झेप
आज तू व्यक्त झालीस, तुला समजून घेण्याच्या नादात मी मात्र कोलमडून पडलेय. हे शिवधनुष्य आपल्याला झेपेल की नाही, मी तुला ह्या निर्दयी जगापासून कशी वाचवू शकेन, हेच कळत नाहीये. तुझ्या जन्माच्या वेळीच मी ठरवलेलं की तू जेव्हा ह्या कळांमधून जाशील, तेव्हा तुझ्या पाठीवरून हात फिरवायला मी असेन. डिलिव्हरी रूममध्ये तुझ्याबरोबर तुझा हात धरून मी असेन, आणि एका बाजूला तुझ्यावर अखंड प्रेम करणारा कासावीस झालेला तुझा नवरा असेल. आणि मी खंबीरपणे तुम्हाला दोघांना आधार देईन. ब्रेस्टफीडिंगच्या वेळी सुद्धा मी ज्या दोलायमान अवस्थेतून गेले, त्यावेळी आई माझ्याजवळ नव्हती. तेव्हाच तुला पाजत असताना मी तुला वचन दिलं होतं की तू जेव्हा ह्या अवस्थेतून जाशील, तेव्हा तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन करायला, तुझ्याबरोबर जागरण करायला, तुला झोपू देऊन, तुला तुझ्या करियरला वाव द्यायला मी असेन. मी तुझं पिल्लू तुला हवं तेव्हा, तुम्हाला दोघांना हवं तसं मी सांभाळायला असेन. असंबंध विचारांनी डोक्याचा भुगा झालाय.
जशी तू मोठी होत गेलीस तशी माझी स्वप्न बदलत गेली. तुला तुझ्या व्यक्तिमत्वात घडत असताना बघून माझा उर अभिमानाने दाटून यायचा. तू शाळेत गेलीस तेव्हा तुझ्यापेक्षा जास्त मीच रडले असेन. आणि मग हळूहळू तुझी ओळख, तुझ्या मैत्रिणी, तुझ्या आवडी-निवडी घडत गेल्या. तू इतर मुलींसारखी नाहीस, हे खूप लहानपणीच कळलं होतं. इतर मुली जेव्हा प्रिन्सेस, पिंक-पर्पलच्या नादात होत्या तेव्हा तू कधीच ह्या गोष्टींसाठी हट्ट करत नव्हतीस. आपल्याकडे कधी तुझ्या मैत्रिणी स्लीप-ओव्हरसाठी यायच्या.सकाळी उठून बघावं, तर कोणाचे पाय कोणाच्या गळ्यात असायचे. आणि तुला त्या गुंत्यात शोधावं, तर तू तुझ्या बेडवर जाऊन एकटी शांत झोपलेली असायचीस. “अगं, इकडे वर कधी आलीस?” “मला नाही आवडत असं चिकटून झोपलेलं, तू असतेस ते वेगळं.” मलाही ते खूप आवडायचं, तुझं वेगळेपण अजूनच भारावून टाकायचं.
उठता-बसता तुला मी पापा द्यायचे, पटकन उचलून घ्यायचे. माझी गोड- गोंडस बाहुलीच होतीस तू. पण मग माझ्या लक्षात आलं की, तू आता “बिग गर्ल” झालीयेस! असं सगळ्यांसमोर लहान बाळासारखं वागवायचं नाहीये तुला आता. मग तू किती पटापट मोठी होते आहेस, तुझं बालपण तर कामाच्या धबडग्यात उपभोगायचंच राहून गेले, अशी बोच जाणवू लागली. जेव्हा तू मला नातवंड देशील तेव्हा त्यांचं बालपण मी किती निगुतीनं जपेन, ह्याची मी मनोराज्य करू लागले. सतत तुझ्या अवती-भवती राहणं, तुझ्या भविष्याची स्वप्नं बघणं, ह्याशिवाय दुसरी ओळखच नाहीये मला, कधी नव्हतीच. ऑफिसमध्ये असेल माझा हुद्दा काहीही, कोणाची सून, कोणाची बायको-बहीण,मुलगी अशा असंख्य ओळखी होत्याच माझ्या, पण जेव्हा तुझी आई म्हणून मला ओळखू लागले नं तेव्हाचा आनंदच काही वेगळा होता!
