किनारा….

सिद्धिविनायकाचे तेजःपुंज तसेच लाघवी रूप डोळ्यात साठवून घेताना तिने अनेक वर्ष डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रु रीते होत होते! ज़ाहीरा हात जोडून तशीच दहा मिनिटे त्याच्यासमोर उभी होती. गणपती तोच आणि तसाच होता….अगदी चाळीस वर्षांपूर्वी होता तस्साच! पण तिचे विश्व चाळीस वर्षात खूप बदलातून गेले होते!
तिला परकर पोलक्यात देवळाच्या आवारात खेळणारी ती आठवली, इथे येताना वाडीतल्या झाडावरून खुडून रुमालात बांधून ती आणत असलेली जास्वंदाची दोन फूल आठवली, घंटांच्या गजरात इथे अनेकदा म्हटलेल्या आरत्या आठवल्या, त्यानंतर मिळणारे गोड तुळशीच्या चवीचे तीर्थ आणि साखर फुटाण्याचा प्रसाद आठवला आणि अक्का आठवली!
अक्का म्हणजे तिच्या आईची आई. बाबा लहानपणीच गेल्यावर तिच्या डोक्याने कमी असलेल्या गरीब आईने तिला आणि दोन वर्षांनी मोठ्या असलेल्या तिच्या दादा ला घेऊन खोपोलीच्या ब्राह्मण आळीतील सिंगल रूम दिराच्या हवाली करून मुंबईचे माहेर गाठले! आईच्या दोन भावांच्या दोन खोल्यातील भरल्या संसारात ह्या तिघांची भर पडली! अक्काच्या दरार्यामुळे कोणी विरोध करायचा प्रश्न नव्हता. तीन मामे भावंडांबरोबर हे दोघे नांदू लागले. मामाची मुले कोव्हेंट मधे जात आणि ही आणि दादा महापालिकेच्या शाळेत. पण शिक्षण सुरु होते. दादा डोक्याने वडिलांवर गेला होता आणि ही आईवर!!! तो चौथी पासून शिकवण्या करून स्वावलंबी बनला. ही गटांगळ्या खात जेमतेम दहावी झाली. दादा त्याच्या शिक्षण आणि करियर मधे बिझी होता, अक्का आताशा अंथरुणाला खिळलेल्या असत आणि आई काही वर्षांपूर्वी गुपचुप जग सोडून गेली होती!
मामाची मुले मजा करायची, मुली छान कपडे घालायच्या…ही मात्र दुर्लक्षित, वर्षातून मामा घेऊन देईल त्या तीन जोडी कपड्यात. नाजूक वय, अनेक प्रलोभन, कोणी फारसे विचारणारे किंवा काळजी करणारे नाही….मग व्हायच तेच झाल! चाळीतला इस्त्रीवाला, समोरचा टॅक्सीवाला…मन जुळली…तन जुळली! मग तो आयुष्यात आला. शेजारच्या काकूंचा मुंबईत शिकायला असलेला लांबचा भाचा.  खूप आधार वाटला त्याचा. लग्नाच्या आणाभाका झाल्या! लोणावळा, मार्वे, अलीबागमधे केलेली मजा उदरात जाणवू लागली! त्याने हात वर केले! ही मनातून पूर्ण कोसळली! पाप साफ करायला गेलेली असताना नवीन करियरचा मार्ग सापडला! आयुष्यात अनेक दुःखे झेललेली ती लोकांचे दुःख हलके करणारी नर्स झाली!
दोन वर्षात अक्का गेल्या! मामाच्या पोरांनी हाताला धरून हिला आणि दादाला घरातून हाकलवले. दादा बरोबर ती भाड्याच्या जागेत विरारला राहू लागली. वर्षभरात दादाने लग्न केले. त्याच्या बायकोला हिची अडचण होऊ लागली. ती पूर्ण निराधार होऊन आधार शोधत होती, डोक्यावर छप्पर शोधत होती!
