मस्तीचेदिवस
आमच्या लहानपणी चाळीतील संडासात दिवे नसत. मग रात्री तिथे जायची गरज पडली की आम्ही रॉकेलची वात असलेला काचेचा एक दिवा नेत असू. त्याला चिमणी असे गोड नाव होते. एकदा का पहिला जोर ओसरला की मग संडासात त्या चिमणीच्या ज्योतीवर दोरे, कापूस, कागद जाळणे हा चाळीतील अनेक मुलांचा आवडीचा उद्योग होता. तिथे रागवायला कोणीच नसल्याने मुलं जाळपोळीत अगदी भान हरवून जात आणि बाहेरून “काय रे किती वेळ?” अशी आईची हाक आली की भानावर येत. ह्या जाळपोळीसाठी सर्व सामग्री जातानाच खिशातून नेली जात असे. अनेकदा रात्री संडासात जायच कारण फक्त जाळपोळच असे!
अश्या त्या रम्य दिवसात टीव्हीमधून आमच्यावर दोन भयाण आघात झाले. एक म्हणजे टीव्हीवर पाहिलेलं एक नाटक. नाव “कल्पनेचा खेळ”! त्यातील एक मोठ्या डोळ्यांची आजी हातावर काहीतरी मंतरलेली भुकटी मंत्र म्हणत घरभर उडवते, सुया टोचलेल्या काळ्या बाहुल्या असतात असं काहीतरी होत. त्याने आमचा जीव घाबरला होता. त्यात फायनल असॉल्ट करायला टीव्हीवर एक भयानक सिनेमा आला. त्याच नाव ‘हा खेळ सावल्यांचा’! त्यातील ‘काजाळ रातीनं ओढून नेला’ हे गाणं, उंच उंच माडाची झाड, भूत लागलेली केस पिंजरलेली बाई आणि नरसूच भूत आमच्या मानगुटीवर कायमचं बसलं!
त्यानंतर जाळपोळीसाठी संडासात रात्री आवर्जून जाऊन भरपूर वेळ तिथे रमणारी चाळीतील मुलं, अति आवश्यक असल्यासच रात्री संडासात जाऊ लागली. कारण संडासाच्या मागच्या खिडकीत नरसुच भूत उभं असल्याचा भास आमच्यापैकी अनेकांना झाला होता. साधं कबुतर जरी फडफडल तरी काम अर्धवट सोडून मुलं संडासातून पळ काढत!
आज चाळीतील संडासात दिवे आले, आमचं वय वाढलं. तरीही आज संडासातील बल्ब गेलेला असताना कधी रात्री संडासात जायची वेळ आली तर मागे खिडकीत नरसू उभा आहे आणि दूर कुठेतरी त्याची बायको केस मोकळे सोडून काजाळ रातीनं ओढून नेला हे गाणं गात फिरते आहे असा भास क्षणभर होऊन अंगावर शहारा येतोच!
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023