पत्रास कारण की…

असं मायन्यात लिहायचं असतं, म्हणून लिहितेय. नाहीतर तुला पत्र लिहायला मला कारणांची गरज नाही.

प्रिय पेक्षा आणखी जवळचा शब्द , नाही लागला हाताशी, …… म्हणून अशी थेट सुरुवात.

या व्हाट्सअप्प मेसेंजर च्या जमान्यात पत्र लिहिणं तसं ऑड वाटतं नं…… पण मी लिहिलीत तुला खूप पत्रं……. शाळेत असताना,….. एकही दिलं नाही, …….. असतील आता कुठशी माळ्यावर……… माहेरातल्या.

पण आज लिहितेय, धाडस करून…… पण आताही हे पोहोचेल की नाही, माहीत नाही.

परवा शिवजयंती होती ना. त्यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या, जवळच.

गॅलरीतून ऐकू येत होती, ….भाषणं.

म्हणून आवरलं अन मुद्दामहून गेले चौकात. कुणी विद्यार्थी, एखाद्या फर्ड्या वक्त्यासारखा बोलत होता. टाळ्यांचा गजर होत होता. त्याचं भाषण संपलं अन, सलग पाच मिनिटं टाळ्या वाजत राहिल्या.  या सोशल मिडियाच्या काळात, त्याच्या वक्तृत्वकलेचं सगळ्यांना अप्रूप वाटत होतं रे…….

पण मी मात्र त्या टाळ्यांमध्ये हरवून गेले. यापेक्षाही मोठा गजर मी ऐकला होता. मन थेट, 35- 40 वर्ष मागे गेलं. किमान पाचसहा वर्षे तरी तुझी भाषणं ऐकलीत. तुझं नाव पुकारलं की, अख्खी शाळा, गावकरी टाळ्या वाजवत रहायचे. तुझ्या तोंडातून पहिला शब्द बाहेर पडेपर्यंत हे असंच सुरू असायचं. एखाद्या मंडळाची स्पर्धा असू दे, नाहीतर शाळेतला सांस्कृतिक कार्यक्रम, तुझा प्रत्येक शब्द ऐकायला सगळे आतुर असायचे.

आणि मी, …….. त्या तुझ्या जादुई वलयात, अन त्या तुझ्यासाठी होणाऱ्या टाळ्यांच्या गजरात हरवलेली.

आत्ता , एखादं-दीड वर्ष झालं असेल, फॅमिली गेट टुगेदर ला तु भेटलास, तेव्हाही, ….. अगदी माझे मिस्टर पण त्या तुझ्या जादूतून सुटले नाहीत.

घरी आल्यावर सहज बोलून गेले,

“युअर चॉईस वॉज ग्रेट ……”

मनकवडे आहेत ना, …… म्हणून तर इतकी वर्षे संसार निभावलाय.

तु माझा चॉईस होताच, …… पण तुझा ?

कधीच काही बोलला नाहीस, आणि आत्ता, इतक्या वर्षांनी, कबूल केलंस ते थेट स्वतःच्या बायकोसमोर…..

किती लाघवी आहे ती, …. समोरच्याला पटकन आपलं करून घेते. तुझ्यापेक्षा जास्त, घट्ट मैत्रीण झालीय माझी.

आणि तिच्या समोरच बोलून गेलास,

“वेळेत लग्न केलं असतं, तर हीच माझी बायको असती…”

कसं आणि कधी करणार होतास रे ?

कधी बोलला पण नाहीस, माझ्या घरच्यांशी देखील फारसं बोलणं नाही. आपले समाज पण वेगळे. तरीही, घरच्यांनी तुला होकारच दिला असता. तुझ्या प्रभावाखाली ते सुद्धा होतेच की….. तु खुप मोठा होणार, ही खात्री होती पप्पांना. शाळेचे मोठे देणगीदार म्हणून कायम स्टेजवर असायचे, ….. तुझा स्टेजवरचा वावर, तुझं बोलणं, सगळं घरी आल्यावर ऐकवत बसायचे मम्मीला.

अन मी लांबून ते ऐकण्यात हरवून जायचे. अस्सल व्यावसायिक असलेल्या पप्पांच्या तोंडून कुणाचं तरी कौतुक म्हणजे मोठं अप्रूप…… त्यातही ते तुझं कौतुक…. सुखी स्वप्नांच्या झोपाळ्यात, झोके घेत असायचे मी त्यावेळी.

पण तुला मोठा इंजिनिअर व्हायचं होतं. अन तसा मोठा जनरल मॅनेजर झालास देखील. पण आमच्या व्यापारी समाजात, मुलीच्याच नव्हे तर मुलांच्याही लग्नाची घाई असायची. बारावी झाली की स्थळं पहायला सुरुवात. कशी थांबवणार होते, मी हे सगळं…… एकटी….. खरंच एकटी, माझ्या स्वप्नां सोबत. तुझ्यासाठी रंगवलेली, पण तुला कधीही न सांगितलेली.

कधीतरी, पुढच्या बेंचवरून, तुझ्या बॅक बेंचर मित्रांशी गप्पा मारायला, तु मागे यायचास. अन वाटायचं माझ्यासाठीच आला आहेस.

कधीतरी, नजरानजर देखील व्हायची. त्या ओझरत्या नजरेत, कसं सांगणार होते मी सगळं, माझ्या मनातलं. तु बुद्धिमान होतास. तुला समजत असणार सगळं.