इस्माईलला जन्मापासून पोलियो. बारीक सारीक कामे करणारा चाळीशीचा इस्माईल काशीमीराला रुख़्सार आणि तीन पोरांबरोबर मोमिनपुर्यातील डबल रूम मधे रहायचा. कावीळ झाली म्हणून हिच्या हॉस्पिटलमध्ये भारती झाला होता. नकर्तेपणामुळे रोज रूख्सारच्या शिव्या खाऊन कावलेला तो आणि एकाकी असलेली ही…त्यांचे समदुःखातून उपचरादरम्यान सूर जुळले…की हिने अगतिकतेतून जुळवले? ते काहीही असो! सुलभाची ज़ाहिदा झाली! रुख़्सारच्या मियांची दूसरी बेग़म बनून काशीमीर्यात राहू लागली!
रुख़सारशी जमवून घेत, नमते घेत, इस्माइलची मर्जी राखत तिने आयुष्य काढले! त्याच्या मुलांची सेवा करताना हिची कूस उजायची विसरून गेली! त्यातच मधे टीबी होऊन गेला. दादाच्या मदतीने इलाज झाला. आता दादा फक्त पैशाची गरज लागल्यास एखाद्या रेल्वे स्टेशनवर भेटून पैसे देण्यापुरता उरला होता! आयुष्याची मध्यान्ह सरून सावल्या लांबू लागल्या! हिची पंचेचाळीशी मागे पडली!
सहा महिन्यापूर्वी इस्माईल कँसरने गेला! शेवटच्या दिवसात हिने त्याचे खूप केले! आता त्याच्या मुलांचे संसार सुरु होणार होते! जागा रुख्सारच्या नावावर होती! ही परत एकाकी…
अश्याच एका एकाकी क्षणी विधात्याला स्मरताना तिला जाणवले की नाव बदलले, वातावरण बदलले, भाषा बदलली पण काही केल्या श्रद्धा बदलत नव्हती! कपाळावराचे कुंकु गेले तरी जास्वंदीच्या फुलाचा मनावर चढलेला लाल रंग काही केल्या मिटत नव्हता! प्रार्थना करायाला डोळे मिटले की समोर सिद्धिविनायकच दिसे! निकाह झाल्या दिवसापासून आजतागायत!
एक दिवस मनाने उचल खाल्ली! कोणतीतरी अद्भुत शक्ती मागे उभी असल्यासारखे वाटत होते. कसलीतरी ओढ जाणवत होती. तिने निर्धार केला!  नेसल्या वस्त्रानीशी घर सोडले. तिच्या जाण्याचा इथेपण सर्वांना आनंदच होता! ती दादर स्टेशनवर उतरली! सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर मंगळवारी लागलेल्या स्टॉलवरून एक नारळ फुलाचा ट्रे घेतला! चपला काढून, पाय धुवून ती देवळात आली!
….सिद्धिविनायकाचे तेजःपुंज तसेच लाघवी रूप डोळ्यात साठवून घेताना अनेक वर्ष डोळ्यात साठवून ठेवलेले अश्रु रीते होत होते! ज़ाहीरा…..की सुलभा? देवाला फरक पडत नव्हता. ती हात जोडून तशीच दहा मिनिटे त्याच्यासमोर उभी होती. तिला एका असीम आनंदाची अनुभूती होत होती! जाती, धर्म ह्यांच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून मनात खोलवर रुजलेल्या श्रद्धेची, समर्पणाची, विश्वासाची अनुभूती! बाप्पाच्या मुकुटात तिने वाहिलेले लालचुटुक जास्वन्द खुलत होते. “तू इथेच रहा. इथेच तुझ्या जन्माचे कल्याण होईल.” जणू असे म्हणत बाप्पा मंद हसत होता….. वर कुठेतरी अक्कांचा सुरकुतलेला चेहरा अश्रु पुसत थरथरत्या हाताने आशीर्वाद देत होता….पूर्वार्ध फक्त कष्टात सरलेल्या तिला सिद्धिविनायकाच्या सेवेतच आयुष्याचा आनंदी उत्तरार्ध दिसत होता…तिला बाप्पाचाच किनारा मिळाला होता!……मंदार जोग
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!