आत्तू- भाग १

संध्याकाळ  होत चालली होती .मंगलू  ला घाई करावी लागणार होती .

पुन्हा अंधार पडल्यावर  खाली उतरायला त्रास होणार होता . बाकी लोक सगळे टेकडीच्या पश्चिमेकडे उतारावर काम करत होते , चहा मळ्यात . तिथे खाली उतरल्यावर कंपनीची गाडी येत असे सगळ्यांना न्यायला . पण आज वरती लाकडाचे ओंडके  सरकवायचे होते , म्हणून आज   मंगलू आपल्या हत्तींना घेऊन वर चढला होता . ती कानन देवन पर्वतरांग होती . ( माहिती ::  अनामुडी हे केरळ मधील कानन देवन रंगामधील सर्वात उंच शिखर आहे .) …………..

आज अनामुडी शिखर त्याला खुणावत होते , सकाळपासून . कंपनीच्या मॅनेजर ने दोन दिवसांपूर्वी खास गाडी पाठवून मंगलू ला बोलावून घेतले होते . त्या भागात फक्त मंगलूकडेच पाळीव हत्ती होते , कारण पूर्वी पासून त्याच्या पणजोबाच्या काळापासून त्यांच्याकडे हत्ती पाळण्याचा परवाना होता . सद्य रेंजर साहेबांनी देखील तो सरकारकडून मान्य करवून घेतला होता .

जंगलात बगीच्यासाठी जागा साफ करतांना हे महाकाय हत्ती खूप मोठी कामगिरी पार पाडत असत .

मॅनेजर साहेबांनी विचारले , ” मंगलू , तुझे हत्ती अनामुडी पर्यंत चढतील का ?

म्हणजे टोकापर्यंत नाही , खालच्या थोड्या सपाट भागापर्यंत ?…म्हणजे वेल्लारी सुळक्याच्या पायथ्याशी ?”

” बघतो साहेब . बाबल्या तर जातो ,पण  माझा आत्तु अजून लहान आहे साहेब . त्याला उंचावर जायची सवयच नाही .’

( हत्ती  निसर्गतः उंचावर चढत नाहीत . आपत्कालीन परिस्थितीत मात्र ते अतिशय अवघड चढाव पण ते चढून जातात . अन्यथा त्यांना तसे ट्रेंनिंग द्यावे लागते .)

” अरे , तिथे काही प्रचंड मोठाले ओंडके आहेत . ते उचलून बाजूला करायचेत . बघ , कंपनीचे मालक उद्या येणार आहेत . त्या वेल्लारी सुळक्याच्या पायथ्याशी एक कॉटेज , म्हणजे झोपडी बंधायचिये .”

” नुसती झोपडी ? त्यासाठी इतका खर्च ? ” मंगलूचा भोळा प्रश्न .

” अरे ,म्हणजे तिथपर्यंत रस्ता बांधून तिथे लोकांना रहायची सोय करणार . बोल ,करशील ? तुला भरपूर पैसे मिळतील आणि हत्तींना पूरम च्या सणासाठी पूर्ण सजावटीचे दागिने देऊ .

करतोस का ? ”

” लक्ष्मी ला विचारून सांगतो साहेब .” मंगलू म्हणाला होता .

” अरे काम हत्ती करणार , तुझी बायको नाही . ”

” माझा आत्तु तिचंच ऐकतो साहेब .तिला संगत न्यावी लागल .”

” बरं बाबा , आजच विचार आणि लवकर कळव . पैसे नकोयेत का तुला ? पोरगा शिकतो का शाळा ? ”

” हो , जातो की . पहिलीत आहे . त्याच्याच साठी पैसे जमवतोय . …..पण साहेब एक नाही कळला . जमीन थोडी कमी पडली का मोठ्या लोकांना ? ते डोंगरावर का बांधायच्या तुमच्या  ‘ काटेजी ‘? ”

उत्तरादाखल साहेब नुसता हसला .

त्यादिवशी घरी जाऊन मंगलू ने

बायकोकडे विषय काढला .

” ना बाबा !! जमिनीवर काय काम करायचे ते करा . तिथं डोंगरावर कसं जाईल माझं लेकरू ? मला चहा वेचायला जायचंय . मी नाही यायची ”

” तू नाही म्हणजे आत्तु नाही . छोटे छोटे ओंडके सहज उचलतो ग तो .”

” छोटेच का मोठ्ठे बी उचलतो तो . पण जमिनीवर . ”

एव्हाना मंगलूचा मुलगा शिव ह्याला हा विषय कळाला होता .

” बाबा , मी येऊ सोबत ? मी आन आत्तु , तुम्ही अन बाबल्या !! मस्तं काम करून टाकू .”

” न्हाई !!! मी न्हाई तयार .” लक्ष्मी घाबरून म्हणाली .

” येडे तुला  माहितेय का किती पैसे देणार ते ? ”

“??….”

” पाच हज्जार !! ” तिच्यापुढे पाच बोटं नाचवत तो म्हणाला .

” असुदे हो , यल्लम्मा देती की आपल्याला . माझं मन नाही करत .”

मंगलू ने लक्ष्मीचे मन वळवले . शिव ला

पोचम्मा कडे ठेवून जायचे दोघांनी ठरवले .

त्या तिघांचाही आपल्या हत्तींवर खूप जीव होता . त्या भागात सणावाराला हत्तीवरून मिरवणूक काढत . कुणाचा वाढदिवस असला की अंबारीत बसवत . असे पैसे मिळत . त्यांच्या छोटेखानी लाकडी घरामागे दोन मोठाले बुंधे होते . त्याला बांधलेले असत हत्ती .

बाबल्या आणि अत्तु हे तसे प्रेमाने राहात . पण तरी त्यांना खूप जवळ बांधता येत नसे . बाबल्या चिडला की अत्तुला  जखमी करण्याची भीती होती .

शेवटी  आज मंगलू आणि लक्ष्मी पहाटेच निघाले .  दोन्ही हत्तींना  गवत आणि  भरपूर केळी खाऊ घातली होती . कंपनीचा ट्रक  आला होता . काही अंतरापर्यंत चढाव सुरू होईपर्यंत त्यांना ट्रक ने सोडणार होते .

रस्त्यात नदीवर बाबल्याला डुंबायचे होते .पाणी बघितले की अत्तुला रहावत नसे . सोंडीत पाणी भरून मनमुराद फवारे मारणे म्हणजे आत्तुचा आवडता खेळ . शिव तर त्याच्या सोंडेवर उभे राही ,आणि आत्तु त्याला उचलून पाठीवर उचलून ठेवी .

मंगलूचं पहिलं अपत्य म्हणजे बाबल्या . शिवचा जन्म नंतर झाला .

अत्तु ला तर मंगलू ने एक सर्कस वाल्याकडून  घेतलं होतं .

काय झालं होतं …..

क्रमश:

Image by Christine Sponchia from Pixabay

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!