तशी लहानपणापासूनच तुला स्वतःहून कोणाशी मैत्री करणं फारसं कधी पटलं नाही, किंवा जमलं नाही. जर कोणी स्वतःहून पुढाकार घेतला, तुला आवडेल ते खेळ खेळलं, तुझं नेतृत्व मान्य केलं की तू खुश असायचीस. आणि सुदैवानी अशा मैत्रिणीही लहानपणी मिळत गेल्या सहजगत्या. तू म्हणजे त्यांच्यासाठी स्वघोषित नेता असायचीस, आणि तू सांगशील तेच सगळे ऐकायचेही. मला आठवतंय, तू पहिलीत असशील. तुझ्या वर्गातल्या मुलांच्या आयांबरोबर मी गप्पा मारत होते. त्या सांगत होत्या, त्यांच्या मुलांची आतापासूनच भांडण होतायेत की तू कोणाशी लग्न करणार. तुझ्या बरोबर लग्न झाल्याची चित्रंही एकानी काढली होती, आणि सगळ्यांना दाखवत फिरत होता की, हे बघा माझ्याकडे प्रुफही आहे लग्नाच्या फोटोजचं. इतकं हसायला येत होतं नं त्या मुलांचा तो निरागसपणा बघून. आणि नकळत मन हळवंही झालं होतं. तू मोठी होऊन तुझ्या लग्नाचेही क्षण डोळ्यांसमोरून तरळून गेलेले. पहिली-दुसरी काय चौथीपर्यंत तुला मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त असायचे. बाकीच्या मुली जेव्हा भातुकली, शाळा-शाळा खेळायच्या तेव्हा तुला मुलांबरोबर बास्केटबॉल, क्रिकेट खेळण्यात जास्त रस असायचा. मुलांनाही तू हवी असायचीस खेळायला, बाकी मुलींना ते खेळायला घ्यायचे नाहीत. असते आवड वेगळी, मोठी झालीस की बघू असं म्हणून मीही फारसं लक्ष दिलं नाही.
तू मोठी होत गेलीस, आता तुझे वयात येण्याचे दिवस आले. तुझ्याबरोबरच्या मुली नटू मुरडू लागल्या. त्यांचे हट्ट वाढत गेले- असेच कपडे हवे, हे ब्रँड हवे. इतर आया जेव्हा लाडिक तक्रार करीत की आज-काल त्यांच्या मुली तासनतास आरशासमोर असतात, सगळं मॅचिंगच लागतं, आज-काल काय घालायचं ह्यावर आमचे वाद होतात, हे अन ते… मला कळायचंच नाही की हे काय आहे? आपल्यामध्ये असले कुठलेच वाद नव्हते. तुझी सगळी खरेदी मीच करायचे. माझे कपडे तू अगदी आवडीने घालयचीस, आणि खरं सांगू- एकदा तू काही घातलंस ना की तुझ्यावरच जास्त खुलून दिसायचं. मग मीही ख़ुशी-ख़ुशी तुला माझ्या कपड्यांवर डल्ला मारू द्यायचे. माझा जीव-की प्राण आहेस तू. तुझ्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक आहे मला. तुझं हसणं, तुझं शांत असणं, एकांतात रमणं, तुझं सुंदर चित्र काढणं, अभ्यासात हुशार असणं, जी कुठली गोष्ट हातात घेशील त्याचं सोनं करतेस तू.
