आत्तु- भाग ३ (शेवटचा भाग)

आधीच्या भागाची लिंक- आत्तु- भाग २

खालून सूक्ष्म आवाज आला ‘ अम्मा s , अम्मा s ‘

” आहो , हा आपल्या शिव चा आवाज आला का ? मी ऐकला .” तीनदा घाबरून विचारले .

पावसाचा आवाज खूप तीव्र होता .

मंगलू कान देऊन ऐकू लागला …

” अण्णा s s , अम्मा s ” खरंच आवाज येत होता .

” येल्लाम्मा , हा पोरगा का आला एव्हढ्या पावसात इथे ? ” आधीच कुडकुडत असलेल्या लक्ष्मीला अजूनच कापरं  भरलं

शिव चा आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला . लक्ष्मी सैर भैर झाली .

शिव का आला इथे ? इतक्या वाईट वातावरणात ? इतक्या दूर ?

” आहो , का आला हा इथे ? समोरचं दिसना झालंय इतक्या पावसात ? …..शिव s s ” तिने हाक मारली .  त्याच वेळी डोंगराचा एक भाग  ढासळला . प्रचंड मातीचा ढीग , गाळ उलथून पडला . मंगलू , लक्ष्मी दूर घसरून दूर जाऊन पडले . काही वृक्ष उन्मळून पडले . लक्ष्मी ओरडत होती …शिव s , बाबल्या s ,

आत्तु रे s !! आणि ती घसरत एका झाडाला जाउन धडकली .

मंगलू चिखलाखाली जवळ जवळ गाडल्याच गेला . पावसाच्या थैमानाने

परिस्थिती खूप वाईट झाली होती .

लक्ष्मी जिवाच्या आकांताने ओरडत होती , ” शिs sव  ,वर येऊ नको s s !!

घरला जा s s !!   मंगलु जी s s ”

मंगलू चिखलात फसला होता . तो ओरडला , ” लक्षमे , पोरं कुठाईत ?”

लक्ष्मी ची शुद्ध हरपत चालली होती .पावसाचे थैमान चालूच होते . आज वरुणराजा खूपच कोपला होता .

इतक्या रणकंदनातही शिव वर पोहोचला होता . त्याने आधी एक जाड फांदी देऊन मंगलू ला चिखलाच्या गाळातून वर यायला मदत केली आणि

लक्ष्मीला उठवले . दोघांची अवस्था खूप वाईट झाली होती . वरून कोसळणारा पाऊस .  समोर पांढरी चादर धरलीये असे वाटत होते . निसरडा उतार आणि प्रचंड प्रपात . तिघेही एक एक वृक्ष पकडून स्वतः ला वाचवत होते . आणि झटका बसावा तशी लक्ष्मी ओरडली .

” आवो  !! बाबल्या ? आत्तु ? ”

मंगलू ने आगतिकपणे आजूबाजूला बघितले . आपण होतो त्यापासून बरच खाली घसरत आलो आहोत , ओंडके ठेवलेली जागा बरीच वरती राहिलीये हे त्याच्या लक्षात आले .

” लक्ष्मी , आता रात्रीचा अंधार आणि हा पूर ! तू शिव ला घेऊन सांभाळून खाली जा . कंपनीची गाडी दिसली तर हात करा ,  घरी जाऊन गरम कपडे घालून थोडी ऊब आणा . मी वर जाऊन पोरांना बघतो .

” नको आण्णा !! तुम्ही पण चला घरी . आपण मिळुन जाऊ . सकाळी पुन्हा येऊ बाबल्या आत्तु ला बघायला .”

” नाही शिव , ते कुठं राहिलेत बघायला पाहिजे . मला रातीचं दिसणार नाही पण त्यांला माझा आवाज कळन ना !! तुम्ही जा .” आम्ही येतोच मागून .

लक्ष्मी आणि शिव निघाले . काळोख झाला होता पण मधून मधून विजा चमकत होत्या त्यामुळे रस्ता कळत होता .

मंगलू ला कळेना की कुठल्या दिशेने आता बाबल्याला शोधावे . त्याने जोरजोरात हाका द्यायला सुरुवात केली .

पुन्हा अंधारात चाचपडत तो वर चढू लागला . तेव्हा त्याला आत्तु चा आवाज आला . अंधारात त्या दिशेला गेला आणि त्याला आत्तुची चाहूल लागली .,,त्याच्या हाताला आत्तु ची सोंड लागली. मंगलुचा स्पर्श होताच आत्तु एकदम त्याला चिटकला . त्याच्या स्पर्शात वेदना होती , त्याला काही सांगायचे होते . तो मागे पुढे होत होता .

वेगळाच आवाज काढत होता .

” आत्तु !! माझ्या सोन्या !! मी तुम्हाला ह्या संकटात टाकलं रे !! बाबल्या ? बाबल्या कुठाय आत्तु ? ”

आत्तु ला काही सांगायचे होते आणि काळोख असल्याने मंगलू ला कळत नव्हते .

