इस्त्रीचे आयुष्य….
काही लोकांचे संबंध आयुष्य इस्त्री केलेल्या पंढर्याधोप कपड्यासारखं चुणीरहित, डाग विरहित असतं! असे कपडे आणि असे आयुष्य तसंच ठेवायला आणि टिकवायला विशेष मेहेनत घ्यावी लागते. अनेकदा मन मारून प्रलोभन म्हणता येणार नाही अश्या लहान लहान आनंद देणाऱ्या इच्छा मारून टाकाव्या लागतात. हे इस्त्रीपणा टिकवताना माणूस थोडा अलिप्त, गर्दीपासून दूर, आपल्या चाकोरीत, इस्त्री न मोडणाऱ्या वातावरणात स्वतःला बांधून ठेवतो. आयुष्यातील कितीतरी रंगांना, इस्त्री चुरेल पण मजा येईल अश्या प्रसंगांना पारखा होतो अस आमच्या सारख्या इस्त्री सोडा, कित्येक आठवडे न धुतलेली जीन्स आणि दोरीवरून ओढून घातलेले टीशर्ट वापरणाऱ्यांना आणि इस्त्रीचे पर्वा न करता आयुष्यातील चुरगळणारे क्षण एन्जॉय करणाऱ्या लोकांना वाटत! पण इस्त्रीचे कपडे आणि इस्त्रीच्या आयुष्याचे शौकीन त्याच चाकोरीला, त्याच बंदिस्त शिस्तबद्ध आयुष्याला आनंद मानून कपडे आणि आयुष्याची इस्त्री काटेकोरपणे सांभाळतात. कारण इस्त्रीपणा हाच त्यांचा आनंद असतो आणि पुढे अभिमान देखील बनतो!
विन्यामामा पण तसाच एक इस्त्रीचे आयुष्य जगणारा माणूस. चाळीसच्या दशकाच्या शेवटी देश स्वतंत्र व्हायच्या किंवा झाल्याच्या आसपासचा ब्राह्मण कुटुंबातील जन्म. दुसऱ्या महायुद्धानंतर त्याचे आजोबा केव्हातरी मुंबईला सहकुटुंब शिफ्ट झाले. म्हणून ह्याचा जन्म मुंबईचा. गोरा वर्ण, सामान्य शरीरयष्टी. तो लहान असताना चाळीतील इतर मुलं चौकातल्या मातीत वेगवेगळे खेळ खेळत मळायची तेव्हा हा आईबरोबर घरात बसून चौसर सदृश सोगट्यांचा खेळ किंवा पत्ते खेळायचा. इस्त्रीपणा तेव्हापासून त्याच्या अंगी होता. शाळेत पण इतर मुलं खेळत असताना हा डबा खाऊन पुस्तक वाचायचा. इस्त्री बिघडायला नको म्हणून!
ह्याच चाकोरीत मोठा झाल्यावर त्याला हळूहळू आपल्या इस्त्रीपणाचा अभिमान पण वाटू लागला. मग त्याने इस्त्रीपणाला “सरळमार्गी” अस टुमदार नाव दिलं! मग सरळ माणूस म्हणजे विन्या आणि विन्या म्हणजे सरळ माणूस अस एक समीकरण होऊन गेल. मग सरळमार्गी आयुष्यात सरळमार्गी सरकारी नोकरी मिळाली आणि आयुष्यात सकाळ पासून उन्ह कलेपर्यंत काय करायचं हा प्रश्नच निकालात निघाला. कारण आता पुढली चाळीस वर्षे रोज सकाळी ऑफिसला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, जेऊन झोपायचं, उठून ऑफिसला जायचं हा इस्त्री न मोडणारा शिरस्ता फिक्स होऊन गेला होता. त्याच्या नशिबाने त्याला बायकोही इस्त्रीपणा जपणारी मिळाली. म्हणजे असतील आधी काही चुण्या. पण लग्नानंतर तिने इस्त्रीच आपली केली! कालांतराने एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य झाली. पण ती सुद्धा घराबाहेर पडून चाळीतल्या मुलांशी समरस होऊन कधीच खेळली नाही. अनेकदा ती इस्त्रीची साखळी पायात बांधल्याने मन मारतात अस आम्हाला वाटत असे!
