कच्चा लिंबू

 
 
“संध्याकाळी जेवायला काय करशील?”
 
“मेथीचे पराठे आणि आमटीभात.” 
 
“एकटीच आहेस घरी. जमेल ना?की थांबशील मी येईपर्यंत?”
 
सासूबाईंच्या या प्रश्नाला “हो, जमेल” असं तिने झोकात सांगितलं होतं. लग्नाला अवघे सहा महिने झाले होते. या सहा महिन्यांत बटाट्याची भाजी करपवून झाली होती, भाजणीचं थालीपीठ खाली तेल न घालता कढईला मस्तपैकी चिटकवून, लढाई करून खरवडून बाहेर काढून झालं होतं. पोहे फडफडीत करून झाले होते आणि साबुदाण्याची खिचडी गच्च गोळा करून झाली होती. रडतखडत, धडपडत सगळं शिकणं सुरू होतं. एखादी गोष्ट चांगली जमली तरी फार कौतुक होत नाही, हे कळून आईची, घराची, आधीच्या स्वातंत्र्याची आठवण येऊन रडू फुटत होतं. गाडीने नवीन रूळ धरल्यावरची खडखड सुरू होती, तिने वेग धरेपर्यंत वेळ लागणार होता. इकडे एकंदरीत फारच कच्चा लिंबू आपल्या पदरात पडलाय याबद्दल घरच्यांना आता खात्री झाली होती. पण लिंबू शिकायला तयार होता आणि त्याला आपलं म्हणल्यामुळे आता त्याला पक्का करून सोडण्याशिवाय घरच्यांनाही गत्यंतर नव्हतं.
 
तर मेथीचे पराठे. वरणभात कसा लावायचा ते नव्याने शिकून झालं होतं, त्याबद्दल आत्मविश्वास होता. मेथीच्या पराठ्यांचं काय करायचं? हा प्रश्न होता. करू काहीतरी, इतकं काय कठीण असणार आहे? नेऊ धकवून, असा विचार करत तिने पीठ भिजवायला घेतलं. इतकंच काय, एकदम टेस्टी पराठे करून सगळ्यांना घरी आल्यावर सरप्राईज देऊ असा चंगच तिने बांधला. फार पाणी न घालता आधी घट्टसर पीठ भिजवून घेतलं. ही टीप आधीच मिळाली होती. एकीकडे कुकर लावला. लग्नाआधी शून्य किंवा मायनस म्हणलं तरी चालेल, असा स्वयंपाक येणाऱ्या (की न येणाऱ्या?) तिला स्वतःचा भलताच अभिमान वाटला. सहा लोकांचं जेवण जमतंय की आता आपल्याला विनासायास! कणकेचा एक छोटा गोळा तिने घेतला, पोळपाटावर ठेवला आणि पोळीसारखा लाटायला लागली. कणिक छानपैकी लाटण्याला चिकटायला लागली. मग परत लाटीचा गोळा करून भरपूर कणकेत बुडवला, परत लाटणं सुरू. ती लाटण्याची क्रियाही दिव्यच होती. मस्तपैकी जोर देऊन देऊन ती पराठा लाटत होती. हलकेपणा कुठेच नाही. कधी सवयच नव्हती असलं काही करायची. असाइनमेंट करायला सांगा, पंधरा मिनिटांत केली असती, एखादी गोष्ट शिकवायला सांगा, चुटकीसरशी शिकवली असती. पण हे काही जमेना. परत लाटणं आणि कणिक एकमेकांना सोडेनात. एक जाडजूड पराठा कसाबसा लाटला, तव्यावर टाकला. तवा मंद गॅसवर. भाजता भाजेना. इकडे दुसरा गोळ्याने तोवर फितुरी केलेली. परातीतच बसकण मारलेली.
 
आता तिला घाम फुटायला लागला. आठ वाजेपर्यंत स्वयंपाक कसा तयार होणार? मारे बोलून गेलो होतो सगळं करून ठेवीन म्हणून! इथे एक पराठा होता होईना! तेवढ्यात बेल वाजली आणि नवरा घरी आला. तिच्या चेहऱ्यावरूनच त्याला समजलं कुछ तो गडबड है! पण तो तरी काय करणार होता? मांडलेला खेळ तिलाच निस्तरायचा होता. ती परत ओट्याकडे वळली. हातपाय धुवून नवरा ओट्यापाशी आला आणि “काय बेत?” विचारू लागला. तोवर तिला रडू फुटायचं बाकी होतं. त्याला अंदाज आलाच. डोळ्यांमधून धरणफुटी व्हायच्या आधीच “एक आयडिया देतो” म्हणत त्याने कणकेचा गोळा लाटला, त्याला आत तेल लावलं, त्याची सुरळी करून त्याला परत गोल केलं. किंचित दाबून त्याची लाटी केली. पिठी लावून हलकं लाटून दाखवलं. झकास पराठा लाटला गेला. मग तव्यावर आच मोठी करून सगळीकडून तेल सोडून, दट्ट्याने दाबून, खरपूस भाजून दाखवला. समोर अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं झालं तिला. त्याने केल्यासारखे सगळं डिट्टो केलं अन पराठे जमत गेले. 
 
“तुला हे सगळं कसं काय माहीत?” तिने विचारल्यावर त्याने सांगितलं, “कॉलेजमध्ये शिकताना, शिकवताना डोळे आणि कान उघडे ठेवतेस ना? मी ही तेच केलंय. आई काय, कशी करते हे डोळे, कान, नाक उघडं ठेऊन बघत आलोय. अधेमधे तिला जमेल तशी मदत केली आहे, त्यात कधीही कमीपणा वाटून घेतला नाही, की पुरुष म्हणून फार बाऊ केला नाही. तिने करूच दिला नाही. क्वचित तीने आरडाओरडा करून आम्हाला स्वयंपाकात मदतीलाही बसवलं आहे, म्हणून सगळं माहीत आहे. तुला तशी वेळ आली नाही कधी, म्हणून कठीण जातंय,  पण जमेल. फक्त एक लक्षात ठेवायचं…”डोळे, कान, नाक उघडे ठेवायचे, हो ना?!” तिने त्याला मधेच तोडत उत्तर दिलं. तो हसला. मेथीच्या पराठ्याचा खरपूस भाजल्याचा वास स्वयंपाकघरभर दरवळत होता. 
 
आजही मेथीचे पराठे करताना तिला तो दिवस आठवतो. पंचेंद्रिय उघडी ठेऊन काम करण्याचे फायदे चिकाssर, तिला तिचं मन सांगत असतं!
 
 
 
 
 
 
 
 
 
Gauri Brahme
Latest posts by Gauri Brahme (see all)

Gauri Brahme

गेली वीस वर्षे पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेची अध्यापिका म्हणून काम करते. अमराठी लोकांना मराठी शिकवते. भरपूर लिहिते, वाचते, कलाकुसरीच्या वस्तू बनवते, खादाडी करते, इतरांना खिलवते. लेखिका म्हणून नावावर २ पुस्तकं जमा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!