आज पुन्हा भूतकाळात मन रमतंय. तुझी लहानपणापासूनची सगळी रूप, तुझ्या आवडी-निवडी, छोटे-मोठे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर येतायेत, आणि मी तुला समजून घ्यायला कमी पडले असं वाटतंय. माझ्या द्रुष्टीनी मी तुझ्या खूप जवळ होते, तुझी प्रत्येक गोष्ट मला माहिती होती असं मला वाटायचं. दुसऱ्या कोणी सांगितलं की, “मुलं सगळं काही घरी सांगत नाहीत, त्यांना बरोबर माहिती असतं, घरी काय सांगायचं आणि काय लपवायचं ते” , असं म्हंटलं की मी मनात म्हणायचे, आमचं वेगळं आहे. माझी मुलगी माझ्यापासून कधीच काही लपवत नाही.
तुझ्या पौगंडावस्थेतील बदल मला जाणवत होते. आधीच शांत असणारी तू अजूनच कोशात गेलीस. त्यातच तुझ्या खास मैत्रिणींचा ग्रुप दुरावला. एकीच्या पालकांची बदली झाल्याने ती दुसऱ्या शहरात गेली तर एकीने शाळाच बदलली. पण हे असं होतंच, नवीन वर्ग, त्यातून हे वय अवघड, त्यात तुझा मुख दुर्बळपणा! त्यामुळे नवीन मैत्री होऊन रुळलायला वेळ लागणारच हे मी गृहीतच धरलेलं. त्यामुळे तुझं शांत होणं, माझ्या नजरेआड झालं खरं. तू कधीच अभ्यासात मागे नव्हतीस, त्यामुळे तुझ्या मागे कधी लागायला लागलंच नाही. स्वतःची जबाबदारी ओळखून तू बरोबर सगळ्या ऍक्टिव्हिटीज, अभ्यास-परीक्षा संभाळतेस. त्यात मीही आता वयाच्या अशा टप्प्यावर येऊन पोहोचलेले की, नाही म्हण्टलं तरी तब्ब्येतीच्या थोड्या-फार कुरबुरी सुरु झालेल्या. स्वतःसाठी वेळ द्यायचा राहूनच गेलं हे नव्याने जाणवायला लागलेलं. स्वतःकडे लक्ष देण्याच्या नादात तुझ्यातले हे बारीक-सारीक बदल ह्या नाजूक वयामुळे असतील, असंच वाटत राहिलं.
तुला मी आडून आडून विचारत होते की, कोणी आवडतंय का, कोणी काही वेगळं ग्रुपमध्ये आलंय का, पण तू नुसतेच खांदे उडवून, “हे असलं काही नसतं गं, मी किती लहान आहे आणि तू काय विचारतेयेस!” असं म्हणून मलाच वेड्यात काढायचीस. मग एक दिवस आपण टीव्ही बघत असताना, एका मालिकेत तर्हेतर्हयेच्या जोड्या होत्या. नवरा-बायको,समलिंगी जोडी, तरुण बायको-वयस्कर नवरा, गोरी बायको- काळा नवरा! नात्यांमधली विविधता दाखवून एकप्रकारे समाज-प्रभोदन करणारी मालिका. आता तू कळत्या वयाची असल्यानी आपण दोघी ती बघू लागलो. सुरुवातीला तू अवघडून बसलीस. पण मग तुला कळलं की मला त्यात काहीच वावगं वाटत नाहीये, त्यांच्यातल्या गमती-जमतींवर आपण खळखळून हसत होतो. ह्या विषयांचा बाऊ मला कधीच नव्हता. मग आपण त्या मालिकेबद्दल वरचेवर बोलू लागलो, एकही भाग तू चुकवत नव्हतीस. तरीही मला वाटत राहिलं की, तुला आता मी मोठ्यांसारखं वागवतेय हे आवडतेय. ह्या अशा अडनिड्या वयात मधेच तुला लहानांसारखं वागायचं असायचं, तर कधी अचानक मोठ्यांसारखं! मीही तुझ्या कला-कलाने घेत होते.