जसजसे आम्ही मोठे झालो तसतस विनुमामाच्या इस्त्रीमय आयुष्याबद्दल कुतूहल वाढत गेल. घोटवून हिरवीगार दिसत असलेली दाढी, तलवार कट मिशी, छप्पर उडत असलेले कुरळे केस, काटक शरीरयष्टी, इस्त्रीची पॅन्ट, इस्त्रीचा इन न केलेला फुल स्लिव्ह शर्ट, हातात अटेची अश्या रुपात मामा सकाळी ऑफिसला जाताना जितका फ्रेश दिसायचा तितकाच फ्रेश तो संध्याकाळी येतानाही दिसायचा. त्याच्या चेहऱ्यावर एक कनेक्ट न होणार अलिप्त अस सार्वजनिक स्माईल असे. म्हणजे तो रागावला तरी ते स्माईल चेहऱ्यावर असे. चाळीत होत असलेल्या कचाकचा भांडणांच्या, क्वचित होणाऱ्या एखाद्याच्या आईबहिणीच्या उद्धाराच्या पार्श्वभूमीवर एखाद्या मतभेदाच्या प्रसंगी त्याचा आवाज कधीच चढलेला आम्ही ऐकला नाही. तो शांतपणे ते सार्वजनिक अलिप्त हसू चेहऱ्यावरून हलू न देता आपली बाजू मांडत असे!
सरळमार्गी किंवा सभ्य असणं आणि एखादा गंड अथवा आत्मविश्वासाचा अभाव म्हणून एकंदरीतच संघर्ष किंवा कसोटीचा प्रसंग निर्माण होतील अश्या गोष्टीत न पडण्याचा साळसूदपणा अथवा अगतिकता, ह्यात असलेला फरक खूप सूक्ष्म आहे. सर्वांच्या तो लक्षातही येत नाही! तीन मुलींच्या पाठीवर नवसाने झालेला म्हणून बहुतेक विनूमामाच बालपण ओव्हर प्रोटेक्टड असावं अशी आम्हाला शंका आहे. मग त्या अनुषंगाने झिरो रिस्क वातावरणात राहायचं आणि तसंच वातावरण सभोवताली निर्माण करायचं ह्याची सवय लागून गेली असावी!
चाळीतील आबालवृद्ध समुद्रात डुंबत असताना तो सार्वजनिक गणपती विसर्जन करायला कधीच समुद्रात उतरला नाही. अगदी गुडघ्यापर्यन्त पाण्यातही नाही. तो वाळूत सर्वांचे कपडे आणि चपालांची देखरेख करत असे. चाळीच्या रिपेअरिंग वरून घरमलकाची हाऊसिंग बोर्डाकडे तक्रार करणाऱ्या पत्रावर चाळीतील सर्व भाडेकरूंच्या सह्या होत्या. रोज टंगळमंगळ करत पत्र द्यायच्या आदल्या रात्री त्याला ऑफिसात अचानक उशिरापर्यन्त बसायला लागून दुसऱ्या दिवशी लवकर जावं लागलं. त्याची सही राहून गेली! संक्रांतीला शेजारच्या चाळीतील मुलांशी पतंगावरून राडा झाल्यावर केलेल्या कौलांच्या फेकफेकीत हा सामील नव्हता. तो त्याचे पतंग आणि मांजा घेऊन केव्हाच घरी जाऊन आपला बाह्यांचा पांढरा गंजी आणि इस्त्रीचा लेंगा हा ठराविक पेहेराव घालून बायकोला उकडलेले बटाटे सोलायला मदत करत होता.
विन्यामामा कधीच कोणाचीच क्लियर बाजू घेत नसे. एखाद्या चर्चेत सेनावाले काँग्रेसला आणि काँग्रेसवाले सेनेला शिव्या घालत असले की हा नेहमीप्रमाणे श्रोता असे. “काय रे मामा मत कोणाला?” ह्या प्रश्नाला “मतदान कोणाला केलं हे सांगायचं नसत. म्हणून तर गुप्त मतदान म्हणतात!” अस छापील उत्तर देऊन त्याच ते सार्वजनिक हसू आमच्यावर फेकायचा. त्याने किंवा त्याच्या मुलांनी कधी गणपतीत ओरडून देवे म्हटले नाही, आडवे बाण किंवा करवंटी खाली सुतळी बॉम्ब लावले नाही. सार्वजनिक गणपतीची वर्गणी अकरा रुपयांपेक्षा जास्त कधी दिली नाही! त्याने कधी सुपारीच्या खंडाचेही व्यसन केले नाही. ठरल्या वेळी ठरलेले जेवण जेऊन लवकर झोपायचे इस्त्रीवाला शिरस्ता नेहमी जपला!