शाळेव्यतिरिक्त तुला पाहता यावं, भेटता यावं, म्हणून तुम्हा मित्रांची वेळ गाठून मी नदीकाठच्या मंदिरात यायची. तुझ्याशी बोलण्याची संधी शोधत रहायची. तुझे मित्र तुला चिडवायचे देखील. पण तुला लोकलज्जा जास्त प्रिय होती.

एकदा , नोट्स मागायचं निमित्त करून बोलले देखील. पण तु, ….. उद्या शाळेत देतो …… यापुढे सरकलाच नाहीस.

कुठलाही क्लास न लावता, तु टॉपर होतास. क्लास वाले सर, तुला हरवण्यासाठी, बक्षीस लावायचे. पण तु हरायचा नाहीस. मला क्लास मध्येच हसू यायचं.

गावातल्या प्रत्येक उत्सवात, मग गणेशोत्सव असो किंवा नवरात्र, तु असशील तिथे मी पोहोचायचे. माझं मैत्रिणींचं नेटवर्कच तसं होतं. सगळ्या जणींना माहीत होतं, …… तु माझा आहेस…… अगदी तुझ्या मित्रांनाही…….

फक्त तुला माहीत नव्हतं, ….. की माहीतच करून घ्यायचं नव्हतं. कदाचित अडकला असतास माझ्यात….. तर एवढा मोठा झाला नसतास. खरंतर पप्पांचा व्यवसाय तुझाच तर होता. पण स्वतःच्या मनगटावर तुझा जास्त विश्वास होता. आणि हेच तर मला आवडायचं.

एकदा, …… फक्त एकदा बोलायला हवं होतं.

काही दिवस, काही तास, …… किमान काही क्षण तरी, तुझ्या सोबतचे जगले असते. खांद्यावर डोकं टेकवलं असतं.

माझ्याकडे, आठवणींचे खजिने आहेत , पण फक्त तु अन मी असे क्षण, …… नाहीत रे.

माझ्या स्वप्नात मी भरपूर जगले, तुझ्यासोबत.

पण एकदा बोलायला हवं होतंस….. किमान नाही म्हणण्यासाठी तरी….

आता, जबाबदाऱ्यांमधून , बऱ्यापैकी मोकळी झालेय मी. लवकर लग्न, ….. लवकर मुलं, …… सगळंच लवकर. आता मुलगा ….. सून ….. मुंबईत असतात.

हल्ली रिकामपण खायला उठतं. एखाद्या तिन्हीसांजेला डोळे भरून येतात. मग निवडत बसते , ….. आठवणी.

भूतकाळाला सुपात घेऊन, हळूहळू पाखडत बसते हल्ली. वेचून काढते एकेक क्षण, …… तुझ्या आठवणींचा. तेवढेच उशाला घेऊन, झोपते रात्री.

हे म्हणतात, नातु आला की मी ठीक होईन.

********************************

काही महिन्यांपूर्वी, मी मुलाच्या लग्नाच्या तयारीत असताना, आपल्या वर्गातल्या, चंदूचा फोन आला.

तु भारती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होतास. करोना पॉझीटिव्ह……  सिटी स्कॅनचा स्कोअर फारच जास्त होता. इथपर्यंतच चंदूला माहीत.

तुझं काय चाललंय? तु कसा आहेस ? काही प्रगती आहे का ? काहीच कळत नव्हतं.

कुणाला विचारू, तु कसा आहेस.

पण माझा भाचा तिथे डॉक्टर होता. त्याला फोन लावला. तो विचारत होता…… कोण आहे हा माणूस ? ……. काय बोलावं सुचलंच नाही.

शेवटी, यांनी फोन घेतला अन डेली अपडेट द्यायला सांगितलं.

तुझा रोजचा रिपोर्ट मला कळत होता. आणि माझ्या सोबत एकही क्षण न जगता, तु माझ्यापासून हळूहळू दुरावत होतास. मी रोज आतून तुटत होते.

देवाला प्रार्थना करत होते. तुझ्या बायकोला विडिओकॉल करून धीर देत होते…….

पण कुठेही न अडकण्याची तुझी जुनी सवय……

आम्हा दोघींमध्येही न अडकता तु निसटलास…… कायमचा. खुप रडले मी त्या रात्री.

*********************************

आता हे पत्र कुणाला देऊ……

कितीवेळा लिहिलं, …… यावेळी मात्र नक्की पोस्ट करीन, त्या नदीकाठच्या मंदिरात.

मी अजूनही वाट बघतेय तुझी, …… पन्नाशी जवळ आली तशी जास्तच निलाजरी होत चाललीये.

मात्र यावेळी आलास की जराही सोडणार नाही तुला…… अगदी बांधूनच ठेवीन बघ, ……

नक्की ये हं, ……

येशील ना, …… माझा नातु बनून ?…… वाट बघतेय…

तुझीच ……..

Story By B R Pawar

B_R Pawar
Latest posts by B_R Pawar (see all)

B_R Pawar

बी आर पवार , भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये नोकरी. शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याखेरीज कथा, कविता, चित्रकलेत रमतो. जीवनानुभव शब्दात चितारायला आवडतो.

5 thoughts on “पत्रास कारण की…

  • April 21, 2022 at 5:34 pm
    Permalink

    सुंदर, वाचताना सर्व काही डोळ्या समोर घडतंय असं वाटत होत.

    Reply
  • April 21, 2022 at 5:49 pm
    Permalink

    वाह !! खूप सुंदर लिहिलय 👌

    Reply
  • April 24, 2022 at 3:18 pm
    Permalink

    फार सुन्दर कथा आहे!

    Reply
  • July 31, 2023 at 3:28 pm
    Permalink

    खूप सुंदर…लक्षात राहील

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!