मग एक दिवस तू म्हणालीस, “आज तुझ्याबरोबर झोपू?” मी तर खूषच झाले. माझी परी पुन्हा एकदा माझ्या कुशीत शिरून झोपणार होती. तिच्याबरोबर सायकलिंग करणं, तिच्याबरोबर धावायला जाणं, तिला थोपटत झोपवणं, हे अगदी आमचे दोघींचेच क्षण असायचे. अशावेळी मी तिच्या मनात काय चाललंय हे काढून घ्यायचा प्रयत्न करायचे, आणि तीही हळूहळू का होईना तिचं मन उलगडत जायची.पण आज काही बोलायलाच तयार नाही, पठ्ठी! शेवटी बोलता बोलता मलाच झोप लागली. मग दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच तुला घेऊन ड्राईव्हला गेले. ड्राईव्ह करताना तुला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते.
“काय चाललंय सध्या शाळेत?”
“उम्म, काय नेहमीचंच बोरिंग…”
“काल काय बोलणार होतीस?”
“कुठे काय..”
“काही सांगायचं नव्हतं?”
“नाही”
“नक्की?”
“हो!”
“काहीही बोलायचं असलं तर सांग मला, मी आहे नेहमीच तुझ्यासाठी.”
“हम्म”
एव्हाना हातांची चुळबुळ सुरु झालेली. खिडकीतून बाहेर बघत मी किती इरिटेट करतेय हे भासवण्यासह प्रयत्नही करून झाला. तरी मी रेटा देणं चालूच ठेवला.
“सांग ना, मैत्रिणी झाल्या का एव्हाना? सारखी फोनवर असतेस म्हणजे, मैत्रिणी असतील ना आता बऱ्याच?”
“त्यांना मैत्रिणी नको म्हणूस हं प्लीज! प्रोजेक्ट्साठी वगैरे आम्ही बोलत असतो एवढंच. ह्या वर्षी सगळंच वाईट होतंय..”
एव्हाना माझा रडार जागृत झाला होता.
“वाईट म्हणजे काय झालं?”
“काही नाही…”
“अगं आताच तर म्हणालीस की वाईट होतंय?”
खिडकीतून बाहेर बघणं सुरूच.
“कोणी काही बोललंय का तुला? तू मागच्या आठवड्यात म्हणालीस तसं तुला कोणावरून चिडवतायेत का? अगं, आम्ही पण तुझ्या वयात असताना उगाच मुला-मुलींच्या जोड्या लावायचो आणि एकेमकांना चिडवायचो. तसं तुला कोणी चिडवतंय का? की तुला कोणी आवडलाय?”
“तसं काही नाहीये!”
“बरं मग, काय वाईट?”
“ते वाईट लोक असतात ना…”
मी सुन्न. एका क्षणात किती प्रकारचे विचार येऊन गेले ते माझा मलाच माहित.पण पटकन कुठलेच निष्कर्ष काढायचे नाहीत, असं मनाला बजावलं आणि पुन्हा एकदा शांतपणे विचारायला सुरुवात केली.
“कोण वाईट लोकं? काय झालंय बच्चा?”
“अगं ते वाईट म्हणजे LGBTQ …”
“कोणी म्हंटलं की ते वाईट असतात? त्यांच्यापैकी कोणी काही त्रास दिलाय का तुला?”
माझ्या हृदयातले ठोके आता तिलाही ऐकू जातील की काय, असं वाटून मी समोरच्या रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं.
“मला नाही दिलाय कोणी त्रास. पण सगळे त्यांना वाईट म्हणतात ना…”
“वाईट नसतं असं कोणी, त्यांच्याबद्दल काय? तुला कोणी काही म्हणटलं का? की तुला उत्सुकता वाटतेय?”
“हम्म म्हणजे तसं…”
“तसं म्हणजे? तुला वाटतंय का की, तू तशी आहेस?”
“हम्म”
“हम्म म्हणजे नीट सांग ना मला. तुला वाटतंय की तुला मुली आवडतात?”
“हो”
“म्हणजे कदाचित की नक्की फक्त मुलीच आवडतात?”
“हो, मुलीच”
“नक्की कधी कळलं तुला?”
“तुला कधी कळलं?”
