं रोजचं मरण तरी होणार नाही . कसा  सांधायचा हा दुवा?
” आई , निखिल येतायत उद्या . ते विमानतळावरुन सरळ इथेच येतील . आदि चं सगळं समान गोळा करून ठेवू का ?” ईरा कपड्यांच्या घड्या घालत विचारत होती .
” गीता अजूनही नाही आली ?”
“आलीये ती , पण रात्री उशिरापर्यंत मिटिंग असल्याने आदीला घेऊन नाही गेली .”
” एक विचारू ईरा ? …..तुला नेमकं काय वाटतं स्त्रीचं करिअर आणि मूल ह्याबद्दल ?…मोकळेपणाने सांग , मला काही नाही वाटणार ……माझ्या करिअर मध्ये  पण असे खूप प्रसंग आले ज्यात नंदन ,अंकिता चे संगोपन  कोंप्रोमाईझ करावं लागणार होतं …….मला नाही जमलं ग तडजोड करणं…….मुलांना जन्म आपणच देतो न ? मग ? तो निर्णय आपण  स्वेच्छेने घेतो , मग त्यामागील जबाबदाऱ्या पण सहजपणे घ्याव्यात न ग?….”
” सुवर्णमध्य साधता येतो आई . करिअर च्या  शिखरावर जाऊन बसतांना पायाखाली आपलेच लोक येत असतील तर काय करायचं ते यश ?”
सुनेच्या शहाणपणाचं राधिकाला कौतुक वाटलं .
******सुरेंद्र त्यांच्या  ‘स्टडी’ मध्ये वाचत बसले होते . राधिकाला दारात बघून त्यांनी हाक मारली . उद्या आदि जाणार ह्याची प्रचंड चुटपुट तिला लागली असणार ह्याची त्यांना जाणीव होती .
“राधिका , ये बस .”
” सुरेंद्र , आपण आदीला दत्तक घेतलं तर?…..म्हणजे नंदन ईरा ने ….?”
“राधिका !  वेडी आहेस का ? आदीला आई ,वडील ,आजी आजोबा सगळे आहेत .तू  असा विचार तरी कशी करु शकतेस?…..मान्य आहे नंदन इरा ला अजून मूल नाहीये……शिवाय ईरा ला स्वीडन ला जायचंय….……
“अंकिता ने केलाच न वेडेपणा?……. गीता वागतेय ते फार शहाणपणाचं आहे का ?  आणि गीताची आई ?…..ती तर आजी आहे न?…?”
” मी समजू शकतो राधिका  , तुला खूप जड जातंय आदीला वापस पाठवणं . पण आवर स्वतःला .”
   निखिल ला बघून आदी धावत गेला. निखिल नि त्याला घट्ट कवटाळून घेतले होते .
” बाबा , मम्मा चा फोन आला होता . ती पण घरी येतेय. ये s s s!!”
”  ओ माय स्वीट हार्ट!…बाबा , त्रास झाला असेल न तुम्हाला?…सॉरी हो आई , एक शब्दाने न अडवता माझी अडचण समजून घेतलीत .
“तुला कल्पना नाही निखिल , आम्हाला काय  मिळालं ह्या आठवड्यात . असं वाटलं हे दिवस कधी संपूच नयेत.”  राधिका टेबल लावत भरल्या डोळ्याने  म्हणाली .
सुरेंद्र राधिकाने अतिशय प्रेमाने बाप लेकाला खाऊ घातलं. थोड्या वेळात गीता आली. तिला पाहून आदीला उन्मळून आलं. तो तिला जाऊन जे चिटकून बसला , की   राधिकाला धन्य धन्य झालं. प्रचंड काळजीचं सावट दूर झाल्यासारखं.
     राधिका आपल्या आवडत्या जागी दूर टेकडीकडे बघत बसली होती……स्त्री पुरुष नातं कसं आहे न?……कुण्या एकानं पसरवावं , दुसऱ्यानं सावरावं . आई हे एक पद आहे , पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन काळानुरूप वेगवेगळा …कोणी अंकिता सारखी टोक गाठणारी , कुणी माझ्यासारखी , कुणी गीता सारखी करिअर ला झुकतं माप देणारी…..तीन कोनावर तीन जणी …..शिवाय इरा …. …ती काय निर्णय घेणार…..तिला देखील नवीन संधी मिळतेय कंपनी कडून…. स्वीडन ला जायचंय ..तो एक चौथा कोण…चार कोनांवर चौघीजणी,  नंदन आणि निखिल सारख्या पुरुषाची  केंद्रस्थानी तीव्र गरज असणाऱ्या…..
      ईरा मागे येऊन थांबली होती.
” आई , एक सांगायचंय.”
“?..?”
“तुम्ही आजी होणार आहात .”
” ग्रेट! अभिनंदन !….पण स्वीडन? “
……..”तुम्ही अजिबात काळजी करू नका…
आणि मी निर्णय घेतलाय ,  मी आताच स्वीडन ला जाणार नाही . उलट थोडा गॅप घेऊन , दोन तीन वर्षे घरी थांबून मग पुन्हा नोकरी सुरू करेन.
आतातायी निर्णय घेणार नाही .”
          राधिका प्रसन्नपणे हसली ……….
चौकोन पूर्ण झाला होता……सुरेंद्र , नंदन आणि निखिल सारखे मध्यबिंदू घेऊन .
अपर्णा देशपांडे
Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

3 thoughts on “ चौकोन आणि मध्यबिंदू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!