एक मात्र होत. त्याच्या त्या इस्त्रीमय जीवनामुळे तसेच जीवापाड जपलेल्या सरळ मार्गी सभ्य माणूस ह्या इमेजमुळे तो मांडवली मस्त करत असे. चाळीतल्या किंवा शेजारपाजारच्या चाळीतील मुलांची भांडण किंवा राडे झाले की विन्यामामा ला हमखास बोलावत. त्याच्या त्या इमेजमुळे राडेबाज पोरांना उगाच कॉम्प्लेक्स येई. मग तो सार्वजनिक हास्य चेहऱ्यावर आणत “चला रे. भांडण मिटवा आता!” असला गुळमुळीत सल्ला देऊन निघून जात असे. तसंच कधी एखाद्या पोराला पोलिसांनी उचलून नेला किंवा इतर काही प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं तर विन्यामामा तिथे इस्त्रीचे कपडे घालून आपला सरळमार्गी सभ्यपणा शिंपडून पोलिसांशी बोलून म्याटर सोडवत असे!
त्याने आयुष्यात टाळलेल्या किंवा न केलेल्या गोष्टींची त्याला भीती होती किंवा त्या करू न शकण्याचा अथवा केल्यास निभावून न नेऊ शकण्याची खात्री होती म्हणूनच हा सरळपणाचा सोपा मध्यमार्ग त्याने स्वीकारला असावा अशी खात्री आमचे वय वाढत गेल्यावर पटू लागली! पुढे उतार वयाला लागल्यावर त्याचा सरळमार्गी सभ्यपणाच कसा बरोबर आणि बिनधास्त, मनासारखं आयुष्य जगणारे, आयुष्यात रिस्क घेणारे, संकटांना आव्हान देणारे कसे चूक आणि बेजबादार हे तो ठासून सांगू लागला. पण तोवर त्याला मानणारी, त्याच्या त्या इमेजला सलाम करणारी पिढी संपत आली होती. दोन तरुण मुलांच्या भांडणात हा आपल्या सभ्यपणाचे चूर्ण घेऊन मध्ये पडला आणि म्हणाला “भांडण काय करता? नोकऱ्या करा. मवलीगिरी बंद करा!” तेव्हा एक मुलगा म्हणाला “ए मामा तू व्हीआरएस घेताना तुझा वर्षाचा पगार होता ना तेवढा पगार मी दोन महिन्यात कमावतो. आणि सभ्यपणाची नाटकं पण नाही दाखवत! मवाली कोणाला म्हणतो तू? तू सेकंड इयर बीए आहेस आणि मी एमबीए आहे. तू जा. आम्ही बघतो आमचं!” तुला दिवसापासून त्याची मांडवलीची खाज कायमची गेली! पण आयुष्यात इस्त्री कायम होती!
पुढे मुलांची लग्न झाली. मुलाने अर्जतीय प्रेमविवाह केल्याने त्याच्या आयुष्यावर एक चुणी पडली इतकीच! आता मुलं लांब राहू लागली. आता मामा आणि मामी दोघेच इस्त्रीमय आयुष्य जगत होते. चाळ तशी रिकामी होती. सरळमार्गी सभ्य आयुष्याला प्रेक्षक उरले नाही! गेल्याच महिन्यात विन्यामामा गेल्याचा फोन आला म्हणून स्मशानात गेलो! तिरडीवर इस्त्रीचा लेंगा आणि इस्त्रीचा शर्ट घातलेला विन्यामामा शांत झोपला होता. चेहऱ्यावर ते सार्वजनिक स्मित तसंच होत! मला मनापासून सांगावसं वाटलं की “विन्यामामा यार चल विसर्जनाला समुद्रात जाऊ, लेझीम आणि कच्छीवर थिरकू, कोणालातरी इरसाल शिव्या देऊ, जोरजोरात देवे म्हणू, बाळासाहेब आमचे दैवत हे बिनधास्त ओरडून सांगू, शेजारच्या चाळीतल्या पोरांवर कौल फेकू, तुझ्या दुसऱ्या जातीतील सुनेला स्वीकारू, एकदा चाळीच्या गच्चीवर जाऊन जोरात ओरडू!” त्या पिढीचा आमच्या चाळीतील जवळजवळ शेवटचा रहिवाशी संपला होता. माझं मन पिळवटलं होतं! मला विन्यामामा त्या तिरडीवरून उठून सार्वजनिक स्माईल लेवून “टेन्शन नको घेऊ. मृत्यू अटळ आहे सर्वांना!” अस शांतपणे सांगत असल्याचा भास झाला! मला हुंदका असह्य झाला! डोळ्यासमोर अश्रूंचा पडदा जमा झाला!
साला खरच काही लोकांच संबंध आयुष्य इस्त्री केलेल्या पंढर्याधोप कपड्यासारखं चुणीरहित आणि डाग विरहित असतं!
Image by Ulrike Leone from Pixabay
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023