“तुझ्याच वयाची असेन मी. कुठल्याही मुलानी माझ्याकडे बघितलं की वाटायचं ह्याला मी आवडत असेन का? बरेच आवडायचे त्या वयात. वेडं वय होतं ते.”
“हम्म तसंच.”
कितीही शांतपणा दाखवत असले तरी मी आतून मुळापासून हलले होते. पुढे काय बोलावं, आणि मी जे ऐकलं ते खरं का, हेच कळत नव्हते. हे सगळं सांगणं तिला किती कठीण गेले असेल. मी जर अशी कसून चौकशी केली नसती, तर तिनी मला हे कधी सांगितलं असतं? किती दिवस, महिने हे तिनी लपवून ठेवलं असेल? तिच्याशी मी नक्की काय बोलायला पाहिजे आता? गाडी थांबवून, काळाला पॉझ देऊन पटकन गुगल करावं असं वाटू लागलं. त्या क्षणाला, तिला घट्ट छातीशी धरून, काहीही झालं तरी मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगावंसं वाटलं. मग उगाच काहीतरी घ्यायचं म्हणून एका दुकानापाशी गाडी थांबवली. आणि गाडीतच तिला घट्ट मिठी मारली. कुठेतरी तिनी सुटकेचा निश्वास टाकल्यासारख उगाच मला वाटलं. तिला समजावलं की,”हे असं वाटणं म्हणजे स्वाभाविक आहे. तुला जर खात्री असेल तर मी आहे तुझ्याबरोबर. काहीही बोलू शकतेस तू माझ्याशी. कोणी आवडतेय का तुला?” “नाही गं… पण आमच्या शाळेत आहेत असे बरेच जण. आणि त्यात कोणाला काही वावगं वाटत नाही, पण त्यांच्या मागे लोकं बोलतातच ना.”
“हो गं बाळा, हे तसं थोडं जगापेक्षा वेगळं आहे ना… लोकांच्या समजुतीपेक्षा कोणी काही वेगळं वागलं की असं होणं स्वाभाविकच आहे ना. पण आता ह्याची तयारी ठेवली पाहिजे ना?”
मी समजावत तिला होते की, स्वतःला तेच कळत नव्हतं. समोर काय वाढून ठेवलंय आणि त्याला कसं सामोरं जायचं ह्याची पुसटशीही कल्पना नाहीये. ना अजून तिनी हे कोणा मैत्रिणीला सांगितलंय की, तिच्या बाबाला सांगायला ती तयार आहे. तिचं हे गुपित माझ्याकडे सोपवून ती मोकळी झालीये आणि माझ्या छातीवर मात्र कोणीतरी मणा-मणाचं ओझं आणून टाकलंय. तुझ्यासाठी बघितलेली सगळी स्वप्नं एका क्षणात नजरेसमोरून तरळून गेली. देवाकडे एकच प्रार्थना आहे की, तुला सांभाळून घेण्याची, समजून घेण्याची शक्ती त्यानी मला द्यावी. वेळप्रसंगी जगाशी, जवळच्यांशी लढण्याची ताकद आपल्या मनगटात येऊ देत. तुझ्यासाठी काय योग्य-काय अयोग्य हे ठरवण्याचा मला काही अधिकार नाहीये,नव्हताच तुझ्या आयुष्याची तूच शिल्पकार असणार आहेस, आणि असायलाच हवी आहेस. पालकांनी फक्त विश्वास ठेवून आपल्या पाल्याला साथ द्यायची असते. एक हक्काचं स्थान जे काहीही झालं तरी दुरावणार नाही हा विश्वास द्यायचा असतो. हे बोलणं आणि प्रत्यक्ष कृतीत आणणं ह्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. आता हे शिवधनुष्य पेलण्याची शक्ती माझ्यात येऊ देत. तू घे झेप मोकळ्या आकाशात उंच भरारी मारण्यासाठी,, मी आहे तुझ्या पाठीशी!
- भेट भाग ५ - February 18, 2024
- भेट – भाग ४ - December 18, 2023
- भेट – भाग ३ - December 11, 2023