” संकटात आहे म्हणतोय तो !!!” मागून आवाज आला .

मंगलू ने चमकून त्या दिशेने पाहिलं . लक्ष्मी वापस अली होती .

” तुम्हाला कसं वाटलं की मी माझ्या लेकरांना सोडून जाईन . ……आत्तु , मी आले राजा , बोल बाबल्या कुठाय ?” शिव आत्तु ला बिलगून रडत होता .

आत्तु ला लक्ष्मीच्या आवाजानेच बळ आलं  . त्याने आपली सोंड तिच्याभोवती गुंडाळली .आणि तिला ओढले . त्याला पकडून ती तो नेईल तिथे निघाली . मागोमाग मंगलू आणि शिव  ही निघाले . तोपर्यंत किंचित उजाडायची वेळ आली होती .

आत्तु त्यांना एका डबक्या पाशी घेऊन गेला . डोंगराची कपार ढासळली होती आणि बाबल्या पूर्ण त्याच्या खाली अडकला होता .  आत्तु ने पूर्ण ताकद लावली तरी ती उचलल्या जात नव्हती .

बाकी तिघे उघड्या डोळ्यांनी बाबल्याची केविलवाणी धडपड बघू शकत नव्हते .

” थोडा वेळ बाबल्या , तांबडं फुटू दे , तू सुखरूप येणार बाहेर ! आम्ही आहोत ना ! ”

थोड्या वेळातच मंगलू कुऱ्हाड घेऊन सरसावला .  त्याने आधी आजूबाजूचे मोठे झाडांचे अडथळे दूर केले . लक्ष्मीच्या सूचनेनुसार आत्तु ने काही ओंडके सरकवले . शिव आत्तु च्या पाठीवर चढून बसला . आता एक मोठ्ठी

शिळा उचलायची होती . म्हणजे बाबल्याचे मागचे पाय मोकळे होणार होते .

तिघांनी म्हणायला सुरुवात केली .

” जोर लगाके हैया !!”

आत्तु ने पूर्ण ताकद लावली आणि ती शिळा उचलली . बाबल्याचे मागचे पाय मोकळे झाले . आता चिखलातून जोर काढून बाबल्याला वर यायचे होते .

आत्तु ने आपली सोंड पुढे केली …बाबल्याने त्याची सोंड त्यात अडकवली ….आत्तु ताकद लावत होता ….काहीच हलले नाही . तोच प्रयत्न त्याने पुन्हा केला आणि बाबल्या वर आला . एवढा मोठा गाळ उलथवून बाबल्या बाहेर आला आणि धप्पकन समोर येऊन बसला .

लक्ष्मी रडत होती .

आत्तु ने सोंडेत पाणी घेऊन बाबल्याला पाण्याने धुतले . पाऊस थांबला होता . ऊन वर येत होते . बाबल्या च्या अंगात ताकद यावी म्हणून आत्तु त्याला सोंडेनी कुरवाळत होता . त्याने आपली सोंड बाबल्याच्या अंगाखाली घातली आणि पूर्ण ताकद लावून त्याला ओढले …..आणि बाबल्या उठला !! आधी लडखडला आणि मग मजबुतीने त्याने पाय पुढे टाकला .

लक्ष्मी ,मंगलू आणि शिव त्याच्या समोर उभे राहून त्याला एक एक पाऊल टाकायला प्रोत्साहन देत होते . हळू हळू ते खाली उताराला लागले . आत्तु ने आपली सोंड उंचावून आनंद व्यक्त केला .

खाली ट्रक येऊन उभा होता . थोड्याच  वेळात सगळे घरी पोहोचले .

” पुन्हा न्हाई आपल्या पोरांना असल्या कामात लावायचं बाबा !!  जीव कासावीस होतो .” लक्ष्मी म्हणाली . ” पैसा काय माझं पोर वापस देऊ शकतं का ?” समोर खेळणाऱ्या बाबल्या आणि आत्तु कडे बघत लक्ष्मी म्हणाली .

” मंगलू , नवीन काम आलंय . तुझे हत्ती घेऊन ये .” मुकादम सांगत होता .

” न्हाई बाबू . माझे पोरं आता फक्त मिरावणुकीतच येतील . मंगलू ने ठामपणे सांगितले .

लक्ष्मी प्रसन्न हसली  .

(समाप्त )

©अपर्णा देशपांडे

Image by Christine Sponchia from Pixabay

Aparna Deshpande
Latest posts by Aparna Deshpande (see all)

Aparna Deshpande

अपर्णा देशपांडे - (B.E E&TC , M.A soc ) एक अभियांत्रिकी प्राध्यापिका . समाज माध्यमं आणि वर्तमानपत्रात नियमित लेखन . वाचन आणि चित्रकारितेची विशेष आवड .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!