सत्यवान
गेला आठवडाभर राजश्री हॉस्पिटल मध्ये होती. त्या दिवशी ऑफिस मधून घरी येत असताना बाईक घसरली आणि रस्त्यावर पडली. पडताना हेल्मेट सरकलं आणि डोक्याला खोक पडली. ब्लिडिंग जास्त झालं आणि ती कोमामध्ये गेली. आठवडाभर राजन, तिचा नवरा आयसीयूच्या बाहेर बसून होता. ऑफिसात सांगितलं होतं त्याने “जमेल तितकी रजा द्या. पुढे पगार कापा आणि ते देखील जमणार नसेल तर टर्मिनेट करा!”
राजनला वर्षभरापूर्वी झालेला त्यांच्या लग्नाचा सोहळा आठवत होता. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले. राजन आयटी मध्ये नोकरीला आणि राजश्री बँकेत. राजनच्या मावशीने स्थळ सुचवलं आणि कांदेपोहे होऊन दोन महिन्यात लग्न झालं देखील. लग्नानंतरचे रंगीत दिवस सरले. दोघे आपापल्या कामात नोकरीत रुजू झाले. पण दोघांनाही जाणवत होतं की आपल्याला जगातील सर्वोत्तम साथीदार मिळाला आहे. राजश्री म्हणायची देखील-
राजश्री- माझं पूर्व जन्मीचं पुण्य आहे की मला तू नवरा म्हणून भेटलास!
राजन- असा पूर्व जन्म आणि पुनर्जन्म असतो का?
राजश्री- अर्थात. असतोच.
राजन- तसं असेल तर मी माझ्या पुढल्या जन्मासाठी तुझं बुकिंग आत्ताच करून ठेवतो आणि त्यासाठी ह्या जन्मी आवश्यक असलेला पुण्यसंचय लगेच सुरू करतो. बायकोवर प्रेम करणे हे देखील पुण्याचे काम आहे. ए मला थोडं पुण्य कमवू दे ना. एक पुण्य दे ना.
तिथून पूढे पुण्य ह्या शब्दाला त्या दोघांचा असा वेगळा अर्थ निर्माण झाला. राजन चारचौघात म्हणायचा “आज पुण्य कमवायला हवं भरपूर” आणि राजश्री लाजयची!
राजनला सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. आणि अचानक तो अपघात. राजश्री क्रिटिकल. कोमात! आठवडाभर वाट बघून राजनचा धीर सुटत होता. डॉक्टर्स देखील “wait and watch” म्हणत स्पष्ट बोलणं टाळत होते हे त्याच्या लक्षात आलं होतं! राजश्रीच काही बरं वाईट झालं तर आपणही अन्नत्याग करून आयुष्य संपवायचं असा निर्णय मनाशी घेऊन राजन तिथेच आयसीयू बाहेरच्या खुर्चीवर झोपला!
राजनला पहाटे सहज जाग आली. चार साडेचारचा सुमार असावा. हॉस्पिटलच्या थंड वातावरणात विचित्र शांतता भरून राहिली होती. इतक्यात राजनला एक तेज:पुंज आकृती तरंगत आयसीयूच्या दारातून आरपार जाताना दिसली! त्याच्या हृदयात चर्रर्र झालं. त्याने मृत्यूला आत जाताना पाहिलं होतं! तो शांत बसून राहिला. मनाची तयारी करू लागला. आई वडिलांची सगळी व्यवस्था लावून एखाद्या जंगलात जाऊन अन्नत्याग करायचा विचार करत असताना त्याला राजश्री बरोबर केलेला एक वर्षाचा संसार आठवला. डोळ्यातून पाणी वाहू लागलं. त्याने डोळे मिटून घेतले. इतक्यात नर्स धावत बाहेर आली आणि म्हणाली-
नर्स- एक्स्क्यूज मी.
राजन- (मानसिक तयारीने) tell me.
नर्स- तुमच्या मिसेस शुद्धीवर आल्या आहेत आणि तुमचं नाव घेऊन पुण्य कमवा अस काहीतरी बोलत आहेत.
राजनचा कानावर विश्वास नव्हता. तो अविश्वास आणि आनंदाने म्हणाला-
राजन- क…काय? You mean ती शुद्धीवर…म्हणजे…
नर्स- येस. She is out of danger. तुम्ही त्यांना भेटा.
राजन आत गेला. राजश्री बेडवर होती. अंगभर नळ्या लावल्या होत्या. राजनला आत आलेला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. राजन ने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला. म्हणाला-
राजन- राजश्री…
राजश्री- आता थोड्या वेळापूर्वी मला स्वप्न पडलं. त्यात एक पांढरी धूसर आकृती येऊन मला म्हणाली की मी तुला न्यायला आलो होतो. पण तुझ्या नवऱ्याची प्रतिज्ञा आड येते आहे. तुला नेली तर तो देखील काही दिवसांनी तुझ्या मागे येणार. म्हणून मी तुला नाही नेऊ शकत. दोघे आता ह्या आयुष्यात अनेक वर्षे एकत्र जगा, भरपूर पुण्य कमवा आणि पुढे अनेक जन्म एकत्र राहा. असं म्हणून ती आकृती अंतर्धान पावली. मग मी शुद्धीवर आले! काय काय स्वप्न पडतात ना आपल्याला? पण काय रे तू खरच काही प्रतिज्ञा केली होतीस?
राजन हे ऐकून हादरला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. त्याने राजश्रीच हात घट्ट धरला होता. आता बाहेर सूर्य उगवत होता. आज वटपौर्णिमेचा दिवस होता. फक्त आज त्या सणाचा रंग वेगळा होता! आज एका सत्यवानाने सावित्रीचा प्राण परत आणला होता!©मंदार जोग
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023